रस्ते, अपघातबळींबद्दल असंवेदनशीलता आणि नियम मोडणे यांचा सायरस मिस्त्री यांच्या मृत्यूशी संबंध नाही.. पण बदल किती आमूलाग्र हवेत हे लक्षात घेतल्यास तो आहे!

‘‘अमेरिका श्रीमंत आहे म्हणून येथील रस्ते चांगले आहेत असे नाही; तर येथील रस्ते उत्तम आहेत म्हणून अमेरिका श्रीमंत आहे,’’ असे त्या देशाचे माजी अध्यक्ष जॉन केनेडी यांचे वचन आहे. सालसमार्गी संपत्तीनिर्मितीसाठी ओळखले जाणारे अत्यंत उमदे आणि आश्वासक उद्योगपती सायरस मिस्त्री यांच्या अपघाती निधनामुळे केनेडी यांच्या विधानाचा अर्थबोध अधिक वेदनादायी ठरतो. सायरस मिस्त्री यांचे श्रीमंती मोटारीतील मरण, त्याच दिवशी देशाच्या आर्थिक राजधानी मुंबईनजीक आठवा दुचाकी खड्डाबळी आणि अन्यत्र ट्रक-मोटार धडकेत प्राण गमावलेले मोटारप्रवासी हे आपले रक्ताळलेले रस्ताचित्र. अलीकडे ज्यात त्यात सकारात्मकता शोधणे, तिचा प्रसार करणे इत्यादी राष्ट्रनिर्मितीच्या कार्यास अनेकांनी स्वत:स जुंपून घेतले आहे. त्यांस या रक्ताळलेल्या रस्त्यांमुळे खरी सामाजिक समरसता साध्य होते असे वाटणारच नाही असे नाही. कारण आलिशान मोटार असो काटकसरी दुचाकी असो वा पोटार्थी मालमोटार. आपले रस्ते सर्वानाच सढळहस्ते मुक्ती देतात. भारतीय समाजव्यवस्थेस शतकानुशतके जी समानता साधता आली नाही ती आपल्या रस्त्यांनी साध्य केली, असेही म्हणता येईल. असे सकारात्मकतावादी वगळता अन्यांस आपले रस्तादौर्बल्य लक्षात येईल. महासत्ता होण्यासाठी आटापिटा सुरू असताना आपणास मुळात आपल्या ‘पाया’कडे किती लक्ष देण्याची गरज आहे याची वेदनादायी जाणीव आपल्या रस्त्यांवरील खड्डे आणि आपली वाहतूक बेशिस्त करून देतात. यात केवळ सुधारणा नव्हे तर आमूलाग्र बदल झाल्याखेरीज अन्य प्रगती किती वरवरची आणि अल्पजीवी ठरेल हे समजून घेण्यासाठी काही तपशील.

Viral video shows car hitting woman distracted by phone the Internet is stunned by what she does next
फोनमध्ये पाहत रस्ता ओलांडते महिला, कारने दिली जोरदार टक्कर अन्…, थरारक अपघाताचा Video Viral
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
in pune katraj person with country made pistol arrested by Crime Branchs Anti Robbery Squad
पिस्तूल बाळगणारा सराइत गजाआड, कात्रज बाह्यवळण रस्ता परिसरात कारवाई
Crime case against the couple, couple pushed traffic police, traffic police,
वाहतूक पोलिसांना धक्काबुक्की करणाऱ्या दाम्पत्याविरुद्ध गुन्हा, कारवाई टाळण्यासाठी बनावट वाहन क्रमांकाची पाटी
motorist, police dragged, barricade, police,
मोटार तपासण्यासाठी थांबविण्यास सांगितल्याने पोलिसाला बॅरिकेटसह २० फुटापर्यंत फरफटत नेले; वाचा कुठे घडली ही घटना
Follow up of demands to candidates through manifesto from Rickshaw Panchayat before elections
रिक्षाचालकांच्या मागण्या ऐरणीवर! निवडणुकीच्या तोंडावर रिक्षा पंचायतीकडून जाहीरनाम्याद्वारे उमेदवारांकडे पाठपुरावा
police conduct mock drill ahead of pm modi pune tour for Maharashtra Assembly Election 2024
बंदोबस्ताची रंगीत तालीम; मध्यभागात वाहतूक कोंडी
speeding bike hit police, pune, bike hit police,
पुणे : नाकाबंदी करणाऱ्या पोलिसांना भरधाव दुचाकीची धडक, दुचाकीवरील सहप्रवासी तरुणीसह चौघे जखमी

