उत्तरेच्या पंजाबातील अकाली दल, पश्चिमेच्या गोव्यातील महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष, पूर्वेच्या ओरिसातील बिजू जनता दल, ईशान्येकडील ‘आसाम गण परिषद’ आणि महाराष्ट्रातील शिवसेना यांच्यात एक साम्य आहे. त्यात काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना शाखेची लवकरच भर पडेल. हे सर्व पक्ष आपापल्या ताकदीवर आपापल्या राज्यात सत्तासमर्थ होते आणि त्यांच्या खांद्यावरून भाजपने त्या त्या राज्यात प्रवेश केला. आज या पक्षांची परिस्थिती काय? अकाली दल आता कायमचा नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. गोव्यातील मगोप संपला. बिजू जनता दल आणि त्या पक्षाचे प्रमुख नवीन पटनाईक दोघांचीही आरोग्यस्थिती एकसारखीच. आसाम गण परिषदेची अवस्था तर यापेक्षा वाईट. प्रफुल्लकुमार महंत आणि भृगू फुकन हे एकेकाळचे केवळ आसामच्याच नव्हे तर देशाच्याही राजकारणाचे आश्वासक चेहरे. आज ते हयात आहेत की नाही हेही अनेकांस स्मरणार नाही आणि त्यांच्या पक्षाचे नावही अनेकांस आठवणार नाही. या सगळ्यांच्या बरोबरीने उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचेही असेच काही व्हावे असा प्रयत्न जोमात सुरू आहे. त्या प्रयत्नात भाजपला एकनाथ शिंदे यांनी साथ दिली. भाजपने त्या बदल्यात त्यांना मुख्यमंत्रीपद दिले. शिंदे कृतकृत्य झाले. सुरुवातीला शिंदे यांच्या शौर्यकथेने आपणास सत्ता दिली याबद्दल भाजपने जाहीर कृतज्ञता व्यक्त केली. शिंदे ‘महाशक्ती’च्या सौहार्दात ओलेचिंब झाले. मग निवडणुका आल्या. त्याच्या निकालाने खुद्द शिंदे हेही चपापले. त्यांनी ‘महाशक्ती’ला आपल्या त्यागाची, शौर्याची आठवण करून द्यायचा प्रयत्न केला. ‘महाशक्ती’ आता शिंदेंकडे ढुंकून पाहायलाही तयार नव्हती. शिंदे यांना त्याचा काय तो अर्थ लक्षात आला. त्यांनी आपली ‘महाशक्ती’मुळेच मिळालेली शस्त्रे खाली टाकली. त्यांचा पक्ष आता वर उल्लेखलेल्या ‘कोणे एके काळी’ कहाणीत सहभागी होण्यास सज्ज झाला आहे. जे झाले ते वर्तमान ताजे आहे. त्यामुळे त्यावर अधिक वेळ न खर्च करता शिंदे आणि त्यांच्या भवितव्याचा वेध घ्यायला हवा.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा