..यापेक्षा कितीतरी गंभीर गुन्हे ट्रम्प यांच्या विरोधात नोंदले गेले असताना १७ वर्षांपूर्वीच्या रंगील्या रात्रीच्या हिशेबासाठी त्यांना आता दोषी ठरवणे कितपत शहाणपणाचे?
अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात एका तरी प्रकरणात कारवाई सुरू झाली म्हणायची. त्यांच्यावर डझनभर विविध प्रकरणांत गंभीर गुन्हे/आरोप आहेत. पण ज्यावरील कारवाईचे पाऊल तसूभर पुढे गेले ते प्रकरण वेगळेच म्हणायचे. सुमारे १७ वर्षांपूर्वी एका देहप्रदर्शन- विक्रय वा देहविक्रय करणाऱ्या महिलेशी ट्रम्प यांनी संग केला आणि हे प्रकरण दडपण्यासाठी पैसे दिले असा हा प्रकार. ‘सौंदर्याचा मादक ॲटमबॉम्ब’ म्हणून ओळखली जाणारी सदरहू महिला आंबटशौकिनांच्या नेत्रक्षुधाशांतीचा व्यवसाय अधिकृतपणे करते. ट्रम्प यांच्या संपर्कात ती आली त्या वेळी ट्रम्पबाबा खासगी वाहिनीवर ‘द ॲप्रेन्टिस’ नावाचा एक कार्यक्रम करीत आणि राजकारणापेक्षा या कार्यक्रमासाठी ओळखले जात. सदरहू मदनिकेस या कार्यक्रमात संधी देण्याच्या मिषाने त्यांनी तीस ‘माडीवर या’ असे निमंत्रण दिले. त्याप्रमाणे ती आली आणि पुढे जे काही व्हायचे ते झाले, असे तिचे म्हणणे. ते ट्रम्प यांस अर्थातच मान्य नाही. खरे तर ट्रम्प यांचे ‘हे’ उद्योग प्रसिद्ध आहेत. या क्षेत्रातील त्यांच्या मुशाफिरीची तुलना इटलीचे माजी अध्यक्ष सिल्विओ बर्लुस्कोनी यांच्याशीच होईल. दोहोंत फरक असला तर इतकाच की बर्लुस्कोनी यांनी या मौजमजेच्या बदल्यात कोणा महिलेस कसले आश्वासन दिल्याची नोंद नाही. ट्रम्पबाबांनी ते केले आणि आश्वासन दिले ते दिले, पण ते पाळले नाही. त्यामुळे सदरहू भगिनी संतापल्या. ट्रम्प यांनी आपल्याकडून ‘हवे ते’ भरभरून घेतले आणि त्या बदल्यात जे देऊ असे सांगितले ते दिले नाही यांचा त्यांना संताप येणे साहजिक. त्याच वेळी, म्हणजे २०१२ च्या सुमारास, या महिलेकडून त्यास वाचा फोडली जाणार होती. पण ट्रम्प यांना त्याचा सुगावा लागला आणि त्यांनी त्या वेळी अध्यक्षीय निवडणुकांतून माघार घेतली. पुढे २०१६ च्या अध्यक्षीय निवडणुकांच्या प्रचारकाळात ‘द वॉशिंग्टन पोस्ट’ने ट्रम्प यांच्या रंगील्या रात्रींच्या रंगवार्ताचे संभाषण ‘हॉलीवूड डायरी’ प्रसिद्ध केल्यानंतर सदर महिलेची ट्रम्प यांस धडा शिकविण्याची इच्छा उफाळून आली आणि तिने हे अंत:पुरातील सत्य चव्हाटय़ावर मांडण्याची धमकी दिली. त्या वेळी तिने गप्प राहावे यासाठी ट्रम्पबाबूंनी सदर महिलेच्या खात्यात सुमारे १ कोटी ६ लाख ६० हजार रुपये इतकी प्रचंड रक्कम (१,३०,००० डॉलर्स) वळती केली. ‘रंगल्या रात्री अशा’ जनतेपासून लपवण्याची ही किंमत. या रात्री जेव्हा रंगल्या त्या वेळी ट्रम्प यांची तिसरी पत्नी दुसऱ्या अपत्याच्या प्रतीक्षेत होती ही यातील ट्रम्प यांची स्वभावनिदर्शक बाब. असो. तर हे पैसे ट्रम्प यांनी स्वत: दिले नाहीत. ते त्यांच्या वकिलांनी दिले. ही माहिती आता उघड होते आहे.
तथापि ट्रम्प हे या आणि अशा अनेक महिलांशी संग केला यासाठी संकटात आलेले नाहीत. तर सदरहू महिलेस त्यांनी दिलेला पैसा ‘व्यावसायिक खर्च’ म्हणून दाखवला आणि वर प्रचाराच्या हिशेबात तो दडवून ठेवला, हा त्यांच्याविरोधातील गुन्हा. ट्रम्प हे भारतीय सत्ताधीशांच्या मित्रपरिवारातील असल्याने भारतीय नैतिकतावादी ट्रम्प यांचे शंभर अपराधही पोटात घालतील हे खरे असले तरी त्यांच्याविरोधात अनैतिकतेसंदर्भात गुन्हा दाखल झालेला नाही, ही बाब लक्षात घ्यायला हवी. हे माजी अध्यक्ष बिल क्लिंटन यांच्यावरील प्रकरणाप्रमाणेच म्हणायचे. क्लिंटन यांच्याविरोधात महाभियोग झाला तो मोनिका लुइन्स्की हिच्यासमवेत करू नये ते केले या कारणामुळे नाही. तर ते शपथेवर खोटे बोलले म्हणून झाला, हे सत्य लक्षात घ्यायला हवे. अमेरिकेत निवडणूक आयोगाचे नियम सर्वसामान्य लोकप्रतिनिधी आणि सर्वोच्च पदावरील अधिकारी व्यक्ती यांसाठी स्वतंत्र नसल्याने खर्च करून हिशेब दिला नाही यासाठी ट्रम्प यांस न्यूयॉर्क येथील न्यायालयाने दोषी ठरवले आहे. त्यांच्यावरील आरोप निश्चिती मंगळवारी होईल आणि त्या वेळी ट्रम्प हेदेखील न्यायालयात हजर राहतील. त्यासाठी आपणास बेडय़ा घालून नेले जावे, अशी ट्रम्प यांची इच्छा आहे. ते तसे केले जाते का हे पाहायचे. तसे झाल्यास ट्रम्प यांची मनीषा पूर्ण होईल. अमेरिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच माजी अध्यक्ष गुन्हेगारी स्वरूपाच्या कृत्यासाठी दोषी ठरवला जाईल. अशा तऱ्हेने ट्रम्प हे ऐतिहासिक ठरतील.
