साऱ्या विवेकी जगाच्या हृदयाची धाकधूक वाढवणारी घटना या आठवड्यात घडेल. ती म्हणजे अमेरिकेची अध्यक्षीय निवडणूक. या जागतिक धाकधुकीचे भवितव्य तेथील जनतेने रिपब्लिकन पक्षाचे डोनाल्ड ट्रम्प वा डेमॉक्रॅटिक पक्षाच्या कमला हॅरिस यांच्यापैकी कोणास कौल दिला या प्रश्नाच्या उत्तरावर अवलंबून असेल. म्हणजे ही धाकधूक थांबणार की पुढील चार वर्षांसाठी उत्तरोत्तर वाढणार हे या निवडणुकीत स्पष्ट होईल. त्या देशाच्या रीतीप्रमाणे पहिल्या नोव्हेंबरातील पहिल्या सोमवारनंतरच्या मंगळवारी ५ नोव्हेंबरला या निवडणुकीत अमेरिकेचा अध्यक्ष निवडला जाणार असला तरी तांत्रिक अर्थाने ही अध्यक्षीय निवडणूक म्हणता येत नाही. कारण विविध राज्यांत विखुरलेली अमेरिकी जनता प्रत्यक्षात राजकीय पक्षास मत देत असते. म्हणजे डेमॉक्रॅटिक वा रिपब्लिकन या पक्षांस मते दिली जातात आणि त्यातून ५३८ लोकप्रतिनिधी निवडले जातात. त्यातील किमान २७० लोकप्रतिनिधी ज्या पक्षाचे निवडून येतात त्या पक्षाचे लोकप्रतिनिधी राज्याराज्यांच्या राजधानीत डिसेंबरातील दुसऱ्या बुधवारनंतरच्या मंगळवारी एकत्र येतात आणि त्या बैठकीत अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडले जातात. म्हणजे ही थेट अध्यक्षीय निवडणूक नाही. यातही परत मेख अशी की एखाद्या पक्षाचे एखाद्या राज्यात निम्म्यापेक्षा अधिक लोकप्रतिनिधी निवडून आले तर त्या राज्याची शंभर टक्के मते त्या त्या पक्षाच्या पारड्यात घातली जातात. अमेरिकेत एखादे राज्य ‘लाल’ की ‘निळे’ असे म्हटले जाते ते यामुळे. लाल रंग हा रिपब्लिकनांचा तर निळा डेमॉक्रॅट्सचा. या निश्चित रंगलेल्या राज्यांखेरीज खरी लढाई असते ती ‘लाल’ की ‘निळे’ हे ठरवता येत नाही, अशा राज्यांत. त्यांना स्विंग स्टेट्स म्हणतात. म्हणजे ही राज्ये रिपब्लिकनांची तळी उचलणार की डेमॉक्रॅट्सना पाठिंबा देणार यावर बऱ्याचदा अध्यक्षपदी कोण विजयी होईल, हे ठरते. अमेरिकेच्या निवडणूक प्रक्रियेविषयीची ही किमान आवश्यक तांत्रिक माहिती. आता तेथे सध्या सुरू असलेल्या अध्यक्षीय निवड प्रक्रियेतील राजकारणाविषयी.
