इस्रायलची विद्यामान राजवट पॅलेस्टिनींस त्यांचे न्याय्य हक्कही देण्यास तयार नाही आणि त्यांना त्यांच्या हक्काची किमान भूमीही देऊ इच्छित नाही…
कर्नल मुस्तफा हकीम (१९५६) इजिप्तमधे पार्सल बॉम्ब स्फोटात मृत्यू, घसन कनाफनी (१९७२) लेबनॉनची राजधानी बैरुत येथे कार बॉम्बमुळे ठार, अब्दुल झ्वाटेर (१९७२) या ‘ब्लॅक सप्टेंबर’ दहशतवादी संघटनेच्या नेत्याची इटलीत हत्या, फताह या दहशतवादी संघटनेच्या हुसेन बशीर (१९७३) याची सायप्रसमधे हत्या, पॅलेस्टिनी संघटनेचा वादी हदीद (१९७३) याची पूर्व जर्मनीत हत्या, पॅलेस्टाईन लिबरेशन ऑर्गनायझेशनचा आणि मुख्य म्हणजे म्युनिक ऑलिम्पिक हत्याकांडास जबाबदार दहशतवादी अली हसन (१९७९) हा बैरुतमधील हल्ल्यात ठार, यासर अराफात यांचा उजवा हात अबू जिहाद (१९८८) याची ट्युनिशियाची राजधानी ट्युनिस येथे कुटुंबासमोर गोळ्या घालून हत्या, हेजबोल्लाचा सेक्रेटरी जनरल अब्बास अल मुलावर (१९९२) हा कार बॉम्बच्या स्फोटात ठार, हमास संघटनेचा बॉम्ब निर्माता प्रशिक्षक याह्या अय्याश (१९९६) याचा मोबाइल फोनच्या स्फोटात मस्तक धडापासून वेगळे होऊन मृत्यू, खलीद मशाल (१९९७) हा हमासचा महत्त्वाचा नेता विषबाधेने गतप्राण… या यादीत आणखीही इतक्याच नावांची सहज भर घालता येईल आणि त्यात आता हेजबोल्लाचे प्रमुख हसन नसरल्ला आणि अन्य सात-आठ पदाधिकाऱ्यांचाही समावेश करता येईल. ही शेकड्यातील संख्या फक्त इस्रायलने गेल्या सात दशकांत मारलेल्या विविध दहशतवादी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची. यात हमास, पॅलेस्टाईन लिबरेशन ऑर्गनायझेशन, हेजबोल्ला, ‘ब्लॅक फ्रायडे’, फताह आदी अनेक संघटनांचा समावेश आहे. याखेरीज इस्रायलच्या कारवाईत मारल्या गेलेल्या जनसामान्यांची तर गणतीच नाही. सध्या एकट्या हमासविरोधी कारवाईत ४८ हजारांहून अधिकांचा मृत्यू झालेला आहे. एरवीही जनसामान्यांचे मृत्यू म्हणजे केवळ संख्या. तेव्हा तो मुद्दा सोडून दिला तरी इस्रायलने मारलेल्या विविध दहशतवादी संघटना पदाधिकाऱ्यांची यादीही इतकी प्रचंड आहे. तीवर नजर टाकल्यास काय दिसते?
हेही वाचा >>> अग्रलेख : भेसळ भक्ती!
