हेन्री किसिंजर हे अत्यंत बुद्धिमान, तितकेच कष्टाळू, मुद्दा समजून घेण्यासाठी कितीही वेळ देणारे आणि मुख्य म्हणजे शेवटपर्यंत कालसुसंगत ठरलेले मुत्सद्दी म्हणून लक्षात राहतील..
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
महाभारतासारखे महाकाव्य लिहिणारे ‘व्यास’ व्हायचे आणि त्याच वेळी त्याच्या कथनासाठी ‘संजया’ची भूमिकाही वठवायची! हे आव्हान एकाच वेळी पेलण्याची प्रतिभा आणि त्यास आवश्यक प्रज्ञा फार कमी जणांस लाभलेली असते. हेन्री किसिंजर हे अशा निवडक प्रतिभावानांतील एक. एका जवळपास संपूर्ण शतकाचे आंतरराष्ट्रीय राजकीय महाकाव्य ‘लिहिण्यात’ ते सहभागी होते. अमेरिका या जगातील एकमेव महासत्तेचे एक नव्हे, दोन नव्हे, तीनही नव्हे तर तब्बल १२ अध्यक्ष, आधुनिक चीनचे संस्थापक माओ झेडाँग, डेंग शियाओिपग ते आताचे क्षी जिनिपग यांचे अप्रत्यक्ष जागतिक दूत, साम्यवादाच्या आणि शीतयुद्धाच्या तप्त काळातील एक क्रियाशील घटक आणि या साम्यवादी सत्तेची अखेर, अमेरिकी अर्थकारणातील सक्रिय भिडू अशा अनेक भूमिका किसिंजर यांनी वठवल्या आणि यातील बऱ्याचशा भूमिकांची संहिताही त्यांनी लिहिली. हे झाले त्यांच्यातील ‘व्यासां’बाबत. पण त्याच वेळी किसिंजर हे या सर्व महाभारताचे उत्कृष्ट कथनकार होते. शेकडय़ांनी भाषणे, दशकभर ग्रंथ, पुन:पुन्हा ऐकाव्यात/वाचाव्यात अशा अनेक मुलाखती आदी अनेक रूपांनी किसिंजर यांनी या महाभारताच्या संजयाची भूमिका बजावली. हेवा वाटावा असे प्रदीर्घ आयुष्य आणि इतक्या प्रदीर्घ, स-व्यसनी आयुष्याचा भार पेलणारे आरोग्य किसिंजर यांना लाभले. त्या सफळ-संपूर्ण आयुष्याची अखेर गुरुवारी झाली. अलीकडे उत्तुंग, हिमालयाएवढे भव्य आदी उपाध्या गावगल्लीत कोणालाही लावल्या जातात. पण अशा उपाध्यांस अत्यंत योग्य असे व्यक्तिमत्त्व किसिंजर यांचे होते. आदरांजली वाहण्याच्या निमित्ताने त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा आढावा घेणे अतिअगत्याचे ठरते.
राजकारणातील यशस्वी व्यक्तिमत्त्वांची वर्गवारीही अभ्यासू आणि उनाड अशा गटांत करता येते. या क्षेत्रातील एखाद्याचे यश हे त्या व्यक्तीच्या अभ्यासू वृत्तीची प्रचीती देणारे असतेच असे नाही. किसिंजर यास अपवाद. भल्याभल्यांस अप्रूप वाटावे अशी त्यांची शैक्षणिक कारकीर्द. हार्वर्ड विद्यापीठात शिकत असताना येथे आपणास प्राध्यापकपदाचा दर्जा मिळावा अशी त्यांची मनीषा होती. आपल्याकडे कनिष्ठ महाविद्यालयात काहीबाही शिकविणाराही आपल्या नावापुढे ‘प्रा.’ असे लावतो हे खरे असले तरी प्रामाणिक विद्वत्जगात प्राध्यापकपद पूजनीय मानले जाते. पण किसिंजर यांस ते हुलकावणी देत राहिले. त्या विद्यापीठाने ‘आंतरराष्ट्रीय परिसंवाद शाखे’चे प्रमुखपद किसिंजरांस दिले, त्यांचा डॉक्टरेटचा प्रबंध स्वीकारला पण त्यांस ‘प्रा.’ काही केले नाही. आंतरराष्ट्रीय शाखेच्या प्रमुखपदी असल्याने किसिंजर यांचा जगातील अनेक अभ्यासकांशी परिचय होत गेला. हार्वर्डची साधनसामग्री आणि स्वत:ची कल्पकता या जोरावर किसिंजर विद्यापीठात उत्तमोत्तम कार्यक्रम आयोजित करीत आणि त्यास हजेरी लावण्यात अनेकांस रस असे. अमेरिकी सरकारचे वरिष्ठ अधिकारीही त्यात असत. यामुळेच अत्यंत प्रतिष्ठित अशा ‘फॉरिन अफेअर्स’च्या संपादकपदी त्यांची नियुक्ती होणार अशी चर्चा सुरू झाली. पण