आपल्याकडची परिस्थिती बरीच बरी असे वाटावे असे सध्याचे अमेरिकेतील राजकारण. ते पाहिल्यावर हीच का ती जगातील महासत्ता असा प्रश्न पडावा आणि इतक्या बिनडोक मुद्द्यांवर तेथे राजकारण होत असेल तर या विश्वाचीच काळजी वाटावी. गेले काही महिने त्या देशातील प्रचार पाहिल्यास हा देश म्हणजे भौतिकदृष्ट्या अत्यंत प्रगत आणि बौद्धिक/मानसिकदृष्ट्या आदिम जनांचा समूह वाटू लागतो. यंदा अमेरिकेत कोणता मुद्दा सर्वाधिक ‘चालला’ असेल तर तो आहे ‘सैतान’ (सेटन). तो ‘यशस्वीपणे’ चालवण्याचे श्रेय(?) अर्थातच ट्रम्पबाबांचे. डेमॉक्रॅटिक पक्षाच्या उमेदवार कमला हॅरिस या निपुत्रिक आहेत, या पक्षाचे समर्थक हे मुख्यत: स्थलांतरित आहेत, त्यांचे अमेरिकेवर प्रेम नाही, ही सारी ‘सैतान’ समर्थकांची अवलाद, त्यांना रोखण्याची हिंमत एकच एक ट्रम्प यांच्यात आहे हे या कथानकातील लक्षणीय मुद्दे. ते अर्थातच रिपब्लिकनांनी रंगवले आणि त्यांच्या वतीने विविध लहानमोठ्या धर्मगुरूंनी प्रचारसभांतून जनमनात रुजवले. ट्रम्प यांच्या रिपब्लिकन पक्षाचे समर्थक तसेही धर्मभोळे, अंधश्रद्धांनी ओतप्रोत भरलेले, आधुनिकतेपासून मैलोगणती दूर, म्हणूनच स्त्रियांचा गर्भपाताचा हक्क नाकारणारे इत्यादी अवगुणवैशिष्ट्यांनी भरलेले असतात. त्यांच्या हलक्या मेंदूंत ही सैतान-कथा खरोखरच रुजली. त्याचमुळे हे स्थलांतरित अमेरिकी नागरिकांचे पाळीव कुत्रे मारून खाऊ लागले आहेत ही ट्रम्पकढी देशभर चर्चेचा विषय ठरली. वास्तविक जेथे असे प्रकार घडल्याचे ट्रम्प यांनी बेधडकपणे सांगितले तेथील स्थानिक पोलिसांपासून प्रशासनापर्यंत अनेकांनी हे असे काही घडल्याचा अधिकृतपणे इन्कार केला. पण तरी ट्रम्प यांनी काही आपला हेका सोडला नाही.
या ट्रम्पकथांस खऱ्या अर्थाने सर्वदूर पोहोचवण्याचे ऐतिहासिक कार्य केले ते पूर्वाश्रमीचे ट्विटर आणि आताच्या ‘एक्स’चा मालक एलॉन मस्क यांनी. ट्रम्प आणि मस्क ही जोडगोळी म्हणजे जणू बिल्ला आणि रंगा. बिनबुडाच्या बिनडोक्यांस जेव्हा तंत्रज्ञान साथ देते तेव्हा काय होते याची अमेरिकेतील ही सध्याची जोडगोळी हे सर्वोत्कृष्ट उदाहरण. ट्रम्प यांच्या निर्बुद्ध दंतकथा समाजमाध्यम सरदार मस्क यांनी इमानेइतबारे सर्वत्र पसरवल्या. इतकेच नाही तर ट्रम्प यांस त्यांनी अधिकृतपणे पाठिंबाही जाहीर केला आणि हॅरिस यांची शक्य तितकी बदनामीही केली. प्रेम, आदर, सद्भावना आदी सत्त्वगुणांपेक्षा घृणा, अनादर आणि वैरभाव पसरवणे अधिक सहजसोपे असते. म्हणूनच गांधी एक असतो आणि त्यांस मारू पाहणारी डोकी अनेक. अमेरिकेत सध्याच्या निवडणुकीत त्याचा प्रत्यय येत असून ट्रम्प यांनी अत्यंत हिरिरीने लावलेल्या द्वेषवृक्षास मोठ्या जोमाने पाने/ फुले/ फळे लागताना दिसतात. याचा थेट परिणाम म्हणजे अ-श्वेत आशियाई पुरुषांचा त्यांना मिळत असलेला पाठिंबा. अनेक अफ्रिकी, पश्चिम आशियाई धर्मवेड्या देशांतील स्थलांतरित अमेरिकेत