संकुचितवादी नेते मंडळी स्वत:ला जड जाणाऱ्या आव्हानांसाठी इतरांस बोल लावतात. अशांचे ट्रम्प हे मेरुमणी…

व्यक्ती असो वा व्यक्तींचा समाज; चांगल्याची अपेक्षा असलेल्याकडून अपेक्षाभंग झाला की पुढची संधी वाईटास द्यावी असे बहुसंख्यांस वाटते. अमेरिकेतील ताज्या निवडणूक निकालातून या सत्याची प्रचीती यावी. बेभरवशी ट्रम्प यांचा पराभव करून अध्यक्षपद मिळवणारे जो बायडेन यांचा गेल्या चार वर्षांतील कारभार अगदीच फिका होता; हे खरे. देशांतर्गत पातळीवर आणि जागतिक पातळीवरही ते अत्यंत निष्प्रभ ठरले, हेही खरे. एकमेव जागतिक महासत्तेचा हा प्रमुख रशिया-युक्रेन आणि इस्रायल-हमास युद्ध रोखू शकला नाही, हे खरे नाही असे कोण म्हणेल? बायडेन यांची शेवटची दोन वर्षे अगदीच केविलवाणी गेली, हे तर खरेच खरे. या काळात त्यांची काही कृती, स्मरणात राहण्याऐवजी बायडेन यांची विस्मरणशीलताच अधिक स्मरणीय ठरली. त्यातूनच या जरठाने अध्यक्षपदाच्या शर्यतीत पुन्हा राहावे की न राहावे याचा घोळ घातला गेला आणि डेमॉक्रॅटिक पक्षाच्या धुरीणांनी अखेर हात धरून बायडेनबाबांस खाली बसवले. त्यामुळे निवडणुकीच्या रिंगणात अखेर कमला हॅरिस यांचा प्रवेश झाला. कमलाबाईंनी सुरुवात तर मोठी झकास केली. चर्चेच्या दोन फेऱ्यांत त्यांनी डोनाल्डदादांस चांगलेच उघडे पाडले. ट्रम्प यांची बौद्धिक पोकळी किती खोल आहे याचे त्यांनी थेट प्रक्षेपण करवले. पण नंतर झालेला हल्ला आणि त्यानंतरचे ध्रुवीकरण हे या सगळ्यापेक्षा अधिक प्रभावी ठरले आणि जगातील या सर्वात श्रीमंत देशाने राजकीय/सामाजिक/ सांस्कृतिक/ लैंगिक आदी आघाड्यांवर आपली वैयक्तिक दिवाळखोरी प्रदर्शित करणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांच्या पारड्यात आपली मते घातली. चांगल्या गणल्या गेलेल्याकडून अपेक्षाभंग झालेल्या अमेरिकनांनी बऱ्या मानल्या जात होत्या अशा कमला हॅरिस यांस संधी देऊन अपेक्षाभंगाचा आणखी एक धोका टाळला आणि अखेर कायद्याने गुन्हेगार ठरलेल्या वाईटाच्या पाठीशी उभे राहण्याचा निर्णय घेतला. जे झाले ते झाले. आता पुढे काय याचा विचार करणे आवश्यक.

loksatta editorial Supreme court verdict on madrasa
अग्रलेख: मदरसे ‘कबूल’
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Loksatta editorial Donald Trump victory in the US presidential election
अग्रलेख: अनर्थामागील अर्थ!
loksatta editorial Donald Trump 2024 presidential campaign
अग्रलेख: सुज्ञ की सैतान?
Loksatta editorial about investment decline in Maharashtra
अग्रलेख: महाराष्ट्र मंदावू लागला…
mharashtra total registered voters
अग्रलेख : अवघा हलकल्लोळ करावा…
Loksatta editorial on Donald Trump unique campaign in us presidential election
अग्रलेख: ‘तो’ आणि ‘त्या’!
india s economy slowing down
अग्रलेख : मध्यमवर्ग मेला तरी…

