अखेर धनाजीरावांच्या धाकट्या लेकाचे लग्न लागले. अगदी त्यांना आणि सुंदराबाईंना हवे होते तसे लागले…

‘आमचे येथे श्रीकृपेकरून अमुक अमुक यांचे सुपुत्र आणि अमुक अमुक यांची सुकन्या यांचा शरीरसंबंध करण्याचे योजिले आहे. तरी मांडवशोभेसाठी आपण अवश्य यावे…’ अशी कोणे एके काळची आपल्या वाडवडिलांच्या लग्नाची इतकी थेट पत्रिका धनाजीरावांच्या डोळ्यासमोरून हलत नव्हती. शरीरसंबंध… मांडवशोभा… छ्या… हे म्हणजे फारच झाले. लग्न म्हणजे स्वर्गात बांधल्या जाणाऱ्या पवित्र गाठी, त्या पृथ्वीवर येऊन पक्क्या करायच्या असतात. त्याआधी दोन्ही घराणी किती तोलामोलाची आहेत, हे पाहायचे असते. लग्न म्हणजे दागदागिने, कपडेलत्ते, मेजवान्या, भेटवस्तू, नाचगाणी, भेटीगाठी हेच त्यांना माहीत होते. आपल्या आजोबा-पणजोबांच्या जीवनात जरा म्हणून मनोरंजन नव्हते, म्हणून त्यांनी अशा थेट आणि रूक्ष पत्रिका लिहून लग्ने उरकली. आपण आपल्या धाकट्याच्या बाबतीत मात्र तसे अजिबात करायचे नाही, असे धनाजीरावांनी ठरवून टाकले होते. त्याला कारणही तसेच होते. हे कारण काय आणि हे धनाजीराव कोण म्हणून विचारता? अहो तेच ते. कोणे एके काळच्या आटपाट नगरातले. नाही समजले? पहिल्यापासून नीटच सांगायला हवे आहे म्हणता? चला तर… मग काय झाले की पूर्वीच्या कहाण्यामध्ये असते तसे एक आटपाट नगर होते. तिथे धनाजीराव आणि सुंदराबाई हे जोडपे राहत होते. आणि हो, या आटपाट नगरात धनाजीरावांच्या गावीही नसलेले एक नानाजीपंतही होते. पण आपणही त्यांची फार दखल घेण्याची गरज नाही. तर असो, गाठीला बक्कळ पैसा जोडलेल्या धनाजीरावांना गावात चांगलाच मान होता. त्यांचे कुटुंबही खाऊनपिऊन सुखी होते. धनाजीरावांच्या दोन गुणी मुलांचे विवाह झाले होते आणि त्यांच्या कुटुंबात एक सुशील सून आणि जावयाची भर पडली होती. आता त्यांच्या शेंडेफळाचे लग्न होऊ घातले होते. धनाजीरावांच्या घरातले हे शेवटचे कार्य. त्यामुळे सगळ्या पंचक्रोशीत त्याची चर्चा झाली पाहिजे, ‘आजवर असा विवाह पाहिला नाही,’ असे लोकांनी म्हटले पाहिजे असे धनाजीरावांना वाटत होते. शिवाय त्यांच्या असेही लक्षात आले की त्यांच्याकडे असलेल्या संपत्तीच्या, त्यांच्या उत्पन्नाच्या तुलनेत आटपाट नगरात महागाई अगदीच किरकोळ होती. त्यामुळे मग धनाजीराव आणि सुंदराबाई यांनी हा समारंभ झोकात, अगदी हात सैल सोडून करायचे ठरवले.

A young man was brutally beaten to death due to an immoral relationship in Nagpur
विवाहित प्रेयसीची अंधारातील भेट प्रियकराच्या जीवावर बेतली
walmik karad illegal transportation
वाल्मीक कराड: राखेच्या अवैध वाहतुकीतून दहशतीचा धुरळा!
Should a divorced wife receive maintenance under any circumstances
घटस्फोटीत पत्नीला कोणत्याही परिस्थितीत निर्वाहनिधी मिळालाच पाहिजे का?
gold prices
लग्नाच्या हंगामात सोन्याच्या दरात मोठे बदल… ग्राहकांची चिंता…
Bollywood actor varun Dhawan reveals wife of a powerful man broke into his house without permission
वरुण धवनच्या घरात घुसली होती चाहती, प्रसंग सांगत अभिनेता म्हणाला, “एका पॉवरफुल व्यक्तीची ती पत्नी होती अन्…”
Girls are lucky for their husband
नवऱ्याला श्रीमंत बनवतात ‘या’ पाच राशींच्या मुली; पद, सन्मान, यशासह मिळतो अपार पैसा अन् धन
Marathi actress tejashri Pradhan talk about her future life partner
अभिनेत्री तेजश्री प्रधानला ‘असा’ हवाय जोडीदार, म्हणाली, “फक्त नात्यात…”
devoleena bhattacharjee blessed with baby boy
Video: दोन वर्षांपूर्वी केलं आंतरधर्मीय लग्न; अभिनेत्रीच्या घरी चिमुकल्या सदस्याचं आगमन

