कला आणि जीवनाचा संबंध दुर्लक्षून ‘कलेची सेवा’, ‘आयुष्य उधळणे’ याचेच कौतुक अधिक होते ही सामुदायिक चिंतेची बाब. त्यावर सौरभ शुक्ला वा एलकुंचवार नेमके बोट ठेवतात..
प्रगल्भ आणि प्रबुद्ध व्यक्तींची विचारप्रक्रिया बहुतांशी समान प्रतलावर असते. भले त्या व्यक्ती एकत्र, एकाच ठिकाणी असोत वा नसोत. अशांचे विचार एकमेकांस समांतर प्रवास करताना दिसतात. याचा ताजा दाखला म्हणजे विख्यात कलाकार, लेखक, अभिनेते, दिग्दर्शक सौरभ शुक्ला यांनी ‘लोकसत्ता’च्या व्यासपीठावर कला क्षेत्राविषयी व्यक्त केलेले विचार आणि त्याच वेळी पुण्यात विख्यात लेखक महेश एलकुंचवार यांची कलाकारविषयक मांडणी. सौरभ शुक्ला जनसामान्यांस बॉलीवुडी चित्रपटांमुळे माहीत असले तरी त्यांची उंची त्यापेक्षा किती तरी अधिक आहे. दिल्ली-स्थित ‘राष्ट्रीय नाटय़ विद्यालया’त साक्षात इब्राहिम अल्काझी यांच्या हाताखाली घेतलेली तालीम, घरचा शास्त्रीय संगीताचा वारसा, स्वत:चे लेखन, रंगभूमीवर केलेले अनेक प्रयोग असे संचित त्यांच्या खाती जमा आहे. एलकुंचवार यांचेही तसेच. जागतिक अभिजात वाङ्मयाच्या जोडीने भवभूती, भास, भरतमुनी आदी देशी परंपरेची पोषकतत्त्वे अंगी मुरवत स्वत:च्या मठीत राहून, कोणतेही जनसंपर्की चाळे न करता जागतिक पातळीवर पोहोचता येते हे ज्यांच्याकडे पाहून कळते असे उच्च दर्जाचे लेखक म्हणजे एलकुंचवार. ‘‘आपण कलेची सेवा-बिवा करतो अशी अभिनिवेशी भाषा करण्याची गरज नाही,’’ असे शुक्ला म्हणाले तर ‘कलेसाठी आयुष्य उधळून देणे’ किती निर्थक आहे; हे एलकुंचवार यांनी बोलून दाखवले. या दोन खऱ्या दिग्गजांनी (येथे ‘खरे’ असे विशेषण आवश्यक कारण अलीकडे विशी-तिशीतले कलाकार बनचुके होतात आणि माध्यमे त्यांस दिग्गज असे संबोधू लागतात.) व्यक्त केलेली मते अत्यंत चिंतनीय.
याचे कारण आपल्याकडे कलाकारांस कलाबाह्य कारणांसाठी दिला जाणारा मोठेपणा आणि या कलाकार म्हणवून घेणाऱ्यांचे आपण म्हणजे कोणी मानवतेच्या उद्धारासाठी भूतलावर आलो असल्यासारखे वागणे. खरे तर अन्य कोणत्याही नोकरदाराप्रमाणे या मंडळींचे पोट त्यांस मिळणाऱ्या मानधनावर अवलंबून असते. नोकरदारास महिन्याच्या अखेरीस वा सुरुवातीस वेतन मिळते तर अभिनेते/ गायक/ कलाकार यांस त्यांच्या त्यांच्या क्षेत्रातील रिवाजानुसार बिदागी/ मानधन दिले जाते. पण आपण बँकिंग/ सचिवालय/ मंत्रालय/ रेल्वे खात्याची सेवा केली असे काही मिरवावयास नोकरदार जात नाही. त्याच्याबाबत सेवा हा शब्द शुद्ध चाकरी या अर्थी वापरला जातो. कला क्षेत्रातील व्यक्तीही प्रत्यक्षात अशीच चाकरी करीत असतात आणि त्यातून येणाऱ्या उत्पन्नातून जमेल तसा आपापल्या संसाराचा गाडा रेटत असतात. पण या दुसऱ्या क्षेत्रातील व्यक्ती मात्र आपण रंगभूमी/ संगीत/ चित्रकला आदी क्षेत्राची कशी ‘सेवा’ केली याचा दंभ मिरवतात आणि समाजही त्यांस दुजोरा देत राहतो. पहिल्या गटातील व्यक्ती करीत असलेली चाकरी एक वेळ परिस्थितीशरण असेल. म्हणजे सदर व्यक्तीस कदाचित मनाविरुद्ध चाकरी करावी लागत असेल. तथापि कला क्षेत्रातील मंडळींबाबत तसे म्हणता येणार नाही. कला क्षेत्र कोणतेही असेल. पण त्या क्षेत्रात कारकीर्द करण्याचा निर्णय हा खुद्द त्या व्यक्तीचा असतो. म्हणजे, एखाद्याचे बखोट धरून त्यास गावयास वा अभिनय करण्यास वा चित्र चितारण्यास जबरदस्ती केली जाते, असे नाही. तेव्हा जे काही होत असते ते स्वान्तसुखायही असते. मग हे सेवा-पुराण कशासाठी? तीच बाब कलेसाठी आयुष्य उधळून देणे अशी थोतांडी भाषा करणाऱ्यांबाबतही लागू होते. कला की जीवन असे विषय रिकामटेकडी परिसंवादांसाठी योग्य. प्रत्यक्षात जीवन हे कलेपेक्षा किती तरी भव्य आणि व्यामिश्र असते आणि जीवन असते म्हणून कला असते. जीवनच