केवळ मैफली गाजवणे प्रभा अत्रे यांचे ध्येय नव्हते. मैफल रंगते, अलौकिक पातळीला जाते ती कशी, याचा अभ्यासही त्यांनी केला..
वडील शिक्षक. स्वभावाने नेमस्त. जन्मगाव पुणे. हे शहर; तरीही सामाजिकदृष्टय़ा कर्मठ. तेव्हा शिक्षकाच्या मुलीने शिक्षणाबरोबरच संगीताच्या मागे लागणे, हे आश्चर्याचेच. डॉ. प्रभा अत्रे यांच्या बाबतीत हे अगदी असे घडले. लहान वयात कोणालाही आवडेल, एवढेच संगीत आवडणाऱ्या या मुलीने पुढे आयुष्यभर संगीताच्या नादातच राहायचे ठरवले, तेही आकस्मिक. पण नशीब असे की गुरू म्हणून साक्षात सुरेशबाबू माने यांच्यासारखा बहुरूपी आणि प्रतिभावान कलावंत लाभला आणि प्रभा अत्रे यांचे आयुष्य संगीताने व्यापले. गेली सात दशके त्या भारतीय संगीताच्या क्षेत्रात कलावंत म्हणून आपले वेगळेपण सिद्ध करीत राहिल्या आणि संगीताची ही ऊर्मी आज ९२ व्या वर्षी जराही कमी झालेली नव्हती. आयुष्याकडून जे मिळायचे, ते भरभरून मिळाल्याचे समाधान बाळगत प्रभाताईंनी अखेरचा श्वास सोडला. त्यांच्या निधनाने, संगीतातील कूटप्रश्नांची उकल करू शकणाऱ्या एका संशोधक कलावंताला आपण मुकलो आहोत.
भारतीय अभिजात संगीताच्या मैफलीत स्त्रीच्या आगमनाला आत्ता कुठे शंभर वर्षे पूर्ण होत आहेत. ज्या हिराबाई बडोदेकर यांनी जाहीर मैफलीत पहिल्यांदा गायन केले, त्याच प्रभाताईंच्या गुरू. पहिले गुरू सुरेशबाबू माने आणि हिराबाई किराणा घराण्याचे संस्थापक उस्ताद अब्दुल करीम खाँ यांची अपत्ये. त्यामुळे संगीताचा हा वारसा थेट प्रभाताईंपर्यंत पोहोचला. पण गुरुमुखातून मिळालेल्या शिक्षणावर गुजराण न करता, त्यांनी त्या संगीतात स्वत:च्या प्रतिभेने कशिदाकारी केली आणि किराणा घराण्याची शैलीच समृद्ध केली. मैफली गाजवायच्या हे मुळी त्यांचे स्वप्नच नव्हते. त्यामुळे आकाशवाणीवरील नोकरी किंवा ना. दा. ठाकरसी विद्यापीठातील संगीत विभागप्रमुख पदाची जबाबदारी, यात त्या रममाण होत्या. तरीही गळय़ातले गाणे त्यांना स्वस्थ बसू देत नव्हते. ‘मारुबिहाग’ आणि ‘कलावती’ या रागांची त्यांची ध्वनिमुद्रिका प्रसिद्ध झाली आणि त्यांचे नाव सर्वतोमुखी झाले. संगीत येणे ही वरवर फार सोपी गोष्ट वाटते. अभिजात संगीताची कास धरणे आणि निभावणे हे फार कर्मकठीण. प्रभाताईंनी नेमस्तपणे या अभिजाततेला चिकटून राहायचे ठरवले. जेव्हा संगीत करणे ही फार अभिमानाची गोष्ट नव्हती, अशा सामाजिक परिस्थितीत घरात कोणतीही संगीताची परंपरा नसताना, प्रभाताईंनी हा निर्णय जाणीवपूर्वकच केला असणार, यात शंका नाही.
