अपयशी ठरल्यास आत्मविश्वास हा आगाऊपणा ठरतो आणि यश मात्र त्यास ‘धडाडी’चा मुलामा देते.. नेतृत्वशैली वगैरे साऱ्या भाकडकथा!

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

संपन्नावस्थेतून विपन्नावस्थेत जावे लागले की संपन्न इतिहासातील गुण विपन्न वर्तमानात दुर्गुण ठरतात. हा मानवी स्वभाव आहे. त्याचेच दर्शन गुलाम नबी आझाद यांच्या काँग्रेस पक्षाच्या राजीनाम्यातून घडते. हा राजीनामा देताना त्यांनी जो पाच पानी प्रदीर्घ प्रबंध लिहिला त्याची चर्चा काही काळ सुरू राहील. विशेषत: काँग्रेस नेतृत्वावर त्यांनी जे धारदार शरसंधान केले आहे त्याची चर्चा अधिक असेल. या शरवर्षांवात काँग्रेस नेतृत्व किती विदग्ध होईल हे सांगता येणे अवघड. पण त्यामुळे काँग्रेस विरोधकांच्या अंगणात मात्र पुष्पवृष्टीचा आनंद लुटला जाईल. हेदेखील मानवी. प्रतिस्पर्ध्याच्या अहितात आनंद शोधणे हा मानवी स्वभाव. त्यात गैर काही नाही. ही मानवी स्वभावदर्शक लक्षणे दूर सारत आझाद यांचा राजीनामा, त्यामागील संभाव्य कारणे आणि परिणाम यावर भाष्य करणे आवश्यक ठरते. पहिला मुद्दा काँग्रेसच्या विद्यमान विपन्नावस्थेचा. आझाद यांनी काँग्रेसची सधन संपन्नता अनुभवलेली आहे. त्यांना त्यामुळे ही विपन्नावस्था अधिक टोचणे साहजिक. ही टोच त्यांच्या राजीनामा पत्रातून दिसते. काँग्रेसचे विद्यमान नेतृत्व – पक्षी : राहुल गांधी – सहकाऱ्यांशी वाद-संवाद न करता परस्पर निर्णय घेते, ज्येष्ठांना किंमत देत नाही, राहुल यांच्या वागण्यातील पोक्तपणाचा अभाव हे तीन आझाद यांच्या पत्रातील प्रमुख मुद्दे. त्यांच्या वैधतेबाबत कोणाचेही दुमत असणार नाही.

आझाद यांची कारकीर्द इंदिरा गांधी यांच्या कार्यकाळात सुरू झाली. मुळात संजय गांधी यांच्या जवळचे ते कश्मिरी नेते. शेर-ए-कश्मीर शेख अब्दुल्ला यांच्या वारसांपेक्षा आपल्या पक्षातच एखादा कश्मिरी चेहरा असावा हा आझाद यांना जवळ करण्यामागे तत्कालीन काँग्रेस नेत्यांचा विचार. असा विचार सर्व राजकीय पक्ष करीत असतात त्यामुळे त्यात गैर असे काही नाही. तथापि यातील महत्त्वाचा मुद्दा असा की ज्या काळात आझाद काँग्रेसमध्ये आले त्या काळातील काँग्रेसच्या सर्वोच्च नेत्या इंदिरा गांधी या पक्षांतर्गत चर्चेसाठी कधी ओळखल्या जात होत्या? तसेच त्यांनीही त्यांच्या काळातील काँग्रेस ढुढ्ढाचार्याना घरी पाठवले. त्या वेळी आझाद हे तरुण तुर्कात गणना होण्याइतकेही ‘मोठे’ नव्हते. पण इंदिराबाईंनी या ज्येष्ठांस घरी पाठवले म्हणून त्यांच्यासाठी आझाद यांनी अश्रू ढाळल्याची काँग्रेसी इतिहासात नोंद नाही. इंदिरा गांधी यांनी राजकीय यशोशिखरावर असताना आणीबाणी लादली. ती लादावी किंवा कसे यावर त्या वेळी काय पक्षात परिसंवाद झाला होता काय? त्यानंतर सुरू होते राजीव गांधी यांची कारकीर्द. त्यांनी इंदिरा गांधी यांच्या काळातील ज्येष्ठांस दूर केले आणि नवे ‘संगणक गणंग’ जवळ करून पक्षास नवा चेहरा देण्याचा प्रयत्न केला. आझाद त्याही प्रयत्नात सामील झाले. पक्षीय ज्येष्ठांसाठी त्या वेळीही त्यांनी काही श्राद्धपक्ष केला किंवा काय याची नोंद नाही. त्याही वेळी विरोधकांस ‘नानी याद दिला देंगे’ असे म्हणणाऱ्या राजीव गांधी यांच्यावर पोक्तपणाच्या अभावाची टीका झाली होती.

