भाजप आणि रालोआ ३५० च्या आसपास मजल मारू शकेल; पण ‘इंडिया’ आघाडीची निराशा फक्त महाराष्ट्रात टळेल असे मतदानोत्तर पाहण्यांतून दिसते..

अलीकडे जनमत (ओपिनियन) आणि मतदानोत्तर (एग्झिट पोल) चाचण्या यांतील द्वैत अदृश्य होऊ लागले असून त्यामुळे त्याचे प्रतिबिंब हे ताज्या मतदानोत्तर चाचण्यांत दिसेल याचा अंदाज होताच. तो अयोग्य ठरला नाही. मतदानोत्तर चाचण्या ज्या माध्यमगृहांनी केल्या त्यातील बहुतेक माध्यमगृहांचा राजकीय कलही उघड होता. त्यामुळे जे काही घडले त्यास आक्रीत म्हणता येणार नाही. यात माध्यमगृहांस बोल लावण्याची गरज नाही. सत्ताधीशांच्या वळचणीस लवकरात लवकर पोहोचणे हीच स्पर्धा असताना त्यापेक्षा वेगळे काही कोणाकडून होण्याची अपेक्षाही ठेवण्याची आवश्यकता नाही. या निमित्ताने मतदानोत्तर चाचण्यांची विश्वासार्हता या मुद्दय़ाची चर्चा करण्याची उबळ अनेकांस येईल. तसे करणेही अंतिमत: निरुपयोगी ठरेल. विश्वासार्हता देखील कोणाकोणाची तपासणार? आणि मुख्य म्हणजे कोण? निवडणूक आयोग, विविध स्वायत्त संस्था, नियामक यंत्रणा अशा कित्येकांचा समावेश यात करावा लागेल आणि परिस्थिती अशी की तसे करू गेल्यास ही जबाबदारी पार पाडणार कोण असाही प्रश्न पडू शकेल. तथापि त्याची चर्चा करण्याचे हे स्थळ नव्हे. तसेच ते करणे कालसुसंगतही नसेल. मुद्दा आहे तो मतमोजणी उंबरठय़ावर असताना जाहीर झालेले मतदानोत्तर चाचण्यांचे ‘निकाल’. ते लागण्याआधी काही मुद्दे स्पष्ट होते आणि काहींबाबत संदिग्धता होती. या चाचण्यांतील ‘निकालांनी’ ती संपुष्टात येईल.

यातील सर्वात महत्त्वाचा मुद्दा होता तो या निवडणुकीनंतर सत्ता कोणाहाती जाईल, हा. त्याबाबत ‘इंडिया’ आघाडीतील काही मोजके सोडले तर कोणाच्याही मनात किंचितही संदेह नव्हता. या निवडणुकीत विद्यमान सत्ताधाऱ्यांच्याच बाजूने जनमताचा कौल असेल हे स्पष्ट होते. सत्ता भाजप आणि रालोआ यांच्याच हाती राहणार हे दिसत होते. तसेच होताना दिसते. प्रश्न इतकाच होता की या जनमत कौलाचा आकार काय असेल. भाजपने सुरुवातीस ‘४०० पार’चा नारा दिलेला असल्याने ही स्पर्धा सुरू होतानाच स्पर्धेचा केंद्रिबदू सत्ताधाऱ्यांच्या दिशेने सरकलेला होता. नंतर प्रश्न राहिला तो इतकाच की भाजप ‘४०० पार’ होणार की नाही? या ‘४०० पार’ मुद्दय़ास भावनिक इतिहास आहे. देशाच्या इतिहासात हा टप्पा एकदाच ओलांडला गेला. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर झालेल्या निवडणुकांत राजीव गांधी यांच्या पक्षाने ४१४ खासदार मिळवून विक्रम रचला. तो अद्याप अबाधित आहे. गांधी-नेहरू घराण्याचा प्रत्येक विक्रम मोडणे हीच स्पर्धा असलेल्या काळात हाही विक्रम स्वत:च्या नावे नोंदवण्याची इच्छा असणे कालसुसंगतच म्हणायचे. तथापि या ‘४०० पार’च्या हाकेने आपण आपल्यालाच एका िरगणात अडकवून ठेवत असल्याचे लक्षात आल्याने भाजपनेच हा आग्रह काहीसा मागे सोडला. कारण नंतरच्या काळात ‘ही निवडणूक फिरत असल्याची’ हवा निर्माण झाली आणि ‘४०० पार’ हा कुचेष्टेचा विषय बनला. राहता राहिला एकच मुद्दा. भाजपला हा विक्रम करण्यापासून रोखायचे कसे आणि रोखणार कोण?

