इतक्या लसमात्रा, तितके बळी, बाधित इतके.. या निव्वळ आकडेमोडीपेक्षाही महत्त्वाचे ठरते, आपण करोनाच्या प्रत्येक आवर्तनातून शिकलो काय हे पडताळणे!

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘करोनाविरुद्ध लढाई नेहमीच जिंकत आलो आहोत,’ असे वाटणारा वर्ग वास्तवाधारित प्रश्न विचारणाऱ्यांशी बोलू लागला, तर त्याच चुका पुन्हा होण्याचे संकट टाळता येईल..

करोनाचे रुग्ण वाढू लागल्याची चर्चा गेले काही दिवस वाचनात-ऐकण्यात येत होती. या तर्क-वितर्कावर बुधवारी शिक्कामोर्तब झाले. देशभरात या दिवसभरात ३,०१६ नव्या रुग्णांची नोंद झाली. गेल्या जवळपास सहा महिन्यांतली ही सर्वाधिक रुग्णवाढ ठरली. गतवर्षी २ ऑक्टोबर रोजी तीन हजारांहून अधिक नव्या रुग्णांची नोंद झाली होती. त्यानंतर प्रथमच इतकी वाढ दिसून आली. करोनाच्या प्रादुर्भावानंतर विषाणूच्या तीन लाटा किंवा आवर्तने आपण पाहिली. त्यांची तीव्रता आणि व्याप्ती पाहता, तितकी आणीबाणी अद्याप अवतरलेली नाही हे खरेच. परंतु उपचारापेक्षा सावधगिरी केव्हाही हितकारक हा वैद्यकशास्त्रातला पहिला नियम. पहिल्या उद्भवापेक्षा ‘डेल्टा प्लस’ या करोना उत्परिवर्तनाच्या दुसऱ्या लाटेतला हाहाकार आपण अनुभवलेला आहे. त्या वेळी म्हणजे २०२१ मध्ये साधारण याच दरम्यान त्या उत्परिवर्तनाच्या असाध्यतेपेक्षा अधिक मारक ठरला, आपल्या सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेतील सिद्धतेचा अभाव. करोनाला कसे टाळावे याविषयी संशोधन सुरूच होते व आहे; परंतु करोना सर्वाधिक त्वेषाने फुप्फुसांवर आघात करतो हे त्या वेळेपर्यंत पुरेसे सिद्ध झाले होते. तरीही प्राणवायूचा पुरेसा आणि वक्तशीर पुरवठा करण्यात केंद्र सरकार तसेच बहुतेक राज्य सरकारे कमी पडली आणि त्याची भयंकर किंमत सर्वसामान्य नागरिकांना मोजावी लागली. यात प्रामुख्याने असा वर्ग होता, ज्यात कमावणारी मंडळी निवर्तल्यानंतर उर्वरितांचे अधिकच हाल झाले.

पहिल्या, दुसऱ्या व तिसऱ्या आवर्तनाचे गुणधर्म निराळे होते. २४ मार्च २०२० रोजी पहिल्यांदा देशव्यापी टाळेबंदी, संचारबंदी जाहीर झाली त्या वेळी उपजीविकेपेक्षा जीविताला प्राधान्य देण्याचे धोरण होते. गतवर्षी ओमायक्रॉन या करोनाच्या आणखी उत्परिवर्तनाची संसर्गक्षमता आधीच्यांपेक्षा खूपच अधिक होती. सुदैवाने मनुष्यहानी तुलनेने कमी झाली. करोनाने आजवर देशभरात पाच कोटींहून अधिक बाधित झाले, तर चार लाखांहून अधिकांना प्राण गमवावे लागले. करोना प्रतिबंधक लशींच्या २२० कोटींहून अधिक मात्रा आतापर्यंत दिल्या गेल्या आहेत. परंतु करोनाच्या बाबतीत विचित्र बाब म्हणजे, असा काही संख्यात्मक लेखाजोखा मांडला जाऊ लागतो तोवर नवी लाट येऊन धडकते. यंदाही बहुधा तसेच काहीसे घडत असावे. यामुळे निव्वळ आकडेमोडीपेक्षाही महत्त्वाचे ठरते, आपण प्रत्येक आवर्तनातून शिकलो काय हे पडताळणे. 