तेही झाले नाही. तथापि याच काळात तत्कालीन सोव्हिएत युनियनची आण्विक ताकद आणि तीस तोंड देण्याचे उपाय यावर किसिंजर यांनी आजही वाचला जातो असा सर्वागस्पर्शी अहवाल तयार केला. (त्याचे पुढे ग्रंथातही रूपांतर झाले) तो राजकीय आखाडय़ात असलेल्या रिचर्ड निक्सन यांच्या वाचनात आला. असे काही चांगले वाचले की लेखकास आवर्जून कळविण्याइतकी सभ्यता निक्सन यांच्या ठायीही होती. त्यांनी किसिंजर यांस या अहवालाबाबत कळवले आणि त्यातूनच मग किसिंजर यांचा राजकीय प्रवास सुरू झाला. दरम्यान या त्यांच्या अहवालाची इतकी चर्चा झाली की हार्वर्डने त्यांस त्यासाठी प्राध्यापकाचा दर्जा दिला. पण एव्हाना हे विद्यापीठ एका चांगल्या अध्यापकास मुकणार आणि राजकारणास एक अभ्यासू व्यक्तिमत्त्व मिळणार हे नक्की झाले होते. हार्वर्डचे नुकसान हा आंतरराष्ट्रीय मुत्सद्देगिरीचा फायदाच होता.
तो त्यानंतर डझनभर अमेरिकी अध्यक्षांनी पुरेपूर लुटला. किसिंजर १९६९ साली निक्सन यांचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून व्हाइट हाऊसमध्ये रुजू झाले. त्यांचा आवाका इतका भव्य होता की निक्सन यांनी त्यांच्याकडे परराष्ट्रमंत्रीपदही दिले. एकाच वेळी दोन्ही पदे किसिंजर सांभाळत. किसिंजर यांची ही भूमिका ऐतिहासिक ठरली. या पदावरून अत्यंत गुप्तपणे, अतिजागृत अमेरिकी माध्यमांसही अंधारात ठेवून किसिंजर यांनी चीनच्या माओंशी संधान बांधले आणि आपल्या तितक्याच गुप्त चीन दौऱ्यातून अमेरिकी-चिनी संबंधांच्या महामार्गाची मुहूर्तमेढ त्यांनी रचली. कित्येक दशकांचा अबोला सोडून अमेरिका-चीन हे राजनैतिक संबंध प्रस्थापित करणे आणि नंतर अध्यक्ष निक्सन यांच्या चीन दौऱ्याची आखणी ही किसिंजर यांनी एकहाती साधलेली किमया होती. माओ, त्यानंतरचे त्यांच्याइतकेच उत्तुंग डेंग शियाओिपग यांच्यापासून ते विद्यमान क्षी जिनिपग अशा सर्वास किसिंजर हे खऱ्या अर्थाने आधार वाटत. डेंग आणि जिनिपग या दोघांच्या मधले हू जिंताव असोत की जियांग झेमीन. या सर्वास किसिंजर यांचे भारीच प्रेम. माओ यांनी किसिंजर यांस ‘लाओ पेंग्यु’ (खरा मित्र) अशी उपाधी बहाल केली होती. अलीकडे खरे तर किसिंजर कोणत्याही पदावर नव्हते. तरीही वयाच्या १०० व्या वर्षी सरल्या जुलै महिन्यात ते चीन दौऱ्यावर होते तेव्हा चिनी यजमानांनी त्यांस एखाद्या सम्राटाचा दर्जा देऊन त्यांचे आगतस्वागत केले. या दौऱ्यानंतर त्यांनी काही निवडक नियतकालिकांस चीनसंबंधांत मुलाखती दिल्या. त्या चार दिवस चालल्या. इच्छुकांनी त्या जरूर वाचाव्यात. ही किसिंजर यांच्या बौद्धिकतेची उंची होती आणि असा त्यांच्या बौद्धिक उंचीचा सार्वत्रिक दरारा होता. याचा अर्थ त्यांचे सर्वच बरोबर होते असा नाही. खुद्द चीनसंदर्भातच त्यांचे अंदाज चुकले. अमेरिकेने चीनला अधिकाधिक प्राधान्यक्रम द्यावा आणि त्या देशात अधिकाधिक गुंतवणूक करावी, अशी त्यांची मसलत होती. अमेरिकेने ते केले. पण पुढचे किसिंजर यांच्या अपेक्षेप्रमाणे घडले नाही. चीन जितका जागतिक अर्थकारणात उतरेल, जितका तो जागतिकीकरणात सहभागी होईल तितका तो अधिकाधिक लोकशाहीवादी होईल, अशी किसिंजर यांची धारणा होती आणि त्यानंतर अनेक अमेरिकी अध्यक्षांस- यात बिल क्लिंटनही आले- तसेच वाटत होते. प्रत्यक्षात चीनने या सर्वास किती गुंगारा दिला हा इतिहास समोर आहे.
