शाश्वततेची जी काही ठिकाणे आजच्या काळात होती त्यात राशिद खान यांचे स्वान्तसुखाय, तरीही श्रोत्यांना सतत जागे ठेवणारे गाणे होते..

सर्जकतेच्या उत्कट बिंदूवरील व्यक्तीचे जाणे चटका लावणारे असते. राशिद खान यांचे निधन हे यात मोडते. भीमसेनजींस जाऊन एक तप लोटले. किशोरीबाई गेल्या त्यास सात वर्षे होतील. चार वर्षांपूर्वी जसराजजी गेले. मालिनीबाई राजुरकर अलीकडेच निवर्तल्या. आमच्या पिढीस गाण्यातील गंधर्वत्व आणि अलौकिक आध्यात्मिकता उमजण्याच्या आधीच कुमारजी आणि मल्लिकार्जुनअण्णा निघून गेले. या सगळय़ांचे जाणे नि:संशय वेदनादायी होते. पण त्या वेदनेस अपरिहार्यतेच्या वास्तवाची शहाणीव होती. राशिद खान यांच्या निधनाच्या वेदनेची गहिराई आणि त्यामुळे उमटलेल्या ओरखडय़ाचा पोत या सगळय़ांपेक्षा वेगळा आहे. आपल्या डोळय़ासमोर, आपल्या बरोबरीने वा मागे-पुढे एखादे वर्ष असलेल्या एका तरुणाचे उस्तादात रूपांतर होताना पाहणे आणि त्या उस्तादाकडून आपल्या स्वरापेक्षांची पूर्तता होणार याची आनंदी खात्री असताना अचानक त्या व्यक्तीने जाणे याचे हे दु:ख! या दु:खाची जातकुळी त्यामुळे वेगळी. भीमसेनजी, किशोरीबाई, मालिनीबाई, मन्सूरअण्णा, कुमारजी वगैरे कलात्मक परिचय झाल्यापासून महानच होते. राशिद खान त्या इंद्रधनुषी मार्गाने निघालेले होते. वरील सर्व महानुभावांना त्या इंद्रधनुष्यावरील ठहरावाची संधी मिळाली. त्यांच्या तेथील वास्तव्याचा आनंद आपणा सर्वास मनमुराद मिळाला. त्यांच्या कलात्मक विभ्रमाचे अस्तित्व आसुसलेल्या कानांनी उपभोगता आले. पण राशिद खान यांच्याबाबत मात्र हे इंद्रधनुष्यी वास्तव्य अवकाळी संपुष्टात आले. म्हणून या दु:खाची तीव्रताही अधिक.

Crime NEws
कुवैतहून थेट मध्य प्रदेश गाठलं अन् मुलीवर लैंगिक शोषण करणाऱ्याचा घेतला जीव; मृत्यूचं गुढ उकलायला वडिलांनीच केली मदत!
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
CSMT accident Accused in accident finally found after CCTV examination
सीएसएमटी अपघात : सीसीटीव्हीच्या तपासणीनंतर अखेर अपघातातील आरोपी सापडला
Union Health Minister confirms sudden deaths in India are not caused by COVID-19 vaccines, addressing public concerns about vaccine safety.
Deaths Due To Corona Vaccine : “करोना लशीमुळे झाले नाहीत लोकांचे मृत्यू”, मोदी सरकारने संसदेत सांगितली अचानक मृत्यूंमागील कारणे
Atul Subhash
“मर्द को भी दर्द होता है!” आत्महत्येआधीचा अतुलचा तासभराचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल; पत्नी आणि सासरच्यांवर गंभीर आरोप
gold from woman dead body s neck was stolen
मृत्यूनंतरही परवड थांबली नाही, पार्थिव रुग्णालयात नेताना महिलेच्या गळ्यातील गंठण चोरीला
Raghunath More, Raghunath More passed away,
शिवसेनेचे रघुनाथ मोरे यांचे निधन, दिघे यांच्या निधनानंतर साभांळली होती ठाणे जिल्हाप्रमुख पदाची जबाबदारी
diarrhea, Badlapur, girl died diarrhea Badlapur,
अतिसाराने चिमुकलीचा मृत्यू, बदलापुरातील दुर्दैवी घटना, अंधश्रद्धेचा संशय

