अटीतटीच्या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी संघर्ष करणाऱ्या युवकांच्या आत्महत्यांना सरकारी धोरणांपासून सामाजिक वातावरणापर्यंत अनेक गोष्टी कारणीभूत आहेत.

९५ टक्क्यांहून अधिक गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांचीच चिंता अधिक आहे, तोवर काठावर उत्तीर्णाच्या आणि अनुत्तीर्णाच्या जगण्याचे भकासपण समाजाला समजू शकणार नाही..

Congestion at Chitnis Park Chowk raises safety concerns for New English Medium School students
गजबजलेला चौक, वर्दळीचा रस्ता अन् विद्यार्थ्यांची घरी जाण्यासाठी घाई, न्यू इंग्लिश शलेसमोरील दृश्य…
24th October 2024 Horoscopes In Marathi
24 October Horoscope : गुरुपुष्यामृत योग कोणत्या राशींसाठी…
प्रवेशाची पायरी : ‘आयआयटी’मध्ये ‘डिझाइन’ पदवी सीईटी
Girl Student suicide hostel Chembur, suicide Chembur,
मुंबई : चेंबूरमधील शासकीय वसतिगृहात विद्यार्थिनीची आत्महत्या
out of 40 open batch seats only 26 students selected for overseas scholarships
परदेशी उच्च शिक्षण शिष्यवृत्तीसाठी खुल्या गटातील २६ विद्यार्थ्यांची निवड; पीएच.डी.साठी एकमेव विद्यार्थी
11th Admission, seats vacant, Mumbai, loksatta news,
अकरावी प्रवेश : दैनंदिन गुणवत्ता फेरीअंती जवळपास १ लाख ३४ हजार जागा रिक्त, द्विलक्षी विषयासाठी ७ ऑक्टोबरपर्यंत प्रवेश
CET, new colleges in third round, CET news,
तिसऱ्या फेरीत नव्या महाविद्यालयांतील जागांचा समावेश ? सीईटी कक्षाचे संकेत; दुसऱ्या फेरीला ६ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
girls admission vocational courses, girls Maharashtra admission,
राज्यातील १ लाख ३९ हजार मुलींनी घेतला व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश, ‘या’ अभ्यासक्रमांना सर्वाधिक पसंती

ज्या वयात उज्ज्वल आयुष्याची स्वप्ने बघायची, लाथ मारीन तिथे पाणी काढीन ही वृत्ती बाळगायची, जगावर स्वार व्हायची महत्त्वाकांक्षा बाळगायची त्या वयातील कोवळी, तरुण मुले शिक्षणव्यवस्थेच्या रहाटगाडग्याला कशी जुंपली जातात, पालकांच्या आणि बाजारबुणग्यांच्या महत्त्वाकांक्षेची कशी बळी ठरतात, याचे अत्यंत वास्तववादी चित्रण कोटा फॅक्टरी या वेबमालिकेमध्ये मांडण्यात आले आहे. स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रातील बाजाराचे हे चित्रण खोटे, अतिरंजित, अवास्तव अजिबात नाही, हे कोटा या शहरातील शिकवणी वर्गामध्ये शिकणाऱ्या १४ विद्यार्थ्यांनी गेल्या वर्षभरात केलेल्या आत्महत्यांमधून म्हणता येते. याला एकीकडे कारणीभूत आहे, ते डॉक्टर, इंजिनीअर, सरकारी अधिकारी या व्यवसायांना भारतीय समाजात आजही असलेले वलय. जगण्याच्या कक्षा गेल्या ५० वर्षांमध्ये रुंदावल्या आहेत, व्यवसाय क्षेत्रे कमालीची विस्तारली आहेत, पण तरीही उपजीविकेसाठी या व्यावसायिक अभ्यासक्रमांकडे असलेला विद्यार्थ्यांचा ओढा अनाकलनीय आहे.  या अभ्यासक्रमांना प्रवेश मिळणे ही मोठी अवघड गोष्ट बनून राहिली आहे.

