व्यवस्था ‘कायद्यासमोर सर्व समान’ मानणारी आणि वागणारी असेल, समाजालाही तिचा आदर करण्याचे भान असेल, तर उच्चपदस्थांचा खोटारडेपणा सहज उघडकीस आणता येतो..

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

देखावा हाच ज्या व्यवसायाचा आधार असतो, त्या व्यवसायातील व्यक्तीस आपण प्रत्यक्षात आहोत त्यापेक्षा अधिक काही आहोत असे दाखवणे आवश्यक ठरते. राजकारण हा एक असा व्यवसाय. त्यातील प्रत्येकालाच आपण आहोत त्यापेक्षा अधिक चांगले, अधिक बुद्धिमान, अधिक सहृदय आणि अधिक नैतिक आहोत असे सतत दाखवावे लागते. ती त्या व्यवसायाची गरज. त्यास इलाज नाही. तथापि असे करण्यातील धोका असा की राजकीय अभिनय करतानाही आपण प्रत्यक्षात कोण, कसे, कितपत आहोत याचे भान सुटले की सदरहू व्यक्ती देखाव्यालाच खरे मानू लागते आणि त्या व्यक्तीचे वास्तव आणि देखावा हे एक होऊन जातात. असे झाल्याचे अलीकडच्या काळातील उत्कृष्ट उदाहरण म्हणजे अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प. आता त्यांचे स्मरण करायचे कारण म्हणजे अमेरिकेत नुकतेच उघडकीस आलेले आणि गाजत असलेले जॉर्ज सँटोस यांचे प्रकरण. राजकारणाचा सार्वत्रिक आणि साकल्याने विचार करणाऱ्यांसाठी ते जाणून घेणे अत्यावश्यक ठरते.

हे जॉर्ज सँटोस अमेरिकेतील राजकारणी. योगायोग असा की तेही ट्रम्प यांच्याच रिपब्लिकन पक्षाचे. अलीकडेच ते न्यूयॉर्क राज्यातून अमेरिकी काँग्रेसवर प्रतिनिधी म्हणून निवडले गेले. त्यांची ख्याती अशी की अत्यंत तरुण, अभ्यासू आणि भविष्यात ज्यांच्याकडे आशेने पाहावे असे त्यांचे व्यक्तिमत्त्व. अमेरिकेतच लब्धप्रतिष्ठितांच्या शिक्षणसंस्थांतून उच्च शिक्षण, अमेरिकी यहुदी ही पार्श्वभूमी, त्यामुळे इस्रायल-संबंधित अनेक माध्यमस्नेही घटना, चळवळी यांत सक्रिय सहभाग, इस्रायली मित्र हे अमेरिकी राजकारणातील यशासाठी आवश्यक असे बिरुद, यहुदी-प्राबल्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या ‘गोल्डमॅन सॅक’ या जगद्विख्यात वित्तसंस्थेतील कार्यानुभव, पुढे ‘सिटी बँक’सारख्या वित्तसंस्थेत, आयुष्यात नावावर एकही गुन्हा नाही असा इतिहास. आईचे निधन ‘९/११’च्या बाँबहल्ल्यात झालेले. त्यामुळे दहशतवाद या विषयावर टोकाची भूमिका मांडण्याचा नैतिक अधिकार त्यांस प्राप्त झालेला. प्रत्येक शाळेत, प्रत्येक वर्गात कधीही गृहपाठ न चुकवणारा, वेळेवर येणारा, सर्व नियमपालक, स्वच्छता आणि टापटीप राखून केसांचा कोंबडा करून व्यवस्थितपणे आज्ञापालन करणारा एक तरी विद्यार्थी असतो. अशी ‘गुडबॉयी’ प्रतिमा म्हणजे जॉर्ज सँटोस. अलीकडच्या काळात पुरोगामी समाजात आपली पुढारलेली मानसिकता मिरवण्यासाठी समलैंगिकतेचा मुद्दा चांगलाच उपयोगी पडतो. स्त्री-पुरुष समागम अनैसर्गिक वाटावा इतका अलीकडे समलैंगिकतेचा उदोउदो होतो. समलैंगिक असणे हा गुन्हा नाही, पण त्यात मिरवावे असेही काही नाही. सँटोस हे त्यापेक्षा एक पाऊल पुढे. म्हणजे ते अशा समलैंगिकतेचे नुसतेच पुरस्कर्ते नाहीत. तर क्रियावान समिलगी. स्वत:चे असे संबंध मिरवणारे. त्यामुळे रिपब्लिकन पक्षाचे असूनही ते अनेक सुधारणावादी, तरुण आदींच्या गळय़ातील ताईत आणि अमेरिकेचे उद्याचे आशास्थान.