कारण आपली विजयी प्रतिक्रिया व्यक्त करताना ट्रम्प यांनी केलेले भाष्य या भविष्यात काय वाढून ठेवलेले आहे याची चुणूक दाखवून देते. अद्याप विजयावर शिक्कामोर्तबही झालेले नाही, तरीही ट्रम्पतात्यांनी देशाच्या सीमा कुलूपबंद करण्याचा निर्णय जाहीर केला. अलीकडेच दर काही मिनिटांस अमेरिकेत घुसू पाहणाऱ्यांमध्ये भारतीय कसे सर्वाधिक आहेत याचा तपशील जाहीर झाला. या भारतीयांवरही ‘दिसता क्षणी गोळ्या घालण्याचा’ आदेश ट्रम्प पुढील काळात देणारच नाहीत असे नाही. अमेरिकेच्या महासत्तापदापर्यंतच्या प्रवासात त्या देशातील स्थलांतरितांचा वाटा मोठा आहे. किंबहुना अमेरिकेस अमेरिकापण मिळाले तेच मुळी स्थलांतरितांमुळे. ट्रम्प यावर नियंत्रण आणू पाहतात. म्हणजे लवकरच भारतीय तरुणांस दिल्या जाणाऱ्या ‘एचवनबी’ व्हिसा संख्येलाही कात्री लागल्यास त्याची तयारी आपण ठेवायला हवी. अमेरिकेतील हे स्थलांतरित स्थानिकांची कुत्री-मांजरे मारून खातात अशी फक्त आणि फक्त ट्रम्प यांच्याच मुखी शोभेल अशी लोणकढी ट्रम्प यांनी हाणली आणि अमेरिकनांनी ती गोड मानून घेतली. ‘सुज्ञ की सैतान’ या संपादकीयात (४ नोव्हेंबर) ‘लोकसत्ता’ने या निवडणुकीतील प्रचार आणि बदलत्या वाऱ्यांचा वेध घेतला होता. त्यात व्यक्त करण्यात आलेली भीती अखेर खरी ठरली आणि अमेरिकनांनी सैतान-वृत्तीस संधी दिली. वाह्यातवृत्तीबाबत ट्रम्प परवडले असे त्यांचे उपाध्यक्षपदाचे साथीदार जेडी व्हान्स आहेत. धर्मांधता ते पुरुषसत्ताकवृत्ती या दोन्हीत ट्रम्प यांना झाकावे आणि व्हान्स यांना काढावे इतके तोडीसतोड ते. प्रचाराच्या काळात अध्यक्षीय प्रतिस्पर्धी कमला हॅरिस यांच्याविषयी लालूप्रसादही वापरणार नाहीत अशी वंगाळ भाषा त्यांनी वापरली. या व्हान्स यांची अर्धांगिनी भारतीय आहे आणि ट्रम्प यांची पत्नी युगोस्लाव्हियन. आणि हे दोघेही आता स्थलांतरितांविरोधात भूमिका घेणार. ट्रम्प अध्यक्षपदी आल्याने काय उत्पात होऊ शकतो हा प्रश्न येथेच संपणारा नाही.

त्याची व्याप्ती खुद्द ट्रम्प यांनी गेल्या महिन्यात दाखवून दिली. ‘‘नरेंद्र मोदी हे आपले मित्र खरे’’ असे म्हणत त्यांनी भारत हा अमेरिकी उत्पादनांवर सर्वाधिक कर आकारणारा देश आहे असे विधान केले आणि या देशास ‘जशास तसे’ उत्तर दिले जाईल असा इशारा त्यांनी दिला. या व्यापारसंरक्षणवादी भूमिकेच्या अनुषंगाने त्यांनी भारताची तुलना चीनशी केली. चीन हा अमेरिकी उत्पादनांवर २०० टक्के कर आकारतो; पण या आघाडीवर भारत हा ‘कर-राजा’ आहे, असे ट्रम्प म्हणाले. तेव्हा ट्रम्प यांच्याशी आपल्या नेत्यांचा असलेला कथित दोस्ताना प्रत्यक्षात किती कामी येणार, याचा अंदाज बांधलेला बरा. तसेच ‘‘भारत-अमेरिका संबंध म्हणजे लोकशाहीची जननी आणि सर्वात श्रीमंत लोकशाही देशांचा बंध’’ असली पोपटपंचीही फारशी उपयोगी ठरण्याची शक्यता नाही. हे फक्त भारताबाबतच घडण्याचा धोका आहे, असे नाही.