मोठ्या प्रमाणावर आहेत. या अशा पुरुषांच्या जोडीदारिणी हॅरिस यांच्या पाठीशी आणि पुरुषांचा पाठिंबा मात्र ट्रम्प यांना असे चित्र बऱ्याच प्रांतांत आणि शहरांत दिसते. महिला नेतृत्व अमान्य असणारा हा मागास अ-श्वेत पुरुषांचा जथ्था श्वेतवर्णाभिमानी श्वेतशाहीचा निर्लज्ज पुरस्कार करणाऱ्या ट्रम्प यांच्या मागे उभा राहताना दिसतो. स्थानिक गोरे बेरोजगार ट्रम्प यांच्या मागे आणि या गोऱ्यांचा रागाचा विषय असलेले गोरेतर पुरुषही ट्रम्प यांच्या साथीला असे हे चित्र. अमेरिका ही फक्त गोऱ्या स्थानिकांची असे ट्रम्प मानतात. त्यामुळे स्थानिक गोऱ्या भूमिपुत्रांचा पाठिंबा त्यांना आहेच. स्थलांतरितांमुळे स्थानिक गोऱ्यांच्या पोटावर पाय येतो, असे सांगत ट्रम्प या स्थलांतरितांस विरोध करतात. ते जर अध्यक्षपदी निवडले गेले तर या स्थलांतरितांवरच पहिला वरवंटा फिरणार. पण या स्थलांतरितांतील एक वर्ग इतका मागास आहे की तरीही तो ट्रम्प यांस पाठिंबा देतो. मागासांच्या वैचारिक अंधत्वावर कपाळमोक्ष हाच अखेर उतारा असतो.
त्याची पुरेपूर हमी ट्रम्प देतात. वसुंधरेचे वाढते तापमान आटोक्यात आणण्याचा मुद्दा नाकारणे हे त्याचे आणखी एक उदाहरण. ‘क्लायमेट चेंज इज अ होक्स’ (वातावरणीय बदल ही एक अफवा आहे.) हे त्यांचे विख्यात विधान. तरी बरे अलीकडच्या काळात त्या देशास एकापाठोपाठ एक चक्रीवादळे, अतिवृष्टी, अवर्षण आदी संकटांचा सामना करावा लागला. तरीही ट्रम्प यांचे मतपरिवर्तन होणे अवघड. मावळते अध्यक्ष जो बायडेन यांनी अनेक आंतरराष्ट्रीय प्रश्नांवर माती खाल्ली असली तरी पर्यावरण विनाश रोखण्यासाठी त्यांनी उचललेली पावले, निधी नियोजन आदी मुद्द्यांवर त्यांच्याविषयी टीकाकारांसही बरे बोलावे लागेल. पण या अशा मुद्द्यांचा उल्लेख ट्रम्प यांच्या रिपब्लिकन कार्यक्रम पत्रिकेवर नाही. त्यांचा आपला एकच एक धोशा : स्थलांतरित आणि त्यांच्या वाढत्या संख्येने अमेरिकेसमोर उभे ठाकलेले कथित गंभीर आव्हान.
ट्रम्प यांचे निवडून येणे हे त्याहीपेक्षा गंभीर आव्हान असेल. भारतासकट अन्य अनेकांविषयी त्यांनी अमेरिकी अर्थव्यवस्थेचे नुकसान केल्याबद्दल दुगाण्या झाडलेल्याच आहेत. सर्व परदेशी वस्तूंवर सणसणीत आयात शुल्क आकारण्याचे सूतोवाचही त्यांनी केले आहे. त्यामुळे ते सत्तेवर आल्यास काही मोजक्याच उद्याोगांना मुक्त रान देण्याचा तिसऱ्या जगाचा विशेष गुण अमेरिकाही अंगीकारेल. म्हणजे धार्मिक सहिष्णुता, निकोप स्पर्धात्मकता आणि गुण-शाही (मेरिटोक्रासी) आदी सत्त्वगुणांच्या अस्तित्वास लोकशाहीची जननी नसलेल्या अमेरिकेत नख लागण्याचा धोका दिसतो.
तूर्त जनमत चाचण्यांनुसार हा धोका ५० टक्के इतका आहे. म्हणजे इतके सारे रामायण रचूनही ट्रम्प यांची आघाडी ५० टक्क्यांवर जाताना दिसत नाही. ती तशी जाऊ नये, अशीच अपेक्षा सुज्ञांस असेल. बहुमत सुज्ञांचे की सैतानकथांचे याचे उत्तर या आठवड्यात मिळेल.