दर काही काळाने अशी घटना घडली की चीड, उद्विग्नता, हताशा घेऊन मोर्चे काढायचे आणि तिच्या जागी आपली लेक नव्हती याचे समाधान मानायचे?
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
बलात्कार आणि क्रूर हत्या यांची बळी ठरलेल्या कोलकात्यातील डॉक्टर तरुणीपेक्षा आईच्या गर्भातच स्त्रीभ्रूणहत्येला सामोऱ्या जाणाऱ्या मुली किती तरी नशीबवान म्हणायच्या. होय… मुली, स्त्रिया यांच्या बाबतीत घडणाऱ्या क्रौर्याची प्रतवारी करायची तर ती अशीच करावी लागेल. या जगात येऊन कुणाची तरी लाडकी लेक, लाडकी बहीण, लाडकी नात, पुतणी, भाची, मैत्रीण, बायको होऊनही कुणा वासनांधाच्या विकृतीची शिकार होण्यापेक्षा जन्मण्याच्या आधीच काय तो मृत्यू आलेला कधीही चांगला. काळजाचा तुकडा असलेल्या लेकीला प्रेमाने, लाडाकोडात वाढवण्याची, शिकवण्याची, हवे ते सगळे मिळवून देण्याची इच्छा बाळगणाऱ्या आईबापांना एके काळी हुंडा नावाच्या छुप्या, पण भयंकर राक्षसाची दहशत होती. आजघडीला त्याची जागा बलात्कार या महाभयंकर अशा सैतानाने घेतली आहे. जळी स्थळी काष्ठी पाषाणी त्याची भीती बाळगत जगण्यापेक्षा ‘पापा की परी’ जन्माला न आलेलीच बरी, असे कोणत्याही आईबापांना आजघडीला वाटत असेल तर त्यात काय चुकीचे आहे?
कोलकात्यातील डॉक्टर तरुणीच्या निर्घृण हत्येनंतर देशभर निर्माण झालेला रोष याच सगळ्या पालकांचे प्रतिनिधित्व करतो. दिल्ली असो, हैदराबाद असो, कोलकाता असो की उत्तराखंड… कोणत्याही कारणाने घराबाहेर पडणारी स्त्री पुरुषांच्या विकृत क्रौर्याला सातत्याने बळी पडत असेल तर आपण खरोखर २१ व्या शतकात जगत आहोत का? किती वेळा या सगळ्याचा संताप व्यक्त करण्यासाठी लोकांनी रस्त्यावर उतरायचे? दर काही काळाने कुठे तरी पुन्हा अशी घटना घडली की चीड, उद्विग्नता, हताशा घेऊन मोर्चे काढायचे आणि तिच्या जागी आपली लेक नव्हती याचे समाधान मानायचे?
बलात्कार, क्रूर हत्या हा गेली काही वर्षे सातत्याने घडणाऱ्या गुन्ह्यांच्या संदर्भातला भावनिक पसारा बाजूला ठेवला की उरते ते एकच सत्य, ते म्हणजे व्यवस्था. या सगळ्याला जबाबदार आहे ती पुरुषप्रधान व्यवस्था. स्त्रीच्या विरोधातला हा अतिशय किळसवाणा, नीच, घृणास्पद, क्रूर अत्याचार पुरुषाच्या मनातली तिची जागा तिला दाखवून देण्यासाठी, काहीही झाले तरी सामाजिक सत्तेच्या उतरंडीत मी तुझ्याहून श्रेष्ठच आहे, हे दाखवून देण्यासाठीच असतो. ज्या क्षणी एखादी स्त्री हवीशी होते, त्या क्षणी ती उपलब्ध असणे, नसेल तर काहीही करून ती मिळवणे आणि तिचा नकार असेल तर तिला जन्माचा धडा शिकवणे… त्यासाठी क्रौर्याचे टोक गाठावे लागले तरी बेहत्तर. स्त्री-पुरुषांच्या नात्यातील सत्तासमतोल हा असा आहे. खरे तर तो समतोल नाहीच. तू स्त्रीपेक्षा श्रेष्ठ आहेस, ही भावना पुरुषांच्या मनात आपल्याच नाही तर जगातील बहुतेक सामाजिक व्यवस्थांमध्ये अगदी लहानपणापासून बिंबवली जाते. ती घेऊनच ते वाढतात. शिक्षण, घरातील वातावरण, स्त्रीवादी विचार, संबंधित व्यक्तीची संवेदनशीलता या सगळ्याच्या परिणामी काही थोडके पुरुष या सगळ्यापासून वाचून अपवाद ठरतात खरे, पण बाकी अनेक जण हिंमत नसते म्हणून किंवा संधी मिळत नाही म्हणून साळसूद वावरत राहतात. घरी मारहाण करणे, रस्त्यावर छेड काढणे, अश्लील बोलणे, अश्लील क्लिप्स पाठवणे, अंगचटीला जाणे असे ‘पुरुषार्थ’ या सगळ्यातूनच येतात.
