मोदींच्या अमेरिका भेटीच्या पार्श्वभूमीवर आपण आयात शुल्क सवलत दिली नसती तर ट्रम्प यांस खूश करण्याचा प्रयत्न आपण किती काळ करणार, हा प्रश्न पडला नसता.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प वक्री जाऊ नयेत यासाठीच्या आपल्या धडपडीचे अधिक कौतुक करावे की आपल्याविषयीचे अंदाज तंतोतंत खरे ठरावेत यासाठी ट्रम्प अध्यक्षपदी आल्यापासून आपण अहोरात्र करत असलेल्या प्रयत्नांचे अधिक, हे ठरवणे अवघड. अमेरिकी वाहनांवर आपल्या देशात लावल्या जाणाऱ्या कराविषयी ट्रम्प रागावलेले आहेत. हा राग त्यांनी अनेकदा जाहीरपणे व्यक्त केलेला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अमेरिकी दौरा सुरू होण्यासाठी या मुद्द्यावर ट्रम्प यांस ‘शांत’ करणे गरजेचे. त्यातूनच ताज्या अर्थसंकल्पात हे आयात शुल्क तब्बल ५० टक्क्यांनी कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला असून हे आयात शुल्क आता १२५ टक्क्यांवरून ७० टक्के इतके कमी होईल. याचा अर्थ केवळ ‘हार्ले डेव्हिडसन’ दुचाकीच नव्हे तर इलॉन मस्क यांची ‘टेस्ला’ वीज कारही भारतात स्वस्त होऊ शकेल. हे अर्थातच ट्रम्प यांस खूश करण्यासाठी. त्यात पंतप्रधानांचा संभाव्य अमेरिका दौरा. या पार्श्वभूमीवर आपण अमेरिकेसमोर असे कंबरेत वाकत असताना ट्रम्प यांनी ताज्या तलवारबाजीत त्यांच्या शेजारील मेक्सिको, कॅनडा आणि दूरवरील चीन या देशांवर अतिरिक्त कर लागू केले. शेजारील मेक्सिको, कॅनडा यासाठी ते २५ टक्के इतके असतील तर चीनसाठी १० टक्के. म्हणजे या तीन देशांची उत्पादने अमेरिकेत इतक्या टक्क्यांनी महाग होतील आणि अमेरिकेच्या मोटारी, दुचाक्या यांच्या किमती भारतात तितक्या टक्क्यांनी कमी होतील. हे दोन्ही एकाच दिवशी झाले. यावरून या निर्णयाचे महत्त्व जसे लक्षात येते तसेच हे असे निर्णय घेणाऱ्यांची मानसिकताही दाखवून देते. ट्रम्प यांनी जे केले त्याचे वर्णन जागतिक स्तरावर ‘व्यापारयुद्धाचे रणशिंग’, ‘नव्या व्यापारयुद्धास सुरुवात’ आदी शब्दांत केले जाते. ते योग्यच. तथापि त्यावर भाष्य करताना एक प्रश्न अधिक महत्त्वाचा आहे तो म्हणजे, आपले काय होणार?
याचे कारण ट्रम्प चीनविरोधात फोडत असलेल्या डरकाळ्यांमुळे आपल्याकडे एका वर्गास होत असलेल्या गुदगुल्या. आपल्या शत्रूचा काटा परस्पर काढला जात असेल तर ते कोणास आवडणार नाही? पण चीनविषयी ट्रम्प यांच्या भूमिकेकडे इतक्या कोत्या नजरेने पाहणे हेच आपल्यासाठी अयोग्य असू शकते, हे सत्य लक्षात घेणे महत्त्वाचे. याचा अर्थ असा की ट्रम्प जितके चीनविरोधात डरकाळ्या फोडत आहेत तितके ते खरोखरच त्या देशाविरोधात जाऊ इच्छितात का हा प्रश्न. तशी त्यांची खरोखरच इच्छा असती तर त्यांनी चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग यांस जातीने स्वत:च्या अध्यक्षावरोहणाचे निमंत्रण दिले नसते. ट्रम्प यांनी ज्यांना वैयक्तिक निमंत्रणे दिली त्यात क्षी वरच्या यादीत आहेत, ही बाब विसरता नये. तसेच त्यांनी कोणास तसे निमंत्रण दिले नाही याकडेही दुर्लक्ष करता नये. ट्रम्प हे केवळ जिनपिंग यांस शपथविधी सोहळ्यास निमंत्रण देण्यावरच थांबलेले नाहीत, ही आपल्यासाठी आणखी गंभीर बाब. अध्यक्षपदी आरूढ झाल्यावर ट्रम्प यांनी काही जागतिक नेत्यांस स्वत: जातीने फोन केले आणि आगामी वाटचालीची चर्चा केली. त्यातही चीनचे जिनपिंग यांचा समावेश होता. ट्रम्प यांनी स्वत:हून असा फोनसंपर्क कोणाशी साधला नाही, हे सांगण्याची गरज नाही. जिनपिंग यांच्याशी तो साधला ही बाब अधिक महत्त्वाची. असे असताना चीनविरोधात ट्रम्प किती टोकाला जातील, या प्रश्नाचा विचार गांभीर्याने करायला हवा. कारण या प्रश्नाच्या प्रामाणिक उत्तरावर आपण आणि चीन तसेच अमेरिका आणि आपण यांचे भावी संबंध अवलंबून आहेत.
