इराणच्या हल्ल्याला त्वेषाने उत्तर द्यावे तर अमेरिकेचा मोडता आणि न द्यावे तर नाकर्तेपणाचा अपमान अशा कात्रीत पंतप्रधान नेतान्याहू सापडलेले दिसतात..
एकदा कोणतीही गोष्ट मिरवायचीच असा निर्धार केला की ज्यामुळे प्रत्यक्षात अब्रू गेली ती बाबही अभिमानाने मिरवता येते. शत्रूस कसे परतवून लावले हे सत्य डामडौलात मिरवणारे प्रत्यक्षात मुळात शत्रू आतपर्यंत आला होता हे सत्य लपवण्याचा प्रयत्न करत असतात. घरात घुसलेल्या शत्रुसैन्याचा कसा खात्मा केला ही बाब वाजत-गाजत साजरी करणारे मुळात शत्रूने घरात घुसून आपणास गाफील पकडले ही बाब दडवू पाहत असतात. सामान्य जनता असले ‘विजय’ साजरे करण्याच्या देखाव्यास भुलते आणि टाळया वाजवत सहभागी होते. इस्रायलसंदर्भात ही बाब सध्या दिसून येईल. त्या देशावर पारंपरिक शत्रू अशा इराण या देशाने भल्या पहाटे अनेक हल्ले केले. ड्रोन आणि क्षेपणास्त्रांच्या रूपाने ही मारगिरी झाली. अधिकृत आकडेवारीनुसार भल्या पहाटे एका तासभरात साधारण २०० हल्ले झाले. या हल्ल्यांत फारशी काही हानी झाली नाही आणि इस्रायली संरक्षण दलांनी ते यशस्वीपणे परतवून लावले. म्हणजे ही क्षेपणास्त्रे जमिनीवर कोसळायच्या आत वरच्या वर हवेतच निकामी केली गेली. त्यामुळे मोठा संहार टळला. त्यानंतर अर्थातच इस्रायलचे पंतप्रधान नेतान्याहू यांनी मायभूच्या लष्करी ताकदीचा गौरव केला आणि इस्रायली हवाई क्षेत्र किती अभेद्य आहे वगैरे दावेही यानिमित्ताने केले गेले. ते सर्वथा पोकळ कसे ठरतात, ते लक्षात घ्यावे लागेल.
पहिला मुद्दा हल्ल्याच्या धक्क्याचा. तो या वेळी अजिबात नव्हता. कारण आपण इस्रायलवर हल्ले करू असा पुरेसा इशारा इराणने दिलेला होता आणि हे हल्ले कधी होतील याची पूर्व आणि पूर्ण कल्पना संबंधितांना होती. म्हणजे यातील पहिला आश्चर्य वा धक्क्याचा मुद्दा निकालात निघाला. दुसरा मुद्दा इराणने केलेली बॉम्बफेक रोखण्यात इस्रायलला आलेल्या ‘यशाचा’. इराणची ही बॉम्बफेक रोखणे एकटया इस्रायली संरक्षण दलास जमलेले नाही. प्रत्यक्षात तीन अन्य देशांनी हे बॉम्बहल्ले रोखण्यात प्रत्यक्ष मदत केली. हे देश म्हणजे इस्रायलचा तारणहार अमेरिका, ग्रेट ब्रिटन आणि तिसरा देश म्हणजे जॉर्डन. या तीनही देशांचे विमानदळ या पूर्वसूचित हल्ल्यांचा प्रतिबंध करण्यात पूर्ण सज्ज होते. यातही जॉर्डनची विमाने तर उड्डाणसज्ज होती आणि त्यांनी अमेरिकी तंत्रज्ञानाच्या साहाय्याने अनेक इराणी बॉम्ब वरच्या वर निकामी केले. इस्रायल या देशास इराणचा हल्ला रोखण्यासाठी जॉर्डनचे लष्करी साहाय्य घ्यावे लागले, ही बाब पश्चिम आशियातील राजकारणाकडे सजगपणे पाहात असलेल्यांच्या भुवया उंचावणारीच.
हेही वाचा >>> अग्रलेख: दूध गेले, दही चालले..
कारण या सौदी, जॉर्डन आदी देशांच्या द्वेषावर इस्रायलच्या अस्तित्वाचा पाया उभा राहिलेला आहे. एक तर हे देश इस्लामी. त्यात अरब. आणि एके काळी इस्रायलविरोधात अरबी एकजूट करण्यात दोघांचाही लक्षणीय वाटा होता. जॉर्डन तर इस्रायल जन्मास आल्यापासून सीमावादाचा संघर्ष अनुभवत आहे. हा संघर्ष इतका तीव्र होता की एके काळी जॉर्डनच्या आकाशातून मार्गक्रमण करण्यास इस्रायली विमानांस मज्जाव होता. या दोन देशांतील संबंध अलीकडे गेल्या दशकभरात कामचलाऊ पातळीवर आले. या तुलनेत जॉर्डनप्रमाणे सौदी अरेबियाशी इस्रायलचा थेट संघर्ष कधी झाला नाही. पण १९७४ साली इस्रायल हे सौदी अरेबियाने अमेरिकेवर घातलेल्या तेलबंदीमागील कारण होते आणि अमेरिकेच्या ‘अरबांकडून घ्यायचे आणि इस्रायलला द्यायचे’ या धोरणास सौदी अरेबियाचा कायमच सक्रिय विरोध राहिलेला आहे. तथापि सौदी अरेबियाच्या सत्तास्थानी महंमद बिन सलमान अल सौद (एमबीएस) याचा उदय झाल्यापासून व्यापारी उद्दिष्टांच्या मिषाने या देशाचे इस्रायलसंबंध काही प्रमाणात सुधारले. मात्र अलीकडे गाझा युद्धामुळे हे संबंध ताणले गेलेले आहेत. पण तरीही जॉर्डनने या इराणी हल्ल्याच्या मुद्दयावर इस्रायलला साथ दिली.