हेतुत: संगीत करायचे ठरवले, तरीही त्यात कलावंत म्हणून गती प्राप्त होईलच, याची शाश्वती नसणारा तो काळ. पण प्रभाताईंनी स्वरांच्या सान्निध्यातच राहायचे ठरवले. सुरेशबाबू आणि हिराबाई यांच्याकडून त्यांना ज्या किराणा घराण्याची तालीम मिळाली, त्या घराण्यात स्वरांचे महत्त्व अधिक. स्वरांच्या छायेत निर्माण करता येणारी गर्द सावली कलावंताला आणि रसिकांना एकाच वेळी कमालीचा आनंद देणारी. प्रभाताई नशीबवान अशासाठी की, त्यांना गुरूंनी आत्मीयतेने कला देताना नुसते राग शिकवण्यापेक्षा रागाकडे कसे पाहायचे, हे सांगितले. कलेच्या प्रांतात सुंदरतेची जाण निर्माण होणे फार महत्त्वाचे असते. सुरेशबाबूंनी ती प्रभाताईंच्या ठायी व्यक्त करण्याचा अवकाश निर्माण केला. रागसंगीताच्या महासागरात स्वरांमध्ये डुंबत राहून आलापीतून सौंदर्याचा आरस्पानी महाल उभारण्याची कला त्यामुळेच त्यांना साध्य झाली. घराणेदार संगीताशी असलेली बांधिलकी ढळू न देता प्रभाताईंनी संगीताकडे अधिक डोळसपणे पाहायचे ठरवले, याचे कारण त्यांच्याकडे असलेले बौद्धिक सामथ्र्य. त्यातूनच प्रभाताईंनी किराणा घराण्याची शैली अधिक उठावदार केली.
संगीतात कलावंताची प्रज्ञा आणि सर्जनशीलता यांचे दर्शन कोणत्या रीतीने होते, याला फार महत्त्व असते. आपल्याला काय काय येते, हे सांगण्याच्या घाईतून धांदल उडणारे अनेक कलावंत आपण पाहात असतो. मिळवलेली कला सादर करताना, मैफलीचे जे रसायन असते, ते जमवण्याची क्षमता साध्य करणे आवश्यक. प्रभाताईंना ते सहजसाध्य झाले. पहिल्या स्वरापासून शेवटपर्यंत संगीत प्रवाही ठेवण्यासाठी विविध अलंकारांचा कुठे आणि किती उपयोग करायचा, याचे काही ठोकताळे नसतात. कलावंतागणिक ते बदलते आणि त्याच्या सर्जनाचेच ते एक अंग असते. प्रभाताईंच्या मैफलीत हे सारे अलंकार त्यांचे गाणे अधिक श्रीमंत करत. तिथे संगीताचा विचार अतिशय रसपूर्णतेने अशा काही रीतीने समोर येऊन उभा राही की, ऐकणाऱ्याने अचंबित होता होता तृप्त व्हावे. मैफली गाजवणे, हे कलावंताच्या कलावंतपणावर शिक्कामोर्तब करण्यासाठी आवश्यक असते. हे खरे असले, तरीही त्यापलीकडे संगीताच्या सागरात खोलवर जाण्यासाठी आपली बौद्धिक तयारी करत राहावे लागते. प्रभाताईंना आपल्याच सर्जनाच्या प्रक्रियेची उलगड करायची होती.
एका कवितेत त्या म्हणतात..
मीच गायक, मीच श्रोता.
मीच माझ्यावर नाराज व्हायचं.
मीच खूश व्हायचं.
खूश होण्याचे क्षण कमी असतात.
कारण स्वत:ला प्रसन्न करणं
फार अवघड असतं..
मैफल तुमच्या मालकीची नसते.
तिचं यशापयश
अनेकांच्या स्वाधीन असतं.
मैफल संपूर्ण यशस्वी झाली तरीही
काही जागा श्रोत्यांना
हेरताच आल्या नाहीत
हे शल्य मागं उरतं..