गेल्या वर्षभरात आपल्या रस्त्यांवरील अपघातांची संख्या चार लाखांहून अधिक आहे आणि त्यातून १ लाख ५५ हजारांनी प्राण गमावलेले आहेत. या चार लाखांपैकी सुमारे सव्वा लाख अपघात तर फक्त राष्ट्रीय महामार्गावर आहेत. त्या क्षेत्राचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यासंदर्भात सतत कंठशोष करीत असतात. पण त्यांच्यासारखा धडाडीचा मंत्रीही याबाबत हतबल दिसतो. या एका २०२१ या वर्षांत केवळ राष्ट्रीय महामार्गावरच्या अपघातात ५३ हजार ६१५ इतक्यांनी प्राण गमावले. याचा अर्थ आपल्या राष्ट्रीय हमरस्त्यांची एकूण लांबी आणि त्यांवरील अपघातांत मरणारे यांचे गुणोत्तर पाहू गेल्यास प्रत्येक १०० किमी अंतरासाठी सरासरी ४० बळी असे समीकरण दिसते. किती लाजिरवाणी परिस्थिती ही. वर्षांला दीड लाखांहून अधिक बळी फक्त रस्ते अपघातात? याचे प्रमाण कमी होण्याऐवजी दिवसागणिक वाढतेच आहे. गेल्या दशकात आपल्याकडे दर तासाला १४ इतके अपघात होत. त्यात आता किमान पाच ते सहाने वाढ झाली असावी. यातील साधारण ४० टक्के अपघातबळी हे दुचाकी आणि मालमोटारी या वाहनांशी संबंधित आहेत. म्हणजे सर्वात अशक्त आणि सर्वात धष्टपुष्ट अशांचे हे अपघात. त्यात बळी कोण जात असणार हे उघड आहे. दुचाकी हे मुळातच अशास्त्रीय वाहन. म्हणजे गुरुत्वीय बलाचा प्रभाव रोखण्यासाठी दुचाकीस वेग राखावाच लागतो. अन्यथा रस्त्यांस समांतर होणे अटळ! त्यात रस्त्यांचा दर्जा! म्हणजे अपघाताची दुहेरी हमी. यंदाच्या गेल्या महिन्या-दीड महिन्यात रस्त्यांवरील खड्डे चुकवण्याच्या प्रयत्नात मुंबई-ठाणे परिसरातच दहा जीव गेले. हे सर्व दुचाकीधारक. इतक्या मोठय़ा संख्येने अपघात होत असताना तो विषय आपल्या समाजमाध्यमी चर्चातसुद्धा नाही. या अभागींचे आप्तेष्ट सोडले तर बाकी चर्चा शिवाजी पार्क मेळाव्याचीच!

या चर्चकांस; गेल्या आठवडय़ात भारताने अर्थव्यवस्थेच्या आकारात इंग्लंडांस मागे टाकले या तपशिलाने नवा मुद्दा दिला. तो छानच. पण देशाच्या अर्थव्यवस्थेच्या आकाराइतकेच, किंबहुना अधिकच, त्या देशातील नागरिकांचे दरडोई उत्पन्न मोलाचे असते हे या चर्चकांस कदाचित माहीत नसावे. ते साहजिकच म्हणायचे. पण त्या सर्वास हे सांगावयास हवे की भारताच्या राजधानी दिल्लीच्या रस्त्यांवर आपण ज्यास मागे टाकले त्या इंग्लंडची राजधानी लंडनपेक्षा अपघातांची संख्या ४० पटींनी अधिक आहे. याही मुद्दय़ावर आपण इंग्लंडांस मागे टाकले यात आनंद मानायचा असेल तर चर्चाच खुंटली म्हणायचे. पण या अपघातांचे प्रमाण कमी करू शकलो तर आपण इंग्लंडलाच काय पण अन्यांनाही अधिक जोमाने मागे सारू शकतो. याचे कारण असे की अपघाताने केवळ जीवच जातात असे नाही. तर मोठे आर्थिक नुकसानही होते. आपल्या सरकारच्याच आकडेवारीनुसार १९९९-२००० या एका वर्षांत रस्ते अपघातामुळे आपले ५५ हजार कोटी रुपयांचे नुकसान झाले होते. हा आकडा २०१२ साली एक लाख कोटी रुपयांवर गेला. यात बळी गेलेल्यांच्या कुटुंबीयांचे आर्थिक नुकसान, प्रशासकीय सेवांवर पडणारा ताण, त्याचा खर्च यांचा अंतर्भाव नाही. तसेच या अपघातात बळी पडणारे प्राधान्याने १८ ते ६० या वयोगटातील असतात. म्हणजे इतके सारे उत्पादक जीव आपण रस्त्यावर गमावतो. या तपशिलाचा अर्थ असा की संरक्षणार्थ तैनात जवानांपेक्षा रस्त्यावर प्रवास करणाऱ्या सामान्यांच्या जिवाचा धोका आपल्याकडे अधिक आहे.