पण ‘न्यू यॉर्क टाइम्स’ आणि अन्यांच्या पत्रकारितेमुळे हे सारे स्वप्न भंगले. म्हणजे झाले असे की सँटोस दावा करतात त्याप्रमाणे कोणत्याही प्रतिष्ठित महाविद्यालयात त्यांचे शिक्षण झालेले नाही, ते स्वत: अमेरिकी-यहुदी नाहीत, ‘गोल्डमॅन सॅक’ वा ‘सिटी बँक’ या आस्थापनांत त्यांनी एक दिवसही चाकरी केलेली नाही, त्यांच्या नावावर धनादेश न वटल्याचा गुन्हा आहे आणि ते दाखवतात तसे समिलगी अजिबात नाहीत. त्यांची ‘पत्नी’ होती आणि स्त्री-संबंधांचे त्यांना अजिबात वावडे नाही आणि मुख्य म्हणजे त्यांच्या मातोश्रींचे निधन आणि ‘९/११’चा दहशतवादी हल्ला यांचा काडीचाही संबंध नाही, त्या या हल्ल्यानंतर काही वर्षांनी निवर्तल्या इत्यादी सर्व तपशील पत्रकारितेमुळे उजेडात आला. साहजिकच सँटोस संकटात आले. इतके की त्यांनी हे सर्व मान्य केले असून आपण खोटे बोललो अशी जाहीर कबुलीही दिली आहे. तथापि ती देतानाही ‘आपण खोटे बोललो हे मान्य’, पण तरी ‘मी खोटारडा नाही’ असे ते म्हणतात. यानंतर अमेरिकी माध्यमांनी या इसमाचे अक्षरश: वस्त्रहरण केले असून दिवसागणिक त्यांच्या विरोधात काही ना काही पुरावा वा घटना उघडकीस येताना दिसते. या सगळय़ाबाबत स्वत:चा खुलासा करण्यासाठी या सँटोसबाबांनी खासगी दूरचित्रवाणीवर मुलाखती देण्याचा घाट घातला. त्यातून त्यांची बाजू सावरली जाण्याऐवजी ते अधिकच गाळात गेले. ‘मी ज्युईश आहे, हे मी गंमत म्हणून म्हणालो’ या त्यांच्या विधानासाठी तर माध्यमे त्यांना शब्दश: फाडून खाताना आढळतात. एका मुलाखतीत त्यांच्या या उत्तराने डेमॉक्रॅटिक पक्षाच्या माजी लोकप्रतिनिधी तुलसी गबार्ड इतक्या संतापल्या की थेट प्रक्षेपित होत असलेल्या मुलाखतीत त्यांनी या सँटोसबाबांस विचारले : याबद्दल तुला लाज कशी काही वाटत नाही?