कलावंत म्हणून संगीतातील स्वत:चा वेगळा विचार परंपरेच्या मधात घोळवून मांडणे, हे प्रभाताईंचे वेगळेपण. मग ते ख्याल, भावगीत, ठुमरी असो की स्वनिर्मित राग.. प्रत्येक गोष्ट आपण का करतो, याचे स्पष्टीकरण खरेतर रसिक मागत नसतो. पण आपल्यापाशी त्याचे समाधानकारक उत्तर असणे अतिशय आवश्यक असते. त्यामुळे आपल्या स्वरविचारांना बळकटी येते आणि आपले म्हणणे अधिक उजळून निघते. रागाची मांडणी करताना स्वरांची बढत करण्यासाठी आलापी, तान, बोलतान यांच्या बरोबरीने सरगमचा उपयोग किती कलात्मक होऊ शकतो, याचा वस्तुपाठ प्रभाताईंनी घालून दिला. सरगम हा त्यांच्या खास अभ्यासाचा विषय. पीएच. डी.साठी त्यांनी सादर केलेला प्रबंधही याच विषयावरचा. पुस्तकी पद्धतीने सरगम समजावून सांगणे आणि मैफलीत त्याचा सौंदर्यपूर्ण उपयोग करणे, या दोन्हीतील अंतर प्रभाताईंनी कमी करून दाखवले. विज्ञान आणि विधि विद्याशाखेची पदवी असतानाही संगीताच्या वाटेला गेलेल्या प्रभाताईंनी लंडनच्या ‘ट्रिनिटी कॉलेज ऑफ म्युझिक’मध्येही अध्ययन केले. हे सारे केवळ ज्ञान संपादन करण्याच्या हेतूने मुळीच नसावे. कारण त्याचा जगण्याशी आणि कलेशी थेट संबंध जोडता येईल का, हे पाहणे त्यांच्यासाठी अधिक महत्त्वाचे होते.
‘स्वरमयी’, ‘स्वराली’,‘स्वरांगिनी’ आणि ‘स्वरंजनी’ ही त्यांची ग्रंथसंपदा त्यांच्या संगीतविचारांचे दर्शन घडवणारी आहे. परंपरेने चालत आलेल्या बंदिशींमधून व्यक्त करायचे काही राहून गेले असावे, अशा हुरहुरीतून त्यांनी बंदिशी रचल्या. त्यामध्ये जसे सांगीतिक विचारांचे अधिष्ठान आहे, तशीच सौंदर्याची अनोखी जाणीव आहे. केवळ शब्द बदलून नवी बंदिश तयार होत नाही. त्यासाठी रागाकडे पाहण्याची वेगळी नजर तयार व्हावी लागते. बंदिश हा स्वरविचार असतो, हे लक्षात घेऊन आपले काही वेगळे सांगणे, कथन करण्यासाठी नवीच बंदिश तयार करणे आवश्यक वाटल्याशिवाय, ती परिपूर्ण होत नाही. प्रभाताईंना हे सारे शक्य झाले, कारण त्यांनी आयुष्यभर संगीताचाच विचार केला. एक उत्तम अध्यापक म्हणून विद्यापीठीय स्तरावर त्यांचा लौकिक झाला. त्या लौकिकाला प्रत्यक्ष मैफली संगीताने पारलौकिकाचा स्पर्श केला आणि त्यातून एका नव्या संगीत विचाराला चालना मिळाली. ‘स्वरमयी गुरुकुल’ ही त्यांची संकल्पना संगीत समजावून घेण्यासाठी उत्सुक असलेल्या नवोन्मेषी रसिक आणि कलावंतांसाठी पाठबळ देणारी ठरली. प्रभाताईंचे निधन क्लेशदायक खरेच; पण समाधान एवढेच, की त्या स्वत: आपल्या आयुष्याबद्दल समाधानी होत्या. आयुष्याने भरभरून दिल्याची समंजस जाणीव त्यांच्यापाशी होती. त्याहीपेक्षा संगीत रसिकांना शक्य ते सर्व देण्याचे त्यांचे कर्तृत्व ही आता पुढीलांसाठी शिदोरी आहे.
असे म्हणणे अन्यायकारक खरे; पण काही राग कलावंतांशी घट्टपणे जोडले जातात. राजन-साजन मिश्रा यांचे ‘ललत’मधील ‘जोगिया मेरे घर आओ..’, उल्हास कशाळकरांचा ‘बिभास’ वा ‘वसंत’ अशी उदाहरणे अनेक. त्यातील एक अजरामर म्हणजे प्रभाताईंचा ‘मारुबिहाग’आणि त्यातील ‘जागू मै सारी रैना’. अनेकांनी ‘मारुबिहाग’ गाईला आणि गातीलही. पण प्रभाताईंनी जागवलेली ‘रैना’ आठवून ‘मन लागेना मोरा.’ असेच रसिकांस वाटत राहील. या गानप्रभेस ‘लोकसत्ता’ परिवाराची आदरांजली.