राजधानी दिल्लीच प्रदूषित असलेल्या आपल्या देशात जगातील १०० अतिप्रदूषित शहरांपैकी ३९; शिवाय एकंदर हवेच्या दर्जाहीनतेतही आपलाच क्रमांक पहिला…
राजधानी दिल्लीतील हवेतच प्रदूषण आहे. आधीच त्या शहरातील हवा भिकार. अलीकडच्या काळात तर ती अधिकाधिक भिकार होऊ लागली आहे, हे कोणी अमान्य करणार नाही. दिल्लीचे वातावरण कधीपासून नक्की खराब होऊ लागले याबाबत अनेकांची मते वेगवेगळी असतील. ती दूर ठेवून राजधानीतील हवेच्या घसरत्या दर्जाचा विचार व्हायला हवा. लवकरच महासत्ता वगैरे होऊ घातलेल्या देशाची राजधानी दिल्ली हे आपल्या देशातील बिघडत चाललेल्या वातावरणाचे एक ढळढळीत प्रतीक. भर दिवसा वातावरणात काळोख दाटवणारी हवा दिल्लीची आणि धडधाकटाचा श्वास कोंडवणारी हवाही दिल्लीचीच. या राजधानीस ना स्वत:चा चेहरा आहे ना स्वत:चे पर्यावरण. शेजारील पंजाब, हरयाणा, उत्तर प्रदेश या राज्यांत काही घडले की दिल्लीचा चेहरा बदलतो आणि वर हिमाचल, जम्मू-काश्मिरातील हवेवर दिल्ली तापणार की कुडकुडणार हे ठरते. या परावलंबी दिल्लीचे हे वास्तव बाजूला ठेवले तरी आणखी एका गंभीर समस्येकडे आपणास दुर्लक्ष करता येणार नाही. ते वास्तव आहे देशातील एकूणच ढासळत्या हवेचा दर्जा हे. त्यावर प्रकाश टाकण्याआधी दिल्लीच्या हवेच्या दर्जाविषयी.
गेले काही दिवस दिल्लीतील हवेचा निर्देशांक (एक्यूआय) ४००-५०० च्या आसपास घोंघावत आहे. हवेत किती प्रदूषके आहेत हे या निर्देशांकावरून कळते. कोणत्याही प्रदेशातील हवा चांगली, श्वसनयोग्य ठरवण्यासाठी हे प्रदूषकांचे प्रमाण ५० च्या आत हवे. दिल्लीतील हवेत प्रदूषके त्याच्या दहापट आहेत. म्हणजे एका दिवसात जवळपास ५० सिगरेटी फुंकल्यास फुप्फुसांचे जे मातेरे होईल ते दिल्लीतील हवेत केवळ श्वास घेतल्याने होते. म्हणून अखेर दिल्लीतील शाळादी संस्था बंद ठेवण्याचा आदेश प्रशासनास द्यावा लागला. बंद घरात थाळ्या बडवल्याने वा टाळ्या पिटल्याने हवा शुद्ध होते असे कोणी अद्याप सुचवलेले नाही, हे दिल्लीकरांचे तसे नशीबच. दिल्लीत अनेकांस कोंडल्यासारखे वाटते त्यामागे त्या शहरातील हवा हे एक कारण असावे. त्या नगरात गेल्यावर अनेकांचा जीव घाबराघुबरा होतो आणि छातीत धडधडू लागते; तेही यामुळेच. दिल्ली ही खरे तर देशाची राजधानी. आपले सर्वोच्च सत्ताकेंद्र. पण तेच असे प्रदूषित. हे असे मुळातच दिल्लीच्या हवेत कायम असलेले प्रदूषण या काळात वाढले की तेथील शासक, उच्चभ्रू, अभिजन हे शेजारच्या राज्यातील शेतकऱ्यांस बोल लावतात. हे शेतकरी आपल्या जमिनीची मशागत करण्यासाठी या काळात झाडपाला जाळून जमीन रापवतात. त्या जळिताचा धूर दिल्लीवर येतो आणि दिल्ली काळवंडते. दिल्लीच्या प्रदूषणामागे हे एक कारण. त्याची चर्चा वर्षानुवर्षे होते. तथापि या इतकेच दिल्लीस वीजपुरवठा करणारी औष्णिक वीज केंद्रेही राजधानीतील हवा खराब करण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. दिल्लीच्या परिसरात ३०० किमीच्या परिघात जवळपास डझनभर औष्णिक वीज प्रकल्प आहेत. यात अर्थातच कोळसा जाळून वीज तयार केली जाते. म्हणजे या कोळशाची राख आणि धूर दोन्हीही आले. या दोन्हींची चादर दिल्लीवर पसरते आणि आपली राजधानी काळवंडते. तथापि जितकी बोंब शेजारील राज्यातील शेतकऱ्यांच्या विरोधात ठोकली जाते त्याच्या एक दशांशही ओरड या ११ वीज प्रकल्पांबाबत काढली जात नाही. या मौनामागील कारण कळणे अवघड नाही. दिल्ली उजळून निघते ती या कारखान्यांतील विजेमुळे. शेतकरी बापडा पिके आणि आंदोलने याखेरीज आणखी काय दिल्लीस देणार! हे झाले दिल्लीचे.