तसे पाहू जाता अवकाळीची सवय व्हावी असा हा काळ. भरवशाच्या म्हशी टोणग्यांवर टोणगे प्रसवत असताना शाश्वतता ही संकल्पनाच अशाश्वत आहे किंवा असा प्रश्न पडणे साहजिक. अशा काळात जी काही शाश्वततेची ठिकाणे होती त्यात राशिद खान यांचे गाणे होते. ते कोणत्या घराण्याचे, तालीम कोणाची वगैरे व्याकरणात जाण्यात काही अर्थ नाही. भाषेच्या आनंदासाठी व्याकरणाचा परिचय जीवनावश्यक नसतो. राशिद खान यांच्या गाण्यातून मिळणारा आनंद या सांगीतिक व्याकरणावर दशांगुळे उभा ठाकत असे. त्यांनीच ‘लोकसत्ता’च्या ‘‘बस.. एक छुरी हलके से चली जाती है’’ (‘लोकरंग’, २८ जुलै २०१९) या लेखात म्हटल्याप्रमाणे या व्याकरणाच्या वजनाने त्यांना कधी दबवले आणि दमवलेही नाही. परंपरा, व्याकरण, पूर्वसुरींचा प्रवास इत्यादी कशानेच त्यांचे दबून न जाणे हे त्यांच्या गाण्यातून कळत असे. त्यांचे गाणे मोकळे-ढाकळे होते. कलाकार हा मोकळा-ढाकळा असला की ‘हाताळायला’ सोपा असतो. त्या अर्थाने त्यांचे नाते भीमसेनजी, कुमारजी वा मल्लिकार्जुनअण्णा यांच्याशी लागते. त्यांच्या गाण्यातल्या या मोकळेपणातच कदाचित भीमसेनजींनी आपले स्वत:चे प्रतिबिंब पाहिले असणार. त्याचमुळे हिंदुस्तानी शास्त्रीय संगीताचे भविष्य असे राशिद खान यांचे वर्णन भीमसेनजींनी केले.

पण तरीही आपल्या खांद्यावर शास्त्रीय संगीताच्या भविष्याची पताका आहे, असे राशिद खान यांनी कधी दाखवले नाही आणि ते तसे कधी वागले नाहीत. उस्तादी असो वा पंडिती. शास्त्रीय संगीतातील बुजुर्ग स्वत:च्या बुजुर्गतेच्या कोषात अडकतात. भीमसेनजी, कुमारजी, मल्लिकार्जुन वगैरेंची महत्ता ते त्या कोषात अडकले नाहीत म्हणून आहे. राशिद खान दर्जाने यांच्याच पिढीचे आणि वयाने आजचे. जुन्या-नव्याचा इतका उत्कृष्ट सांधा त्यांच्याइतका अन्य नाही. तरुणांपैकी काही परदेशस्थ मंडळी जुन्यांच्या स्वरलिपीचे पाठांतरी सादरीकरण करतात अथवा तितकेही ज्यांना जमत नाही ते अचकट-विचकट काहीबाही करून नवेपणा मिरवतात. राशिद खान यांना असे काहीही करावे लागले नाही. स्वत:च्या गाण्यावर त्यांचा ठाम विश्वास होता. या क्षेत्रात थोडेच कलाकार असे आहेत की ज्यांची बैठक  पार पडली, असे म्हणण्याची वेळ येत नाही. राशिद खान यांतील एक. अलीकडे विलंबितात सोडाच, पण मध्यलयीतही फार कोणी थांबण्याच्या फंदात पडत नाही. सगळी घाई द्रुतलयीतील चमत्कृती, तबलजींशी ‘झगडा’ वगैरेंतून टाळय़ा कधी मिळतील याची. राशिद खान पहिल्या दोन्ही टप्प्यांत निवांत विहरायचे. लहान लहान पक्ष्यांना तरंगते राहण्यासाठी फार पंख फडफडवावे लागतात. गरुड मात्र आपल्याच आनंदात हवे तितके तरंगू शकतो. राशिद खान असे स्वरलयींच्या दोन्ही पंखांवर आपल्याच मस्तीत ‘फिरत’ राहायचे. कलाकृतीची, म्हणजे अर्थातच कलाकाराचीही, वाटचाल ‘चांगली/ चांगला’ येथपासून उत्तम, महान येथपर्यंत कधी होऊ लागते, या प्रश्नाचे उत्तर समजून घ्यायला सोपे पण अमलात आणण्यास अत्यंत अवघड असे आहे. एखादा कलाकार काहीही सिद्ध करायचे नाही या अवस्थेला पोहोचतो त्या वेळी तो केवळ चांगला राहत नाही; तो उत्तम, महानतेच्या वाटेला लागतो.