गावोगावी आमंत्रणे पाठवायची होती. धनाजीरावांचा मित्रपरिवार तसा मोठा आणि वेगवेगळ्या थरांमधला. कुणाला चढवायचे नाही आणि कुणाला उतरवायचे नाही म्हणून ज्याच्या त्याच्या मगदुराप्रमाणे पत्रिका छापायचे आणि पाठवायचे ठरले. आपल्या घरातून जाणारी लग्नपत्रिका पुढची पन्नास वर्षे लोकांनी जपून ठेवली पाहिजे, असे धनाजीराव आणि सुंदराबाई यांना वाटत होते. त्यामुळे त्यांनी पत्रिकाही अशा सोन्याचांदीचा वर्ख ल्यालेल्या छापल्या की त्या ज्यांना ज्यांना मिळाल्या त्या बघून सगळ्यांनी आ वासला. ज्यांना पत्रिका गेल्या नाहीत, त्यांना म्हणजे नानाजीपंतांना आपोआपच समजले की आपण किती मोठे व्हायला हवे, तर धनाजीरावांच्या घरून आमंत्रण यायला हवे एवढे. त्यामुळे ज्यांना धनाजीरावांकडून पत्रिका आली असे लोक आणि ज्यांना आली नाही असे लोक अशी आपोआपच जगाची विभागणी झाली. तर असो. लग्न समारंभ एकाच दिवशी झाला तर तो कशाला कुणाच्या लक्षात राहील, असे धनाजीरावांना वाटत होते. लग्न मुहूर्तावर लावायचे असल्यामुळे ते एकदाच लावावे लागते, पण साखरपुड्याचे तसे काही नसते अशी पळवाट गुरुजींनी काढून दिल्यावर सगळे कसे सोपे होऊन गेले. एकदा मुलाच्या घरी, एकदा मुलीच्या घरी, एकदा शेतातल्या बंगल्यावर असा तीन तीन वेळा साखरपुडा झाला. अशीच वेगवेगळ्या ठिकाणी तीन तीन वेळा व्याहीभोजने झाली. त्याशिवाय संगीत समारंभ, मेंदी समारंभ, सीमान्तपूजन आणि मुख्य लग्न समारंभ आणि त्यानंतरचा स्वागत समारंभ… अबब… या सगळ्या कार्यक्रमांमधल्या वधूवरांच्याच नाही, तर इतरांच्याही पोशाखांची, दागदागिन्यांची, जेवणावळींमधल्या पदार्थांची यादी ऐकूनच नानाजीपंतांची दमछाक होत होती. तीन साखरपुडे, तीन व्याहीभोजने आणि प्रत्यक्ष लग्न समारंभ यांत वेगवेगळे पेहराव करायचे, त्यावर वेगवेगळे दागिने घालायचे म्हणजे वऱ्हाडी मंडळींनीच धनाजीरावांच्या चिरंजीवांच्या विवाहासाठी किती बरे खर्च केला असेल, अशी चर्चा नानाजीपंतांच्या घरीदारी रंगू लागली.