ही कामगिरी आपण फत्ते करू असा विश्वास ‘इंडिया’ आघाडीकडून व्यक्त होत गेला. तो किती खरा होता ते प्रत्यक्ष मतमोजणीनंतरच कळेल हे सत्य असले तरी तो अस्थानी होता ही बाब या निवडणुकोत्तर चाचण्यांतून दिसून येते. वास्तविक समग्र निवडणुकांत राजकीय मुद्दा एकच एक होता. ‘इंडिया’ आघाडी भाजपस ३०० च्या आसपास रोखू शकेल किंवा काय? त्याचे उत्तर नकारार्थी असल्याचे या पाहण्या सांगतात. त्या करणाऱ्या जवळपास सर्वाचे एकमत भाजप आणि रालोआचे ३५० च्या आसपास उमेदवार निवडून येतील असेच आहे. एखाद-दुसरा अपवाद. तो केवळ अपवादच ठरण्याची शक्यता अधिक. हिंदी भाषक ‘गोपट्टय़ातील’ राज्यांत भाजपने कमाल जागा आधीच मिळवलेल्या आहेत, त्यात वाढ होण्याची शक्यता नाही आणि त्याच वेळी दक्षिणेतील राज्येही भाजपच्या पदरात अधिक काही घालण्याची शक्यता नाही हे मुद्दे भाजप विजयाच्या संभाव्य आकाराबाबत मांडले गेले. त्यातील एक रास्त होता आणि दुसरा नाही, असे या चाचण्या दर्शवतात. म्हणजे उत्तरेतील राज्ये भाजपस अधिक काही देताना दिसत नाहीत, हे खरे. पण त्याचवेळी त्या राज्यांत होणारे कथित नुकसान भाजप दक्षिणेतील राज्ये आणि पश्चिम बंगालातून भरून काढताना पाहण्यांतून तरी दिसतो. तमिळनाडू, केरळ या राज्यांत भाजपचा झालेला चंचुप्रवेश, कर्नाटकाने त्या राज्यातील सत्ता आणि त्या सत्ताधारी पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष तेथील असूनही त्या पक्षास दिलेला अपेक्षेपेक्षा कमी पाठिंबा, तेलंगण आणि आंध्र प्रदेशात भाजपने प्रादेशिक पक्षाचा घेतलेला घास आणि चंद्राबाबू नायडू यांचे भाजपचे आगामी ‘भक्ष्य’ ठरणे इत्यादी मुद्दे या निवडणुकीत निर्णायक ठरल्याचे या पाहण्यांतून दिसते. त्याचवेळी पश्चिम बंगाल या ममतांच्या तृणमूल किल्ल्यासही भाजपने अपेक्षेपेक्षा मोठे भगदाड पाडल्याचे या पाहण्या सांगतात. या सगळय़ांमुळे भाजप आणि रालोआ ३५० वा अधिकची मजल मारू शकेल. या सगळय़ात ‘इंडिया’ आघाडीची निराशा एकच राज्य टाळेल असेही या पाहण्यांतून दिसते.

हे राज्य अर्थातच महाराष्ट्र. जवळपास सर्वच मतदानोत्तर चाचण्या महाराष्ट्रात भाजप आणि रालोआ यांस ‘इंडिया’ आघाडीचे कडवे आव्हान असल्याचे दर्शवतात. त्यातील दोन वा तीन चाचण्यांच्या मते ‘इंडिया’ आघाडी ही भाजप-प्रणीत ‘रालोआ’वर मात करेल. म्हणजे उद्धव ठाकरे यांची शिवसेना, शरद पवार यांची राष्ट्रवादी आणि काँग्रेस ही तिहेरी आघाडी भाजप, एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी या तिहेरी आघाडीस मागे टाकेल. यातही जवळपास सर्वच पाहण्यांत एका मुद्दय़ावर सहमती दिसते. या तीन विरुद्ध तीन संघर्षांत भाजपच्या तंबूची फारशी पडझड नसेल. म्हणजे जे काही नुकसान होईल- अर्थातच या पाहण्यांच्या मते- ते एकनाथ शिंदे यांची सेना आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी या पक्षांचे. एक पाहणी तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कर्मभूमी ठाणे मतदारसंघही गमावतील असे भाकीत करते. तसे झाल्यास भाजपच्या स्थानिक ठाणेकरांस मनातल्या मनात आनंद होईल आणि त्यांस आपल्या प्रयत्नांचे चीज झाले असे वाटून जाईल. पण हे भाकीत प्रत्यक्षात आल्यास शिंदे यांना उर्वरित विधानसभा अधिवेशनापर्यंतचा काळ अधिक आव्हानात्मक असेल. एकतर त्यांच्या मागोमाग अजितदादाही राष्ट्रवादीचे लटांबर घेऊन भाजपच्या दारी आल्याने शिंदे यांस आपल्या समर्थकांस मंत्रीपदे देता आली नाहीत. त्यामुळे ते नाराज. आणि वर इतके करून अपेक्षित संख्येने उमेदवारही निवडून आले नाहीत ही नाराजी आणि नाराजांची संख्या अधिकच वाढणार. तीस उतारा असेल तो खुद्द अजितदादांचाही या पाहण्यांतील पराभवाचा अंदाज प्रत्यक्षात येणे. बहुतांश पाहण्या अजितदादांच्या राष्ट्रवादीस शून्य ते एक इतक्याच जागा देतात. यातील एक कोणती हाच काय तो कुतूहलाचा मुद्दा. या दोनही पक्षांबाबत पाहण्यांतील भाकिते खरी ठरल्यास भाजपला ‘हेचि फल काय मम (फोडाफोडीच्या) तपाला’ असा प्रश्न पडू शकतो.

कारण या पाहण्यांतून देशाचा कौल समोर येत असताना महाराष्ट्राचा कल काय आहे हे दिसते. पाहण्यांतील हे चित्र प्रत्यक्षात अवतरले तर तीन महिन्यांवर येऊन ठेपलेल्या विधानसभा निवडणुकांत सर्वास समान संधी असल्याचा संदेश जाईल. तेव्हा या कलाचे कौलात रूपांतर करण्यासाठी भाजप निवडणुकांपर्यंत थांबेल की अन्य पक्षांत जे कोणी उरले-सुरले आहेत त्यांनाही आपल्यात घेईल इतकाच काय तो प्रश्न.