जे काही झाले वा भाजपने करून घेतले त्याचे वर्णन पाहुण्याच्या वहाणेने यजमानाने स्वत:च्या श्रीमुखात मारून घेणे असे करता येईल..

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

अजितदादा पवार यांना हवे होते ते पुणे जिल्ह्याचे पालकमंत्रीपद मिळाले याबद्दल त्यांचे अभिनंदन करावे की ते ज्यांच्या हातून गेले त्या चंद्रकांतदादा पाटील यांच्याविषयी दु:ख, कणव इत्यादी सहवेदना व्यक्त करावी हा तसा गंभीरच प्रश्न. दोघेही दादा. त्यात चंद्रकांतदादा तर भाजपचे कर्ते-धर्ते अमित शहा यांच्याशी सासुरवासीय सख्य राखून असलेले. पण तरी त्यांना डावलून अमितभाईंनी अजितदादांकडे पुण्याचे पालकमंत्रीपद दिले यामुळे दादांच्या (चंद्रकांत) मनास किती यातना झाल्या असतील याची कल्पना अतुल भातखळकर किंवा तत्समच करू शकतील. शेवटी ‘घर की मुर्गी दाल बराबर’ हेच खरे! (भातखळकरांनी मुर्गीच्या जागी तुरीची डाळ आणि ‘दाल’च्या जागी केशरी दाल असे वाचावे!) बाकी राजकारणात नशीब घेऊन यावे ते अजित पवारांसारखे. कोणताही पक्ष, कोणत्याही आघाडय़ा सत्तेवर येवोत. उपमुख्यमंत्रीपद अजितदादांसाठी हमखास असणारच. त्याअर्थी अजितदादा म्हणजे एकविसाव्या शतकातील बाबू जगजीवनरामच म्हणायचे. सत्ताधारी आपले असोत की परके! दादा रुसले की सगळेच त्यांच्या नाकदुऱ्या काढायला येणार. घरचा पक्ष सत्तेवर असेल तर सर्व पापे पोटात घालायला, परक्यांशी हातमिळवणी करून आल्यावरही ‘सुबह का भूला शामको घर आये तो उसे भूला नही कहते’, असे म्हणत सर्वावर पांघरूण घालायला काका आहेतच! मधल्या मध्ये शत्रुपक्षाशी हातमिळवणी करून सिंचन घोटाळय़ातून स्वत:चे नाव पुसून टाकण्याचे त्यांचे कसबही वाखाणण्यासारखेच. ते करायचे, परत स्वगृही यायचे, उपमुख्यमंत्री व्हायचे, सरकार गेल्यावर ते ज्यांच्या हाती गेले त्यांच्याशी पुन्हा हातमिळवणी करायची आणि पुन्हा उपमुख्यमंत्रीपद मिळवायचे हे काही येरागबाळय़ाचे काम नाही. त्यासाठी पवारच हवे! एका बाजूने स्वकीय काका आणि दुसऱ्या बाजूला परपक्षीय अमित शहा इतकी भक्कम तटबंदी निर्माण करू शकणारा राजकारणी, आचार्य अत्रे यांच्या शब्दांत सांगावयाचे तर, गेल्या दहा हजार वर्षांत या राज्यात झाला नाही. तेव्हा पुण्याचे पालकमंत्रीपद हिसकावून घेण्यात यश आल्याबद्दल त्यांचे अभिनंदन आणि अपयशासाठी दुसऱ्या दादांचे सांत्वन करून जे झाले त्याविषयी काही..

जे काही झाले वा भाजपने करून घेतले त्याचे वर्णन पाहुण्याच्या वहाणेने यजमानाने स्वत:च्या श्रीमुखात मारून घेणे असे करता येईल. वास्तविक अलीकडेपर्यंत भाजपचे आणि त्यांच्या उच्चवर्णीय समर्थकांचे सोवळे पवार काका-पुतण्यांचे नाव जरी घेतले तरी मोडत असे. अजित पवार यांचा कथित सिंचन भ्रष्टाचार हा तर भाजपच्या राजकीय विजयाचा पाया होता. त्याआधी थोरल्या पवारांनी त्या वेळी पुरवलेल्या रसदीवर गोपीनाथ मुंडे आदींची कारकीर्द उभी राहिली. पवार यांच्याप्रमाणे त्यांचे सहकारी राष्ट्रवादीचे प्रफुल्ल पटेल हेदेखील भाजपच्या नैतिकतावाद्यांसाठी अब्रह्मण्यम होते. त्यांच्या मतदारसंघात जाऊन सर्वशक्तिमान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या नायनाटाची हाक दिली होती. तेव्हा भाजपतील अनेक पापभीरूंस वाटले ‘झाले.. पटेलभाईंचे दिवस भरले’. पण कसचे काय! आज परिस्थिती अशी की अजित पवार हे जणू भाजपचे जावई आहेत असे वाटावे आणि प्रफुल्लभाई व्याही. काय मान आहे उभयतांस भाजपत! राज्य भाजपत अजित पवार त्यांना हवे ते करून घेऊ शकतात आणि दिल्लीत बसून प्रफुल्लभाई त्यांचा मार्ग निष्कंटक करतात. तथापि भाजपची सून नकटी असती तर तिला पदरात घेतले म्हणून या उभयतांविषयी भाजपच्या मनात असलेली आदराची भावना एक वेळ समजून घेता आली असती. पण तसे काही नाही. भाजपची ही सून अंगापिंडाने भरलेली आणि चांगलीच ‘कमावती’देखील. या सुनेच्या संसारास आधीचे शिवसेना हे सासर हवा तसा हातभार लावायला होतेच. तरीही अजित पवार आणि कंपूंचे चोचले पुरवण्याची गरज या भाजपस वाटते याचे आश्चर्य. हे चोचले पुरवणे पालकमंत्रीपदावरच थांबणारे नाही. आधी उपमुख्यमंत्रीपद, अर्थखाते, पालकमंत्रीपद आणि आता त्यानंतर हव्या त्या ठिकाणी हवे ते पोलीस आणि प्रशासकीय अधिकारी असा हा प्रवास असेल यात शंका नाही.

