..या यशाच्या स्वागतासाठी खरी गरज आहे बुद्धीपुढे नतमस्तक होणाऱ्या नम्रतेची. तथापि ‘‘इंडिया काँकर्स द मून’’, ‘‘भारताने चंद्र काबीज केला’’ इत्यादी कर्कश मथळय़ांतून नेमका तिचाच अभाव तूर्त दिसतो.
‘‘हायड्रोजनचे दोन रेणू आणि ऑक्सिजनचा एक कोणत्याही कुमुहूर्तावर एकत्र आले तरी त्यातून पाणी होणारच’’; अशा अर्थाचे विधान सावरकर करतात. याचा अर्थ शास्त्रकाटय़ाच्या कसोटीवर, शास्त्रीय नियमांच्या आधारे एखादी गोष्ट केली जात असेल तर तिच्या यशासाठी मुहूर्त, अभिषेक, अनुष्ठाने इतकेच काय पण आशीर्वादाचीही गरज नसते. भारतीय अवकाश संशोधन संस्थेच्या तिसऱ्या ‘चंद्रयान’ मोहिमेचे यश हे या शुद्ध शास्त्रीय बाण्यात दडलेले आहे. या देदीप्यमान यशासाठी विज्ञानावर निष्ठा असलेल्या आणि त्यानुसार मार्गक्रमण करणाऱ्या सर्व शास्त्रज्ञ, अभियंते, तंत्रज्ञ यांचे मन:पूर्वक अभिनंदन. ज्या देशास ‘साप-गारुडय़ांचा प्रदेश’ असे हिणवले जात होते त्या देशाने अवकाश विज्ञानाच्या क्षेत्रात इतकी उंच भरारी घ्यावी ही बाब सर्वार्थाने विलक्षण कौतुकास्पद. सुमारे सहा हजार किमी प्रति तास इतक्या महाप्रचंड वेगात आपली परिक्रमा पूर्ण करणाऱ्या यानाचा वेग फक्त १० किमी प्रति तास इतका कमी करणे आणि आडवे धावणाऱ्यास अचानक उभे करून पृष्ठभागावर उतरवणे हे कल्पनाही करता येणार नाही इतके प्रचंड आव्हान इस्रोच्या वैज्ञानिकांनी यशस्वीपणे पेलले. कोणत्याही विज्ञानप्रेमींसाठी हा आनंद शब्दांत व्यक्त करता येणार नाही, इतका मोठा ठरतो.
या यशामुळे चंद्रावर अत्यंत नियंत्रितपणे पाऊल ठेवण्याची क्षमता असणाऱ्या जगातील तीन देशांत भारताचा समावेश होईल. हे अद्वितीय यश मिळविणारे आपण चौथे. या यशाचे अप्रूप किती हे लक्षात घेण्यासाठी एकच आकडेवारी पुरेशी ठरावी. गेल्या सुमारे ७० वर्षांत विविध देशांनी जवळपास १११ चंद्रमोहिमा हाती घेतल्या. त्यापैकी फक्त आठ यशस्वी ठरल्या. आजची आपली नववी. या चंद्रयान मोहिमेची मुहूर्तमेढ रोवली गेली ती २००८ साली. त्यासही कारण ठरली ती २००३ साली चीनने यशस्वीरीत्या मानवांस अवकाशात पाठवले ती घटना. चीनच्या त्या यशामुळे असे काही आपण करावयास हवे असे तत्कालीन सत्ताधीशांस वाटले आणि त्यातून चंद्रयान मोहीम हाती घेतली गेली. त्यानंतर पाच वर्षांनी २००८ साली कोणताही बडेजाव, समारंभीकरण इत्यादी न करता त्यावर्षी पहिले यान चंद्राकडे झेपावले. त्या यानाकडून एक वर्षभर चंद्रपृष्ठभाग आदींची माहिती प्रक्षेपित केली जाणे अपेक्षित होते. तशी त्याने ती केली. जवळपास ३२० दिवस त्या यानाने आपले काम चोख बजावले. त्या एकाच वर्षी, म्हणजे २००८ साली, आपल्या अवकाश संशोधकांनी ११ उपग्रह प्रक्षेपित केले आणि यात अत्यंत महत्त्वाची बाब अशी की त्यातील १० उपग्रह हे एकाच प्रक्षेपकाने अंतराळात सोडले. याचा अर्थ पुन:पुन्हा वापरता येतील असे प्रक्षेपक-म्हणजे रॉकेट्स-विकसित करण्यात भारतीय वैज्ञानिकांना यश आले. तरीही या अभूतपूर्व यशाचे ढोल पिटले गेले नाहीत, ही बाब तितकीच कौतुकाची.