हेही वाचा >>> Kolkata Rape Case: ‘आंदोलनामागे राजकीय षडयंत्र’; तृणमूलमधील काही आरोप; काहींचा आंदोलनाला पाठिंबा
हजारो वर्षे जिला घरात डांबून ठेवले, चूल आणि मूल एवढेच करायला लावले ती स्त्री आधुनिकतेच्या रेट्यात व्यक्ती म्हणून विकसित होत गेली आहे, तिच्यावर लादलेल्या बेड्या फेकून देते आहे. अडथळ्यांवर मात करते आहे. लिंग, जात, वर्ग या सगळ्याच ठिकाणच्या पुरुषी मक्तेदारीला तिने आव्हान दिले आहे. ते थोपवण्यासाठी, संपवण्यासाठी बलात्कार, क्रौर्य याशिवाय दुसरे कुठले मार्ग पुरुषाकडे असू शकतात? काही वर्षांपूर्वी झालेल्या एका पाहणीमध्ये ‘तुम्हाला सगळ्यात जास्त भीती कशाची वाटते,’ असा प्रश्न स्त्रियांना विचारला गेला होता, तेव्हा बहुतांश स्त्रियांनी ‘बलात्काराची’ असे उत्तर दिले होते. म्हणजे जिवाच्या भीतीपेक्षाही त्यांना बलात्काराची जास्त भीती वाटत होती. त्यामुळेच एकीवर बलात्कार झाला की शंभर मुलींचा अवकाश सीमित होत जातो. त्यांच्या मोकळेपणाने वागणे बोलणे, वावरणे, उशिरापर्यंत बाहेर असणे यासह अनेक गोष्टींवर बंधने येतात. बलात्कार झाला की पुढचे सगळे आयुष्य ‘बरबाद’ होते, अशा कल्पना बिंबवल्या जातात. तिची बेअब्रू होऊ नये म्हणून तिची ओळख लपवली जाते. पण हे सगळे अशाच पद्धतीने का करत राहायचे? मुळात स्त्रीची अब्रू हे कुठले काचेचे भांडे नाही, बलात्कार हा त्या व्यक्तीविरोधातील व्यक्तिगत गुन्हा नाही, तर तो पुरुषसत्ताक मानसिकतेने केलेला ‘राजकीय’ गुन्हा आहे, हे आपण जोपर्यंत नीट समजून घेत नाही, मुलींच्या मनांवर बिंबवत नाही, तोपर्यंत परिस्थिती बदलण्याची शक्यता खूपच कमी आहे.
आपल्या राजकारण्यांकडे ही परिपक्वता नाही, हे तर उघडच आहे. अन्यथा काही वर्षांपूर्वी घडले ते हैदराबादमधील बलात्काऱ्याचे ‘एन्काउंटर’ घडते ना. बलात्काऱ्यांना ताबडतोब फाशीच द्या, ही मागणी सामान्यांकडून अत्यंत त्वेषाने होणे, हे समजण्यासारखे आहे. पण ममता बॅनर्जींसारख्या कसलेल्या राजकीय नेत्याही निव्वळ आपल्या राजकारणासाठी केंद्रीय अन्वेषण विभागाला कोलकात्यातील बलात्कार हत्याप्रकरणी रविवारपर्यंत फाशीच्या शिक्षेचा निर्वाणीचा इशारा देतात, तेव्हा सगळेच हास्यास्पद होऊन जाते. हजारो वर्षे घडत- बिघडत आलेली मानसिकता झट की पट फाशी या न्यायाने कशी सुधारणार आहे? उलट त्यामुळे ती आणखीच बिघडेल असे काहीसे चित्र निर्भया कायद्यातून दिसून आले आहे. १९७५ मधले मथुरा बलात्कार प्रकरण ते २०१२ चे दिल्लीतील निर्भया प्रकरण या ३५-३७ वर्षांच्या काळात बलात्कारविरोधी कायद्यासंदर्भात बऱ्याच घडामोडी घडत गेल्या आहेत. निर्भया प्रकरणानंतर या गुन्ह्यासाठी फाशीची तरतूद करण्यात आली तेव्हा यामुळे बलात्कारितांच्या हत्यांचे प्रमाण वाढेल, असेही म्हटले गेले होते. ते काही प्रमाणात खरे होताना दिसत आहे.
हेही वाचा >>> अग्रलेख: ‘घर में घुसके’…
कोलकाता प्रकरणातील तपशील जसजसे पुढे येत आहेत, तसतसे त्यातील अनेक गोष्टी सगळ्यांनाच कमालीच्या अस्वस्थ करणाऱ्या आहेत. बलात्कारानंतर संबंधित डॉक्टर तरुणीच्या बाबतीत जे क्रौर्यकर्म केले गेले, तिच्या शरीराची ज्या पद्धतीने विटंबना करण्यात आली, ते हिणकस म्हणण्याच्याही पलीकडचे आहे. माणूस माणसाशी असा वागू शकतो? संबंधित आरोपी पोलीस मित्र असल्याचे सांगितले जात आहे. पोलीस आणि गुन्हेगार यांच्यामधली सीमारेषा अत्यंत पुसट असल्याचे सांगितले जाते, ते या प्रकरणातून पुन्हा एकदा खरे ठरताना दिसते आहे. इतक्या मोठ्या रुग्णालयाच्या सेमिनार हॉलमध्ये सीसीटीव्ही नव्हता, हे आणखी एक विशेष. रुग्णालयाने सुरुवातीला या प्रकरणाची आत्महत्या म्हणून बोळवण करायचा प्रयत्न केला, हेदेखील आपल्याकडे नेहमी घडते त्या प्रकारामधलेच. आणि या सगळ्यामुळे रुग्णालयावर हल्ला करणाऱ्या जमावाने येऊन रुग्णालयाची अपरिमित मोडतोड, हानी केली हेदेखील आपल्या एकूण मानसिकतेला धरून असणारेच. फक्त कुठल्या सर्वसामान्य माणसाची समूहाबरोबर जाऊन असे काही करायची हिंमत होऊ शकते, हा प्रश्न विचारला की त्याची उत्तरे वेगळी मिळतात.
दिल्लीतील तरुणीला निर्भया म्हटले गेले होते, तसे आता या तरुणीला अभया म्हटले जात आहे. पण अभया असो की निर्भया, घरीदारी, कामाच्या ठिकाणी कुणीच, कुठेच सुरक्षित नाही. अशा असुरक्षित जगात पोरी तू जन्मूच नकोस, हेच बरे.