हेच की इस्रायलने आणखी एका दहशतवादी संघटनेच्या आणखी एका म्होरक्यास ठार केले म्हणून स्थानिक परिस्थितीत काडीचाही फरक इतिहासात पडला नाही, वर्तमानात पडत नाही आणि भविष्यातही पडणार नाही. कारण मरायला तयार असणाऱ्यांची संख्या ही ज्यांचा जीव वाचवण्यासाठी हा नरसंहार सुरू आहे त्यांच्यापेक्षा किती तरी अधिक आहे. मरायला तयार असणाऱ्यास मारण्यात काहीही शौर्य नसते. या अशा तयारीनंतर खरोखरच मारल्या गेलेल्यांची संख्या इतकी असतानाही तितक्याच किंवा त्याहूनही अधिक संख्येने नव्याने असे मरणोत्सुक तयार होत असतील तर किमान अक्कल असलेल्यासही आपल्या माणसे मारण्याच्या धोरणात बदल करायला हवा, याची जाणीव होईल. ती व्हायला हवी याचे कारण गेल्या ७० वर्षांत या सनी देओली-छापाच्या निर्बुद्ध राष्ट्रवादाने इस्रायलच्या वाट्यास शांतता आलेली नाही. दंडात बेटकुळ्या आणि तोंडी मर्दुमकीची भाषा यांमुळे फार फार तर दहशत निर्माण होईल. तीदेखील क्षणिक. जगात कोणत्याही प्रदेशात कोणाचीही दहशत अनंत काळ टिकलेली नाही. इस्रायलच्या बाबतही असेच झाले. अमेरिकेच्या पदराआड राहून अन्यांवर डाफरणाऱ्या इस्रायलचा दरारा निर्मितीनंतर काही काळ राहिला. पण नंतर त्यास कोणी घाबरेनासे झाले. आदर्श पालकत्वात पाल्यावर हात उचलणे हा टाळायला हवा असा पर्याय. कारण एकदा का पालक जास्तीत जास्त दोन-चार रट्टे देतील; पण त्यापेक्षा अधिक काहीही करू शकत नाहीत, हे पाल्यास कळले की पोटची पोरेही अधिक निर्ढावल्यासारखी वागतात. इस्रायल आणि आसपासच्या देशांचे संबंध हे असे आता या निर्ढावलेपणाच्या पातळीवर आलेले आहेत.
हेही वाचा >>> अग्रलेख: सुखद स्वयंप्रज्ञेचे सुचिन्ह!
म्हणजे इस्रायल जीव घेण्यापलीकडे अधिक काहीही करू शकत नाही हे आता इस्लामी देशांस कळून चुकले आहे आणि असे जीव देण्यास आपल्याकडे मोठ्या संख्येने आहेत याचीही त्यांना जाणीव झालेली आहे. त्यामुळे अमेरिकेच्या पदराआडून अमाप लष्करी ताकद प्राप्त करूनही सतत तणावाखाली राहावे लागते आहे ते इस्रायली यहुदींनाच. हा तणाव फक्त इस्रायलच्या पवित्र भूमीपुरताच मर्यादित नाही. जगभरातील यहुदींनाही तो सहन करावा लागत आहे. अशा वेळी तरी बंदुका बाजूला ठेवून जरा वेगळा मार्ग चोखाळायला हवा असे इस्रायली नेतृत्वास वाटत नसेल तर ते खरे त्या देशाचे दुर्दैव आहे. इस्रायल आणि आसपासचे प्रदेश हा एकेकाळी लष्करी प्रश्न होता. आता तो नाही. एकेकाळी इस्लामी देशांनी इस्रायली भूमी बळकावण्याचा प्रयत्न केला. आता तो नाही. एकेकाळी इस्रायलींविरोधात इस्लामी देशांनी जिहाद पुकारला. आता तो नाही. अमेरिकेच्या दुधावर पुष्ट झालेली इस्रायलची पुतनामावशी आता धष्टपुष्ट झाली असून उलट तीच शेजारील पॅलेस्टिनींची भूमी व्यापू पाहते आहे. ज्या भागांत या पॅलेस्टिनींची वस्ती होती/ असायला हवी त्या भागांत इस्रायल पद्धतशीरपणे हातपाय पसरत असून स्थानिकांच्या भावनांस न जुमानता बेधडकपणे इमारती उभारत आहे. इस्रायलच्या अस्तित्वास ज्या वेळी नख लावले जात होते त्या वेळी इस्रायल चवताळून उठला आणि आपल्या जिवावर उठणाऱ्यांचा बीमोड त्या देशाने केला. त्या वेळी इस्रायली लष्करी कारवाई न्याय्य ठरवली गेली. ती तशी तेव्हा होतीही. तोच न्याय खरे तर सद्या:स्थितीत पॅलेस्टिनींस लावावयास हवा. इस्रायलची विद्यामान राजवट पॅलेस्टिनींस त्यांचे न्याय्य हक्कही देण्यास तयार नाही आणि त्यांना त्यांच्या हक्काची किमान भूमीही देऊ इच्छित नाही. जेथे त्यांची वसतिस्थाने होती तेथेही आता इस्रायली सैनिकांच्या देखरेखीखाली यहुद्यांच्या वसाहती उभ्या राहात आहेत.