याचे कारण विज्ञान ना कधी अपयशी ठरते ना त्यातील यश कधी अंतिम असते. विज्ञान ही अखंड चालणारी प्रक्रिया आहे. त्यामुळे वैज्ञानिक विश्व एखाद्या अपयशाने माना टाकत नाही आणि यश मिळाले म्हणून ‘गर्व से कहो..’च्या उन्मादी अवस्थेत जात नाही. म्हणूनच पहिल्या चंद्रयान मोहिमेनंतर ११ वर्षांनी २०१९ साली हाती घेण्यात आलेली दुसरी मोहीम फसली तरी वैज्ञानिकांचा आत्मविश्वास तसूभरही कमी झाला नाही. सतत शिकणे, अपयशी होणे आणि अपयशांतून शिकत पुन्हा प्रयोग करणे यावर(च) विश्वास ठेवणाऱ्या विज्ञानविश्वाने आपले काम तसेच सुरू ठेवले. त्याचे फळ आज चंद्रावर अलगदपणे उतरलेल्या भारतीय यानाच्या रूपाने आपणास मिळाले. या यशाच्या स्वागतासाठी खरी गरज आहे बुद्धीसमोर नतमस्तक होणाऱ्या नम्रतेची. तथापि तिचाच नेमका अभाव तूर्त दिसतो. ‘‘इंडिया काँकर्स द मून’’, ‘‘भारताने चंद्र काबीज केला’’ इत्यादी कर्कश मथळे यांतून हा नम्रतेचा अभाव आणि मूर्खपणाचा प्रादुर्भाव दिसून येतो.
विज्ञानाच्या क्षेत्रात काहीही काबीज होत नाही. अवकाशाबाबत तर नाहीच नाही. सुमारे ५४ वर्षांपूर्वी, २० जुलै १९६९ या दिवशी मानवाने पहिल्यांदा चंद्रावर पाऊल ठेवले ती अमेरिकेच्या ‘अपोलो’ची ११ वी फेरी होती. नील आर्मस्ट्रांग हा सदेह चंद्रावर उतरला तरी अमेरिकेस चंद्र काबीज केला असे काही वाटले नाही. इतक्या प्रचंड यशानंतरची अपोलोची १३ वी चंद्रवारी यशस्वी ठरली नाही, ही बाब दुर्लक्ष करावी अशी नाही. याचा अर्थ असा की विज्ञानात कोणतेही यश हे गगनास गवसणी घालणारे नसते. याचे कारण विज्ञान हा विचार आहे. आणि अन्य कोणत्याही विचाराप्रमाणे प्रत्येक पिढीने त्यात आपली भर घालून तो पुढच्या पिढीकडे द्यावयाचा असतो. म्हणून ही चिरंतन चालणारी प्रक्रिया असते.