पण तरीही एकाही चिनी नेत्याने आणि एकाही अमेरिकी अध्यक्षाने केवळ चीनच नव्हे तर अन्य अनेक जागतिक मुद्दय़ांवर किसिंजर यांस कधीही दूर ठेवले नाही. ‘वॉटरगेट’ प्रकरणात निक्सन यांस राजीनामा द्यावा लागल्यावर जेराल्ड फोर्ड यांच्याकडे त्यांचे उर्वरित अध्यक्षपद आले. त्यांनीही किसिंजर यांस राखले. जॉन एफ. केनेडी हे डेमॉक्रॅट. त्यांनाही किसिंजर अत्यंत आदरणीय होते. वास्तविक किसिंजर हे केनेडी यांचे टीकाकार. पण तरी केनेडी यांनी किसिंजर यांचा आदरच केला. सोव्हिएत रशिया सामथ्र्यवान असताना शीतयुद्धाचा स्फोट होणार नाही आणि उभय देशांतील तणावपूर्ण संबंध अबोल्यापर्यंत जाणार नाहीत, याचे भान राखण्याचे श्रेय किसिंजर यांचे. व्हिएतनाममधला गुंता सोडवण्यात त्यांची भूमिका महत्त्वाची होती. तरी तो पूर्ण सुटला नाहीच. याच्या अनेक कारणांपैकी एक म्हणजे साम्यवादाचा त्यांना असलेला मनस्वी तिटकारा. कम्बोडिया- व्हिएतनामच्या सीमेवर अमेरिकी फौजांनी केलेला बेछूट बॉम्बहल्ला हा या तिटकाऱ्याचे प्रतीक. ‘‘जे जे हलते आणि/ किंवा उडते आहे ते सर्व बेलाशक पाडा’’ असा त्यांचा अमेरिकी फौजांना आदेश होता. साम्यवाद वा साम्यवादाच्या नि:पाताचा मुद्दा आला की किसिंजर हे विवेकास तिलांजली देत. पूर्व पाकिस्तानचा बांगलादेश होत असताना पाकिस्तान आणि भारत या संदर्भातील संघर्षांबाबतही किसिंजर यांची भूमिका कौतुकास्पद नव्हती. ढाका येथील अमेरिकी दूतावास पाकिस्तानबाबत टाहो फोडत होता तरीही त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. का? कारण त्यांना भारत-पाकिस्तान आणि बांगलादेश यांपेक्षा चीन अधिक महत्त्वाचा वाटत होता. त्या वेळी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी किसिंजर यांस जे खडे बोल सुनावले त्यांस भारताच्या परराष्ट्र इतिहासात आजतागायत तोड नाही. भारत आणि भारतीय याबाबत किसिंजर यांस तितके प्रेम नव्हते. भारतातील त्यांचा शेवटचा मोठा कार्यक्रम म्हणजे जेआरडी टाटा यांच्या श्रद्धांजली सभेचा. उभयतांत स्नेह होता आणि परस्पर संबंधांत बौद्धिक आदर.