नानाजीपंतांना वाटू लागले, लग्न असावे तर असे… नाही तर आपली लग्ने… वरपक्षाने आयत्या वेळी ही मागणी केली, वरमाय अशी रुसून बसली, करवलीचा तोरा कसा आवरायचा हा प्रश्न पडला यातच लग्न समारंभ संपून जातो आणि कर्जाचा डोंगर डोक्यावर येतो तो वेगळाच. त्यांना दिसत होते की धनाजीरावांच्या घरच्या कार्यात असे काहीच नव्हते. मुळात लग्न किती पैशात उरकायचे हाच प्रश्न नव्हता. एकट्या वरपक्षाने सगळा खर्च करायचा नव्हता की तो निम्मा निम्मा वाटूनही घ्यायचा नव्हता. ९९ टक्के भांडणे तिथेच संपली होती. त्यामुळे वातावरण कसे छान होते. कुणी रुसत नव्हते की कुणी भांडत नव्हते. सगळी मंडळी नटूनथटून येत होती. छान हसत फोटोग्राफरला पोझ देत होती. सगळ्यांनी आपापले आहेर तर आधीच पाठवून दिले होते. कुणी धनाजीरावांच्या शेंडेफळाला बंगला भेट दिला होता, तर कुणी गाडी. कुणी सोनेनाणे, कुणी हिरेमाणके तर कुणी आणखी काही मौल्यवान वस्तू. आपल्याकडच्या काही लग्नपत्रिकेत लिहिले जाते, तसे ‘कृपया आहेर आणू नये’ हे वाक्य धनाजीरावांनी पत्रिकेत का लिहिले नसेल, विसरले असतील का असा प्रश्न नानाजीपंतांना पडला होता. तर तिकडे धनाजीराव सुंदराबाईंना म्हणत होते, ‘बघ, आपण आहेर घेतला नसता तर किती लोक बिचारे नाउमेद झाले असते. त्यांच्यासाठी आपण वेळोवेळी इतके केले आहे की आपल्याला काही तरी करायची संधी मिळावी असे त्यांनाही वाटत असणारच की…’ ‘तर… तर…’ नवऱ्याकडे कौतुकाने पाहत सुंदराबाई म्हणाल्या, ‘तुम्ही या सगळ्यांसाठी एवढे केले आहे म्हणूनच तर या गावचा सरदार, त्या गावचा सरपंच, या गावचा पोलीस पाटील, त्या गावचा प्रवचनकार असे कोण कोण अगदी तूप वाढण्यापासून धावपळ करताहेत.’

धनाजीरावांच्या घरच्या कार्यात अगदी तूप वाढण्यापासून प्रत्येक गोष्टीसाठी नाचानाच करणाऱ्या वऱ्हाडी मंडळींविषयी काय सांगावे? पंचक्रोशीमधली सगळी बडी बडी मंडळी सहकुटुंब झाडून हजर झाली होती. धनाजीरावांनी आपल्याला बोलावले, आपण त्यांच्या आमंत्रितांच्या यादीत आहोत, एवढ्या एका गोष्टीमुळेच आपण कृतकृत्य झालो आहोत, असे त्यांना वाटत होते आणि ते धनाजीरावांना जाणवावे असेच त्यांचे वागणे होते. एरवी आपल्याला कस्पटासमान लेखत आपल्यासमोर मोठा तोरा मिरवणारी, नाक वर करून चालणारी ही सगळी मंडळी धनाजीरावांसमोर कशी लीन होताहेत हे नानाजीपंत डोळे विस्फारून बघत होते. अर्थात गेल्या महिनाभरात कपडे असोत, धान्यधुन्य असो की औषधे असोत, या सगळ्यांच्या खरेदीसाठी गावात असलेल्या धनाजीपंतांच्या दुकानांमधले भाव ज्या वेगाने वाढले होते, त्यामुळे नानाजीपंतांचे डोळे यापेक्षाही जास्त विस्फारले गेले होते, ही गोष्ट वेगळी.

अखेर धनाजीरावांच्या धाकट्या लेकाचे लग्न लागले. अगदी त्यांना आणि सुंदराबाईंना हवे होते तसे लागले. एवढा खर्च करूनही धनाजीरावांचा खिसा जडच राहिला. कारण तेवढी महागाईच नव्हती त्यांच्या जगात. आता त्या दोघांपुढे प्रचंड मोठे रिकामपण दाटून आले आहे. त्या रिकामपणाचे करायचे काय हा प्रश्न होम थिएटरवर साखरपुडा वा लग्नाची दृश्ये पाहून काही काळापुरता सुटेलही… पण त्यानंतर काही ना काही समारंभ करावाच लागेल… तोही वाजतगाजत… तिकडे नानाजीपंतांनीही आता, भाच्याचे लग्नही इतक्याच थाटात करायचे असा हट्ट त्यांच्या बहिणीकडे धरला आहे म्हणतात.

Story img Loader