संगणक, समाजमाध्यमे आदींच्या प्रसारातून ‘फेक न्यूज’ वगैरेचा धोका वाढण्यापूर्वीपासून, मानवी कौशल्य आणि कल्पनाझेपेवर अवलंबून असलेल्या कलाप्रांतातही ‘फेक’ होतेच..
‘फेक’ या इंग्रजी शब्दाला मराठीतही आता अढळपद मिळू लागले आहे. मराठीत यापूर्वी चेंडू फेकला जायचा, दिवाळी-दसऱ्यापूर्वीच्या आवराआवरीत नकोशा वस्तू फेकून दिल्या जायच्या, नाटकात ‘संवादफेक’ असायची किंवा गायकांना कुणा उत्साही श्रोत्याकडून ‘काय आवाजाची फेक आहे..’ अशी दाद मिळायची. यापेक्षा निराळय़ा आणि ‘खोटे- बनावट’ या अर्थाने इंग्रजीतला ‘फेक’ मराठीतही आला, ‘फेक न्यूज’चे दैनंदिन प्रमाण वाढू लागले, तसा तो इंग्रजी शब्दही मराठीत रुळला. गेल्या वर्षभरात तर कृत्रिम बुद्धिमत्तेचा- चॅटजीपीटी आदी उत्पादनांचा बोलबाला वाढला आणि ‘फेक’ची व्याप्ती किती मोठी असू शकते, याविषयीची चिंताही काही पटींनी वाढली. एखाद्या व्यक्तीचे छायाचित्र अथवा चलचित्र म्हणून प्रत्यक्ष दाखवले जाणारेही ‘फेक’ निघू लागले. संगणकीय करामतीने कुठलीही प्रतिमा कुठेही जोडता येऊ लागली. इथून पुढे ‘फेक’- बातम्या, छायाचित्रे, ध्वनि-चित्रमुद्रणे यांच्याबाबत सावधगिरी बाळगावीच लागणार, अशी खूणगाठ आता विवेकीजन बांधू लागले. पण ‘फेक’चा दोष संगणकीय प्रगतीलाच देण्यात कितपत हशील आहे? हे कबूल की संगणक आणि माहिती-तंत्रज्ञानाची साधने, संदेशजाळय़ाचा विस्तार, समाजमाध्यमांचा प्रसार आणि कुणाला तरी, कुठे तरी हवाच असलेला प्रचार यांमुळे ‘फेक’चे दैनंदिन प्रसंग वाढले.. पण यापैकी काहीही जेव्हा नव्हते, तेव्हाही ‘फेक’-निर्मितीची मानवी प्रेरणा कार्यरत होतीच आणि फेक न्यूजमुळे आज जी फसगत होते आहे, फेक ध्वनि-चित्रमुद्रणामुळे जो मनस्ताप होतो आहे किंवा फेक खात्यांमुळे जे आर्थिक नुकसानही होऊ शकते आहे.. ते सारे संगणक नसतानाही होऊ शकत होते. मानवी हातांच्या कौशल्यावर आणि मानवी मेंदूच्या कल्पनाझेपेवर अवलंबून असलेल्या चित्रकलेसारख्या प्रांतात तर ते होतच होते आणि आजही होते आहे.. ते कसे, याचा अनुभव पुनीत मदनलाल भाटिया यांना अलीकडेच आला!
