कुपोषणासारख्या समस्येशी सामना करत असणारा भारतच ‘लठ्ठ लोकांच्या संख्येत जगात दुसरा क्रमांक’ पटकावतो, हे कसे?
जगातील तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था ठरण्याचे भारताचे स्वप्न पूर्ण होईल तेव्हा होईल, पण सध्या तरी आपण जगातले दुसऱ्या क्रमांकाचे स्थूलराष्ट्र ठरलो आहोत. स्थूल- म्हणजे ग्राम्य शब्दांत लठ्ठ- लोकांची संख्या भारतात वाढते आहे. ‘लॅन्सेट’ या आरोग्यविषयक शोधपत्रिकेने एका अहवालाचा हवाला देऊन, १८ कोटी भारतीय स्थूल असल्यावर शिक्कामोर्तब केले. म्हणजे या बाबतीत महासत्ता अमेरिकेलाही (१७ कोटी २० लाख) मागे टाकले आहे. आता आपल्यापुढे केवळ एकच देश आहे- चीन (४० कोटी). किमान या क्षेत्रात आपण आपल्या शेजाऱ्याला यातल्या काही निकषांवर तरी लवकरच धूळ चारू, अशी शक्यताही या अहवालाने वर्तवली आहे. २०५० पर्यंत भारतातील एकतृतीयांश लोकसंख्या स्थूलतेचा सामना करत असेल, असा इशाराही हा अहवाल देतो. त्यामुळेच स्थूलता ही आपल्याला समस्या वाटत नसली तरीही ती गांभीर्याने घेणे गरजेचे आहे.
आपण पिढ्यानपिढ्या स्थूलतेला समृद्धीचे लक्षण मानत आलो, मात्र ही समस्या केवळ पोषणातिरेकातून उद्भवलेली नाही. चुकीचा आहार आणि बेजबाबदार जीवनशैली ही त्यामागची मूळ कारणे आहेत. शिवाय ही तथाकथित समृद्धीही सर्वत्र समप्रमाणात विभागलेली नाही. तसे नसते, तर आज देशात सरकार अन्नधान्य मोफत वाटत असूनही ३५.५ टक्के बालकांची वाढ खुंटली नसती आणि ३२.१ टक्के बालकांचे वजन उंचीच्या आणि वयाच्या मानाने कमी भरले नसते. केवळ कर्बोदके म्हणजे संपूर्ण आहार नाही आणि जनतेचे पोट भरले म्हणजे इतिकर्तव्य पार पडले, असेही नाही हे आता सरकारला स्वीकारावे लागेल. भारतात पीक-पाणी आणि ऋतुमानात एवढे वैविध्य आहे की काय, किती, कधी खावे याचे विशिष्ट सूत्र असणे शक्य नाही. पण खाद्यासंस्कृतीत विविधता असली, तरी आरोग्याचे तीनतेरा वाजवण्याच्या इच्छेत मात्र देशभर एकात्मता दिसते.