हेही वाचा : अग्रलेख : नगरांचे नागवेकरण
पण ‘स्टँडर्ड अँड पुअर्स’ (एसअँडपी) या जागतिक संस्थेच्या मते जगातील १०० कुप्रसिद्ध प्रदूषित शहरांपैकी तब्बल ३९ शहरे या एका भारतवर्षात आहेत. लोकसंख्येप्रमाणे या मुद्द्यावरही आपण आपल्या शेजारील चीन या स्पर्धक देशास मागे टाकलेले दिसते. महासत्तापदानजीक गेलेल्या चीनमधे जगातील सर्वात प्रदूषक १०० पैकी ३० शहरे आहेत. आपल्या देशात ३९. एकेकाळी बीजिंग ही चीनची राजधानी जगातील सर्वात प्रदूषित शहरांत गणली जात असे. पण १६ वर्षांपूर्वी बीजिंगने ऑलिम्पिक भरवले आणि त्यानिमित्ताने शहराचे प्रदूषण कायमचे दूर केले. आपणही २०३६ साली ऑलिम्पिक भरवू इच्छितो. ते देदीप्यमान क्रीडासंस्कृती असलेल्या अहमदाबादपेक्षा दिल्लीत भरवल्यास तेथील प्रदूषण कमी करण्याची संधी मिळेल. पण तूर्त तरी दिल्लीकरांस या प्रदूषकांपासून मुक्ती नाही. जगात सर्वाधिक प्रदूषित शहरांतील पहिला क्रमांक आपला, दुसरा चीनचा आणि तिसऱ्या क्रमांकावर आहे आपला दुसरा शेजारी पाकिस्तान. त्या देशातील सात शहरे पहिल्या शंभरात स्थान पटकावून आहेत. आपला आणखी एक प्रिय शेजारी बांगलादेशही या स्पर्धेत मागे नाही. एकूण पाच शहरांसह तो चवथ्या क्रमांकावर आहे. त्याचा समानधर्मीय इराण तीन शहरांसह पाचव्या आणि नेपाळ, इंडोनेशिया हे दोन दोन शहरांसह पाठोपाठ आहेत. म्हणजे एक चीन वगळता तर तिसऱ्या जगातील देश प्रदूषक शहरांत ‘मानाचे पान’ हक्काने मिळवतात, असे दिसते.
हेही वाचा : अग्रलेख : विकासासाठी वखवखलेले…
हे प्रदूषक सत्य या शहरांपुरतेच मर्यादित नाही. ‘एसअँडपी’ने उच्च दर्जाच्या प्रदूषक शहरांचेही मानांकन केले. त्यानुसार हवेचा निर्देशांक ७९.९ असलेला बांगलादेश पहिला, ७३.७ निर्देशांकाने पाकिस्तान दुसरा आणि ५४.४ निर्देशांकाने भारत तिसरा क्रमांक पटकावून आहे. म्हणजे हा निर्देशांक ५० च्या आत असावा हा निकष समग्र भारतासाठी स्वप्नवतच ठरतो म्हणायचा. आपण या क्रमवारीत पुढे आहोत ते ताजिकिस्तान, बुर्किना फासो, इराक, नेपाळ, इजिप्त, कांगो आदी देशांच्या. सर्वाधिक प्रदूषित देशांत चीनचा समावेश नाही, ही बाब लक्षात घ्यावी अशी. आपण मात्र दोन्ही आघाड्यांवर समर्थपणे उभे आहोत. याखेरीज या अहवालातील काही निरीक्षणे आपल्या देशातील प्रगती निदर्शक म्हणावी लागतील. उदाहरणार्थ ४३० मोटारी प्रति किलोमीटर वागवणारी मुंबई शहरांतील वाहन-गर्दीबाबत मानाच्या पदावर आहे. तथापि बेंगळूरु ही आपली ‘आयटी राजधानी’ एक वेगळाच विक्रम आपल्या नावे नोंदवून आहे. तो म्हणजे वाहनांचा वेग. बेंगळूरुच्या रस्त्यांवर वाहनांची गर्दी इतकी की त्या शहरातील मोटारी सरासरी फक्त १० किमी प्रति तास या आणि इतक्याच वेगाने मार्गक्रमण करू शकतात. यावरून नवतंत्रज्ञानाची जननी असलेल्या आपल्या देशातील महानगर प्रगतीचा किती ‘वेग’ गाठू शकते हे कळावे.
हेही वाचा : अग्रलेख : मणिपुरेंगे!
हे वास्तव आपल्यासाठी खचितच भूषणावह नाही. पुढील काही वर्षांत आपण तिसऱ्या/ चौथ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनू असे स्वप्न पाहात आहोत. वास्तव हे की ते प्रत्यक्षात येण्यासाठी कोणत्याही सरकारी प्रयत्नांची वा घोषणांची आपणास गरज नाही. आता जो आहे तो विकासाचा वेग कायम राखला तरी आपल्या अर्थव्यवस्थेचा आकार आपोआप वाढणार, हे सामान्य ज्ञान आहे. पण हे असले प्राथमिक मुद्देही पांडिती चातुर्याने मांडण्याचा आणि ते मांडले म्हणून स्वत:भोवती आरत्या ओवाळून घेण्याचा हा सध्याचा काळ. खरे तर अर्थव्यवस्थेचा क्रमांक चढवण्यापेक्षा देशातील नागरिकांना शुद्ध हवा देता येणे हे अधिक आव्हानात्मक आहे. एरवी चांगल्या हवेसाठी ओळखल्या जाणाऱ्या मुंबईतील हवेचा दर्जाही सध्या बिघडलेला दिसतो. मुंबईसारखे शहर काय वा दिल्लीसारखे काय… हवा मोकळेपणाने वाहात नसल्याने प्रदूषके वातावरणात भरून राहतात. तेव्हा ‘जरा मोकळी हवा येऊ द्या’ असे म्हणणाऱ्यांचा जोर वाढत नाही तोपर्यंत हवेचा दर्जा असाच राहील. मोकळेपणा हाच सर्व प्रदूषकांवर उतारा असतो.