तरीही याचे कसलेही गांभीर्य आपल्या समाजजीवनात नाही. रस्त्यांवरच्या नियमांबाबत बेफिकिरी इतकी की नियम मोडणाऱ्याचे वर्तन पाहून नियम पाळणाऱ्यास ‘आपलेच तर काही चुकले नाही’ असे वाटावे. रस्ता ग्रामपंचायतींच्या हद्दीतील असो वा राष्ट्रीय महामार्ग. दोन्हींकडे नियम मोडणाऱ्यांचा आत्मविश्वास दृष्ट लागावी असा. काही वर्ष पूर्वीपर्यंत वाहतूक नियम मोडणाऱ्यांत तरुणांचे प्रमाण अधिक असे. आता परिस्थितीत आमूलाग्र ‘सुधारणा’ झालेली दिसते. म्हणजे हल्ली सहकुटुंब-सहपरिवार प्रवास करणारेही मोठय़ा उत्साहात वाहतूक नियम मोडतात. या मुद्दय़ावर स्त्री-पुरुष असाही भेद राहिलेला नाही. दोन्ही पाय रस्त्यांवर घासत अभिनव शैलीत दुचाकी चालवणाऱ्या काही महिलाही आता पुरुषांच्या खांद्यास खांदा लावून सर्रास वाहतूक नियम मोडतात. वाहतूक पोलिसांची गरज राहू नये म्हणून वाहतूक सिग्नल बसवले गेल्यानंतर त्या सिग्नल्सचे पालन होते की नाही हे तपासण्यासाठी अधिक पोलिसांची गरज लागणारा आपला देश! त्यास वाहतूक नियमांचे ममत्व आणि महत्त्व ते काय असणार? आणि हाच वर्ग स्वातंत्र्याच्या अमृतकाली तिरंगे फडकावीत, रस्त्यावर ‘राँग साइड’ने गाडय़ा दामटत देशप्रेमाचा जयजयकार करणार. म्हणजे आपल्या पापात ही मंडळी सुस्नात, मोकळे केस सोडलेल्या त्रिशूल वा तिरंगाधारी भारतमातेसही आपल्या पापात सहभागी करून घेणार!

हे सारेच उद्विग्न करणारे आहे. वास्तविक सायरस मिस्त्री यांच्या अपघाताशी या सर्वाचा थेट संबंध नाही. पण तो आहेही. याचे कारण समाजच बेफिकीर असेल तर या समाजातूनच आलेले महामार्ग अभियंते, रस्तानिर्मितीतील कर्मचारी हे कसे काय फिकीर बाळगणारे निपजणार? मिस्री यांची गाडी जेथे आदळली तेथे रस्ता अचानक अरुंद होतो. म्हणजे याच रस्त्यांवर रुळलेला चालक नसेल तर नवख्याचा गोंधळ होणे अटळ. तसेच झाले. त्यामुळे वाहनाच्या वेगापेक्षाही या अपघातास अधिक जबाबदार आहे ती सदोष रस्तेबांधणी. अशी सदोष रस्तेबांधणी आणि बेजबाबदार सहवाहनचालक यांच्यासमवेत आपणास प्रवास करावयाचा आहे याचे भान ठेवत सायरस आणि अन्यांनी ‘सीट बेल्ट’ लावला असता तर कदाचित निदान मरण तरी टळले असते. स्वत:च्या जिवाचा विचार करून स्वत:च स्वत:ची काळजी घेण्यास आपल्याकडे पर्याय नाही. इतका वास्तवदर्शी विचार जरी झाला तरी रस्त्यांवर हकनाक सांडणारे रक्त कमी होईल. नपेक्षा आपले रस्ते असेच रक्तरंजित राहतील.