या साऱ्या वादंगामुळे आपण काय दर्जाच्या इसमास निवडणूक उमेदवारी दिली असा प्रश्न रिपब्लिकन पक्षनेतृत्वास पडला असून त्याबाबत या पक्षनेतृत्वास माध्यमांच्या रोषासही सामोरे जावे लागत आहे. पुढील आठवडय़ात काँग्रेस-सदस्य म्हणून हे सँटोसबाबा शपथ घेतील. तोपर्यंत त्यांची आणि रिपब्लिकन पक्षाचीही उरलीसुरली अब्रूही निकालात निघालेली असेल. तथापि ज्या पक्षाने डोनाल्ड ट्रम्प यांच्यासारख्या कमालीच्या असहिष्णु, असभ्य आणि अश्लाघ्य व्यक्तीस उमेदवारी देऊन अध्यक्षपदापर्यंत जाऊ दिले त्या पक्षाने लावलेल्या वृक्षास सँटोस यांच्यासारखीच फळे लागणार अशा प्रकारचे भाष्य अनेक करतात. ते अयोग्य नाही. यात कौतुकाचा भाग आहे तो अमेरिकी माध्यमांचा. केवळ ‘न्यू यॉर्क टाइम्स’च नव्हे तर सर्वच वर्तमानपत्रे, दूरचित्रवाणी वाहिन्या आदी सर्वानीच नंतर या प्रकरणाचा पिच्छा पुरवला आणि आपला लोकप्रतिनिधी किती खोटारडा आहे हे प्रामाणिकपणे दाखवून दिले. हे सारे बरेच काही शिकवून जाणारे आहे.

ते शिकायचे कारण माणसे सर्वत्र सारखीच असतात. एखाद्या देशात, धर्मात, जातीत जन्मला म्हणून कोणी चांगला वा वाईट ठरत नाही. व्यक्तीचे सामाजिक चांगले/वाईटपण ठरते ते तो ज्या समाजात वावरतो, त्या समाजातील व्यवस्थांच्या आरोग्यावर. कायद्यासमोर सर्व समान असे मानणाऱ्या आणि त्याप्रमाणे वर्तन असणाऱ्या नियमाधारित व्यवस्थेचा आदर करायला हवा, याचे भान असणारा समाज हे सामाजिक प्रगतीचे आवश्यक घटक. ते सुस्थितीत असले तर उच्चपदस्थांचा खोटारडेपणा सहज उघडकीस आणता येतो. आधी ट्रम्प आणि आता सँटोस ही याची उदाहरणे. अर्थात तरीही ही माणसे इतकी खोटी कशी काय वागतात, हा प्रश्न उरतोच. ट्रम्प यांचे मनोविश्लेषणात्मक चरित्र लिहिणारे डॉ. डॅन मॅकअ‍ॅडम्स हे याचे उत्तर देतात. ते ट्रम्प यांचे वर्णन ‘एपिसोडिक मॅन’ असे करतात. म्हणजे ‘भागपुरुष’. दूरचित्रवाणी वाहिन्यांवर दीर्घकाळ चालणाऱ्या मालिका असतात. त्यातील कलावंत नाटक वा चित्रपटाप्रमाणे अभिनय करीत नाहीत. ते चित्रीकरणास येतात. आज काय ‘करायचे’ ते जाणून घेतात आणि त्याप्रमाणे ‘आजच्या’पुरता अभिनय करून पुढच्या मालिकेच्या चित्रीकरणास जातात. ‘एपिसोडिक’ हे विशेषण या कलावंतास (?) लागू होते. राजकारण ही कला मानली तर अमेरिकेत आणि अन्यत्रही ट्रम्प आणि अन्य काही ‘भागपुरुष’ उठून दिसतात. आजचा प्रसंग तेवढा साजरा करायचा. उद्याच्या भागाचा विचार उद्या. या अशा ‘भागपुरुषां’चे पितळ उघडी पाडणारी माध्यमे असणे आणि नसणे हाच काय तो अमेरिका आणि अन्यांतील फरक. पण या फरकातच अमेरिका महासत्ता का आहे आणि अन्य का होऊ शकत नाहीत या प्रश्नाचे उत्तर आहे. म्हणून या प्रकरणाचे महत्त्व.

मराठीतील सर्व संपादकीय बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gop congressman elect george santos members of the house representing zws
Show comments