जगातील तब्बल २३ आदरणीय आर्थिक नोबेल पारितोषिक विजेत्यांनी गेल्याच आठवड्यात एक पत्र प्रसृत करून ट्रम्प यांच्या आर्थिक धोरणांचा किती गंभीर दुष्परिणाम होऊ शकतो याची जाणीव करून दिली. बाजारपेठेच्या मुद्द्यावर ट्रम्प यांची ‘‘गड्या आपली अमेरिकाच बरी’’ ही भूमिका जागतिकीकरणाची प्रक्रिया तर मागे नेईलच; पण त्याच वेळी अन्य अनेक देशांस अशीच संरक्षणवादी भूमिका घेण्यास उद्याुक्त करेल. परिणामी इतक्या वर्षांच्या प्रयत्नांनंतर आकारास आलेल्या जागतिक व्यापार संघटनेसारख्या यंत्रणा कोसळून पडण्याचा धोका संभवतो. तीच अवस्था अमेरिका-केंद्री ‘नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन’, म्हणजे नाटोसारख्या संघटनांची होणार हे उघड आहे. आपल्या पहिल्याच अध्यक्षीय कारकीर्दीत ट्रम्पतात्यांनी नाटोस अमेरिकेकडून दिल्या जाणाऱ्या निधीस कात्री लावली. ही कात्री आता अधिक जोमाने फिरेल. अमेरिका हा जगातील सर्वात धनिक देश. या नात्याने जागतिक बँकेचा तो कर्ताकरविता. ट्रम्प यांस हेही मंजूर नाही. अन्य अनेक देश जागतिक बँकेस पुरेसा निधी देत नाहीत, मग आपण का तो द्यावा, अशी तक्रार त्यांनी केली होती. म्हणजे जागतिक बँकेवर ट्रम्प निवडीने संक्रांत येणार.

म्हणजेच अमेरिका अधिकाधिक संकुचित होणार. संकुचितता ही नेहमीच अल्पमतींस आकृष्ट करते. ही अशी संकुचितवादी नेते मंडळी स्वत:ला जड जाणाऱ्या आव्हानांसाठी इतरांस बोल लावतात. हे ‘इतर’ कधी देश असतात तर काही नेत्यांसाठी धर्म. स्वत:च्या नाकर्तेपणासाठी स्वत: सोडून इतरांस जबाबदार धरणे हेच तर खरे उजवे म्हणवणाऱ्यांचे वैशिष्ट्य. ट्रम्प अशा सर्वांचे मेरुमणी. त्यांच्याच हाती पुन्हा सत्ता आल्याने अमेरिकी विवंचनांसाठी आता भारतासकट सर्वांच्या नावे बोटे मोडणे नव्या जोमाने सुरू होईल. त्यात आता प्रतिनिधीसभेतही त्यांच्या रिपब्लिकनांचे प्राबल्य आल्याने एकापेक्षा एक मागास निर्णय रेटणे त्यांना शक्य होईल. उद्या संपूर्ण अमेरिकेत गर्भपातावर बंदी घातली गेली वा स्कंदपेशी (स्टेम सेल) संशोधनावर निर्बंध आणले गेले तर आश्चर्य वाटू नये. ट्रम्प यांचे पूर्वसुरी त्यांच्याच पक्षाचे जॉर्ज बुश यांनी व्हाइट हाउसमधे बायबल शिकवणी वर्ग सुरू केले होते. ट्रम्प यांच्या मागे बावळटपणे उभे राहणाऱ्या अमेरिकी भारतीयांस अशा काही धर्मकार्याची सक्ती केली जाणारच नाही, याची शाश्वती नाही.

असे विविध देशीय पुरुष ट्रम्प यांच्या मागे ठामपणे उभे राहिले. परंतु त्या तुलनेत महिलांचा पाठिंबा मिळवण्यात कमलाबाई अयशस्वी ठरल्या. म्हणजे जगातील पुरोगाम्यांचा आधारस्तंभ असणाऱ्या अमेरिकेतच पुरुषी अहंने स्त्रियांवर मात केली. अमेरिकेच्या जखमांवर मी फुंकर घालेन असे ट्रम्प आता म्हणतात. परंतु या जखमा मुळात कोणामुळे झाल्या, यावर ते बोलणार नाहीत. ती अपेक्षाही नाही. आधी दुभंग घडवायचे आणि नंतर आपणच तो भरू शकतो असे मिरवायचे ही ट्रम्पनीती. आज जगात तिचे अनुकरण करणारे बरेच दिसतात. त्यांची संख्या पुढील चार वर्षांत वाढण्याची शक्यता अधिक. गेल्या २०२० च्या अध्यक्षीय निवडणुकीत जो बायडेन यांच्याकडून ट्रम्प पराभूत झाले. त्यावरील ‘लोकसत्ता’च्या संपादकीयाचे शीर्षक ‘बुडाला ट्रम्पुल्या पापी’ असे होते. आजच्या त्यांच्या फेरनिवडीवर ‘ ‘तो’ परत आलाय…’ इतकेच म्हणणे पुरेसे.

Story img Loader