इस्रायलच्या हेकेखोर, विस्तारवादी राजकारणाला हमासचे हल्ले हे उत्तर असू शकत नाही, हे विशेषत: पॅलेस्टिनी युवकांपुढे मांडण्याची ही शेवटची संधी आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

इस्रायल आणि हमास यांच्यात गाझा संघर्षभूमीतील निर्धारित शस्त्रविरामाची मुदत सोमवार, २७ नोव्हेंबर रोजी संपुष्टात आली, पण इस्रायल आणि हमास यांनी या विरामास मुदतवाढीचे दार किलकिले ठेवले आहे. तशी ती मिळेल, अशी आशा दोन्हींकडील मंडळींना वाटत होती हे महत्त्वाचे. त्यादृष्टीने दोन्ही बाजूंचे प्रयत्न सुरू होते. गत सप्ताहात शुक्रवारपासून शस्त्रविरामाची अंमलबजावणी सुरू झाली. शुक्रवार, शनिवार आणि रविवारी अनुक्रमे १३, १३ आणि १४ इस्रायली ओलिसांची सुटका हमासने केले. प्रत्येक ओलीस संचाच्या तिप्पट संख्येने पॅलेस्टिनी आणि हमास कैद्यांची सुटका इस्रायलने केली. शस्त्रविरामाच्या सहमतीनाम्यानुसार, ५० इस्रायली आणि १५० पॅलेस्टिनी कैद्यांची सुटका अपेक्षित होती. याशिवाय मुदत संपल्यानंतर प्रत्येक दिवशी १० ओलिसांच्या बदल्यात तो पूर्ण दिवस शस्त्रविराम घोषित करण्याचा प्रस्ताव इस्रायलने मांडला होता. त्याला हमासकडून सुरुवातीस तरी सकारात्मक प्रतिसाद मिळाला.  हमासच्या दहशतवाद्यांनी ७ ऑक्टोबर रोजी इस्रायलमधील काही स्थळांवर आणि एका सांगीतिक कार्यक्रमावर केलेल्या हल्ल्यात बाराशे जण ठार झाले होते. हमासने २४० इस्रायली आणि इतर देशीय नागरिकांना पळवून नेऊन ओलीस ठेवले. त्या ओलिसांची फारशी पर्वा न करता इस्रायलने गाझा पट्टीमध्ये प्रतिहल्ले सुरू केले. विविध स्रोतांच्या माहितीनुसार त्यात आतापर्यंत १३ हजारांहून अधिक नागरिक मरण पावले आहेत. यात उत्तर गाझामध्ये हमासचे सैनिक आणि म्होरकेही मोठय़ा प्रमाणात ठार झाल्याचे वृत्त आहे. आकडय़ांच्या तपशिलात शिरण्यात अर्थ नाही. कारण प्रत्येक आकडय़ामागे एक विषण्ण करणारी करुण कहाणी असते, जी बहुतेकदा इतिहासाच्या उदरात गाडली जाते. युद्ध, हल्ले, अपहरणे, लष्करी कारवाया यांमध्ये सर्वाधिक नाडला-भरडला जातो तो सर्वसामान्य नागरिक. ७ ऑक्टोबर रोजी हमासच्या तथाकथित कारवाईची झळ एका चार वर्षीय चिमुरडीला बसली. अविगेल इदान असे तिचे नाव. अविगेलच्या दोन तितक्याच लहानग्या भावंडांसह तिचे अपहरण करण्यात आले. तिचा चौथा वाढदिवस हमासच्या ताब्यात असतानाच येऊन गेला. तो ती काय साजरा करणार होती नि आता तिची सुटका झाल्यानंतरचा आनंद तरी ती कोणाबरोबर वाटणार होती, याचे उत्तर पॅलेस्टिनी सहानुभूतीदार आणि हमासच्या समर्थकांना द्यावेच लागेल. अविगेल ही अमेरिकी यहुदी मुलगी. येथून पुढे मोठी होत असताना, हमास तर सोडाच पण पॅलेस्टाइनविषयी तरी तिच्या मनात कसलीही सहानुभूती कशी काय निर्माण होईल, या प्रश्नाचे उत्तर सोपे नाही.

