भाजप वा काँग्रेस या दोन ध्रुवीय पक्षांपैकी एकाचा हात उघडपणे धरला तरच प्रादेशिक पक्षांना अपेक्षित जागा, हा अंदाज राजकारणाचा पोत बदलणारा आहे…

निवडणुकांच्या रणधुमाळीत राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार यांच्या एका विधानाने बराच राजकीय धुरळा उडाला. अनेक लहान लहान पक्षांनी काँग्रेसमध्ये विलीन व्हावे अशा अर्थाचे विधान पवार यांनी केले. ‘लोकसत्ता लोकसंवाद’ उपक्रमात बोलताना त्यांनी या विधानाचे स्पष्टीकरण दिले. देशातील अनेक लहान पक्षांचे मूळ खोड काँग्रेस. या अशा पक्षांना एकत्र आणण्याचा विचार काँग्रेसला करावा लागेल आणि या अशा पक्षांनाही काँग्रेसशी सहकार्य करण्याचा अथवा त्या पक्षात विलीन होण्याचा विचार करावा लागेल, असा त्यांच्या प्रतिपादनाचा अर्थ असावा. ‘असावा’ असे म्हणायचे याचे कारण पवार यांच्यासारखा मुरब्बी राजकारणी उगाच कोणतेही विधान ‘सहज सुचले म्हणून’ करत नाही आणि अशांकडून जे विधान केले जाते त्याचा अर्थ केवळ तत्कालिकतेत राहात नाही. तो त्यापेक्षा अधिक असतो. म्हणजे अशा विधानांची दोन लक्ष्ये असतात. एक समोर दिसणारे. आणि दुसरे न दिसणारे. यातील पहिल्याचा साक्षात्कार सर्वांस झाला. या विधानाने उठलेला गदारोळ, धुरळा आणि त्यामुळे निर्माण झालेले प्रवाद हे लगेचच दिसले. तथापि यातील न दिसणारे लक्ष्य हे कदाचित मतदानोत्तर पाहण्यांतून (एग्झिट पोल) समोर आले असावे. त्याचा विचार करावा लागेल.

हेही वाचा >>> अग्रलेख: कलापासून कौलापर्यंत..

त्यावरून दिसते ते असे की तमिळनाडूत स्थानिक अण्णा द्रविड मुन्नेत्र कळहम (अण्णा द्रमुक) या पक्षाचा पुरता बोऱ्या उडाला. हा पक्ष भाजपशी निवडणूकपूर्व युती करणार होता. ती होता होता थांबली. परिणामी भाजप आणि अण्णा द्रमुक हे दोन्ही पक्ष स्वतंत्रपणे लढले. हा एके काळी जयललिता यांनी नेतृत्व केलेला पक्ष. त्यांच्या निधनानंतर अनाथ झाला. या राज्याच्या उत्तरेकडील नव्या तेलंगण राज्यातही स्थानिक ‘भारत राष्ट्र समिती’ (बीआरएस) या पक्षाचे बंबाळे वाजले. अगदी अलीकडेपर्यंत हा पक्ष त्या राज्यात सत्तेवर होता आणि त्याचे प्रमुख के चंद्रशेखर राव यांना तो राष्ट्रस्तरावर नेण्याची आणि पंतप्रधानपदाचीही स्वप्ने पडत होती. ती पार मातीत गेली, असे या मतदानोत्तर पाहण्यांतून दिसते. अण्णा द्रमुकप्रमाणे या पक्षानेही ही निवडणूक स्वत:च्या ताकदीवर एकट्याने लढवली. हा पक्ष ना काँग्रेसशी सहकार्य करत होता ना भाजपशी. या पक्षास सत्ताच्युत करून काँग्रेसने त्या राज्यात सरकार बनवले. त्यामुळे त्या पक्षाशी ‘बीआरएस’ची हातमिळवणी होणे शक्यच नव्हते. दुसरीकडे केंद्रीय यंत्रणांनी राव यांच्या कन्येस तुरुंगातच टाकले. त्यामुळे भाजपशीही आघाडीचा प्रश्न नव्हता. हे राज्य ज्याच्या पोटातून आकारास आले त्या आंध्र प्रदेशात चंद्राबाबू नायडू यांचा ‘तेलगु देसम’ यावेळी भाजपच्या आघाडीचा घटक असल्यासारखा वागला. भले भूतकाळात नायडू यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांस वाटेल तसे बोल लावले असतील. पण झाले गेले गंगेस मिळावे त्याप्रमाणे आपल्याच आधीच्या भूमिकेस मुरड घालत नायडू यांनी मोदींशी यावेळी दोस्तीचा हात पुढे केला. मतदानोत्तर पाहण्यांनुसार तेलगु देसम यावेळी आंध्रात सत्तेत येईल आणि त्या पक्षाचे उमेदवार लोकसभेतही चांगल्या संख्येने निवडून येतील असे दिसते.