तथापि जगाचे चातुर्य असे की इस्रायलने स्वसंरक्षणार्थ केलेल्या लष्करी कारवाईचे कौतुक होते आणि पॅलेस्टिनी तेच करू गेले की तो दहशतवाद ठरतो. ही पाश्चात्त्य मांडणी पश्चिम आशियातील अशांततेचे मूळ आहे. पाश्चात्त्यांच्या तालावर नाचत होती तोपर्यंत ‘मुस्लीम ब्रदरहूड’प्रमुखांस अगदी व्हाइट हाऊसमधे पाहुणचार करवावा अशी मित्र संघटना, नैसर्गिक वायू वाहू देण्याच्या मुद्द्यावर अगदी इनाम द्यावे असा ‘तालिबान’ही मित्र, व्यवसायात भागीदार होता तोपर्यंत ओसामा बिन लादेन मित्र, विनासायास तेल ओरपता येत होते तोपर्यंत कर्नल मुअम्मर गडाफी मित्र आणि ही सर्व समीकरणे उलटली तेव्हा मात्र हे सारे दहशतवादी, हे कसे? पाश्चात्त्यांचे आणि त्याचमुळे इस्रायलींचे हे दोन्ही बाजूंनी खेळणे बराच काळ विनासायास खपून गेले. गेली दोन दशके मात्र पाश्चात्त्यांच्या ‘अरे’स ‘कारे’ म्हणणारे पश्चिम आशियाच्या वाळवंटात वाढू लागलेले आहेत. शिवाय हे नुसते ‘कारे’ एवढेच म्हणून स्वस्थ बसणारे नाहीत. ते जीव द्यायला तयार आहेत. म्हणूनच ‘ब्रदरहूड’ संपली नाही. तालिबान संपली नाही. ओसामा, गडाफी मेले तरी त्यांच्या प्रांतात त्यांच्यापेक्षा भयानक ‘आयसिस’ तयार झाली. याचा अर्थ असा की एखाद्या म्होरक्यास टिपले म्हणून आनंद साजरा करण्यात अर्थ नाही. त्याची जागा घेणारा आणि त्याच मरणाच्या मार्गाने जाण्यास तयार असणारा त्याच्या मागे सज्ज असतो. नसरल्ला आणि अन्यांस ठार मारल्याच्या ‘यशा’नंतरही हे असेच होणार. तेव्हा हा लष्करी प्रश्न नाही. तो मुलकी आहे आणि नागरी प्रश्न लष्करी उपायांनी उलट चिघळतात असा इतिहास आहे. इस्रायल- हमास- हेजबोल्ला आदींबाबतही त्याचीच पुनरावृत्ती होणार याबाबत तिळमात्रही शंका नाही. म्हणजे अशीच माणसे मारणे दोनही बाजूंनी असेच अव्याहत सुरू राहणार. पॅलेस्टिनींस देय असलेल्या भूमीतील वाटा देणे हाच यावरील कायमचा तोडगा. तो मान्य होत नसेल तर जगासमोर कितीही हे धर्मयुद्ध असल्याचा आव आणला तरी प्रत्यक्षात हे ‘अधर्मयुद्ध’ ठरते आहे हे वास्तव लपणार नाही आणि त्याचा अंत होणार नाही.