शाश्वत आणि चिरंतन शांततेसाठी गतशतकात विविध पातळय़ांवर प्रयत्न झाले. त्यातून काही वेळा तोडगे निघालेही. पण शांततेची ती वीण नवीन शतकात जागोजागी उसवताना दिसते आहे. शांततेऐवजी शाश्वत आणि चिरंतन विद्वेषाचे ज्वालामुखी जगभर जागोजागी भडकू लागले आहेत. त्यांचे निराकरण करताना शांततावाद्यांची ऊर्जा कमी पडत आहे. अत्यंत युद्धजन्य अशा गतशतकापासून आपण काहीच शिकलो नाही, याची जाणीव या शांततावाद्यांना अस्वस्थ करून सोडते. याचे एक कारण म्हणजे आग लागल्यानंतर अग्निशमनाचे प्रयत्न सुरू होतात. काही वेळा पुंडाई करणाऱ्या देशांकडे, नेत्यांकडे जाणूनबुजून दुर्लक्ष केले जाते. मोजक्याच कानफाटय़ा देशांना धोपटून आपली जबाबदारी संपते, असे मानणाऱ्या मुख्य प्रवाहातील नेत्यांची संख्या वाढली आहे. यात सर्वाधिक दोष अमेरिकेचा आहे. जो बायडेन हे त्यांचे विद्यमान अध्यक्ष शहाणे असले तरी वयपरत्वे पोक्त आणि नको तितके सहनशील आहेत. त्यांचे पूर्वसुरी डोनाल्ड ट्रम्प यांनी इस्रायल-पॅलेस्टाइन संघर्षांत पॅलेस्टिनी आकांक्षांना पूर्ण हरताळ फासून काही करारनामे केले, ज्यांचा विरोध तेव्हाही आणि आजही खुद्द इस्रायलमध्येच मोठय़ा संख्येने शहाणे इस्रायली करतात. इस्रायलचे पंतप्रधान बिन्यामिन नेतान्याहू यांच्या विस्तारवादी आणि संकुचित, असहिष्णु राजकारणामुळे अनेक अनुत्तरित प्रश्नांची उकलच होऊ शकली नाही. तशात प्रमुख अरब देशांनी ‘इराणविरोध’ या मर्यादित उद्देशाने नेतान्याहू यांच्याशी दोस्ती वाढवण्याचा निर्णय घेतला. तेव्हा आपले प्रश्न सोडवणार कोण, पॅलेस्टाइनला व्यापक स्वायत्तता मिळणार तरी कधी, याविषयी पश्चिम किनारपट्टी आणि गाझा पट्टीमधील लाखो पॅलेस्टिनींना रास्त शंका वाटू लागली आहे. त्यांच्या दुर्दैवाने पॅलेस्टिनींचे प्रतिनिधित्व करणाऱ्या पॅलेस्टिनी ऑथोरिटीकडे इस्रायली नेत्यांसमोर दाखवण्यासाठी आवश्यक असा खमकेपणा नाही. तो ज्यांच्यात आहे, असे हमास या दहशतवादी संघटनेचे म्होरके गाझामध्ये पॅलेस्टिनींचे अधिपती बनून राहिले आहेत. ‘इस्रायलला थेट भिडणारे’ अशी युवा पॅलेस्टिनी वर्गात हमासची ख्याती आहे. पण हमासच्या कृतीमुळे पदरात काही पडण्यापेक्षा आपलाच विध्वंस किती होतो, हे समजावून सांगणाऱ्यांची त्या समाजात वानवा आहे. विद्यमान संघर्षांचे मूळ हे अशा अनेक विसंगतींमध्ये दडलेले आहे. त्यातून वारंवार उद्भवणारे संघर्ष शमवण्यासाठी प्रयत्न करणे हे रुग्णावर इलाज करण्यासारखे तात्पुरते ठरते. त्यातून रोगाचे निराकरण होत नाही. तो साथीच्या रूपात वारंवार डोके वर काढत राहतो. हमासच्या मित्रदेशांनी, इस्रायलच्या मित्रदेशांनी, पॅलेस्टाइनच्या सहानुभूतीदारांनी; भारत, चीनसारख्या समाईक मित्रदेशांनी याविषयी विचार करण्याची गरज आहे.

