‘आयसिस’ च्या जन्मास आणि पर्यायाने ‘बोको हराम’च्या वाढीस कारण ठरलेल्या इराक युद्धाचे कवित्व अद्याप संपलेले नाही..
बलवानाच्या बळावर बुद्धीचे आणि विवेकाचे नियंत्रण नसेल तर अशा बलवानांतून केवळ गावगुंड तयार होतात. हे सत्य स्थानिक पातळीवर जितके लागू होते तितकेच राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरही परिणामकारकपणे दिसून येते. या संदर्भातील उदाहरण अमेरिका आणि ताजा संदर्भ त्या देशाने लादलेल्या निर्लज्ज युद्धाची द्विदशकपूर्ती. या आठवडय़ात २० मार्च रोजी अमेरिकेने केवळ चूष म्हणून इराकवर केलेल्या हल्ल्यास २० वर्षे झाली. १९ मार्चच्या रात्री अमेरिकी हवाईदलाने बगदादवर हल्ले सुरू केले आणि २० तारखेस भल्या सकाळी तत्कालीन अमेरिकी अध्यक्ष जॉर्ज डब्ल्यू. बुश यांनी देमार हिंदी चित्रपटातील नायकास शोभेल अशा शब्दांत इराकवरील हल्ल्याची घोषणा केली. प्रत्यक्ष जमिनीवर पहिल्यांदा उतरल्या ब्रिटिश फौजा. ब्रिटनवर त्या वेळी मजूर पक्षाचे टोनी ब्लेअर पंतप्रधानपदी होते आणि ब्रिटनचे वर्तन अमेरिकेचे ५१ वे राज्य असल्यासारखे होते. त्यामुळे बुश यांच्या पडत्या फळाची आज्ञा ब्लेअर यांनी मानली आणि जवळपास ५० हजार सैनिक या युद्धात उतरवले. पाठोपाठ अमेरिकाकेंद्रित ‘नाटो’चे अन्य फौज-दारही या युद्धात आले. जवळपास नऊ-दहा महिन्यांच्या संघर्षांत इराकची उद्ध्वस्त धर्मशाळा केल्यानंतर, दोन लाख स्थानिक आणि साडेचार हजार अमेरिकी सैनिक इतक्यांची प्राणाहुती घेतल्यानंतर, तीन वर्षांनी सद्दामला संपवल्यानंतर या युद्धाने नेमके साधले काय याचे स्मरण या युद्धाच्या दुसऱ्या दशकपूर्तीनिमित्ताने करायला हवे.
त्यासाठी प्रथम या युद्धाचे प्रयोजन काय होते, हा प्रश्न महत्त्वाचा. त्याआधी २००१ साली सप्टेंबरात ९/११ च्या हल्ल्यात अमेरिकेच्या जागतिक सामर्थ्यांचे प्रतीक असलेले वल्र्ड ट्रेड सेंटरचे दिमाखदार मनोरे कोसळल्यानंतर कचकडय़ाच्या राष्ट्राभिमानाची शांत करण्यासाठी अमेरिकेस सूड घेणे आवश्यक होते. हे हल्ले घडवून आणले अल कईदा आणि त्या संघटनेचा ओसामा बिन लादेन याने. अफगाणिस्तानात दडलेला ओसामा अमेरिकेच्या हाती काही लागत नव्हता. मूळच्या उद्ध्वस्त अफगाणिस्तानास अधिक उद्ध्वस्त केल्यानंतरही ओसामा काही अमेरिकेस गवसला नाही. त्यामुळे या देशाने ओसामा आणि इराकचा सद्दाम हुसेन याचे संगनमत असल्याचा जावईशोध लावला आणि सद्दामने महाभयानक संहारास्त्रे जमवली असल्याची कंडी पिकवली. प्रत्यक्षात ओसामा आणि सद्दाम यांच्यात सौहार्द राहिले दूर, शत्रुत्वच होते. सर्व इस्लामधर्मीय हे इस्लामींविरोधात एकमेकांचे साथीदार असतात असा समज अनेकांचा असतो. बुश अशा बिनडोकींचे प्रतीक. सद्दामचे सुधारणावादी वर्तन परंपरावादी ओसामास मंजूर नव्हते. पण या सत्याचा कोणताही विचार न करता अमेरिकेने सद्दाम आणि ओसामा यांस एकाच कंसात बसवले आणि हा हल्ला केला. अमेरिकेस खरे तर सद्दाम सलत होता कारण त्याने स्थानिक इराकी तेल कंपन्यांचे केलेले राष्ट्रीयीकरण. यामुळे अमेरिकी तेल कंपन्यांची इराकी तेलावरील मालकी संपुष्टात आली. तेव्हा आर्थिक नुकसानीस धर्माचे कारण देत अमेरिकेने सद्दाम नायनाटाची कल्पना आखली. ती प्रत्यक्षात आणली. इतक्या प्रबळ देशांसमोर इराक टिकणे शक्यच नव्हते. तीन आठवडय़ांत त्या देशाचा पाडाव झाला. सद्दाम पकडला गेला. त्यानंतर तीन वर्षांनी ईदचा मुहूर्त शोधून अमेरिकेने त्यास देहान्त प्रायश्चित्त दिले. २००३ साली छेडलेल्या या युद्धाची सांगता अशा तऱ्हेने २००६ साली झाली. पण या युद्धाचे कवित्व अद्याप संपलेले नाही.
