‘आवडेल तेच’ ऐकवल्या, दाखवल्या जाण्याच्या या युगात पटेल तेच बोलून दाखवणारे इयन चॅपेल यांच्यासारखे भाष्यकार ‘म्हातारे डोंगर’ बनत चाललेत, हे दु:खद आहे..
क्रिकेटमधील वाढत्या भारतीय प्रभावाचा, टी-२० आणि फ्रँचायझी क्रिकेटविषयी क्रिकेटपटूंना वाटणाऱ्या आकर्षणाचा बारकाईने आणि वस्तुनिष्ठ परामर्श समालोचक आणि लेखक म्हणून त्यांनी घेतला..
ऑस्ट्रेलियाचे माजी कर्णधार इयन चॅपेल जितका काळ क्रिकेट खेळले, त्याच्यापेक्षाही अधिक काळ त्यांनी क्रिकेटचे समालोचन केले. जवळपास १६ वर्षे त्यांनी ऑस्ट्रेलियाचे प्रतिनिधित्व केले आणि मग ४५ वर्षे समालोचन केले. त्यामुळे आजच्या पिढीतील बहुतांनी क्रिकेटपटू इयन चॅपेल ‘पाहिलेले’ नसतील. पण समालोचक इयन चॅपेल ‘ऐकलेले’ जरूर आहेत. दोन्ही व्यक्तींच्या स्वभावात, वागणुकीत आणि क्रिकेटविषयीच्या दृष्टिकोनात काहीच फरक नव्हता, असे जुनीजाणती मंडळी सांगतील. इयन चॅपेल आज ७८ वर्षांचे आहेत आणि या वयात, काही व्याधींमुळे समालोचनासाठी आवश्यक धावपळ करण्याची ऊर्जा फारशी शिल्लक नसल्याची कबुली त्यांनी परवा एका मुलाखतीदरम्यान दिली. हा निर्णय त्यांनी स्वत:हून घेतला, कुणी सांगायची वाट पाहिली नाही. विविध नियतकालिकांतून त्यांचे स्तंभलेखन सुरूच राहील. पण समालोचनातून क्रिकेट, क्रिकेटपटू आणि क्रिकेट व्यवस्थेविषयीचे त्यांची रोखठोक मते कानावर पडणार नाहीत, ही जरा खंतावणारी बाब. कारण व्यवस्था आणि (विशेषत: वलयांकित) व्यक्तिमत्त्वे यांविषयी चिकित्सक मतप्रदर्शन करताना, परिणामांची आणि भावनांची भीडभाड अजिबात बाळगायची नाही, याची शिकवण देणारे ते एक विद्यापीठच होते. उत्तम आवाज नि उत्तम शैली नसूनही, इतर बहुतेक समालोचकांच्या तुलनेत त्यांनी विशिष्ट विषयावर, विशिष्ट काळात केलेली टिप्पणी आजही लक्षात राहते. दांभिकता, तोंडदेखलेपणा आणि कथानकवादाच्या सध्याच्या उबगवाण्या काळात, ज्या मोजक्या व्यक्तींचे विचार आजही बहुप्रतीक्षित असतात, त्यांपैकी इयन चॅपेल एक होते.
