व्यक्तीप्रमाणे व्यवस्थाही घसरली तर होणारे नुकसान मोठे आणि दीर्घकालीन असते. व्यक्तीची हकालपट्टी करता येते. पण सडू लागलेली व्यवस्था पुन्हा निरोगी करणे महाकठीण..
दोन दिवसांपूर्वी अर्थमंत्री ऋषी सुनक आणि आरोग्यमंत्री साजिद जावेद यांच्या राजीनाम्याविषयी प्रतिक्रिया विचारली असता ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी ‘फ*दॅट’ असे उद्गार काढत सर्व काही आलबेल असल्याचे सूचित केले. त्यानंतरच्या २४ तासांत आणखी काही मंत्री आणि त्यांच्या हुजूर पक्षाच्या पन्नासहून अधिक खासदारांनी राजीनामा दिला आणि आज अखेर खुद्द जॉन्सन यांच्यावर पदत्यागाची वेळ आली. तीन वर्षांपूर्वी याच महिन्यात जॉन्सन ‘१० डाऊनिंग स्ट्रीट’ या पंतप्रधानांच्या निवासस्थानाचे रहिवासी झाले तेव्हाच या गृहस्थाचे काही खरे नाही, अशी सार्वत्रिक प्रतिक्रिया होती. त्यांचे व्यक्तिमत्त्व, वाह्यातपणा, त्यास खोटारडेपणाची झाक एवंगुणवैशिष्टय़ांची दखल घेत ‘लोकसत्ता’ने ‘बोरिस बहु..’ (२५ जुलै ’१९) या संपादकीयातून या गृहस्थास काहीही भरीव न करता पायउतार व्हावे लागेल, असे भाकीत वर्तवले होते. ते दुर्दैवाने खरे ठरताना दिसते. स्वत:विषयी आत्यंतिक प्रेम, टीका अथवा प्रतिकूल मताकडे दुर्लक्ष आणि संस्थात्मक व्यवस्थेपेक्षा अंत:प्रेरणेस महत्त्व देणारा नेता असला की हे असेच होणार. या जॉन्सनांस इंग्लंडचे ‘ट्रम्प’ असे म्हटले जाते, यातच त्यांच्या पानिपताची बीजे होती. ती घटिका भरली असे दिसते. चार वर्षांपूर्वी ‘ब्रेग्झिट’च्या मुद्दय़ावर या बोरिसबाबांनी पंतप्रधान थेरेसा मे यांच्या मंत्रिमंडळातून परराष्ट्रमंत्री पदाचा राजीनामा देऊन त्यांचे सरकार संकटात आणले होते. त्यावर ‘ब्रेग्झिटचा वाघ’ या संपादकीयात (११ जुलै २०१८) ‘लोकसत्ता’ने जॉन्सन हे ब्रेग्झिटच्या वाघावर स्वार झाल्याचे म्हटले. असे वाघावरचे स्वार नंतर त्याच वाघाचे भक्ष्य बनतात हा इतिहास आहे. जॉन्सन यांच्या राजीनाम्याने त्याची पुनरावृत्ती होताना दिसते.