अलीकडे जगास भेडसावत असलेला इस्लामी देशांतील दहशतवाद आणि तेलकारण यात किसिंजर यांस आपली मुत्सद्देगिरी दाखवण्याची फारशी संधी मिळाली नाही. तथापि लिबियात कर्नल मुअम्मर गडाफी याच्याशी चर्चा करण्याइतकी प्रागतिकता किसिंजर यांनी दाखवली होती. पण तरीही किसिंजर शेवटपर्यंत कालसुसंगत- रिलेव्हंट- होते. त्यांच्यासारख्या पांडित्याशी दूरान्वयानेही संबंध नसलेल्या डोनाल्ड ट्रम्प यांनाही निवडणुकीच्या प्रचारात आशीर्वाद घेण्यासाठी किसिंजर यांची गाठ घ्यावीशी वाटली, यातच सर्व काय ते आले. असे केल्याने काही बुद्धिमंतांची मते आपल्याकडे वळतील, असा ट्रम्प यांचा होरा होता. या भेटीनंतर न्यूयॉर्क टाइम्सच्या वार्ताहराने ट्रम्प यांस ‘तुम्ही किसिंजर यांच्याकडून काय शिकलात?’ असे विचारले असता अमेरिकेच्या या भावी अध्यक्षांस एक मुद्दाही सांगता आला नाही. याबाबत किसिंजर यांची प्रतिक्रिया अशी : ‘‘मी बोललेले न कळणारा हा काही पहिला अध्यक्ष नाही’’. तथापि याच ट्रम्प यांस ते अध्यक्षपदी निवडून आल्यावर किसिंजर यांनी चीन संबंध सुधारण्यात मदत केली. किसिंजर यांचे वजन अजिबात न घेणारा एकमेव अमेरिकी अध्यक्ष म्हणजे बराक ओबामा. ‘‘किसिंजर यांनी घालून ठेवलेला गोंधळ मी निस्तरत आहे’’, असे विधान ओबामा यांनी २००८ साली अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर काही महिन्यांत केले होते. ते काही प्रमाणात खरेही होते. याचे कारण साम्यवादास संपवण्याच्या नादात किसिंजर यांनी जगात बऱ्याच समस्या निर्माण केल्या. त्यांचा हेतू शुद्ध असेलही. पण त्यांनी निवडलेला मार्ग प्रत्येक वेळी तसा होता असे म्हणता येणार नाही.
अत्यंत बुद्धिमान आणि तितकेच कष्टाळू हे दोन्ही गुण एकाच व्यक्तीच्या ठायी फार कमी वेळा असतात. किसिंजर यांच्यात हे मिश्रण होते. त्यांचा कामाचा उरक कमालीचा दांडगा होता. सकाळी सात वाजता सुरू झालेला त्यांचा कार्यालयीन दिनक्रम रात्री बाराच्या आत कधीही संपला नाही. सायंकाळी सातनंतर समशीलांच्या भेटीगाठी आणि मद्यपान. घरी आल्यावर पुन्हा वाचन. चर्चा करण्याच्या त्यांच्या शैलीबाबतही अनेकांनी लिहून ठेवलेले आहे. कोणताही गहन मुद्दा असो. किसिंजर पाच-सहा तास सलग बैठक मारून बसत. सुरुवातीस ऐटबाज पाइपचे धूम्रपान करणारे किसिंजर वयपरत्वे सिगारकडे झुकले. यामुळेही अमिताभ बच्चन आणि रझा मुराद या दोघांच्या आवाजाची बेरीज म्हणजे किसिंजर यांचा खर्ज. त्यामुळे त्यांचे विद्वत्पूर्ण वक्तृत्व या आवाजाने अधिकच वजनदार भासे. जोडीस विनोदाची झालर. ‘‘इल्लीगल वुई डुई इट इमीजिएटली; अनकॉन्स्टिटय़ुशनल टेक्स अ लिटल टाइम’’, ‘‘ऑइल इज टू इम्पर्ॉटट टु बी लेफ्ट टु ऑइलमेन’’ अशी त्यांची अनेक वचने सहज सांगता येतील. इतके आनंददायक जगूनही किसिंजर शतायुषी ठरले. इतके आयुष्य काहींच्या वाटय़ास येतेही. पण शेवटच्या क्षणापर्यंत स्मृती, वाचा, बुद्धी आणि गर्विष्ठपणाकडे झुकता अभिमान शाबूत असलेले विरळाच. इतके जगणारे सगळेच शतायुषी शेवटपर्यंत शहाणे राहतातच असे नाही. किसिंजर यास अपवाद. गेल्याच वर्षी, वयाच्या ९९ व्या वर्षी त्यांचे शेवटचे पुस्तक (लीडरशीप: सिक्स स्टडीज इन वल्र्ड स्ट्रॅटेजी) प्रकाशित झाले आणि अलीकडे काही मुलाखती. ते सर्वच लोकप्रिय ठरले. शतकानुशतकात क्वचितच कधी असे शतायुषी शहाणे जन्मास येतात. ‘लोकसत्ता’ परिवारातर्फे या बुद्धिवंतास आदरांजली.