त्यात भर पडते ती व्यायामाच्या अभावाची. घरकाम, शेतावरचे काम, धावपळ यालाच व्यायाम समजून समाधानी राहण्याची वृत्ती सार्वत्रिक आहे. शरीरातील प्रत्येक सांध्याला, स्नायूला, हृदयाला, मेंदूला योग्य प्रकारे, योग्य प्रमाणात आणि पुरेसा काळ चालना मिळाली, योग्य आहार आणि विश्रांती मिळाली, तरच त्याला व्यायामाचा खरा लाभ मिळतो, मात्र आठ तास संगणकासमोर आणि उरलेला वेळ मोबाइलसमोर अशी बैठी जीवनशैली आजच्या स्थूलतेच्या उद्रेकामागचे महत्त्वाचे कारण आहे. जिथे शाळेपासूनच शारीरिक शिक्षणाचा तास हा इतर विषयांचा अभ्यास संपवण्यासाठी आहे, असे बिंबवले जाते, त्या देशातील नागरिकांकडून एवढी अपेक्षा कुठे करणार? व्यायामाला प्रोत्साहन देण्याचे आपले सरकारी प्रयत्न नाक्यानाक्यांवर उभारलेल्या आणि बहुतेकदा सहा महिन्यांत निरुपयोगी ठरणाऱ्या तकलादू खुल्या व्यायामशाळांपलीकडे जात नाहीत. खेळाचे मैदान या शीर्षकाखाली राखीव ठेवलेल्या जागांवर सहज अतिक्रमणे होतात. सायकल किंवा जॉगिंग ट्रॅक हे केवळ पालिकेच्या निवडणुकीवेळी जाहीरनाम्यात दिसतात. गल्ल्या पार्किंगने गिळंकृत केलेल्या असतात आणि पदपथ तर फेरीवाल्यांसाठीच बांधले जातात. जिम वा स्पोर्ट्स क्लबचे सदस्यत्व ज्याला परवडते त्यांनीच व्यायामाची चैन करावी, उरलेल्यांनी योगदिन वगैरेची वर्षभर वाट पाहावी, असेच एकंदर धोरण दिसते. अर्थात इच्छाशक्ती असणारे अशा प्रतिकूलतेवर मात करण्याचे मार्ग शोधून काढतात; पण त्यांचे प्रमाण १४० कोटींमध्ये अत्यल्पच. अशात आपल्या खाण्याच्या सवयींनी अशी काही वळणे घेतली आहेत की कटिप्रदेशही गरगरीत होऊ लागले आहेत.
या खाद्याबदलाचा दोष शहरीकरणाला किंवा शहरांमधून वाढत गावोगावी पोहोचलेल्या पुरवठा साखळ्यांना देण्यापेक्षा भारतीयांच्या बेदरकार भाबडेपणाला द्यायला हवा. विविध देशांची खाद्यासंस्कृती जाणून घेणे चांगलेच. पण चायनीज आणि पिझ्झा हे केवळ चविष्ट आणि स्वस्त आहे, म्हणून आपण ते रोजच्या आहारात आणणार असू तर धन्यच. पोहे, उपमा, इडली, पराठ्यांऐवजी दररोज सकाळी रेडिमेड सिरिअलची पाकिटे दुधाच्या वाडग्यात रिती केली तर गडबड होणार, हेही निश्चित. नवे ते हवे असले तरी आपल्या कुटुंबव्यवस्थेतली कामाची विभागणी मात्र बहुश: पारंपरिकच राहिली आहे. स्वयंपाकघरात रोज घड्याळाच्या काट्यावर रंगणाऱ्या थरारक सामन्यांत खेळाडू म्हणून उतरण्याची संधीच पुरुषांना नाकारली जाते. एवढ्या प्रचंड वर्गाला परावलंबी ठेवणारी ही व्यवस्था घरोघरी मोडून काढली गेली तर, निखळणारे अनेक दुवे सांधले जातील. स्वयंपाकघरातील मनुष्यबळ दुप्पट होईल आणि काम निम्मे. पाकीटबंद पदार्थ कमी, पोषण अधिक. मोकळा वेळ वाढेल, तो कदाचित व्यायामासाठी सत्कारणी लागेल.