त्यांच्या पश्चात पक्षनेतृत्वासाठी सोनिया गांधी आणि सीताराम केसरी, पंतप्रधान नरसिंह राव यांच्यात घर्षण झाले. त्या वेळी आझाद यांनी सोनिया गांधी यांची तळी उचलून धरली. त्या वेळच्या राजकारणात सोनिया गांधी यांची जी निर्णय चौकडी होती त्यातील निष्ठावंतांत आझाद यांची गणना होत होती. त्यांचे कौशल्य असे की सोनिया गांधी यांच्याशी निष्ठा राखत त्यांनी राव यांच्या मंत्रिमंडळातही स्थान मिळवले. हेच कौशल्य त्यांनी सोनिया गांधी गट आणि पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्याही मंत्रिमंडळातील स्थान मिळवण्यात दाखवून दिले. असे दोन्ही एकाच वेळी सांभाळता येणे ही आझाद यांची खासियत. आणि हे सर्व कधी? तर एक मतदारसंघसुद्धा राखता येत नव्हता त्या वेळी. काश्मिरी असूनही त्या राज्यात त्यांना कधी स्थान नव्हते. पक्षश्रेष्ठींची मर्जी राखण्यातील कौशल्य आणि  पक्षश्रेष्ठींची मुसलमान चेहऱ्याची निकड यातून आझाद यांचे स्थान अबाधित राहिले. म्हणूनच जनसंपर्क नसताना कोणत्या ना कोणत्या राज्यातून त्यांची राज्यसभा उमेदवारी ‘आरक्षित’ होती.

या इतिहासाचा मथितार्थ इतकाच की आझाद यांनी उपस्थित केलेले मुद्दे शंभर टक्के खरे असले तरी ते शंभर टक्के निरर्थक आहेत. खरे असूनही ते निरर्थक आहेत याचा अर्थ असा की केवळ काँग्रेसच काय आपल्याकडील डावे वगळता सर्वच राजकीय पक्ष याच पद्धतीने चालतात. फरक पडतो तो केवळ यश आणि अपयश या आणि या एकमेव मुद्दय़ावर. राहुल गांधी यांच्या ज्या मनमानीवर आझाद यांना आक्षेप आहे ती ‘मनमानी’ इंदिरा गांधी, राजीव गांधी आणि नंतर काही प्रमाणात सोनिया गांधी यांनीही दाखवली. पण ते यशस्वी ठरले. यावर ‘काँग्रेस असाच आहे’ असे म्हणत टाळय़ा देणाऱ्यांच्या मनांतील आनंदाच्या उकळय़ा ‘‘काँग्रेसची जागा घेणारा भाजप यापेक्षा काही वेगळा आहे का,’’ या प्रश्नाने आपोआप थांबतील. काँग्रेसमध्ये निर्णय घेणारे दोघे अशी टीका करणारे; निर्णयाचा अधिकार असणाऱ्यांची भाजपतील संख्या किती यावर निरुत्तर होतील. पण हा मुद्दा तूर्त उपस्थित होत नाही. कारण भाजप (तूर्त) यशोशिखरावर आहे आणि काँग्रेस अपयशांखाली गाडल्या गेलेल्या अवस्थेत आहे. अपयशी ठरल्यास आत्मविश्वास हा आगाऊपणा ठरतो आणि यश मात्र त्यास ‘धडाडी’चा मुलामा देते. म्हणजे यश की अपयश हा एकमेव मुद्दा महत्त्वाचा. नेतृत्वशैली वगैरे सर्व काही भाकडकथा. यशस्वींचे सर्व काही बरोबर असते आणि अपयशींचे सर्व काही चुकलेले असते.

