एखादा खेळाडू खेळाचे सौंदर्य वाढवत असेल, पण तो खेळापेक्षा मोठा नसतो, हे सांगणारे ‘सांतोस’ आपल्याकडे कधी निपजतील?
आपल्याकडे खेळाडूंना निवृत्तीची वेळ आणि जागाही ठरवण्याचे स्वातंत्र्य दिले जाते. व्यक्तिपूजा आणि वलयासक्ती मुरलेल्या समाजात यापेक्षा वेगळे काही अपेक्षित नाही..!
फर्नाडो सांतोस यांना लवकरात लवकर भारतात बोलावून त्यांचा जाहीर सत्कार करण्याची नितांत गरज आहे. ते खुलेपणाने व उत्तम अभिव्यक्त होणाऱ्यांतले नाहीत, नाही तर त्यांचे छानसे भाषणही आयोजित करता आले असते. पण.. कोण हे फर्नाडो सांतोस? तर ते आहेत पोर्तुगालच्या फुटबॉल संघाचे विद्यमान प्रशिक्षक. पोर्तुगालचा संघ विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत शनिवारी रात्री उपांत्यपूर्व फेरीचा सामना खेळेल. परंतु केवळ त्या संघाच्या येथवरच्या वाटचालीबद्दल सांतोस सत्कारयोग्य ठरू शकत नाहीत. मग त्यांचे कर्तृत्व काय? तर, पोर्तुगालचा सर्वोत्तम फुटबॉलपटू, जगभरातील कोटय़वधी फुटबॉलरसिकांचा लाडका ख्रिस्तियानो रोनाल्डो याला विश्वचषक स्पर्धेत दुसऱ्या फेरीच्या सामन्यात वगळण्याची धमक सांतोस यांनी दाखवली. इतकेच नव्हे, तर त्याच्या अनुपस्थितीत उतरवलेल्या पोर्तुगीज संघाने प्रतिस्पर्ध्यावर (स्वित्झर्लंड) अर्धा डझन गोल डागून दिमाखात उपांत्यपूर्व फेरीही गाठून दाखवली. रोनाल्डोला वगळण्याची जोखीम कदाचित अंगाशी आली असती. किंवा पोर्तुगाल त्या सामन्यात पिछाडीवर पडता, तर नाइलाजाने रोनाल्डोला मैदानात उतरवून चुकीची कशीबशी उतराई करण्याची वेळ सांतोस यांच्यावर आली असती. दिएगो मॅराडोना जसा अर्जेटिनात, तसा रोनाल्डो पोर्तुगालमध्ये फुटबॉल दैवत. मॅराडोनाला असा मान मिळाल्यामुळे ती जागा लिओनेल मेसीला लाभत नाही. पण पोर्तुगालमध्ये कोणी मॅराडोना नव्हता. तेव्हा सांतोस यांच्या कृतीमागील धाडस समजून घेण्यासाठी प्रथम ख्रिस्तियानो रोनाल्डो ही काय वल्ली आहे, ते समजून घेणे क्रमप्राप्त ठरते.