दरम्यान ज्या कारणांसाठी हे युद्ध आपण इराकवर लादले ते कारणच अस्तित्वात नाही, अशी कबुली अमेरिकेस द्यावी लागली. तत्कालीन युद्धनेते अमेरिकेचे कॉलिन पॉवेल यांनी यासाठी आत्मचरित्रात माफी मागितली. संरक्षणमंत्री डोनाल्ड रम्सफेल्ड, उपाध्यक्ष डिक चेनी यांना काही ही अशी उपरती झाली नाही. अध्यक्ष धाकले बुश यांस युद्धास भरीला घालणारे हे दोघे या युद्धाचे खरे शिल्पकार. पण त्यांच्या युद्धखोरीस बुश बळी पडले आणि त्यांच्या तीर्थरूपांनी १३ वर्षांपूर्वी केलेले पाप स्वत: करून बसले. सद्दाम हुसेन हा कुवेतवर हल्ला करण्याच्या तयारीत आहे असे कारण दाखवत थोरल्या बुश यांनी १९९० साली कुवेत वाचवण्यासाठी आणि इराकमध्ये ‘सहिष्णू लोकशाही’ प्रस्थापित करण्यासाठी आखाती युद्ध छेडले. त्याचे पुढे काय झाले हे आपण जाणतोच. त्याचप्रमाणे धाकल्या बुश यांच्या युद्धामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचे चटके आपण अजूनही सहन करीत आहोत. या युद्धोत्तर परिस्थितीस लागलेले सर्वात कटू आणि विषारी फळ म्हणजे ‘आयसिस’ ही संघटना. पाश्चात्त्यांच्या प्रत्येक आखाती हस्तक्षेपाने नवनव्या दहशतवादी संघटनांस जन्म दिला. २००३ सालच्या युद्धानंतर आकारास आलेली ‘आयसिस’ ही अशीच. इराकपाठोपाठ अमेरिका-केंद्रित ‘नाटो’ने लिबिया बेचिराख करून सद्दामप्रमाणे त्या देशाचा कर्नल मुअम्मर गडाफी यांसही ठार केले. या दोन देशांतील तेलसाठय़ावर त्यामुळे ‘आयसिस’ने कब्जा मिळवला आणि पुढे आफ्रिकेपर्यंत हातपाय पसरून ‘बोको हराम’सारख्या भयानक दहशतवादी संघटनेच्या वाढीस निमित्त दिले. इकडे इराकची प्रशासकीय वाताहतही झाली.
याचे कारण इराक शिया, सुन्नी आणि कुर्द यांच्यात विभागला गेला. या धार्मिक विभाजनाची अमेरिकेची समजूत इतकी केविलवाणी होती की या समान विभागणीच्या हव्यासात इराकच्या पंतप्रधानपदी शिया पंथीय नूरी अल मलीकी यांची वर्णी लावली गेली. हे मलीकी शेजारील शिया-बहुल इराणशी लागेबांधे असलेले. अशा व्यक्तीच्या हाती इराणचा कट्टर शत्रू असलेल्या सुन्नी इराकची सूत्रे देणे हे शहाणपणाचा अभावनिदर्शक होते. या अशा सत्तावाटपाच्या प्रयत्नात इराकमध्ये इतकी बेदिली माजली की स्थानिक पातळीवर दंगली झाल्या आणि त्यात हजारो इराकींस प्राण गमवावे लागले. या वातावरणाचा सर्वात मोठा फायदा उचलला तो ‘आयसिस’ने. या दहशतवादी संघटनेने इराकात आपली पाळेमुळे तर घट्ट रोवली; पण त्यासाठी नृशंस हत्याकांडे घडवून आणली. इतके करून अमेरिका-नियंत्रित प्रशासनास स्थानिक सुन्नी बहुमताशी जुळवून घेता आले नाही ते नाहीच. त्यामुळे शिया- सुन्नी- कुर्द असा तिकोनी बेबनाव तयार झाला आणि उत्तरोत्तर तो वाढतच गेला. दक्षिणेस शिया मुक्तबा-अल-सद्र याने आपला जम बसवला तर अनबार-फालुजा प्रांतांवर सुन्नी पंथीयांनी कबजा केला. सद्दामच्या काळात कुर्द जमातींस तसेही काही स्थान नव्हते. सद्दाम उच्चाटनानंतर तर त्यांची अवस्था अधिकच बिकट झाली. आता इराक, तुर्की आदी देशांतले कुर्द एकत्र येऊन स्वतंत्र कुर्दिस्तानची मागणी करू लागले आहेत. पण त्यांच्या पदरात काहीही पडण्याची शक्यता नाही. चिनी विगुर मुसलमानांप्रमाणे हे कुर्दही असेच मातृभूमीस वंचित राहण्याची शक्यता अधिक. या कुर्दाचे भले केल्याने बडय़ा देशांचा काही फायदा होण्याची शक्यता नाही. उपयुक्तता नाही आणि उपद्रवही नाही; अशांस कोणीच कधी वाली नसतो. अशा तऱ्हेने या युद्धामुळे कोणाचे काही भले होण्याऐवजी त्या प्रांतांतील सर्वाचेच बुरे झाले. या युद्धाची वेळ खरे तर अमेरिकेच्या सोयीची होती. पण अमेरिकेच्या हातीही त्यातून काही लागले नाही. उलट युद्धाच्या खर्चापोटी मुबलक डॉलर्स उपलब्ध करून द्यावे लागल्याने पैसा कमालीचा स्वस्त झाला आणि त्यातून २००८ चे आर्थिक अरिष्ट निर्माण झाले. म्हणजे ‘ही वेळ युद्धाची नाही’ हेच सत्य समोर आले. कारण युद्ध कोणत्याही वेळी, कोणत्याही काळी विध्वंसकच असते. त्या विध्वंसाच्या वेदनांचा विषाद नंतर वाटून काहीही उपयोग होत नाही. इराक युद्धाची द्विदशकपूर्ती याचेच स्मरण करून देते.