हे पुनीत भाटिया एका मालमत्ता-गुंतवणूक कंपनीत उच्च पदावर आहेत. म्हणजे या कंपनीच्या ग्राहकांसाठी मालमत्तांचे व्यवस्थापन करणे हा त्यांचा व्यवसाय. प्रख्यात चित्रकारांनी रंगवलेली चित्रे, हीदेखील अशा व्यवसायातील लोकांसाठी ‘मालमत्ता’च. त्यातही दिवंगत, प्रसिद्ध चित्रकारांच्या चित्रांना संग्रहमूल्य जास्त, चित्रकार या जगात नसल्याने तशीच आणखी चित्रे होण्याची शक्यताही कमी- म्हणजे ही चित्रे दुर्मीळसुद्धा. याचाच अर्थ अशा चित्रांची पुन्हा विक्री जेव्हा होईल, तेव्हा त्यांचे मोल वाढण्याची हमी! याच विचाराने भाटियांनी १७ कोटी ९० लाख रुपये खर्चून मनजीत बावा, एफ. एन. सूझा अशा बडय़ा दिवंगत चित्रकारांची चित्रे खरेदी केली. आणि ही एवढय़ा किमतीची चित्रे ‘फेक’ आहेत, असे सुमारे दीड वर्षांनंतर त्यांच्या लक्षात आले! त्यांनी याबद्दल केलेल्या तक्रारीतून या ‘फेक’चित्र बाजाराची एक कहाणीच उघड झाली. चित्रकार मनजीत बावा यांना भोपाळच्या ‘भारत भवन’चे प्रमुख नेमण्यात आले होते आणि फ्रान्सिस न्यूटन सूझा हे परदेशात स्थायिक होऊन तिथे निवर्तले असले तरी ‘प्रोग्रेसिव्ह आर्टिस्ट्स ग्रुप’ या मुंबईच्या कला क्षेत्रात १९४८-४९ च्या सुमारास मन्वंतर घडवणाऱ्या कलाकार-समूहाचा जाहीरनामा त्यांनी लिहिला होता. आधुनिक भारतीय कलेच्या इतिहासात आपापल्या विशिष्ट शैलीमुळे अजरामर ठरलेले हे दोघे चित्रकार. त्यांची चित्रे भोपाळच्या कुणा निवृत्त सनदी अधिकाऱ्याला विकायची आहेत, असे भाटियांना एक चित्रव्यापारी आणि एक वकील यांनी सांगितले. भाटियांना ही चित्रव्यापारी आणि वकील दुक्कल एका उच्चभ्रू पार्टीत भेटली, तिथे ओळख आणि प्राथमिक बोलणे झाले. मग व्यवहार करताना अमुक बँक खात्यात थेट हस्तांतरित करा, असे सांगून चित्रेही वेळच्या वेळी भाटियांकडे पोहोचवण्यात आली. पण काही जाणकारांनी ती चित्रे पाहून शंका व्यक्त केल्यामुळे या चित्रांची तपासणी भाटियांनी करवून घेतली, तेव्हा ती जितकी जुनी असल्याचे सांगितले जाते तितकी नसून नव्यानेच केली आहेत, हे सिद्ध झाले. भाटियांनी पोलिसांकडे तक्रार केली ती यानंतर. मग कला-आस्वादापेक्षा कला-बाजारातच अधिक रमणाऱ्या इंग्रजी माध्यमांनी या प्रकरणाच्या बातम्या दिल्या. त्यावर अनेक जाणकारांची प्रतिक्रिया मात्र, ‘हे एक प्रकरण उघडकीला तरी आले.. अशी कित्येक ‘फेक’ चित्रांची प्रकरणे दबूनच राहतात’- अशी होती.