२००४ मध्ये पोर्तुगालला युरो स्पर्धा झाली. त्या स्पर्धेत विशीही न ओलांडलेल्या रोनाल्डोने पोर्तुगालकडून पदार्पण केले. नवीन सहस्रकाच्या सुरुवातीला पोर्तुगालकडून अनेक उत्तमोत्तम फुटबॉलपटू खेळत होते. यांतील बहुतेक (उदा. लुइस फिगो) पोर्तुगालच्या युवा जगज्जेत्या संघाचे सदस्य होते. युवा संघाचे यश पुढे वरिष्ठ संघाकडूनही पाहायला मिळेल, अशी पोर्तुगीज फुटबॉलप्रेमींची अपेक्षा होती. ती पूर्ण झालीच नाही. २००४ मध्ये त्यांचा संघ युरो स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचला. घरच्या मैदानावर अंतिम सामना आणि समोर ग्रीससारखा फुटबॉलमधील नवोदित संघ. काही तरी जिंकण्याची शक्यता आणि संधी त्या वेळी सर्वाधिक होती. पण तरीही पोर्तुगालचा संघ ग्रीसकडून पराभूत झाला. ख्रिस्तियानो रोनाल्डोचे आगमन पोर्तुगाल आणि विश्व फुटबॉल आसमंतात झाले, ते अशा निराशामय वातावरणात. तोपर्यंत तो इंग्लंडच्या मँचेस्टर युनायटेड क्लबकडून निष्णात फुटबॉलपटू म्हणून ओळखला जाऊ लागला होता. नवीन सहस्रकातील पहिल्या दशकाच्या उत्तरार्धात तो आणि लिओनेल मेसी यांनी क्लब फुटबॉलमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी केली. त्यामुळे फुटबॉलमधील विद्यमान महानतम खेळाडू कोण, या मुद्दय़ावर या दोघांमध्ये तुलना सुरू झाली. तुलनेचा हा खेळ आजतागायत सुरू आहे. यात उल्लेखनीय बाब म्हणजे, मेसी बहुतांश काळ बार्सिलोना या एका क्लबकडून खेळला आणि चमकला. याउलट रोनाल्डो मँचेस्टर युनायटेड, स्पेनचा रेआल माद्रिद, इटलीचा युव्हेंटस, पुन्हा मँचेस्टर युनायटेड अशा विविध क्लबांकडून खेळला. अशा बहुसांघिक कारकीर्दीमध्ये सातत्य राखणे अधिक आव्हानात्मक असते. रोनाल्डोची कारकीर्द झळाळती आहे हे नि:संशय. पाच वेळा ‘बॅलन डी ओर’ हा फुटबॉलमधील सर्वोच्च वैयक्तिक वार्षिक पुरस्कार त्याने पटकावला, त्याच्या जोडीला खंडीभर क्लब आणि चॅम्पियन्स लीग अजिंक्यपदे, पोर्तुगालसाठी एक युरो आणि एक युएफा नेशन्स लीग अजिंक्यपद. आता मेसी आणि रोनाल्डोला इतक्या झळाळत्या कारकीर्दीतही आपापल्या देशांसाठी विश्वचषक जिंकून देता आलेला नाही ही बाब सध्याच्या सेलेब्रिटी संस्कृतीत गौण ठरते हा भाग अलाहिदा.
पोर्तुगालसाठी रोनाल्डो मध्यंतरीच्या काळात अतिशय महत्त्वाचा होता. परंतु रोनाल्डोमुळेच पोर्तुगालने गेल्या १५-२० वर्षांत प्रगती केली, असे मानणे सत्यापलाप ठरेल. पोर्तुगालच्या समृद्ध फुटबॉल संस्कृतीचा आढावा घेण्यापूर्वी एक महत्त्वाची नोंद. २०१६ मध्ये युरो स्पर्धेच्या अंतिम सामन्यात रोनाल्डोला २५ व्या मिनिटालाच दुखापतीमुळे मैदान सोडावे लागले. समोर होता फ्रान्सचा बलाढय़ संघ, त्यांच्या घरच्या मैदानावर खेळणारा. त्या वेळी पोर्तुगीज संघाचे प्रशिक्षक होते, फर्नाडो सांतोस! रोनाल्डोच्या अनुपस्थितीत निर्धारित वेळेत पोर्तुगालने फ्रान्सला गोलशून्य बरोबरीत रोखून धरले. अतिरिक्त वेळेत बदली खेळाडू म्हणून सांतोस यांनी पाठवलेल्या एडर या युवा खेळाडूने पोर्तुगालतर्फे सामन्यातला एकमेव, निर्णायक गोल झळकावला. रोनाल्डो साइडलाइनवरून त्याच्या संघाला अनेक सूचना करत होता. त्या वेळी सांतोस शांत होते. त्यांनी अखेरचा हुकमी एक्का म्हणून एडरला पाठवले आणि त्याने गोल झळकावला. रोनाल्डो त्याही सामन्यात अल्प काळ खेळला. पण त्याच्या अनुपस्थितीने सांतोस किंवा मैदानावर खेळणारे पोर्तुगालचे खेळाडू विचलित झाले नाहीत. याचे कारण रोनाल्डो म्हणजे पोर्तुगाल असे समीकरण झुगारून देण्याइतकी गुणवत्ता त्या संघात तेव्हा होती नि आजही आहे. रोनाल्डोच्या उदयाबरोबरच पोर्तुगालचा नवोदय होऊ लागला होता. हा संघ आंतरराष्ट्रीय स्पर्धामध्ये चांगली कामगिरी करून दाखवू लागला होता. युरोपातील जर्मनी, फ्रान्स, इटली, स्पेन, इंग्लंड, नेदरलँड्स या देशांच्या फुटबॉल गुणवत्तेविषयी चर्चा होत असते. या देशांची महत्त्वाच्या स्पर्धेत कामगिरी उत्तम म्हणावी अशीच. तितक्या जोरकसपणे पोर्तुगालच्या कामगिरीचा उल्लेख होत नाही. परंतु नवीन सहस्रकात बेन्फिका, पोटरे, स्पोर्टिग असे अनेक महत्त्वाचे क्लब तेथे उदयाला आले. युवा अकादमीच्या माध्यमांतून रोनाल्डोइतकीच गुणवत्ता असलेले असंख्य तरुण तेथे उदयाला आले. सर्वानाच रोनाल्डोइतकी प्रसिद्धी वा यश मिळू शकले नाही. तरी एक संघ म्हणून पोर्तुगालच्या बांधणीत त्यांचे योगदान अमूल्य आहे.