तसेच त्यांना ठरायचे आहे. म्हणून या संदर्भात खरा मुद्दा हा की ट्रम्प यांस जे हवे आहे ते न्यायिक यंत्रणेने करावे का? ‘नग्न व्यक्तीस साक्षात जगन्नियंताही वचकून असतो’ अशा अर्थाची एक म्हण आहे. ती ट्रम्प यांस डोळय़ासमोर ठेवूनच बेतली गेली असावी. याचे कारण असे की नेसूचे सोडून डोक्यास बांधायची तयारी असलेल्याच्या वस्त्रहरणाचा प्रयत्न तो करणाऱ्यावर उलटतो. ट्रम्प यांच्याबाबत हे असे होत आहे. तुरुंगात टाकले तरी ट्रम्प ही शिक्षा साजरी करणार आणि नाही टाकावे तर मला घाबरले असे म्हणत पुन्हा हा विजय साजरा करणार. आणि हे पैसे ट्रम्प यांनी दिलेलेच नाहीत. त्यांच्या वकिलाने ते दिले. म्हणजे माझा वकील खोटे बोलला असे म्हणण्याची सोय त्यांना आहे आणि आपल्याविरोधातील कारवाईमागे राजकीय हेतू आहेत असेही सांगण्याची सुविधा त्यांना आहे. तसेच या संदर्भात अत्यंत महत्त्वाचा मुद्दा असा की याप्रकरणी शिक्षा झाली तरीही ही शिक्षा ट्रम्प यांना अध्यक्षीय निवडणुकीत पुन्हा उतरू देण्यापासून रोखणारी नाही. तेव्हा या मुद्दय़ावर त्यांना शिक्षा केली जावी का, हा यातील खरा प्रश्न. ट्रम्प यांना एक न्याय आणि इतरास दुसरा हे करता येणार नाही, तसे केले जाऊ नये हे खरेच. पण यापेक्षा कितीतरी गंभीर गुन्हे ट्रम्प यांच्या विरोधात नोंदले गेले असताना १७ वर्षांपूर्वीच्या रंगील्या रात्रीसाठी त्यांना आता दोषी ठरवणे कितपत शहाणपणाचे? अध्यक्षीय निवडणुकीतील पराभवानंतर या गृहस्थाने पुढील वर्षी ६ जानेवारीस राजधानीवर हल्ला चढवण्यासाठी आपल्या समर्थकांस चिथावले आणि ट्रम्प यांचे समर्थक त्यांच्यापेक्षाही अधिक बिनडोक असल्याने त्यांनी तो हल्ला केलादेखील. त्यामुळे जागतिक राजकारणात, पराभवानंतर काय करायचे याचा एक नमुनाच तयार झाला. शेजारील ब्राझील देशात कडवे उजवे अध्यक्ष जाइर बोल्सेनारो यांनीही पराभवानंतर ट्रम्पछाप उद्योग करण्याचा प्रयत्न करून पाहिला. अन्यत्रही या खेळाचे आणखी प्रयोग होतील. त्याची मूळ संहिता लिहिणारे ट्रम्प यांच्याविरोधात हा गुन्हा अधिक गंभीर आहे. ते प्रकरण धसास लागून ट्रम्प यांस शासन झाले तर निदान त्यामुळे तरी ते पुन्हा नव्याने निवडणूक लढवण्यास अपात्र ठरू शकतील. सध्याच्या प्रकरणाने तसे काहीही होणार नाही.
म्हणूनच एकीकडे न्यायालय त्यांना शासन करण्याच्या तयारीत असताना खुद्द ट्रम्प मात्र पुढच्या निवडणुकीत निधीसंकलनाच्या उद्योगात मग्न आहेत. त्यामुळे त्यांना ‘या’ उद्योगासाठी शासन झाले तर त्यांच्या लोकप्रियतेचा आलेख अधिकच वर जाईल आणि त्याचा राजकीय फायदा ते उठवू शकतील. तो धोका अधिक आहे. चौफुल्यावरील उद्योगांसाठी राजकीय नेत्यांच्या बदनामीने निवडक नैतिकतावाद्यांस उचंबळून येत असले तरी या उद्योगांवर राजकारण करणे- भारत असो वा अमेरिका- हास्यास्पदच ठरते. ट्रम्प यांना रोखण्यासाठी अनेक गंभीर कारणे आहेत. ती धसास लावून ट्रम्प यांचा उच्छाद रोखणे गरजेचे आहे. ट्रम्प ही व्यक्ती कमी आणि प्रवृत्ती अधिक. चौफुल्यावरील अशा एखाद्या प्रकरणाचा बभ्रा झाल्याने ती रोखली जाणार नाही.