   वैद्यकीय अभ्यासक्रमाची (एमबीबीएस) देशातील एकूण प्रवेशसंख्या आहे, ९६ हजार आणि त्यासाठी नीट या प्रवेश परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या आहे तब्बल साडेसतरा लाख. देशातील आयआयटी संस्थांमधील एकूण प्रवेशसंख्या साडेसोळा हजार, तर तेथील आणि अन्य अभियांत्रिकी, वास्तुकला, तंत्रज्ञान अशा अभ्यासक्रमांसाठी जेईई ही प्रवेश परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या दहा लाख. राजस्थानमधील कोटा हे शहर केवळ अशा व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षांची तयारी करून घेण्याच्या व्यवस्थेबद्दल ओळखले जाऊ लागले, त्याला आता बरीच वर्षे झाली. जेईई आणि नीट या प्रवेश परीक्षांच्या तयारीसाठी कोटा येथील निवासी शिकवणी वर्गात नुसता प्रवेश मिळवण्यासाठीही मोठी स्पर्धा असते. खासगी महाविद्यालयांना लाजवतील अशा भव्य इमारती, तेथील टापटीप, करडी शिस्त, प्रचंड प्रमाणातील शुल्क या सगळय़ामुळे कोटा शहरातील या शिकवणी वर्गाचे अवघ्या काही वर्षांतच औद्योगिकीकरण झाले.   

कोटा शहराची अर्थव्यवस्था या शिक्षणातील नव्या उद्योगामुळे फोफावू लागली खरी, परंतु तेथे प्रवेश मिळाल्यानंतरही यशाची हमी नसल्याने विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांचे प्रमाण वाढत चाललेले दिसते. निवासी शिकवण्यांचे अवाढव्य दर, शिकवणी वर्गात शिकवून कोटी रुपयांमध्ये पगार मिळवणारे अध्यापक, शिकवणी वर्गामधील राजकारण, विद्यार्थी पळवापळवीची जीवघेणी स्पर्धा यामुळे या शहरातील सगळे वातावरणच गेल्या काही वर्षांत बदलून गेले. अर्थात हे सगळे केवळ कोटा शहरातच घडते, असे नाही.

एकीकडे तरुण नागरिकांची सर्वाधिक संख्या असणारा तर दुसरीकडे तरुण निराशेच्या गर्तेत सर्वाधिक प्रमाणात अडकत असलेला अशी या देशाची ओळख बनू लागली आहे. व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशाची संख्या मर्यादित असल्याने विद्यार्थ्यांवरील ताण अधिक वाढत राहतो. त्यातही सरकारी संस्थांमध्ये अधिक शुल्क न भरता प्रवेश मिळवण्यासाठीचा आटापिटा अधिक. कारण तेथील जागा अतिशय कमी. अशा परिस्थितीत अनेक जण परदेशाची वाट धरतात. तेही शक्य न होणाऱ्यांना या तणावाला तोंड देणे भाग पडते. सलग काही काळ घरापासून लांब राहणे, शिकवणी वर्गाचे असह्य वेळापत्रक, अभ्यासात मागे पडण्याची भीती, त्यापोटी तेथील परीक्षा आणि अभ्यासक्रमाला जुंपून घ्यावे लागणे यातून ही तरुण  मुले कधी निराशेच्या खाईत जातात, ते त्यांनाही समजत नाही. आईवडिलांच्या महत्त्वाकांक्षा, सहाध्यायांमुळे येणारा दबाव, शिक्षणाची बाजारपेठ सुरू राहण्यासाठी शिकवणी वर्गानी तयार केलेली तटबंदी या सगळय़ाच्या पलीकडे काही जीवन असते, तिथेही जगण्याचा आनंद असतो, एखादी गोष्ट जमली नाही तर ती बाजूला ठेवून तुम्ही दुसरे काही अजमावू शकता आणि आनंदाने जगू शकता, स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होणे म्हणजेच यशस्वी होणे नाही हे त्या भाबडय़ा जीवांना समजत नाही. त्यांना ते न समजण्यातच अनेकांचा स्वार्थ असल्यामुळे त्यांना ते समजावून सांगण्याच्या फंदातही कुणी पडत नाही. त्यातूनच कोटासारख्या शिकवणी वर्गाच्या फॅक्टऱ्या नुसत्या उभ्या राहात नाहीत, तर फोफावतात. मूळ व्यवस्थेचे तीनतेरा वाजल्यानंतर बांडगुळांचे फावते, तसाच हा प्रकार.