तीत तथ्यही आहे. उदाहरणार्थ बेंगळूरुच्या एका चित्र-लिलावगृहाने काही वर्षांपूर्वी विक्रीस काढलेल्या चित्रांपैकी काही चित्रे ‘फेक’ आहेत, अशा बातम्या देणाऱ्या चौघा पत्रकारांवर तातडीने बदनामीचा खटला गुदरण्यात आला. हे ऐकून कुणाला राजकारणाचीच आठवण येईल! आम्ही ज्याचा प्रचार करतो ते बनावट नाहीच, उलट ते बनावट असल्याची शंका घेणाऱ्यांचे हेतूच संशयास्पद- असा प्रकार राजकारणात चालतो, तोच त्या कुणा लिलावगृहाने केला. अशा बनावट कलाकृतींचा फैलाव तीसेक वर्षांपूर्वी सहसा मध्यम दर्जाच्या कलादालनांतून होई, पण मधल्या काळात लिलावगृहे वाढत गेली. कुणा संस्थेच्या मदतीसाठी किंवा व्याधिग्रस्तांना मदत म्हणून काही चित्रदलालसुद्धा लिलावाचा मार्ग स्वीकारू लागले- या मार्गात तर लिलावगृहांचाही अडसर नव्हता. या मार्गामध्ये ‘फेक’ चित्रांचा धोका होताच, पण बहुतेकदा ‘कुणाकडे तरी ही चित्रे आहेत- त्यांना विकायची आहेत- तुम्हाला थेट मिळवून देतो’ अशा प्रकाराने हा फेक कलाकृतींचा बाजार फोफावू लागला. कमी किमतीला मोठमोठय़ा चित्रकारांची चित्रे मिळवण्याची हाव, हे या फेक-बाजाराच्या बिनबोभाट यशामागचे एक कारण. दुसरे महत्त्वाचे कारण म्हणजे, चित्रकारांना निव्वळ ‘ब्रँड’- नाममुद्रा- मानण्याची ग्राहकांची प्रवृत्ती. हे असे ग्राहक चित्राकडे धड पाहतही नाहीत, चित्रकाराच्या शैलीची शहानिशा करत नाहीत. अर्थात, अशी शहानिशा वगैरे करण्यासाठी जाणकारी हवी, ती संबंधित चित्रकाराची अनेक चित्रे आधी पाहिलेली असल्याखेरीज कशी येणार? थोडक्यात, अनुभवातून झालेला अभ्यास असेल, तर ‘फेक’ चित्रे ओळखता येतात. पण त्यासाठी धीर हवा. चित्रांकडे पाहत राहून, अनेक चित्रे नीट पाहून अनुभवसमृद्ध होण्याची तगमग हवी!
त्या तगमगीऐवजी चित्रांना ‘मालमत्ता’ मानले, की पाय घसरणारच. तसा तो कुणा भाटियांचा घसरला, याबद्दल तुम्हाआम्हाला काही सोयरसुतक असण्याचे कारण नाही. भाटियांनी अपुऱ्या ओळखीवर विश्वास ठेवून व्यवहार केला, तो करताना जी काही ‘मालमत्ता’ आपण खरेदी करतो आहोत तिची शहानिशा त्यांनी केली नाही आणि मुख्य म्हणजे, चित्रखरेदीनंतर काही महिन्यांपर्यंत त्यांना ही चित्रे बनावट असल्याची शंकाही येऊ नये, याचा अर्थ त्यांचा अभ्यास कमी पडला. बरी बाब इतकीच की जे कुणी जाणकार भाटियांना ‘हे फेक आहे’ असे सांगू लागले, त्यांच्यावरच शंका न घेता, स्वतंत्रपणे तपासणीचा मार्ग त्यांनी पत्करला! त्यामुळेच तर, फेक चित्रांतून भाटियांसारख्या मालमत्ता-व्यवस्थापकाच्या झालेल्या फसवणुकीची गोष्ट ही एरवी कलादालनांतही न जाणाऱ्या परंतु रोजच्या जगण्यात तरी ‘फेक’बाबत सावध होऊ पाहणाऱ्या अशा अनेकांसाठी दृष्टान्तपाठासारखी ठरावी.
फेक बातम्या, फेक ‘फ्रेण्ड रिक्वेस्ट’, फेक प्रचार – त्यासाठी फेक व्हिडीओ.. हे सारे येत्या २०२४ या निवडणूक-वर्षांत तर वाढणारच. मोठी नावे, छान हुबेहूब दृश्य, शंका न येता पटेल असे संभाषण.. या साऱ्यामुळे ‘फेक’ला फशी पडण्याचे प्रसंगही अनेक येऊ शकतातच, पण ज्यावर कुणी तरी शंका घेते आहे ते शंकास्पद असूही शकते, ही शक्यता खरी मानणे, ही ‘फेक’च्या जमान्यातली अत्यावश्यक बाब. प्रत्येक जण प्रत्येक बाबतीत अभ्यासू, अनुभवसमृद्ध असेलच असे नाही. पण ‘शंका खरी असू शकते’ एवढे मान्य करण्याचा दिलदारपणा मात्र अनिवार्य, हा सरत्या वर्षांतला फेककलेचा दृष्टान्तपाठ!