पोटात जे काही जाते त्याचा शरीरावर परिणाम होणारच, हे मान्य करणे ही महत्त्वाची बाब. आपल्याकडे याचाच घाऊक अभाव. त्यामुळे बहुराष्ट्रीय कंपन्या बाकी भारताविषयी काहीही म्हणोत, पण आपल्या जाहिरातविषयक धोरणांवर त्या बेहद्द खूश असणार. कारण अमुक एक पावडर दुधातून दिली की मुले ताडमाड वाढतील, शीतपेय प्राशनाने मरगळलेला माणूस धावत सुटेल, तमुक बाबाचे मिश्रण चमचाभर खाल्ले की स्मरणशक्ती वाढेल, या छापाच्या जाहिराती सहज खपून जातात. गुटख्यापासून मद्यापर्यंत साऱ्याला अन्य उत्पादनांआडून सहज प्रसिद्धी देता येते. पाकीटबंद पदार्थांतील घटक लिहिताना लबाडी केली, तरी आकाश कोसळत नाही. माध्यमक्रांतीपूर्वी या पाकीटबंद पदार्थांचा उच्छाद शहरांपुरताच सीमित होता. आता मात्र गावांतल्या दुकानांतही चिप्सच्या पाकिटांच्या माळा झरझर संपतात आणि शीतपेयांच्या बाटल्या रित्या होतात. वडे, समोसे, चायनीजचे लोण खेडेगावांतही पोहोचले आहे. यातून दुहेरी तोटा होतो. या पाकीटबंद पदार्थांतून मोठ्या प्रमाणात तेल, मीठ, साखर, अन्नरक्षक रसायनं शरीरात जातात आणि लठ्ठपणाबरोबरच मधुमेहापासून हृदयविकारापर्यंतच्या विविध आजारांना आमंत्रण देतात आणि दुसरे म्हणजे खऱ्या पोषक तत्त्वांवर खर्च होऊ शकणारी आणि स्थानिक शेतकरी आणि व्यापाऱ्यांच्या प्रगतीला हातभार लावू शकणारी रक्कम, बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या पोतडीत जाते. कंपन्या पोसल्या जाताना ग्राहक बिचारा लठ्ठ, कुपोषित आणि कंगालही होत राहतो. गावांतही स्थूलता वाढल्याचे आपलाच ‘राष्ट्रीय कौटुंबिक आरोग्य अहवाल’सुद्धा मान्य करतो.
स्थूलता हे भूषण नाही, हा अनेक व्याधींना निमंत्रण देणारा आजार आहे, हे आता तरी स्वीकारावे लागेल. केवळ सडपातळ बांधा म्हणजे निरोगी व्यक्ती या गैरसमजालाही दूर ठेवावे लागेल. कारण अलीकडे फॅड डाएटच्या नादी लागणे जिवावर बेतल्याची अनेक उदाहरणे आहेत. याचे दुसरे टोक म्हणजे जिममध्ये जाऊन आणि प्रोटीन पावडरच्या बरण्या रित्या करून कमावलेले पीळदार शरीर. त्याचे महत्त्वाच्या अवयवांवर किती गंभीर परिणाम होतात, हेही आता सिद्ध होऊ लागले आहे. समस्त मानवजातीला प्रथिनेच तारू शकतात, या भ्रामक कल्पनेला मागे टाकावे लागेल. अगदी लहान लहान जीवनसत्त्वे आणि खनिजांचा अभाव शरीरात मोठा घोळ घालून ठेवू शकतो, हे स्वीकारावे लागेल.
वाढता लठ्ठपणा हे आपल्या अर्थव्यवस्थेसमोरीलही एक मोठे आव्हान आहे. आधीच तोळामासा आर्थिक तरतूद असलेल्या आपल्या आरोग्य यंत्रणेला त्याचा भार झेपणार नाही. मनुष्यबळ निरोगी राहिले नाही, तर त्याचा अर्थव्यवस्थेवर विपरीत परिणाम होणारच. पण आरोग्य म्हणजे ताटासमोर बसून कॅलरी मोजणे किंवा रोज काट्यावर उभे राहून वा मोजपट्टी घेऊन ग्रॅम, इंच मोजत बसणे नव्हे. अन्न अतिशय मौल्यवान आहे. कित्येक पिढ्यांनी खूप कष्टाने, विचारांती आणि कल्पकतेने विकसित केलेले संचित त्यात सामावलेले आहे. त्याचे ग्रहण करताना अपराधीपणाची वा भीतीची भावना बाळगणे हा करंटेपणाच. स्थूलतेचे आव्हान अन्नामुळे नव्हे सर्वच स्तरांतील अज्ञान आणि बेजबाबदारपणामुळे उभे ठाकले आहे. त्यामुळे किमान यापुढे तरी ‘उदरभरण नोहे…’ हे लक्षात ठेवूनच वाटचाल करावी लागेल.