 शैक्षणिक क्षेत्रातील आत्महत्यांचे मुख्य कारण पुरेशा प्रमाणात प्रवेशसंख्या नसणे हे आहे. १३० कोटींच्या आपल्या देशातील २५ वर्षांखालील शिक्षणयोग्य विद्यार्थ्यांचे प्रमाण ५३.७ टक्के आहे. त्यातील बहुसंख्य विद्यार्थी पुरेशी कौशल्ये आत्मसात करू न शकल्याने रोजगाराच्या परिघाबाहेर राहतात. वैद्यकीय, अभियांत्रिकी, वास्तुकला, तंत्रज्ञान यापलीकडे लोकसेवा परीक्षा, चार्टर्ड अकौन्टन्सी यांसारख्या परीक्षांना देशातील लाखो विद्यार्थी तोंड देत असतात. वयाच्या चाळिशीपर्यंत लोकसेवा परीक्षा देऊनही त्यात यश न मिळणाऱ्यांची संख्या प्रचंड म्हणावी इतकी असते. मुलाने कलेक्टर व्हावे, म्हणून पोटाला चिमटा घेत, प्रसंगी जमीनजुमला, सोनेनाणे विकून त्याला शहराकडे पाठवणाऱ्या आईबापांना आपली घालमेल समजू नये अशी मुलांची धडपड असते. अशा मानसिक अवस्थेत स्वत:ला आणि आपल्या पालकांनाही फसवत जगणे अनेक वेळा अडचणीचे ठरू लागते. मग स्वत:चे अपयश स्वीकारण्यापेक्षा मृत्यूला कवटाळण्याचा मार्ग अवलंबला जातो. कोटामध्ये आत्महत्या करणाऱ्या विद्यार्थ्यांची वर्षभरातील संख्या १४ असेल तर तिथे असलेल्या आणि नैराश्याने ग्रासलेल्या विद्यार्थ्यांची संख्या किती असेल याची तर गणतीच न केलेली बरी.

नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरोच्या २०२० या वर्षांतील आकडेवारीनुसार दिवसाला ३४४ विद्यार्थी आत्महत्या करतात. याचा अर्थ दर ४२ मिनिटाला एक. हा अहवाल असेही सांगतो, की देशात आत्महत्या करणाऱ्या युवकांचे प्रमाण ८.२ टक्के एवढे आहे. शिक्षित, रोजगारक्षम मुलांचे हे वास्तव युवकांच्या मानसिक अस्थिरतेचे गांभीर्य अधिक वाढवते. मात्र हा विषय सरकार आणि समाज यांच्या दृष्टीने अद्यापही महत्त्वाचा दिसत नाही. शिक्षणावर होणारा तुटपुंजा खर्च, अपुरी प्रवेशसंख्या, शिक्षणाचा दर्जा, शिक्षित होऊनही रोजगार न मिळण्याची भीती ही कारणे सगळय़ात ‘उपयुक्त’ असलेल्या युवकांना भेडसावत असतील, तर देशाच्या प्राधान्यक्रमात त्याचे स्थान वरचे असायला हवे.

कोटामधील विद्यार्थ्यांच्या या आत्महत्यांकडे केवळ सहानुभूतीने पाहणे आत्मवंचना ठरेल. किमान हुशारी कमावलेल्या युवकांना परिसरातील वातावरण घाबरवून सोडत असेल, तर त्यासाठी तातडीने पावले उचलणे आवश्यक आहे. जोवर समाजातील सर्व स्तरांत ९५ टक्क्यांहून अधिक गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांचीच चिंता अधिक प्रमाणात आहे, तोवर काठावर उत्तीर्ण आणि अनुत्तीर्णाच्या जगण्याचे भकासपण समाजाला समजू शकणार नाही. अशा विद्यार्थ्यांचे प्रमाण सर्वाधिक आहे, हे लक्षात घेतले, तर या प्रश्नाचे गांभीर्य लक्षात येईल. अटीतटीच्या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी संघर्ष करणाऱ्या युवकांच्या आत्महत्यांना सरकारी धोरणांपासून  सामाजिक वातावरणापर्यंत अनेक गोष्टी कारणीभूत आहेत. यशाच्या भौतिकतेच्या जंजाळात तरुणाईला होरपळत ठेवण्याने भविष्याच्या उज्ज्वलतेच्या महत्त्वाच्या संधी गमावण्याने फार मोठे नुकसान होणार आहे, याकडे सर्वच घटकांनी लक्ष देण्याची आत्यंतिक गरज आहे. उत्तम पदवी घेऊनही मिळेल ते काम करावे लागणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. ही मुले कोटाला गेली नसतील, तेथील शिकवणी वर्गापर्यंत पोहोचली नसतील, पण अंगभूत कौशल्याला वाव देऊ न शकणाऱ्या, नुसते पदवीधर निर्माण करणाऱ्या ‘शिक्षणाच्या फॅक्टरी’चीच बळी आहेत.