आधीच गांजलेल्या कर्मचाऱ्यांसाठी आठवडय़ास ७० तास काम करण्याची सूचना अव्यावहारिक आणि अनारोग्याची हमी देणारी ठरते..
‘इन्फोसिस’च्या संस्थापकांपैकी एक नारायण मूर्ती आणि त्यांच्या सुविद्य पत्नी सुधा हे दाम्पत्य एकेकाळी सोज्वळ व्यक्तिमत्त्वामुळे आणि सात्त्विक लिखाणामुळे मराठी मध्यमवर्गीयांत हवेहवेसे होते. तथापि अलीकडे श्रीमती मूर्ती सात्त्विकतेतून सत्तासहवासाचा सूर आळवू लागल्यापासून एका वर्गाचा त्यांच्यावरील लोभ तुलनेने कमी झाला. पण नारायणरावांचे तसे नव्हते. सुधाताईंच्या तुलनेत नारायण मूर्ती ‘जोडोनिया धन उत्तम व्यवहारे’ याच कर्तृत्वासाठी ओळखले जात. त्यातही घरात नारायणराव कसा शौचकूप स्वत:च धुतात, कार्यालयात कर्मचाऱ्यांप्रमाणे जेवणाच्या रांगेत उभे राहतात इत्यादी व्यवस्थित पेरलेल्या (पेरलेल्या म्हणायचे कारण घरात कोण संडासबाथरूम धुते; हे बाहेरच्यांस ‘सांगितल्या’खेरीज कसे कळणार?) चुटकुल्यांमुळेही ते चर्चेत राहात. पण यामागील प्रसिद्धिचातुर्य ओळखण्याइतकी सामाजिक चपळता फारच कमी जणांत असल्यामुळे त्यांच्या खऱ्या कर्तृत्वापेक्षा असल्याच गोष्टींची टिमकी वाजवली गेली. असल्या दुय्यम गोष्टींस महत्त्व देण्याच्या सवयीमुळे उलट आपले अधिक नुकसान होते. ज्याचे कौतुक करायला हवे ती बाब त्यामुळे दुर्लक्षिली जाते. याचे भान ना त्या व्यक्तीस असते ना समाजास! नारायण मूर्तींचे ताजे वक्तव्य याचा आणखी एक नमुना. त्यात ते तरुणांनी देशउभारणीसाठी आठवड्यास ७० तास काम करावे, असा सल्ला देतात. तीन वर्षांपूर्वी याच नारायणरावांनी ६० तास/ प्रतिसप्तहाची शिफारस केली होती. आता त्यात १० तास वाढले. त्यावरून नारायणरावांचे वय वाढेल तसे त्यांस तरुणांस अभिप्रेत असलेले कार्यतास वाढतात, असे अनुमान निघू शकते. ते आणखी वाढण्याआधी या ७०- तास-काम शिफारशीची दैनंदिन फोड करायला हवी.
आठवड्यास ७० तास म्हणजे प्रतिदिन साधारण १२ तास असे सहा दिवस काम करायचे. एकच साप्ताहिक सुटी. मुंबई, पुणे, दिल्ली, इतकेच काय पण नारायणरावांचे बेंगळूरु आदी शहरांत कार्यालय ते घर प्रवासास सरासरी तास-दोन तास लागतात. त्याआधी कार्यालयात येण्याआधीची तयारी, दैनंदिन आन्हिके आदींसाठीही किमान तास ते दोन तास, पोराबाळांस वा पत्नीस शाळेत/ कार्यालयात सोडणे/ आणणे या कामांची जबाबदारी असेल तर त्यासाठी अर्धा तास. घरी आल्यानंतर भोजनादी दिनक्रमात साधारण एक तास. असे वेळवाटप गृहीत धरले तर युवकांचे प्रतिदिन सरासरी १७-१८ तास कार्यालय आणि घर ही दिनचर्या सांभाळण्यातच जातील. म्हणजे रात्रीच्या झोपेसाठी फक्त सहा-सात तासच? कोणा देशी जीवनगुरू/ बाबा/ बापूंच्या शिबिरात मार्गदर्शन करताना ते वा नारायणराव वा तत्सम किमान आठ तासांची झोप एकंदर शारीरिक स्वास्थ्यासाठी किती आवश्यक आहे त्याचा उपदेश करणार. दुसरीकडे उद्योग-व्यापार मंचावरून बोलताना तरुणांनी दिवसाला १२-१२ तास करण्याची कशी गरज आहे, हेही सांगणार. म्हणजे या मंडळींचे विचार मंचानुरूप बदलतात की काय? आणि दुसरे असे की १२ तास काम करा असा सल्ला हा केवळ पुरुषी मानसिकतेतूनच येऊ शकतो, याचा विचार नारायणरावांनी केलेला दिसत नाही. म्हणजे असे की अलीकडे पुरुष आणि स्त्री उभयता चरितार्थ चालवण्यास हातभार लावत असतात. तरीही तुलनेने पुरुषाचे आयुष्य कमी कष्टाचे असते. कारण कार्यालयात पुरुषाइतकेच काम करणाऱ्या महिलेस घरी आल्यावर पुरुषापेक्षा किती तरी अधिक काम करावे लागते. पुरुष मंडळीस आपल्या बसक्या कामाने दमलेले पाय लांब करून दूरचित्रवाणीवर क्रिकेटच्या सामन्याचा आनंद घेण्याची वा राजकारणावरील बहुमौलिक चर्चा ऐकण्याची सोय असते. महिला मात्र घरी आल्यावरही घरकामात स्वत:स जुंपून घेतात. तेव्हा प्रति सप्ताह ७० तास कामाच्या समीकरणांत त्यांना कसे बसवणार? आणि समजा बसवले तर कामांत दुजाभाव केल्याचा आरोप होणार आणि न बसवल्यास महिलांवर अन्याय होणार. याचा कोणताही विचार नारायणरावांनी केलेला दिसत नाही. हा एक भाग.