म्हणजे ज्या बोरिसबाबांनी आपल्या राजीनाम्याने थेरेसाबाईंचे सरकार संकटात आणले, त्याच जॉन्सन यांच्या मंत्रिमंडळातील अर्धा डझन मंत्र्यांनी आपल्या राजीनाम्याने विद्यमान सरकारच्या गच्छंतीचा नारळ फोडला. वास्तविक गेली दोन वर्षे अर्थमंत्री सुनक, आरोग्यमंत्री जावेद आणि पंतप्रधान जॉन्सन यांच्यातील मतभेदांच्या बातम्या येत होत्या आणि त्याची तीव्रता वाढू लागली आहे हेही दिसत होते. गेल्या वर्षी विशेषत: करोना टाळेबंदीकाळातील बहुचर्चित पाटर्य़ाप्रकरणी सुनक यांच्यावर उगाच ताशेरे ओढले गेले. हे सुनक अन्य एका बैठकीसाठी पंतप्रधानांच्या कार्यालयात गेले आणि त्याच वेळी तेथे सुरू असलेल्या हौस-मजेच्या उद्योगात सहभागी होण्यासाठी आल्याचे प्रसिद्ध झाले. माडाच्या झाडाखाली बसून दूध जरी प्यायले तरी माडी प्यायल्याचा आरोप होऊ शकतो, तसेच हे. त्या वेळी वास्तविक सुनक यांच्याविषयी पंतप्रधानांनी खुलासा करणे आवश्यक होते. ते त्यांचे कर्तव्यही होते. पण बोरिसबाबांनी तसे केले नाही. त्याच सायंकाळी खरे तर सुनक राजीनामा देते. पण पक्षातील अन्यांनी रोखल्यामुळे तेव्हा ते टळले. पण त्यानंतर फार काळ या मनमौजी पंतप्रधानांस सहन करणे त्यांना जड झाले असावे. सुनक आणि जावेद हे खास दोस्त. कर आकारणीच्या मुद्दय़ावर सुनक आणि बोरिसबाबांत मतभेद तर आरोग्य अर्थसंकल्प हा जावेद आणि पंतप्रधान यांच्यातील तणावाचा मुद्दा. पंतप्रधान दोघांचेही अजिबात ऐकत नव्हते. मंत्रिमंडळात हे असे होतेच. त्यात नवीन काही नाही. कितीही मतभेद असले तरी शेवटी कर्णधार या अर्थाने पंतप्रधानांचाच शब्द अंतिम असतो आणि तो तसाच असायला हवा. तथापि याच्या जोडीने या पंतप्रधानांचा जाहीर खोटारडेपणा हा सुनक आणि जावेद यांस अधिक संताप आणणारा ठरला. अधिकारपदस्थाची अरेरावी सहन करावी लागणे यात काही नवीन नाही. तथापि अशी अरेरावी करणारा उच्चपदस्थ आत्यंतिक खोटारडा आणि सार्वत्रिक नैतिक ऱ्हासाचा निदर्शक असेल तर त्याच्या नेतृत्वाखाली काम करणे अवघड जाते. जॉन्सन यांच्या हुजूर पक्षातील अनेकांस याचा प्रत्यय आला आणि सुनक-जावेद यांच्या राजीनाम्याने हा नाराजांचा प्रवाह खळाळून वाहू लागला. त्यात बोरिस जॉन्सन वाहून जाणे अपरिहार्य होते.
या अपरिहार्यतेस ताजे निमित्त ठरली ती पार्लमेंटमध्ये हुजूर पक्षाच्या उपप्रतोदपदी ख्रिस पिंश्चर यांची नियुक्ती. या पिंश्चरास मद्यभान नाही. ते किती आणि कोठे प्राशन करावे याचा विवेक नाही. त्यामुळे त्यांनी मद्योत्तर उन्मादात आपल्याच काही पुरुष सहकाऱ्यांशी नको ते चाळे करण्याचा प्रयत्न केला. याचा बभ्रा झाल्यावर त्यांना जावे लागले यात नवल नाही. पण आश्चर्य होते ते पिंश्चर यांचे हे गुण माहीत असूनही बोरिसबाबांनी त्यांची नियुक्ती करणे. पिंश्चर यांचे हे आणि अन्य काही असे प्रकार उघडकीस आल्यावर बोरिसबाबांनी कानावर हात ठेवले. ‘मला हे माहीतच नव्हते.. तसे माहीत असते तर मी त्यांना नेमलेच नसते’ हा त्यांचा बचाव. पण तेथील वर्तमानपत्रे अजूनही