राशिद खान यांची बैठक काहीही सिद्ध करण्यासाठी नसायची. आपण गातो ते उत्तम आहे हे वयाच्या अवघ्या ११ व्या वर्षीच उमगलेले. बडय़ा बडय़ा बुजुर्गाची मान्यताही कधीचीच मिळालेली. इतरांचे ऐकून मनातल्या मनात घोटवण्याच्या वयात राशिद खान उस्तादपदास पोहोचलेले. त्यामुळे त्यांचे नंतरचे गाणे स्वान्तसुखाय आणि म्हणून इतरांनाही सुखावणारे असे. अशा कलाकारांच्या वर्तनात स्वत:विषयी ‘मी आहे हा असा आहे’ अशी एक लोभस मस्ती (मराठी अर्थाने नव्हे) असते. राशिद खान यांच्या संपूर्ण सादरीकरणात ती असायची. संपूर्ण सादरीकरणात याचा अर्थ केवळ सांगीतिक नाही. ते गाणेच नाही; तर स्वत:लाही ज्या तऱ्हेने पेश करायचे त्यातून ही मस्ती दिसून यायची. अशी अवस्था एकदा आली की कलाकार प्रयोग करण्यास घाबरत नाही आणि पोथीनिष्ठही राहत नाही. त्याचमुळे कोलकात्यात नवरात्रीतल्या ‘दुर्गो पुजो’च्या दिवसात स्वत:च्या घरी माता सरस्वतीची प्राणप्रतिष्ठा करून ‘तुम बिना सुना संसार’ असे ते सहज आळवू शकत आणि लुई बँक्स यांच्या पाश्चात्त्य सांगीतिक सादरीकरणात सहज सहभागी होत. ‘जश्न-ए-रेखता’च्या अनेक जवांदिल कार्यक्रमांत हजारो तरुण-तरुणी राशिद खान यांना ऐकत तासनतास बसत. भारतीय संस्कृतीतील भद्र, मंगल यांचे दर्शन शास्त्रीय संगीतात सहज होते. म्हणूनच जन्माने मुसलमान, तेही उत्तर प्रदेशी, वाढले-बहरले पश्चिम बंगालात.. अशा राशिद खान यांना मनापासून सांगीतिक श्रद्धांजली कोणास वाहावीशी वाटते? तर गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांस. राशिद खान यांनी सादर केलेले ‘रबींद्रो संगीत’ समग्र भद्रलोकी आजही कौतुकाने ऐकले जाते. आणि त्याच वेळी हा कलाकार बडे गुलाम अली खानसाहेबांची ‘याद पियाकी आये’ही तितक्याच उत्कटतेने सादर करू शकतो. शास्त्रीय संगीतातल्या बुजुर्गाच्या मते बडे गुलाम अली खानांची आठवण करून देण्याची क्षमता अलीकडच्या काळात फक्त राशिद खान यांच्याकडेच होती.

त्यांना साक्षात ऐकणे हा मूर्तिमंत सोहळा असे. बेताची उंची, हल्ली गरगरीतपणाकडे झुकलेले स्थूलसे शरीर, केसांचा भांग पाडला पाडला नाही नाही अशी अवस्था. मांडीवर स्वरमंडल. फार काही जामानिमा नाही आणि ‘गला तकलीफ देता है’ वगैरे नाटकीपणा नाही. एखाद्या पंडिताने वादविमर्शात थेट मुद्दय़ालाच हात घालावा तसे राशिद खान कोणताही संकोच नाही, साशंकता नाही.. थेट षड्जाला हात घालत. त्यांच्या सादरीकरणात एक गंमत असे. उंच भरारी घेणार असे वाटून ‘वर’ची तहान कानांस लागावी तर हे सहजपणे जमिनीवर येत आणि तितक्याच सहजपणे नंतर पुन्हा वर जात. एखादा पक्षी येथे बसेल असे वाटून त्या जागेकडे पाहावे आणि त्याने पुन्हा आकाशात झेप घेऊन पुढे जाऊन उतरावे.. तसे त्यांचे गाणे! मोठय़ा कलाकाराचे आणखी एक लक्षण म्हणजे ते कधी ‘प्रेडिक्टेबल’ होत नाहीत. ही सततची अनिश्चितता श्रोत्यांना सतत सजग ठेवते. राशिद खान आणि त्याचे गाणे हे असे होते.

आता त्याच्या नोंदीच ऐकाव्या लागणार. त्यांच्या निधनाच्या वाईटात त्यातल्या त्यात एक चांगली गोष्ट म्हणजे राशिद खान यांचे रेकॉर्डिग विपुल आहे आणि सहज उपलब्धही आहे. ‘आओगे जब तुम ओ साजना, अंगना फूल खिलेंगे’ने तर राशिद खान यांना घरोघर आणि दिलोदिल पोहोचवले. राशिदभाई गेले. ते आता येणार नाहीत. पण तरी रेकॉर्डिगच्या माध्यमातून  ‘गाओगे तुम ओ साजना’ असे म्हणता येऊ शकते आणि त्यावरही अंगना फूल खिलू शकतात. या मनस्वी कलाकाराच्या स्मृतीस ‘लोकसत्ता’ परिवारातर्फे आदरांजली.

Story img Loader