नसेल तर कसली कला आणि कोणती कुसर? तेव्हा अशा कलेसाठी आयुष्य उधळून देणे वगैरे भाषा कशासाठी? ही असली पोकळ वक्तव्ये करणाऱ्यांची तुलना मद्यपी वा तत्सम व्यसनींशी करणे अधिक्षेपाचे वाटले तरी तार्किकदृष्टय़ा योग्य ठरेल. म्हणजे एखादी व्यक्ती मी अमुक व्यसनावर आयुष्य उधळून लावले असे म्हणाली तर ते जितके बेजबाबदारपणाचे निदर्शक असेल तितकेच अमुक एका कलेवर मी आयुष्य निछावर केले हे विधानही बेजबाबदारीचेच असेल. या विधानाचा साधा (आणि खरा) अर्थ बाबा रे.. तुला अन्य काही करणे जमले नाही, असा असतो. पण तसे न म्हणता अशा व्यक्ती आयुष्य उधळून दिले वगैरे भाषा करतात आणि स्वत:च स्वत:च्या कृतीचे उदात्तीकरण करतात. या अशा व्यक्तींनी जे केलेले असते ते त्यांनी केले नसते तरीही जगाचे रहाट-गाडगे आपल्या गतीने फिरत राहिले असते. एखादा गायक/ लेखक/ अभिनेता/ चित्रकार निपजला नसता तर जगाचे भले/ बुरे होणे रोखले गेले असते असे अजिबात नाही. तरीही कलेसाठी आपण स्वत:चे आयुष्य कसे उधळून लावले वगैरे बाता काहींकडून मारल्या जातात. ते त्यांच्यापुरते ठीक. पण आपला समाज हे अशांचे उदात्तीकरण करतो ही यातील सामुदायिक चिंतेची बाब. सौरभ शुक्ला वा एलकुंचवार हे नेमके या चिंतेवर बोट ठेवतात.
त्यानिमित्ताने हा असला सामाजिक भोंगळपणा दाखवून देण्याची संधी मिळते. आपल्याकडे तो प्रत्येक क्षेत्रात भरलेला आहे. मग ते बळीराजा म्हणून शेतकऱ्यांस चुचकारणे असो वा सीमेवरील सुरक्षारक्षकांबाबत होणारे भावनाबंबाळ समारंभ असोत. शेतकऱ्यांस बळीराजा वगैरे म्हणून फुकाच्या शब्दगौरवापेक्षा अधिक आवश्यक असते त्याच्या पिकास रास्त बाजारभाव दिला जाईल याची हमी. तद्वत सीमेवरील जवानांस भाऊबीज इत्यादी निर्थक भावनोत्सवांपेक्षाही अधिक आवश्यक असतात उत्कृष्ट कार्यसुविधा आणि अद्ययावत शस्त्रास्त्रे. यातील शेतकऱ्यांनी शेती करण्याचा पर्याय स्वत:हून एक वेळ निवडलेला नसेल/ असेल; पण सुरक्षा यंत्रणेत चाकरी करणे हा पर्याय मात्र त्या व्यक्तीचा स्वत:चा असतो. अशा वेळी त्यांना खरी ज्याची गरज आहे ते न देता उगाच त्यांच्याविषयी शब्दोत्सव साजरा करण्याचे काही कारण नाही. पण आपल्याकडे तेच होत राहाते. याचे कारण प्रत्यक्ष काही भरीव करून दाखवण्यापेक्षा पोकळ शब्दफुगे वातावरणात सोडत राहाणे हे नेहमीच अधिक सोपे, सुलभ असते आणि त्यास कोणत्याही भांडवलाची गरज नसते. भांडवलाची गरजच नाही म्हणजे भांडवलावरील परताव्याची काही चिंताही नाही. कसलेच मोजमाप नाही. ज्या समाजात कसल्याही मोजमापाची सवय लावली जात नाही त्या समाजात प्रगती ही प्रत्यक्षात असण्यापेक्षा ती आहे असे मानण्यावर भर दिला जातो. मुद्दा स्वच्छतेचा असो वा नागरिकांसाठी बांधल्या जाणाऱ्या स्वच्छतागृहांचा असो वा कोणत्याही सामाजिक म्हणवून घेणाऱ्या योजनांचा असो. त्यांचे फलित वा यशापयश मोजले जायलाच हवे. अशी स्पष्ट, व्यक्ती/ राजकीय पक्षनिरपेक्ष मोजमाप यंत्रणा ज्या समाजात विकसित झालेली असते ते समाज निश्चित प्रगती करतात. उर्वरितांस विकास वदंतांवर समाधान मानून घ्यावे लागते, हे वास्तव.
सौरभ शुक्ला वा एलकुंचवार यांच्यासारख्या प्रगल्भ कलावंतांच्या सदर वक्तव्यांतून ते समोर येते. ते बदलावयाचे असेल तर समाजात ‘बाप दाखव, नाही तर श्राद्ध कर’ ही भावना अधिकाधिक रुळायला हवी. असे सांगण्यात काहीही औद्धत्य नाही. जे उच्चपदस्थ तर्काधारित प्रतिवाद करू शकत नाहीत, तेच अपमान/ अवमान झाल्याचा कांगावा करतात. अशांकडे दुर्लक्ष करून करकरीत बुद्धिवादास उत्तेजन द्यायला हवे. तेव्हा हिंदूुत्ववाद, उदारमतवाद हे आपले खरे आव्हान नाही. नसानसांत भरलेला भोंगळ भावनावाद ही आपली समस्या आहे. ती दूर करण्याची गरज वाटते का, हा प्रश्न.