मोबाइलच्या लहान पडद्यावर हिंसक प्रसंग बघताना जेवढे आपण अलिप्त असतो, तेवढेच प्रत्यक्ष हिंसा बघतानासुद्धा असतो का? हिंसा इतकी अंगवळणी पडली आहे की, समोर घडणारा हिंसक प्रसंग पाहतानाही माणसे अस्वस्थ होत नाहीत? तसे असेल तर त्याचा संबंध ‘मला काय त्याचे’ या मध्यमवर्गीय मानसिकतेशी आहे का? मग एक समूह अथवा समाज या संकल्पनेतील व्यक्तीचे स्थान काय? असे कोडगे होत जाणे याला जगणे तरी कसे म्हणायचे? समाजमाध्यमांच्या प्रभावापायी असे वारंवार घडू लागले काय? तसे असेल तर या माध्यमावर नियमनाची गरज आता वाटते काय? अलीकडच्या काळातील काही घटना व प्रसंग बघितले की कोणत्याही संवेदनशील मनाला असे प्रश्न सहज पडतील. मात्र अलीकडे अनेकांना ते पडेनासे झालेत. इतकी बधिरता योग्य कशी ठरवता येईल? मुंबईला खेटून असलेल्या वसईत दिवसाढवळ्या वर्दळीच्या रस्त्यावर एक माथेफिरू प्रियकर प्रेयसीला मारून टाकतो. ते भयावह दृश्य बघायला मोठी गर्दी जमते. मात्र त्यातल्या कुणालाच त्याला थांबवावे असे वाटत नाही. जमलेेले सारे हा मृत्युदंडाचा प्रकार मूकपणे बघत असतात. हे चांगल्या समाजस्वास्थ्याचे लक्षण कसे मानायचे?

गर्दीत माणूस एकटा असतो, त्यामुळे तो स्वत:ला असुरक्षित समजतो असे मानसशास्त्र सांगते. अशा वेळी एखाद्याने हिंमत दाखवून पुढाकार घेतला तर हीच असुरक्षितता क्षणात नाहीशी होते व त्याचे रूपांतर एकीच्या बळात होते असेही याच शास्त्राचे म्हणणे. याच तर्काचा आधार घेतला तर या गर्दीतील एकालाही पुढाकार घ्यावा असे का वाटले नसेल? माणूस जसजसा प्रगत होत चालला तसतशी भावनांच्या प्रकटीकरण व समायोजनाला खीळ बसली. परस्परसंबंध व शेजारधर्मापासून तो दुरावला. यातून हे घडले असा निष्कर्ष आता काढायचा काय? असे समूहकेंद्री होण्यापासून दूर होत जाणे सुदृढ समाजव्यवस्थेसाठी अपायकारक नाही काय? एखाद्या ठिकाणी अपघात झाला तर जमलेल्या गर्दीतले काही मोजके जखमींना मदत करण्यासाठी पुढे सरसावतात तर बहुसंख्य अपघाताला कारणीभूत ठरलेल्यांना मारहाण करण्यात धन्यता मानतात. अशा पद्धतीने हाताला व्यायाम देऊन ते व्यवस्थेविषयीचा राग व हताशा बाहेर काढत असतात. अशा प्रकरणात अपघाताला कारणीभूत असलेला दुबळा ठरत असतो म्हणूनच अशी हिंमत दाखवली जाते. मात्र हिंसक घटना असेल तर बहुतेक सारे दर्शकाच्या भूमिकेत वावरतात. ही बघ्यांची दुनिया योग्य कशी ठरवता येईल? अगदी काही महिन्यांपूर्वी याच मुंबईजवळ रेल्वेत सुरक्षेसाठी तैनात असलेल्या जवानाने तीन मुस्लीम प्रवाशांना गोळ्या घालून ठार केले. या घटनेकडे बहुसंख्याकवादाचा अतिरेक या दृष्टिकोनातून बघितले गेले, त्या वेळीही डब्यात सत्तरेक प्रवासी होतेच पण कुणीही या जवानाला रोखण्याचा प्रयत्न केला नाही. त्याच्या हाती बंदूक होती व जीव तर प्रत्येकालाच प्यारा असतो असे या भेकडपणाचे समर्थन केले गेले. प्रेयसीला मारणाऱ्या या तरुणाच्या हातात धारदार शस्त्र नव्हते. तरीही गर्दीतील एकालाही अटकावासाठी पुढाकार घ्यावासा वाटल्याचे दिसले नाही. यातून निष्कर्ष हाच निघतो की सार्वजनिक ठिकाणी कितीही गर्दी असली तरी माणूस स्वत:ला एकटा समजत असतो. हे शास्त्रीय दृष्टिकोनातून ठीक असेलही, पण हे एकसंध समाज या कल्पनेलाच छेद देणारे. संकटकाळात आपला कोण व परका कोण हे न बघता मदतीलाही धावून जाण्याची वृत्ती अलीकडे कमी होत चालली. यातून हिंमत वाढते ती गुन्हेगारी प्रवृत्ती जोपासणाऱ्यांची. प्रेयसीला ठार मारण्यासाठी रस्ता निवडला तरी काही फरक पडत नाही. कुणीही मध्ये येणार नाही अशा भावनेला बळ मिळते ते यातून. याला सामाजिक प्रगतीचे लक्षण कसे समजायचे?

मराठीतील सर्व संपादकीय बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta editorial horrific murder in vasai boyfriend stabs girlfriend to death with iron spanner amy
First published on: 22-06-2024 at 03:49 IST