शेजारी महाराष्ट्रातील परिस्थिती याच्या अगदी उलट. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर उद्धव ठाकरे यांनी आपला पक्ष भाजपच्या नव्हे तर काँग्रेसच्या जवळ नेला. शरद पवार यांची राष्ट्रवादी, उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि काँग्रेस अशी युती महाराष्ट्रात होती. मतदानोत्तर पाहण्यांच्या भाकितानुसार भाजप-प्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या तुलनेत काँग्रेसची विरोधी पक्षांची आघाडी या निवडणुकीत बरी कामगिरी करताना दिसते. पूर्वेकडील राज्यांपैकी पश्चिम बंगालात स्थानिक सत्ताधारी ‘तृणमूल काँग्रेस’ हा पक्ष वास्तविक विरोधी पक्षीयांच्या ‘इंडिया’ आघाडीचा प्रमुख घटक. परंतु निवडणुकीत ‘तृणमूल’ची ना काँग्रेसशी युती होती ना त्या राज्यात प्रबळ असलेल्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाशी काही समझोता होता. परिणामी त्या राज्यात भाजपने मोठी मुसंडी मारल्याचे मतदानोत्तर चाचण्या सांगतात. शेजारील ओदिशात बिजू जनता दल हा राज्यात सत्तेत आहे. तो पक्ष केंद्रीय पातळीवर जो कोणी सत्तेवर असेल त्यास धरून असतो. कारण त्या पक्षाचे अध्वर्यू नवीन पटनाईक यांना रस आहे तो राज्याच्या राजकारणात. त्यामुळे ते कधी उगाच केंद्रातील सत्ताधारी पक्षाशी दोन हात करायला जात नाहीत. याहीवेळी त्यांची भाजपशी युती होणार होती. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तशा अर्थाचे विधान केले होते. पण तरीही दीर्घकालीन हित लक्षात घेत पक्षाने अशी युती करणे टाळले. त्यामुळे निवडणुकांत उभय पक्षांनी एकमेकांस बोचकारले आणि दोन्ही पक्ष स्पर्धकाप्रमाणेच वागले. मतदानोत्तर पाहण्यांनुसार यावेळी बिजू जनता दल ओदिशा विधानसभेत जरी चांगली कामगिरी करण्याची शक्यता असली तरी लोकसभेत मात्र भाजपचे त्या राज्यातील उमेदवार अधिक प्रमाणात निवडून येण्याचा अंदाज आहे. आतापर्यंत लोकसभेतही बिजू जनता दलास चांगले यश मिळत असे. यावेळी चित्र बदललेले असेल असे या पाहण्या सांगतात. त्याच भागातील बिहारमध्येही तसेच झाले. नितीशकुमार यांचा जनता दल हा स्थानिक पक्ष भाजपच्या गोटातून लढला आणि लालू प्रसाद यादव यांचा ‘राष्ट्रीय जनता दल’ काँग्रेसच्या कंपूतून. या दोनही पक्षांची कामगिरी उल्लेखनीय असल्याचे पाहण्यांतून दिसून येते.

हेही वाचा >>> अग्रलेख: कल्पनाशून्य कारभारी!

अन्य लहान-मोठ्या राज्यांतून अशी आणखी काही उदाहरणे देता येतील. या सगळ्याचा अर्थ एकच. तो असा की जे प्रादेशिक पक्ष फक्त स्वत:च्या पायावर उभे राहण्याचा प्रयत्न करत होते त्या सर्वांस या निवडणुकीत फटका बसला. याचाच दुसरा अर्थ असा की ज्या प्रादेशिक पक्षांनी काँग्रेस असो वा भाजप या दोन ध्रुवीय पक्षांपैकी एकाचा हात उघडपणे धरला ते आपली कामगिरी अधिक ठसठशीतपणे नोंदवू शकले. महाराष्ट्रात उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने नि:संदिग्धपणे काँग्रेसशी हातमिळवणी केली. निवडणुकीत त्या पक्षाचे भले होत असल्याचा अंदाज पाहण्यांतून व्यक्त होतो. त्याचवेळी अण्णा द्रमुक वा बिजू जनता दल वा अन्य पक्षांनी भाजपच्या जवळचे असूनसुद्धा अधिकृत युती टाळली. दुसऱ्या टोकाला पश्चिम बंगालमध्ये ‘तृणमूल’ या काँग्रेस-प्रणीत ‘इंडिया’चा घटक पण त्यांनी काँग्रेसशी युती केली नाही आणि दक्षिणेतील तेलंगणातही ‘बीआरएस’ काँग्रेस वा भाजप युतीशिवाय लढला. निवडणुकीत तृणमूल आणि ‘बीआरएस’ या दोनही पक्षांस मतदारांनी हातचे राखून मतदान केल्याचे पाहण्यांतील आकडेवारीवरून दिसते. यावरून देशातील राजकारण यापुढे दोन ध्रुवांभोवती फिरेल असा एक अंदाज बांधता येईल आणि अस्थानी नसेल. म्हणजे काँग्रेसचे विघटन होण्याआधी देशात जी परिस्थिती होती तीकडे आपल्या राजकारणाचे मार्गक्रमण सुरू असल्याचे दिसते. त्यावेळी राजकीय विचारधारेच्या डावीकडे एका ध्रुवावर काँग्रेस होता आणि समोर उजवीकडे आधी जनसंघ आणि नंतर भाजप. अन्य पक्ष हे या पक्षीय विचारधारांच्या परिघात फिरत. त्याचप्रमाणे भविष्यातही प्रादेशिक पक्षांस काँग्रेस अथवा भाजप या दोनपैकी एकाची निवड करावी लागेल. आताच्या मतदानोत्तर पाहण्यांचे निष्कर्ष जर वास्तव निदर्शक असतील तर त्याचा हा अर्थ आहे. मागल्या पिढीतील लोकप्रिय भावगीत गायक गजानन वाटवे यांनी गायलेले एक गीत त्यावेळी चांगलेच गाजले. त्या ‘‘दोन ध्रुवांवर दोघे आपण; तू तिकडे अन् मी इकडे’’ गीताप्रमाणे यापुढे आपले आगामी राजकारण असेल असे दिसते.