तेव्हा मुळात काँग्रेस नेतृत्वाने आपण यशस्वी कसे होऊ हे शोधावयास हवे. हे यश जोपर्यंत त्या पक्षास मिळत नाही तोपर्यंत गुलाम नबी आझाद हे पंजाबी अमिरदर सिंग वगैरेंच्याच मार्गाने जाणार. उद्या जम्मू-काश्मिरातील निवडणुकांत त्यांच्या संभाव्य पक्षाने भाजपचा ‘ब’ संघ म्हणून संधान बांधल्यास आश्चर्य वाटणार नाही. भाजपस हात-पाय पसरण्यासाठी नेहमीच असे नवनवे ‘ब’वर्गीय हौतात्म्यास उत्सुक लागतात. त्यात आता एकाची भर. गेल्या वर्षी संसदेत पोलादी नरेंद्र मोदी यांनी या आझाद यांच्यासाठी अश्रू ढाळले होते. तो रोमहर्षक प्रसंग अनेकांस स्मरतही असेल. त्यामुळे त्या अश्रूंचे नाते आणि अश्रूंची गुंतवणूक फळेलही. अशा गुंतवणुकांचा जीव एका निवडणुकीपुरता असतो. प्रमुख प्रतिस्पर्ध्याचे खच्चीकरण हा अशा प्रयोगांमागील खरा अर्थ. कडव्या राजकीय भाषेत अशांच्या वर्णनार्थ ‘व्होटकटवा’ असा रास्त शब्दप्रयोग आहे. अशा व्होटकटव्यांत आणखी एकाची भर इतकेच याचे महत्त्व.

पण ते लक्षात आल्यामुळे काँग्रेसच्या समस्या दूर होणाऱ्या नाहीत. त्यासाठी त्यांना खच्चून प्रयत्न करावेच लागतील. अशा प्रयत्नांचा आणि म्हणून निवडणुकोत्तर यशाचा अभाव हा काँग्रेसचा खरा आजार. त्यावर इलाज शोधण्यात त्या पक्षाच्या नेत्यांना रस आहे असे अजिबात दिसत नाही. त्यामुळे भाजपच्या यशाचा आकार दिवसेंदिवस वाढत जातो. त्यास रोखण्याची ताकद काँग्रेस पक्ष जोपर्यंत मिळवत नाही तोपर्यंत हे असेच सुरू राहणार. आज आझाद गेले; उद्या आनंद शर्मा वा अन्य कोणी जातील. स्वत: बरोबर ठरण्यासाठी सत्ताधारी भाजपच्या चुकांची वाट पाहणे हा पर्याय असू शकत नाही. त्यासाठी काँग्रेस पक्षास आधी नेतृत्वाचा प्रश्न सोडवावा लागेल. सत्ताधारी भाजपने राजकारणाचा पोत बदलून टाकलेला असताना काँग्रेसलाही नवे मार्ग शोधावे लागतील. ते गवसले आणि यश मिळाले तर स्वत:ची आझादी सोडून नेतृत्वाची गुलामी स्वीकारण्यास उत्सुक अनेक मिळतात. हे सर्वपक्षीय सत्य. त्यात अपयश आल्यास मात्र गुलामांना आझादी आठवते. तेव्हा आझादांना गुलाम करण्याइतके यश काँग्रेस मिळवणार का, हाच काय तो प्रश्न. एरवी नेतृत्वशरण गुलामांच्या आझादीस फार महत्त्व देण्याचे कारण नाही.

मराठीतील सर्व संपादकीय बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta editorial ghulam nabi azad resigned from congress party zws
Show comments