महाराष्ट्राचे आर्थिक पुढारलेपण यापुढे संपुष्टात येईल किंवा काय, असा प्रश्न ताज्या आर्थिक पाहणीमुळे निर्माण होतो…

सरत्या आर्थिक वर्षात महाराष्ट्रासारख्या तुलनेने श्रीमंत राज्याच्या डोक्यावरील कर्जाचा बोजा गतवर्षीच्या कर्ज रकमेपेक्षा तब्बल १६.५ टक्क्यांनी वाढून तो सात लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक झाला ही एकच चिंतेची बाब म्हणता येणार नाही. गेली काही वर्षे राज्यावरील कर्ज सातत्याने वाढतेच आहे. म्हणजे २०१९-२० साली या कर्जाची रक्कम चार लाख ५१ हजार ११७ कोटी रु. इतकी होती तर पुढच्याच वर्षी ती पाच लाख १९ हजार ८६ कोटी रु. आणि त्यापुढल्या वर्षी पाच लाख ७६ हजार ८६८ कोटी रुपयांवर गेली. गतसाली हे कर्ज होते सहा लाख २९ हजार २३५ कोटी रु. इतके. ते आता सात लाख ११ हजार २७८ कोटी रु. इतके असेल. हे मर्यादेच्या बाहेर नाही. आर्थिक शिस्तीसंदर्भात सर्वानुमते ठरलेल्या धोरणानुसार कोणत्याही राज्यास त्याच्या सकल राज्यस्तरीय उत्पन्नाच्या २५ टक्क्यांपर्यंत कर्ज उभारण्याची मुभा असते. आपले हे वाढीव कर्ज राज्याच्या सकल उत्पन्नाच्या तुलनेत जेमतेम १७.६ टक्के इतके भरते. याचा अर्थ अजूनही साधारण सात टक्के इतके कर्ज महाराष्ट्रास उभारता येईल. त्यामुळे कर्ज ही एकमेव बाब महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेचा विचार करता काळजीची ठरत नाही. व्यक्ती असो वा राज्य, त्याचे डोक्यावरील कर्ज हा एकच घटक विचारात घेऊन चालत नाही. या कर्जाच्या तुलनेत उत्पन्न वाढते काय, हा यातील कळीचा प्रश्न. त्या आघाडीवर महाराष्ट्र निश्चिंत राहू शकत नाही. विद्यामान महाराष्ट्र विधानसभेच्या शेवटच्या अधिवेशनात सादर झालेला आर्थिक पाहणी अहवाल राज्यासमोरील आव्हानांची चुणूक दाखवणारा ठरतो.

मराठीतील सर्व संपादकीय बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta editorial financial audit report presented in session of maharashtra legislative assembly amy
First published on: 28-06-2024 at 05:00 IST