करोना हाताळणीच्या बाबतीत अर्ध्या भरलेल्या पेल्याचा संदर्भ देता येऊ शकतो. यात पहिले येतात पेला अर्धा(च) भरलेला असे ठामपणे मानणारे. देशातील सत्ताधीश आणि संलग्न संप्रदायाच्या मते आपण करोनाविरुद्ध लढाई नेहमीच जिंकत आलो आहोत! याचे कारण तसे समर्थ, जागरूक, संवेदनशील नेतृत्व आपल्याला लाभले, असे त्यांस वाटते. यास्तव लसीकरण प्रमाणपत्रावरही लाडक्या नेत्याचे छायाचित्र छापणारे जगातले बहुधा आपणच. हा आत्मविश्वास प्रशंसापात्रच, कारण संकटसमयी हिंमत दाखवणे ही सोपी बाब नव्हे. पेला अर्धा रिकामा मानणारा चिकित्सक, विश्लेषक वर्ग वास्तवाकडे बोट दाखवतो. तसे करताना स्वत:च्या चुकाही मान्य करतो, हे अधिक लक्षणीय. करोना हा वैद्यक समुदाय, प्रशासन, राजकीय नेते यांच्या मर्यादा उघडय़ा पाडून दाखवतो, असे ‘या’ संप्रदायाचे मत. करोनाबाधितांचे उपचार करताना काही औषधे सरसकट वापरली गेली का, टाळेबंदीने करोना खरोखर आटोक्यात आला का, करोनाला रोखता येणारच नसेल तर मग त्याचा बागुलबुवा आणि त्यानिमित्तची संचार- संपर्क- उद्यम आदींवरील बंदी किती समर्थनीय या प्रश्नांची म्हणावी तेवढी चर्चा करोनापश्चात (जर असा काही काळ अस्तित्वात असेल, तर) झालेली नाही. करोनोत्तर किंवा पोस्ट-कोविड म्हणतात त्या विकारांचा प्रतिबंध वा उपचार याबाबत वैद्यक समुदाय वा औषध कंपन्यांनी नेमकी उत्तरे अद्यापही शोधलेली नाहीत. अलीकडच्या काळात वारंवार दिसू लागलेले तरुणांमधील अपमृत्यू हे अतिरिक्त वा अनावश्यक करोना उपचार पद्धतीमुळे होत आहेत का, यावर एखाद्या व्यासपीठावर एकत्र येऊन चर्चा झालेली नाही. ती होण्याची गरज आहे. याची समाजाला, देशाला नितांत निकड आहे. ही मंडळी किमान एका व्यासपीठावर कधी तरी एकत्र येतीलही. पण यांच्या मागे असणाऱ्या आणि प्रसिद्धीस पुढे येणाऱ्या राजकारणी धोरणकर्त्यांचे काय? त्यांची मनमौजी वर्तणूक हेदेखील करोना-कालीन आव्हान होते हे कसे नाकारणार? गेल्या वर्षी ‘भारत-जोडो’ मोहिमेवर असलेल्या राहुल गांधी यांच्यामुळे करोना प्रसाराचा धोका असल्याचा संशय सरकारने व्यक्त केला. लगेच दुसऱ्या दिवशी ही सर्व मंडळी संसदेत मुखपट्टय़ा बांधून आली. ते ठीक. पण करोना ऐन भरात असताना पश्चिम बंगालादी ठिकाणी देशातील सर्वोच्च पदावरील व्यक्तीच्या निवडणूक प्रचारसभा निवांतपणे भरवल्या गेल्या होत्या, हे कसे विसरणार? ‘आपली ती जमीन, इतरांचा तो भूखंड’ या न्यायानुसार आपली गर्दी कल्याणकारी आणि विरोधकांची करोनाकारी, असे काही समीकरण आहे काय? सत्ताधीशांस एक न्याय आणि विरोधकांस दुसरा असे गेल्या खेपेस झाले. करोनाची साथ पुन्हा तशीच पसरली तर निदान यात सुधारणा व्हावी अशी अपेक्षा बाळगणे गैर नाही.

  करोनाच्या संभाव्य लाटेसंदर्भात आणखी एक धोका यंदा संभवतो, तो म्हणजे केंद्र व राज्यांतील वाढलेल्या विसंवादाचा. पूर्वी कधीही नव्हते इतके विद्यमान केंद्रीय नेतृत्व राज्यांच्या बाबतीत – अर्थातच जेथे ‘डबल इंजिन’ नाही अशा – अधिक आक्रमक आणि अधिक असहिष्णूपणे वागताना दिसते. त्यांना विरोध करण्याच्या नादात अनेक राज्यांतील नेतेही ताळतंत्र आणि विवेक सोडल्यासारखे वागत आहेत. करोनासारख्या महासाथीचा मुकाबला करताना सर्वात कळीचे ठरते समन्वय आणि सहकार्य. ते गेल्या तीन वर्षांत वर्धिष्णू राहिले की आकुंचित झाले, याचे उत्तर शोधणे अवघड नाही. तेव्हा करोना पुन्हा मोठय़ा प्रमाणावर प्रकटू लागलाच, तर त्याचा प्रभाव वाढण्याचे सर्वात ठळक कारण राज्याराज्यांतील, पक्षापक्षांतील विसंवाद हे राहील. हे होऊ द्यायचे नसेल, तर दिल्लीतील सिंहासनावरून आदेश देण्याची मानसिकता प्रथम सोडावी लागेल. यासाठी सर्व राज्यांना – लाडकी असो वा दोडकी- समान वागणूक देऊन, चर्चेच्या मेजावर बोलवावे लागेल. विद्यमान परिप्रेक्ष्यात ते अशक्य दिसत असेल, तर येऊ घातलेल्या चौथ्या आवर्तनाची भीती बाळगण्याखेरीज पर्याय नाही.

एक महत्त्वाचा मुद्दा. करोना हा विषाणूजन्य आजार आहे आणि अन्य कोणत्याही आजारांप्रमाणे तो वैदू आणि विनोदी उपायांनी रोखता येत नाही. करोनाच्या पहिल्या साथेत महासत्ता होऊ पाहणाऱ्या या देशाच्या तत्कालीन आरोग्यमंत्र्यांनीच कोणा वैदूच्या करोना प्रतिबंधक औषधाचे अनावरण करण्याचे पाप केले. त्यामुळे करोना तर गेला नाहीच. पण त्या आरोग्यमंत्र्यांची खुर्ची मात्र गेली. तेव्हा महत्त्वाचा मुद्दा असा की दुर्दैवाने करोनाचा फेरा पुन्हा अवतरलाच तर या आणि अशा भोंदूबाबांच्या प्रचारात मंत्र्यासंत्र्यांनी सामील होणे टाळायला हवे. आणि दुसरे म्हणजे करोना आलाच तर टाळ-टाळय़ा-थाळय़ा वाजवणे, दिवे घालवणे, दिवे लावणे, कष्टकरी, स्वयंपाकाच्या महिला, वर्तमानपत्रे घरपोच टाकणारे आदींस दूर लोटणे, दुधाच्या पिशव्याही धुऊन घेणे, इमारतीच्या जिन्यांसह उद्वाहने ९९.९९ टक्के विषाणू निर्मूलनाची हमी देणाऱ्या भुक्कड रसायनांनी धुणे इत्यादी मूर्ख उद्योग करू नयेत. गेल्या खेपेस करोना विषाणूइतकेच हे वावदूक वारेदेखील डोकेदुखी ठरले होते, याचे स्मरण ठेवले जाईल, ही आशा.