ट्रम्प यांच्या आधीचे डेमॉक्रॅट्स जो बायडेन आपल्याकडे चीनच्या नजरेतून पाहत. म्हणजे चीन या साम्यवादी, हुकूमशाही देशास पर्याय म्हणून त्यांच्या नजरेतून भारताची उपयुक्तता होती. त्यामुळे चीनचे नाक खाजवण्यासाठी, त्या देशास इशारा देण्यासाठी वा चीनविरोधातील प्यादे या अर्थाने डेमॉक्रॅट्सच्या नजरेत भारताचे महत्त्व होते. त्यामुळे आंतरराष्ट्रीय निर्बंध लादलेल्या रशियाशी असलेल्या आपल्या संबंधांकडे अमेरिकेने काणाडोळा केला. ट्रम्प यांची रिपब्लिकन नजर यापेक्षा वेगळी आहे. ते थेट चीनशी चीन म्हणूनच व्यवहार करू पाहतात. त्यांना चीनला पर्याय म्हणून कोणी एक साथीदार राखलेला बरा, असे वाटत नाही. या त्यांच्या दृष्टिकोनाची तुलना शीतयुद्धाच्या काळात अमेरिकी नेतृत्वाने अखेर त्यांचा तेव्हाचा कडवा शत्रू असलेल्या सोविएत युनियनच्या नेतृत्वाशी थेट संधान साधले, या घटनेशी करता येईल. सोविएत रशियाचे अध्यक्ष ब्रेझनेव्ह हे या काळात ‘व्हाइट हाऊस’चा पाहुणचार घेऊन आले होते. त्या वेळी असा प्रयत्न अमेरिका आणि सोविएत युनियन या दोघांनीही करण्यामागील एक कारण या शत्रुत्वाचा फायदा उठवण्याचा अन्य देशांकडून होणारा प्रयत्न; हे होते. त्याचप्रमाणे चीन आणि अमेरिका सध्याही करू पाहतात किंवा काय, हा प्रश्न. तो पडतो कारण ट्रम्प जितक्या तीव्रतेने मेक्सिको, कॅनडा आदी देशांवर धावून जातात ती त्यांची आक्रमकता चीनविरोधात दिसत नाही. हे ‘घर में घुस के मारेंगे’चे स्मरण करून देणारे असू शकते. आज चीन हा अमेरिकेचा सर्वात मोठा धनको आहे.
अमेरिकी रोखे, डॉलर्समधील गुंतवणूक आणि अमेरिकी कंपन्यांची उत्पादन केंद्रे चीनमध्ये आहेत. त्यामुळे अशा देशाशी थेट दोन हात करण्यापेक्षा सामोपचाराने मतभेद मिटवता आल्यास बरे, असा विचार ट्रम्प यांनी केला नसेलच, असे नाही. शेवटी त्यांचा उजवा हात असलेल्या मस्क याचा सगळ्यात मोठा ‘टेस्ला’ कारखानादेखील चीनमध्येच आहे, हे कसे विसरणार? याचा अर्थ हे पडद्यामागील चातुर्य प्रत्यक्षात येत असेल तर आपणासाठी ती स्पष्ट धोक्याची घंटा ठरते. कारण यापुढे आपण चीनचा बागुलबुवा सतत पुढे करत अमेरिकेकडून आपणास हवे ते काढून घेऊ शकणार नाही. म्हणून ट्रम्प हे भारताचा उल्लेख अमेरिकेच्या व्यापारशत्रूंच्या यादीत करतात, ही बाब दुर्लक्ष करू नये अशी. त्याचा अर्थ ‘‘चीनचे मी काय ते बघतो, आधी तुम्ही सरळ व्हा’’ असा सूर ट्रम्प लावणारच नाहीत याची खात्री नाही. किंबहुना ट्रम्प यांची कसलीच खात्री देता येत नाही, हीच तर खरी अडचण. त्यामुळे ट्रम्प यांस खूश करण्याचा प्रयत्न आपण किती काळ करणार, हा मुद्दा! मोदींच्या अमेरिका भेटीच्या पार्श्वभूमीवर ऐन अर्थसंकल्पात आपण ही आयात शुल्क सवलत दिली नसती तर तो कदाचित पडला नसता. पण ट्रम्प यांच्या शपथविधीप्रसंगी आपण अमेरिकेतील १८ हजार अनधिकृत भारतीयांस परत मायदेशी आणण्याची कबुली देतो, आपले सरकार आता आम्ही अमेरिकेकडून अधिक तेल/ नैसर्गिक वायू खरेदी करू अशी स्वत:हून घोषणा करते, आपला अर्थसंकल्प अमेरिकेबरोबरचा अणुकरार पुनर्जीवित करण्यासाठी पावले उचलण्याची भाषा करतो आणि ट्रम्प यांनी डोळे वटारायच्या आत आपण ‘हार्ले डेव्हिडसन’सह ‘टेस्ला’वरील आयात शुल्क आपणहून कमी करतो, या सगळ्याचा अर्थ कसा लावणार? कोणत्याही नजरेतून पाहिले तरी या सगळ्याचा अर्थ आपण ट्रम्प यांच्यासमोर लोटांगण घालतो किंवा काय, असाच होईल. हे असे मनमोहन सिंग अथवा विरोधी पक्षीय सरकारने केले असते तर विद्यामान सत्ताधाऱ्यांची प्रतिक्रिया काय असली असती असा राजकीय प्रश्न न विचारतादेखील ट्रम्प यांची मर्जी आपण किती राखणार या प्रश्नास भिडावे लागेल.