मुरब्बी सांतोस हे ओळखून आहेत नि त्या दिवशीही होते. रोनाल्डो पोर्तुगालसाठी खेळत नाही. तो क्लबसाठी किंवा प्रेक्षकांसाठीही खेळत नाही. रोनाल्डो हा रोनाल्डोसाठी खेळतो! त्याच्या ठायी अफाट कौशल्य, असीम ऊर्जा, तल्लख बुद्धी, अचाट तंदुरुस्ती वगैरे सारे काही आहे. पण त्याचा मैदानावरील वावर स्वयंभू असतो. कोणी कुठे खेळावे, कसे खेळावे ही चौकट त्याला मान्य नाही. त्याचा चौकटीबाहेरील असा स्वैर-स्वयंभू वावर सांतोस यांना मान्य नाही. तसाच तो अमान्य होता मँचेस्टर युनायटेडचे प्रशिक्षक एरिक तेन हाग यांना. त्यांनी रोनाल्डोला खेळवणेच बंद केले, तेव्हा रोनाल्डो वैतागून तेथून बाहेर पडला. रोनाल्डोसारखे खेळाडू खेळाचे सौंदर्य वाढवत असतील, त्यातून स्वत:ला अढळपद असल्याचे धरून चालत असतील. पण ते खेळापेक्षा मोठे नसतात. फुटबॉलसारख्या सांघिक खेळात तर नाहीच नाही. सांतोस रोनाल्डोच्या विरोधात नाहीत. त्याची गुणवत्ता त्यांना ठाऊक आहे आणि या स्पर्धेत अजूनही तो पोर्तुगालसाठी चमत्कार करू शकतो, ही जाणीवही त्यांना आहे. पण त्यांनी रोनाल्डोला त्याची ‘जागा’ दाखवून दिली.
आणि आपल्याकडे? टी-२० विश्वचषक स्पर्धेत आपल्या वलयांकितांचा कालबाह्य खेळ आणि चातुर्याचा अभाव असंख्यांना खुपणारा ठरला. आमच्या मंडळाने त्यानंतरही या खेळाडूंना ‘स्वत:च स्वत:चे भवितव्य ठरवण्या’चा अजब सल्ला दिला! आमच्याकडे खेळाडूंना जणू ‘व्हीआरएस’चा पर्याय दिला जातो. निवृत्तीची वेळ आणि जागाही ठरवू देण्याचे स्वातंत्र्य दिले जाते. व्यक्तिपूजा आणि वलयासक्ती मुरलेल्या समाजात यापेक्षा वेगळे काही अपेक्षित नाही! म्हणून सांतोससारखे कुणी येथे हवेत. त्यांना स्वातंत्र्य देणारी यंत्रणा हवी. ती कशी असावी, याचे मार्गदर्शन कदाचित सांतोस करू शकतील. रोनाल्डोसारखे वलयकोषातले आत्मानंदी येथे कमी नाहीत. त्यांना योग्य वेळी ‘जागा’ दाखवून देतील असे सांतोस मात्र अभावानेच आढळतील.