क्रिकेट हा सांघिक खेळ आहे. येथे खेळाडूंपेक्षा संघाला प्राधान्य मिळाले पाहिजे आणि संपूर्ण व्यवस्थेमध्ये खेळाडू हेच केंद्रस्थानी असले पाहिजेत असे मानणाऱ्या व जाहीरपणे तसे मांडणाऱ्या आद्य क्रिकेटपटूंपैकी इयन चॅपेल हे एक. क्रिकेटच्या मैदानावर संघाचे भवितव्य हे केवळ आणि केवळ कर्णधाराच्या आकलनक्षमतेशी आणि कार्यक्षमतेशी संलग्न असते. ज्यांच्याकडे हे गुण नसतात, ते पळवाटा शोधत राहतात किंवा त्यांच्यासाठी पळवाटा शोधल्या जातात. चॅपेल यांनी १९७१ ते १९७५ या काळात ऑस्ट्रेलियाचे नेतृत्व केले. ऑस्ट्रेलियाने त्यांच्या नेतृत्वाखाली एकही कसोटी मालिका गमावली नाही. नेतृत्व करत असताना त्यांची फलंदाजीची सरासरी एकूण कारकीर्दीतील सरासरीपेक्षा अधिक होती. वैयक्तिक पातळीवर उत्तम कामगिरी करत असतानाच त्यांनी डेनिस लिली, जेफ थॉमसन, डग वॉल्टर्स, केरी ओकिफ, रॉडनी मार्श, ग्रेग चॅपेल, अॅश्ले मॅलेट, टेरी जेन्नर अशा अनेक गुणवान आणि तऱ्हेवाईक क्रिकेटपटूंचे समर्थ नेतृत्वही केले. संघात नुसतेच गुणवान क्रिकेटपटू असून भागत नाही, त्यांच्याकडून सांघिक कामगिरी करवून घ्यावी लागते. इयन चॅपेल मैदानावर उतरायचे, तेव्हा कर्णधार कोण, कोणाचे ऐकायचे याविषयी इतरांच्या मनात संदेह नसायचा. त्याचप्रमाणे, सहकाऱ्यांकडून काय अपेक्षित आहे आणि त्यांना किती सल्ला द्यायचा, याविषयी चॅपेल यांच्या मनात संदेह नसायचा. बाष्कळ आणि उथळ भावनाप्रदर्शनाच्या वाटय़ाला ते कधी गेले नाहीत. आपल्यालाच साऱ्यातले कळते आणि संघाला जिंकून देण्याची जबाबदारी जणू आपल्याच शिरावर वगैरे भासवणारा आविर्भाव त्यांच्या ठायी नव्हता. क्रिकेट हा अखेरीस एक खेळ आहे, युद्ध नव्हे. दिवसभराचा खेळ संपल्यानंतर सायंकाळी सहकाऱ्यांबरोबर किंवा अगदी एखाद्या प्रतिस्पर्ध्याबरोबर निवांत क्षणी झुरके आणि घुटके घेत वेळ घालवावा या ऑस्ट्रेलियन क्रिकेटसंस्कृतीचा त्यांच्यावर पगडा होता. क्रिकेटपटूंच्या हक्कांविषयी ते अत्यंत संवेदनशील आणि जागरूक होते. क्रिकेटपटूंनाही घरांचे हप्ते फेडावे लागतात, मुलांचा शिक्षणखर्च उचलावा लागतो. त्या तुलनेत त्यांना मिळणारे मानधन हास्यास्पद असते. अशा परिस्थितीत रोजगाराचे समांतर मार्ग धुंडाळावे लागतात. मग केवळ क्रिकेटवरच एकाग्रता आणि निष्ठा दाखवायची कशी, असे प्रश्न त्यांनी तत्कालीन व्यवस्थेला विचारले होते. याच भूमिकेतून त्यांनी केरी पॅकर यांच्या वल्र्ड सीरिज स्पर्धेला (तिची ‘सर्कस’ अशी हेटाळणी तत्कालीन प्रस्थापितांनी केली) पाठिंबा दर्शवला. पुढे पॅकर सीरिजची क्रांती (रंगीत पोशाख, पांढरे चेंडू, विद्युतझोतातील सामने) मुख्य प्रवाहच बनून गेली. परंतु एक ऑस्ट्रेलियन कर्णधार म्हणून चॅपेल यांनी घेतलेली भूमिका त्या वेळी निर्णायक ठरली होती.