पत्रकारिता करीत असल्याने त्यांनी बोरिसबाबा खोटे बोलत असल्याचे दाखवून दिले. आणि या पत्रकारितेचे मोल असलेला समाज अजूनही ब्रिटनमध्ये असल्याने पंतप्रधानांस खाका वर करून ‘मी नाही बा त्यातला’ असे वर्तन करणे अशक्य झाले. हा खोटारडेपणा हा या लोकप्रिय पंतप्रधानांचा खास गुण. करोनाकाळात जनता निर्बंधांचा जाच सहन करीत असताना बोरिसबाबांच्या कार्यालयात खुद्द त्यांच्या उपस्थितीत पाटर्य़ा झाल्याचे प्रसिद्ध झाल्यावरही त्यांनी असाच खोटेपणा केला. आधी असे काही घडले हेच त्यांनी नाकारले. ते जमत नाही असे दिसल्यावर ‘झाल्या असतील पाटर्य़ा, पण मी काही नव्हतो बुवा त्यात’ असा खुलासा करण्याचा प्रयत्न केला. त्यावर ‘गार्डियन’सारख्या वृत्तपत्राने पंतप्रधानांची पाटर्य़ातील छायाचित्रेच प्रसिद्ध केली. अखेर सर्व बिळे बुजवली गेल्याने पंतप्रधानांच्या सुटकेसाठी मार्गच उरला नाही. त्या प्रकरणी रीतसर पोलिसांत गुन्हा दाखल होऊन त्याची चौकशी करण्याची वेळ आली. हा त्या देशातील सळसळत्या माध्यमांचाही विजय ठरतो. सरकारी मदतीवर चालवल्या जाणाऱ्या ‘बीबीसी’सारख्या वाहिनीवर तेथे पंतप्रधानांचे लांगूलचालन करण्याची वेळ आली नाही की त्यांना बोरिस गोडवे गावे लागले नाहीत.
हे त्या देशातील व्यवस्था आणि समाजमनाचा विवेक अजूनही शाबूत असल्याचे लक्षण. बोरिस जॉन्सन यांच्यासारख्या हडेलहप्पी व्यक्तींमुळे या व्यवस्थाधारित रचनेस मोठा तडा जातो. व्यक्तीप्रमाणे व्यवस्थाही घसरली तर होणारे नुकसान मोठे आणि दीर्घकालीन असते. व्यक्तीची हकालपट्टी करता येते. पण सडू लागलेली व्यवस्था पुन्हा निरोगी करणे महाकठीण. आपला पंतप्रधान नैतिक मूल्ये पायदळी तुडवत आहे असे जाहीरपणे म्हणत राजीनाम्याचे धैर्य दाखवणारे मंत्री त्या देशात (अजूनही) निपजतात हे वास्तव खचितच हरखून टाकणारे. सामान्य ब्रिटिशांनाही याची चाड असल्याने या बोरिसबाबांचा पंतप्रधानावतार अवघ्या तीन वर्षांत आटोपला.
आता पुढे काय हा अन्य अनेक लोकशाही देशांसमोर आ वासून उभा असलेला प्रश्न त्या देशासही भेडसावताना दिसतो. निवडणुकीतील बहुमत म्हणजे वाटेल ते करण्याची मुभा आणि विक्रमी बहुमत म्हणजे हे वाटेल ते विक्रमी पातळीवर करण्याची सवलत असा सोयीचा अर्थ जॉन्सन यांच्यासारख्या व्यक्ती लावतात तेव्हा ते लोकशाहीस जायबंदी करीत असतात. आताही आपला राजीनामा देताना जॉन्सन यांनी स्वत:च्या विक्रमी मताधिक्याचा उल्लेख केला. पण याचा अर्थ कसेही वागण्याचा परवाना असा होत नाही, हे त्यांस आता उमगले असेल. आता त्यांच्या पक्षात जॉन्सन यांच्या उत्तराधिकाऱ्यासाठी स्पर्धा सुरू होईल. समोर टोनी ब्लेअर यांच्यानंतर नेतृत्व हरवलेला मजूर पक्ष असल्याने हुजूर पक्षास अद्याप आव्हान नाही. पण ते तयारच होणार नाही, असे नाही. ज्या गतीने गेले दशकभर हुजूर पक्ष त्या देशाचा बट्टय़ाबोळ करतो आहे ते पाहता या बदलाची वेळ येऊन ठेपली आहे हे निश्चित. तोपर्यंत तरी बोरिसबाबांच्या पंतप्रधानपदाचा बोऱ्या वाजवता आला हे ब्रिटिशांचे समाधान!