त्यामागील कारण धर्म. पश्चिम आशियाच्या वाळवंटात इस्रायलविषयी कोणत्याही देशास ममत्व नाही. यास उभय बाजू जबाबदार. पण हे मतभेद, वैरत्व विसरून हे दोन देश इस्रायलच्या मदतीस धावले कारण या दोन देशांची त्यातल्या त्यात ‘कमी वाईट’ निवडण्याची अपरिहार्यता. इस्रायल नकोच, पण सध्याच्या नेतृत्वाखालील इराण तर त्याहूनही नको, हे यामागील कारण. इराण हा या परिसरातील एकमेव शियाबहुल देश आणि समस्त अरब जगत हे सुन्नीप्रधान. त्यामुळे या एका मुद्दयावर उभय गटांत तर मतभेद आहेतच. पण इराणचे महत्त्व वाढणे हे जॉर्डन, सौदी अरेबियास परवडणारे नाही. इराण, इजिप्त आणि सौदी अरेबिया हे तीनही देश स्वत:स या प्रांताचे मुखत्यार मानतात. हे तीनही देश आकाराने, लष्कराने मोठे आणि यातील सौदी आणि इराण हे तर तेलसंपन्न. त्यामुळे या प्रांताचे नेतृत्व आपल्याकडे यावे अशी मनीषा हे तिघेही बाळगून आहेत. यातील इजिप्त सद्य:स्थितीत मागे पडले आहे. इस्रायलवरील इराणी हल्ले यशस्वी ठरले असते तर इराणचे या परिसरातील प्राबल्य वाढले असते. ते जॉर्डनला नको आहे. तेव्हा इस्रायल आणि इराण यांतील कमी वाईट पर्याय म्हणून तो अमेरिकेसह इस्रायलच्या मदतीस धावला.
हेही वाचा >>> अग्रलेख: धडाडांची धरसोड!
म्हणजे इस्रायल या देशांचा पाठिंबा गृहीत धरू शकत नाही. त्यात पुन्हा अमेरिकाही इस्रायलला बजावते. इराणवर प्रतिहल्ला चढवल्यास अमेरिका साथ देणार नाही, असा स्पष्ट इशारा अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी दिला. मुळात इराणने इस्रायलवर केलेला हल्ला हा इस्रायली फौजांनी सीरियातून इराणी दूतावासावर अकारण केलेल्या हल्ल्याच्या प्रत्युत्तरार्थ आहे. त्यासाठी इस्रायलने माफीही मागितली. तरीही इराणने हल्ल्यास तयार राहा असा इशारा इस्रायलला दिला आणि त्याप्रमाणे कृती केली. म्हणजे इस्रायलच्या चुकीचे प्रत्युत्तर इराणने दिले. तेव्हा आता या प्रत्युत्तरास परत इस्रायलने प्रत्युत्तर देणे आगलावेपणाचे ठरेल. इस्रायलचे मित्रदेशही असेच मत व्यक्त करतात. त्यामुळे इस्रायलचे पंतप्रधान नेतान्याहू यांची अधिकच चिडचिड होत असणार. एक तर इराणने अत्यंत शिस्तबद्धपणे इस्रायलवर हल्ला केला. इराणने थेट असे काही इस्रायलविरोधात करण्याची ही पहिलीच खेप. त्यातही पहिल्यांदा लहान ड्रोन, मग बॉम्ब, क्षेपणास्त्रे आणि अंतिमत: अधिक ताकदीची क्षेपणास्त्रे असा हा क्रम होता. इस्रायल ही क्षेपणास्त्रे वरच्या वर रोखू शकतो याची कल्पना अर्थातच इराणला होती. तरीही असे हल्ले केले गेले.
कारण त्यातून इस्रायलच्या या हल्ले रोखण्याच्या यंत्रणांचा पूर्ण आराखडा इराणी हवाईदलास ठाऊक झाला. कशा पद्धतीने हल्ला केल्यास इस्रायल कसा प्रतिसाद देते याचा अंदाज इराणला यातून मिळाला. काही जागतिक संरक्षण विश्लेषकांनी यावर भाष्य केले असून इराणच्या कृतीमुळे इस्रायलसाठी ‘इकडे आड, तिकडे विहीर’ अशी स्थिती झाल्याचे म्हटले आहे. यास त्वेषाने उत्तर द्यावे तर अमेरिकेचा मोडता आणि न द्यावे तर इराणी युद्धास प्रत्युत्तर देता न येण्याचा अपमान अशा कात्रीत पंतप्रधान नेतान्याहू सापडलेले दिसतात. इराणकडे परत याखेरीज हेझबोल्लासारखे दहशतवादी संघटनांचे पर्याय असून इस्रायलवरील बॉम्बफेकीतून मिळालेली माहिती हेझबोल्लास पुरवली जाईल, अशी चिंता इस्रायलला आहे. या सर्वांचे मूळ आहे पंतप्रधान नेतान्याहू यांची युद्धाची खुमखुमी. ती कमी होताना दिसत नाही. त्यामुळे खुद्द त्यांच्या मायदेशात नेतान्याहूविरोधी वातावरण चांगलेच तापू लागले असून इराणच्या हल्ल्यामुळे सरकारविरोधातील नाराजी अधिकच वाढणे साहजिक. इस्रायल आणि नेतान्याहू हे इराणी हल्ले रोखण्यातील यश भले मिरवत असतील. पण या मिरवण्याच्या मर्यादाही लपून राहत नाहीत.