‘इंडियन नॅशनल कमिटी फॉर स्पेस रिसर्च’च्या रूपाने १९६२ साली हा विचार जन्मला आणि त्याचेच रूपांतर पुढे ‘इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन’ म्हणजे ‘इस्रो’त झाले. पुढे मंत्रिमंडळात यासाठी स्वतंत्र खाते निर्माण केले गेले. त्याआधी होमी भाभा यांच्यासारख्या शुद्ध विज्ञानवाद्याहाती अशा विषयांची सूत्रे देण्याचा मोठेपणा नेतृत्वाने दाखवलेला होता. या इतिहासाची या प्रसंगी उजळणी करायची याचे कारण वैज्ञानिकांस कसे महत्त्व द्यावयाचे असते लक्षात यावे म्हणून. या प्रक्रियेतून १९७५ साली आपला ‘आर्यभट्ट’ अवकाशात झेपावला. अमेरिकेने त्यावेळी तंत्रज्ञान हस्तांतरित करण्यास नकार दिला होता. असे असताना भारतीय अभियंत्यांनी क्रायोजेनिक इंजिनांचा विकास स्वबळावर करून दाखवला. शून्याखाली १५० अंशावर राखले जाणारे इंधन जाळून गतीज ऊर्जा देऊ शकणारी इंजिने क्रायोजेनिक नावाने ओळखली जातात. यांची निर्मिती अत्यंत महत्त्वाची. याचे कारण अवकाश प्रवासात मोठमोठय़ा इंधनटाक्या असलेली वाहने प्रक्षेपित करणे अवघड. त्यासाठी कमीतकमी जागेत अधिकाधिक इंधन साठवण्याची, ते वाहून नेण्याची आणि वर ते जाळण्याची क्षमता हवी. १९७०-८० च्या दशकांत भारतीय अभियंत्यांनी ती विकसित केली. भारतीय अवकाश यशोगाथेचा हा दुसरा पाया.
आजच्या चंद्रयान यशात या क्रायोजेनिक इंजिनाच्या यशाचा वाटा अत्यंत निर्णायक ठरला. त्याचे महत्त्व किती? चंद्रावर प्रत्यक्ष उतरण्यापूर्वी चंद्रयानाने तब्बल ५५ लाख किमी अंतर प्रवास केला, या तपशिलातून ही बाब लक्षात येईल. आता त्याच्या पोटातून बाहेर पडलेल्या वाहनातून चंद्राच्या पृष्ठभागाचा अभ्यास होईल आणि त्यावर पाणी आहे किंवा काय याची माहिती मिळेल. या संदर्भात वृत्त देताना अवकाशस्पर्धा, त्यात भारताची आघाडी इत्यादी शब्दप्रयोग सर्रासपणे केले जाताना दिसतात. ते अज्ञानमूलक आहेत. याचे कारण ही स्पर्धा फक्त ज्ञानलालसेची आहे. चंद्रावर वा मंगळावर आपण गेलो म्हणजे तो प्रदेश आता आपला झाला वा तेथील खनिजे आता आपणास आपल्यासाठी येथे आणता येतील असे काहीही होणार नाही.
अवकाश संशोधन हा विज्ञानाचा सामुदायिक प्रयास असतो आणि त्यात एकाच्या यशावर दुसऱ्याचा प्रवास होत असतो. आणखी एक बाब महत्त्वाची. अवकाशात सीमा नसतात. त्यामुळे हा आपला, हा तुमचा वा ‘त्यांचा’ असे करता येत नाही. शेकडो अब्ज किलोमीटरवर असलेले हे अवकाश आणि त्या अजस्र विश्वाच्या पसाऱ्यात एक टिंब असलेल्या पृथ्वीवर अवकाशाची लांबी-रुंदी-खोली याचा कसलाही अंदाज नसलेले आपण! खरे तर या विश्वरूप दर्शनाने अज्ञानाची जाणीव होऊन आपण खरे तर खजील व्हायला हवे!! ते राहिले दूर. उलट पृथ्वीवरील क्षुद्र हेवेदावे अवकाशातही आपण नेणार असू तर तो चंद्रयानाचा आणि समस्त विज्ञानाचाच अपमान ठरेल. या चंद्रमाधवीच्या प्रदेशात आता कोठे आपण पहिले पाऊल टाकले आहे. प्रवास आता कोठे सुरू झाला आहे. तो असाच सुरू राहावा यासाठी चंद्रयान अधिकाधिक विज्ञानवृत्ती जागवेल ही आशा.