शस्त्रविरामाच्या अल्पकाळात दोन्ही बाजूंकडील ओलीस वा कैद्यांची मुक्तता झाल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावर झळकलेले समाधान आणि आनंदाची तुलना कशाशीही करता येणार नाही. पॅलेस्टिनी गाझातील त्यांच्या घरांकडे परत जातील तेव्हा  ती घरे उद्ध्वस्त झालेली असतील. पण तरीही शस्त्रविरामाचे महत्त्व कमी होत नाही. कारण या सगळय़ांचे स्वातंत्र्य शस्त्रविरामातूनच साधलेले आहे. हमास आणि नेतान्याहू यांसारख्या युद्धखोरांनी अल्पकाळासाठी मती शाबूत ठेवल्यानेच हे घडून येऊ शकले. तरी दोघांची खुमखुमी कमी झालेली नाही.

ओलिसांना जसजसे इस्रायलच्या ताब्यात दिले जाईल, तितक्या प्रमाणात आपल्याकडील वाटाघाटींचे हुकमी पत्ते कमी होत जातील, याची जाणीव हमासला आहे. हमासचा नि:पात करणारच, अशी गर्जना नेतान्याहू यांनी केली आहेच. पण यासाठी किती किंमत मोजणार याचा आढावा दोन्ही बाजूंना घ्यावा लागेल. गाझा पट्टीच्या शहरा-शहरांत इस्रायलचे सैन्य घुसून हल्ले करू लागल्यास त्यांना तीव्र प्रतिकार होणारच. यातून जी संभाव्य इस्रायली मनुष्यहानी होईल, ती स्वीकारणे इस्रायलमधील कित्येकांना मान्य नसेल. हमासविषयी आकस असूनही इस्रायलमधील कित्येकांना नेतान्याहूंचे सूडाचे राजकारण अजिबात मान्य नाही. हमासचे अनेक बडे नेते उत्तर गाझातील इस्रायली हल्ल्यांमध्ये मारले गेले आहेत. पश्चिम किनारपट्टीस्थित पॅलेस्टिनी प्रशासनाला या संधीचा फायदा घेत हमासच्या हल्लेखोरीमागील फोलपणा दाखवून देण्याची संधी उपलब्ध झाली आहे. दहशतवादी हल्यात गेलेल्या १२०० इस्रायली नागरिकांच्या बदल्यात जवळपास दसपटीहून अधिक पॅलेस्टिनींना जीव गमवावा लागणे, यातून यापेक्षा वेगळे काही सिद्ध होत नाही. इस्रायलच्या हेकेखोर, विस्तारवादी राजकारणाला हमासचे हल्ले हे उत्तर असू शकत नाही, हे विशेषत: पॅलेस्टिनी युवकांपुढे मांडणे गरजेचे आहे. ते मांडण्याची ही शेवटची संधी आहे. खुद्द इस्रायलमध्ये ‘हमासचे हल्ले तुमच्यामुळेच घडले’ असे नेतान्याहूंना सुनावणाऱ्या नागरिकांची आणि विश्लेषकांची संख्या कमी नाही. त्यांनीही आपला रेटा वाढवला आहे. चार दिवसांच्या शस्त्रविरामाने या मुद्दय़ांवर विचार करण्याची उसंत संबंधित सगळय़ांनाच मिळालेली आहे. अशावेळी भडक नेतृत्वाच्या मागे जाणे गाझावासीयांस सोडावे लागेल आणि  राष्ट्राभिमानाच्या आड वैयक्तिक पुंडगिरी करणाऱ्या पंतप्रधानास पदच्युत करणे इस्रायलींस साधावे लागेल. तरच शस्त्रविरामाची ही शहाणीव ओलीस किंवा कैद्यांच्या सुटकेपेक्षा अधिक शाश्वत आणि फलदायी ठरू शकते.

मराठीतील सर्व संपादकीय बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta editorial deadline for a scheduled ceasefire between israel and hamas in the gaza strip amy
Show comments