भूमिका घेण्याची त्यांची सवय पुढे समालोचकाची कारकीर्द सुरू झाल्यानंतर सुटली नाही हे आपले भाग्य. सर डॉन ब्रॅडमन हे महान फलंदाज होते. पण ते तितकेच स्वार्थी कर्णधार आणि कल्पनाशून्य प्रशासक होते, हे चॅपेल यांचे मत ५० वर्षांपूर्वी होते नि आजही कायम आहे. देवसमान अशा व्यक्तिमत्त्वाविषयी असे मतप्रदर्शन जरा धाडसीच. आपल्याकडल्या देवतुल्यांबाबत असे धाडस किती जणांनी दाखवले हा विशेष संशोधनाचा विषय ठरावा. चॅनल नाइन वाहिनीच्या जगप्रसिद्ध चौकडीतील ते एक. या चौघांतील रिची बेनॉ हे वय, अनुभव आणि कर्तृत्वानेही ज्येष्ठ. टोनी ग्रेग, बिल लॉरी यांना आवाजात चढ-उतार आणून समालोचन रंगतदार करण्याची शैली अवगत होती. इयन चॅपेल यांच्याकडे असे काही नव्हते. पण क्रिकेटमधील बारकावे समजावून सांगणे, ‘काय घडत आहे’ यापेक्षाही ‘काय घडणार’ यावर भाष्य करण्याचे चातुर्य आणि धैर्य, नेतृत्वातील त्रुटींवर परखड भाष्य करणे हे त्यांचे गुण चॅपेल यांची स्वतंत्र ओळख बनवणारे ठरले. वर्षांनुवर्षे ऑस्ट्रेलियाच्या दिग्विजयी संघासमोर खेळणाऱ्या संघांच्या चाहत्यांना, चॅनल नाइनवर इयन चॅपेल आपल्या आवडत्या खेळाडूविषयी काय म्हणताहेत हे जाणून घ्यायला आवडे. त्यांची टीका बोचरी वाटत नसे, उलट वास्तवदर्शी मतप्रदर्शनामुळे चॅपेल यांच्या जागतिक लोकप्रियतेत भरच पडत गेली. क्रिकेटमधील वाढत्या भारतीय प्रभावाचा, टी-२० आणि फ्रँचायझी क्रिकेटविषयी क्रिकेटपटूंना वाटणाऱ्या आकर्षणाचा ते बारकाईने आणि वस्तुनिष्ठ परामर्श घेत. प्राधान्य कशाला द्यायचे याविषयी क्रिकेटपटूंच्या मनात निर्माण होणारे द्वंद्व स्वाभाविक आहे. कारण या द्वंद्वाचे निराकरण करण्याचा प्रयत्न क्रिकेट प्रशासकांनी कधीच केला नाही हे त्यांचे सद्य:स्थितीविषयीचे मत.
लेखनक्षमता उच्च असलेल्या मोजक्या क्रिकेटपटूंपैकी ते एक. कधी कोणाकडून ‘भूतलेखन’ करून घेणे नाही आणि बऱ्याचदा जे लिहिणे, ते संबंधित नियतकालिकाच्या संपादकांशी चर्चा करूनच. त्यात कोणतीही आढय़ता नाही. हा उमदेपणा, मनाचा मोकळेपणा हल्ली दुर्मीळ होत चालला आहे. कर्तृत्वाच्या सुवासात अहंगंडाचा उग्र दर्प घुसळला-मिसळला जात आहे. वस्तुनिष्ठ चिकित्सा आणि त्या चिकित्सेचा विशालहृदयी स्वीकार हे गुण तर नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. ‘आवडेल तेच’ ऐकवले आणि दाखवले जाण्याचे हे युग. या युगात पटेल तेच बोलून दाखवणारे इयन चॅपेल यांच्यासारखे भाष्यकार ‘म्हातारे डोंगर’ बनत चाललेत, हे दु:खद आहे, तरी नवलकारक नाही! चॅपेल यांची क्रिकेट कारकीर्द वादातीत नव्हती. त्यांचे समालोचनही वादातीत नव्हते. ‘चाहत्यांनी माझे मूल्यमापन करावे किंवा न करावे, तो त्यांचा प्रश्न. त्यांना काय वाटते याविषयी फिकीर करावी किंवा न करावी, हा माझा प्रश्न. त्याचे उत्तर तयार आहेच. मी फिकीर करत नाही!’, हे चॅपेल यांचे साधे-सरळ तत्त्व. क्रिकेटपटू इयन चॅपेल यांच्यापेक्षाही समालोचक इयन चॅपेल यांच्या अशा स्पष्टोक्तीपर्वाने क्रिकेट अधिक समृद्ध केले, ही त्यामुळेच अतिशयोक्ती ठरणार नाही.