आणि दुसरे असे की राष्ट्र उभारणीसाठी इतके काम करण्याची गरज आहे असे त्यांस वाटत असेल तर त्यांनी याची सुरुवात ‘इन्फोसिस’पासूनच का करू नये? मूर्ती हे या कंपनीच्या संस्थापकांतील एक. त्यामुळे ‘चॅरिटी बिगिन्स अॅट होम’ तत्त्वाने त्यांनी असे करणे अगदी रास्त ठरते. यावर माझा ‘इन्फोसिस’शी आता ‘तसा’ संबंध नाही, अशी चतुर भूमिका घेण्याची सोय मूर्ती यांस आहेच. पण ‘इन्फोसिस’ सोडले म्हणून ते त्या कंपनीत अजिबात हस्तक्षेप (की ढवळाढवळ ?) करत नाहीत, यावर विश्वास ठेवावा अशी परिस्थिती नाही. पाच वर्षांपूर्वी याच कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल सिक्का यांनी पदत्याग का केला, हे अनेकांस स्मरत असेल. त्याही आधी दहा वर्षांपूर्वी ६५ वर्षांनंतर कार्यकारी पदावर न राहण्याची आपली प्रतिज्ञा नारायण मूर्ती यांनी स्वहस्तेच तोडल्याचे आणि संन्यासाची वस्त्रे त्यागून पुन्हा कंपनीच्या संसाराची जबाबदारी घेतल्याचेही अनेकांस स्मरत असेल. इतकेच काय पण घराणेशाहीविरोधात बोलणाऱ्या मूर्ती यांनी आपल्या चिरंजीवांस, रोहन यांस, कंपनीत महत्त्वाच्या पदावर आणले होते, हेही विस्मरणात गेले नसेल. त्याहीवेळी ‘लोकसत्ता’ने ‘मूर्तीभंजन’ ( ३ जून २०१३) या संपादकीयाद्वारे मूर्ती यांचा दांभिकपणा दाखवून दिला होता. आता पुन्हा हेच करण्याची वेळ आली हे आपले दुर्दैव. त्यांचा हा ७० तास/ प्रतिसप्ताह काम हा सल्ला त्यास जबाबदार आहे.
अशी मागणी करणे हेच मुळात अमानुष आहे. एकेकाळी बिहारातील खाण मालकांवर कामगारांसाठी कसल्याही सुविधा नसल्याचा, त्यांच्या जिवास काहीही किंमत दिली जात नसल्याचा आरोप केला जात असे. याचे कारण खाणीतील कार्यस्थळाची अवस्था. मूर्ती यांचे हे विधान त्याची आठवण करून देते. आधीच माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील अनेकांचे दिवस-रात्रीचे शारीर घड्याळ बिघडलेले असते. हे कर्मचारी विकसित देशांतील दिनमानाप्रमाणे आपले कार्यालयीन वेळापत्रक आखतात. त्यामुळे इकडे रात्र असली तरी तिकडे दिवस असल्याने आपल्या कर्मचाऱ्यांस अडनिड्या वेळी जागत काम करावे लागते. यातील बहुतांश कामे बसकी. त्यामुळे आधीच पाठीच्या कण्याच्या, डोळय़ाच्या आणि डोक्याच्याही अनेक समस्या या कामगारांस भेडसावत असतात. असे असताना आरोग्याची अधिकच हेळसांड करणारी ७० तास काम करण्याची सूचना अव्यावहारिक आणि कर्मचाऱ्यांच्या अनारोग्याची हमी देणारी ठरते. अनेक विकसित/युरोपीय देश सध्या उलट ही कमाल कामाची वेळ ४०-४१ तास / प्रतिसप्ताह इतकी कमी करताना दिसतात. फिनलंडसारख्या देशांत तर त्यापेक्षाही कमी केली जाते. आज अनेक देशांत पाच दिवसांचा कार्यालयीन आठवडा चार दिवसांवर कसा आणता येईल यावर चर्चा सुरू आहे. दुबईसारख्या संयुक्त अरब अमिरातीतही हे प्रमाण ४० तासांवर आणले जात आहे. असे असताना विकसित देशांच्या रांगेत बसण्याचे स्वप्न पाहणाऱ्या भारतात कोणा उद्योगमुत्सद्द्याने ७० तास/प्रति सप्ताहाची शिफारस करावी, हे घड्याळाचे काटे उलटे फिरवण्यासारखेच. ही सूचना ऐकली जाण्याची शक्यता सुदैवाने कमीच. पण दुर्दैवाने तसे झाले नाही (कारण काही उद्योगपतींनी मूर्ती यांच्या सूचनेस जाहीर पाठिंबा दिला आहे) तर आपण अत्यंत मागास उत्तर कोरियाच्या खालोखाल या मुद्द्यावर असू. त्या देशातील लेबर कॅम्पांत दर आठवड्यास १०५ तास काम करून घेतले जाते. आपल्याकडे मूर्ती यांची ही सूचना अमलात आली आणि कामगारांच्या जिवाचे बरेवाईट झाले तर ते सर्व ‘नारायण वाक्बळी’ ठरतील.