ते पुरवले जातात याचे कारण धाकल्या अजित पवार यांच्या राजकीय ताकदीबाबत भाजपच्या दिल्लीश्वरांस असलेला गैरसमज. त्यातही त्यांचे मराठा असणे. अलीकडे भाजप बेरजेच्या राजकारणात मराठा नेतृत्वास आकृष्ट करताना दिसतो. शिवसेनेतील एकनाथ शिंदे, राष्ट्रवादीतील अजित पवार आणि छगन भुजबळ वगळता अन्य कंपूस चुचकारणे, राधाकृष्ण विखे पाटील यांचे वाढते प्रस्थ ही याची उदाहरणे. विस्तारवादी राजकारणात हे योग्यच. पण हा विस्तार करताना स्वत:ची ओळख विसरून चालत नाही. सत्तामदाचा गंध घेत धुंद झालेला भाजप आता स्वत:चीच ओळख विसरत चाललेला आहे. किंबहुना अशी काही ओळख आपली होती, तशी ती असायला हवी याची गरज त्यास वाटेनाशी झाली आहे. सहा दशकांहून अधिक काळ सत्ता भोगल्यावर काँग्रेसचेही असे झाले होते. तथापि भाजपचे मोठेपण म्हणजे त्यांनी स्वत:बाबत ही वेळ अवघ्या दशकभरात आणली. पुढची पिढी आधीच्यापेक्षा अधिक प्रगत असते असे म्हणतात; ते याचमुळे बहुधा! आज केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरात अनेक महत्त्वाच्या पदांवरील राजकीय व्यक्ती भाजपेतर पक्षातील आहेत. ही अन्य पक्षीयांची भाजपतील चलती पाहता एक प्रश्न पडतो.

तो असा की संस्कारी राजकारण्यांसाठी वर्ग चालवा, बौद्धिके घ्या, प्रभात-सायं शाखा चालवा वगैरेची आता गरजच काय? कोणत्याही मार्गाने सत्ता मिळवा आणि अन्य पक्षांतील संभाव्य विजयींची आयात करून ही सत्ता अधिकाधिक लांबवा हे समीकरण दीर्घकालीन गुंतवणुकीवरील परताव्यापेक्षा अधिक फलदायी आहे. किती ते भाजपचे सध्याचे राजकारण पाहता लक्षात यावे. वाईट वाटते ते या अशा झटपट फलाची चटक लागल्यामुळे दीर्घकालीन देश आणि पुढची पिढी वगैरे घडवण्याच्या मार्गाने भाजपत राहून भाजपत वाढीची स्वप्ने पाहणाऱ्यांचे. आता चंद्रकांत दादांचेच पाहा. दादा कोल्हापुरी. त्यांच्याकडून पुण्याचे पालकमंत्रीपद हिसकावून घ्यायचेच होते तर कोल्हापूरचे तरी द्यायचे. तेही नाही. कोल्हापुरात दादांच्या नाकावर टिच्चून बसवले कोणास? तर भ्रष्टाचार इत्यादींचे आरोप झालेल्या हसन मुश्रीफांस. त्याचा भाजपस हिंदू-मुस्लीम समरसता प्रदर्शनात उपयोग होईलही. पण चंद्रकांत दादा आणि अन्य संस्कारींचे काय? बिचारे विजयकुमार गावित. किती पक्षांतून भाजपत आले. आपले आदिवासी विकास कल्याण आणि नंदुरबारचे पालकमंत्रीपद अबाधित राहावे इतकीच काय ती त्यांची मनीषा. तीही भाजपने पूर्ण होऊ दिली नाही. ते थेट भंडाऱ्यात पाठवले गेले. बीडमध्ये गोपीनाथकन्या पंकजा मुंडे लक्ष वेधण्यासाठी जिवाचे किती रान करतात. पण त्यांना मंत्रीपद वगैरे नाहीच; उलट त्यांच्या वडिलांशी प्रतारणा करून राष्ट्रवादीत गेलेल्या धनंजयाकडे जिल्ह्याची सूत्रे. असो.

हे सगळे खरे तर भाजपशी पाट लावणाऱ्या एकनाथ शिंदे गटाचीही झोप उडवणारे आहे. शिंदे यांचे ठीक. ते झाले मुख्यमंत्री. पण त्यांच्या भरवशावर शिवसेना सोडणाऱ्या अन्यांचे काय? सगळेच काही उदय सामंत किंवा दीपक केसरकर नसतात. इतरांवर बदल्या-बढत्या कोरून पोट भरायची वेळ आल्याचे दिसते. या दु:खी जीवांकडे लक्ष द्यायला भाजपस वेळ नाही. स्वपक्षीयांनाच कस्पटासमान लेखणारे भाजप नेतृत्व शिंदे गटास काय भीक घालणार हे उघड आहे. तेव्हा राज्य भाजपत सर्व बालक आहेत आणि त्यांचे दिल्लीतील पालक या बालकांच्या इच्छा-आकांक्षांकडे ढुंकूनही पाहण्यास तयार नाहीत हा या घटनेचा अर्थ. शिंदे गटास तो एव्हाना लक्षात आला नसेल तर पालकमंत्रीपदावरील नेमणुकांतून तो समजून घेता येईल. आता उपेक्षा अटळ.