अयोध्येचा होऊ घातलेला कायापालट अन्यत्रही अशा मंदिर उभारणीच्या रेट्यास गती देईल.. पण केवळ धर्मकेंद्र असणे हे सर्वागीण प्रगतीसाठी पुरेसे असते?

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आज २२ जानेवारीस अयोध्येत श्रीराम मंदिराचा उद्घाटन सोहळा. यानिमित्ताने एकंदरच सर्वत्र हिंदू सश्रद्धांच्या आनंदास उधाण आलेले आहे आणि अनेकांच्या मनात स्वप्नपूर्तीची भावना आहे. या स्वप्नपूर्तीच्या श्रेयाचे मानकरी या नात्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याही मनात कृतकृत्यतेची भावना दाटून आली असणार. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि त्यामुळे भाजपची तीन प्रमुख स्वप्ने होती. जम्मू-काश्मिरातून अनुच्छेद ३७० चे उच्चाटन, राम मंदिराची उभारणी आणि समान नागरी कायदा. यातील पहिल्या दोनांची पूर्तता मोदी यांच्या हस्ते झाली आणि तिसऱ्यासही ते निर्विवाद हात घालतील. संघाच्या आणि म्हणून भाजपच्याही विरोधकांस हे सगळे व्यर्थ, निरुपयोगी आणि भावना उद्दीपित करणारे वाटू शकेल. त्यांनी तसे वाटून घेण्यात अगदीच तथ्य नाही असे नाही. तथापि देशातील बहुसंख्यांना आपल्याकडे जाणूनबुजून दुर्लक्ष होते असे वाटत असेल आणि त्या वाटण्यास खतपाणी घालणारी परिस्थिती निर्माण होत असेल तर यातही तथ्य नाही असे म्हणता येणार नाही. धर्म ही संकल्पना व्यक्तिसापेक्ष असते आणि ती त्या त्या व्यक्तीने स्वत:च्या घराच्या उंबरठ्याबाहेर आणू नये हे आदर्श तत्त्व. तथापि काही धर्मीयांबाबत- आणि त्यातही विशेषत: इस्लाम- या आदर्श तत्त्वास सोयीस्कर तिलांजली दिली जाते असे बहुसंख्य हिंदू धर्मीयांस वाटू लागले असेल आणि त्यातून त्यांच्या धर्मभावना अधिक चेतवल्या गेल्या असतील तर ते का, कसे आणि कोणामुळे झाले याचाही विचार यानिमित्ताने केला जाणे आवश्यक ठरेल. समाजकारणात सर्वधर्मसमभाव/ निधर्मिकता अत्यावश्यक याबाबत तिळमात्रही संदेह नाही. तथापि जॉर्ज ऑर्वेलच्या ‘अ‍ॅनिमल फार्म’मध्ये ज्याप्रमाणे कायद्यासमोर सर्व समान असले तरी काही अधिक समान असतात हे सत्य धर्माबाबतही दिसून येत असेल तर कालांतराने त्या धर्मीयांच्या भावनेचा प्रस्फोट होतो. तसा तो आपल्याकडे झाला आणि त्यातून भाजप अधिकाधिक सुदृढ होत गेला. त्या सुदृढतेच्या भावनेचे प्रतीक म्हणजे आज उद्घाटन झालेले अयोध्येतील राम मंदिर.

राम-कृष्ण-शिव या त्रिकुटाचे गारूड भारतीय मनावर किती व्यापक आहे हे उलगडून दाखवणारा राममनोहर लोहिया यांचा लेख ‘लोकसत्ता’ने रविवारी पुनप्र्रकाशित केला. लोहिया हे समाजवादी विचारधारेचे. तरीही राम-कृष्णाचे सांस्कृतिक महत्त्व मान्य करण्याच्या आड त्यांची विचारधारा आली नाही. याचे कारण राम-कृष्ण-शिव आदी ही भारताची सांस्कृतिक प्रतीके आहेत हे त्यांना मान्य होते आणि सांस्कृतिक प्रतीकांस राजकारणात ओढण्याची गरज नसते हा समंजसपणा सर्वमान्य होता त्या काळात ते राजकारणात होते. तो नंतर लोपला. पुढे मूळच्या काँग्रेसवासी असलेल्या हिंदू (हिंदुत्ववादी नव्हे) नेत्यांस स्वत:ची वेगळी चूल मांडण्याची गरज वाटली. अशी हिंदू गरज ही नेहमी प्रतिक्रियारूपी आहे, हे सत्य यानिमित्ताने लक्षात घ्यायला हवे. म्हणजे आधी ‘मुस्लीम लीग’ची स्थापना झाली. हिंदू महासभा आणि रा. स्व. संघ हे नंतर आले. हिंदू महासभा ही ‘मुस्लीम लीग’ निर्मितीची पहिली प्रतिक्रिया. पुढे ही महासभाही पुरेशी हिंदू नाही असे वाटल्याने रा. स्व. संघ तयार झाला. मुसलमानांच्या क्रियेवर हिंदूंची प्रतिक्रिया उमटण्याचा इतिहास आजतागायत तसाच सुरू आहे. यावर ‘ते’ तसे वागले म्हणून ‘आपण’ असे वागावे का, असा प्रश्न उपस्थित होतो. तो योग्यच. पण या प्रश्नाचे उत्तर नाही देण्यास आवश्यक बौद्धिक उंचीवर बहुसंख्य सामान्य कदाचित पोहोचू शकत नसावेत. अशा सर्वास ‘विजय’ दृश्य स्वरूपात असावा लागतो. याचे साधे कारण म्हणजे भक्ती नवविधा असल्याचे हिंदू धर्मच सांगत असला तरी बहुसंख्यांची हयात प्रतीक-पूजेच्या पहिल्या विधी-पायरीवरच संपते. त्यांच्यासाठी अशी प्रतीके आणि त्या प्रतीकांचा ‘विजय’, त्यांची ‘भव्यता’ सुखावणारी असते. ‘उसकी कमीज मेरी कमीज से सफेद कैसे’ ही भावना धर्मक्षेत्रातही असते हे विसरून चालणार नाही.

हे असे हिंदू धर्माच्या तात्त्विक, बौद्धिक विशालतेशी अवगत नसतात. त्यांस ही विशालता कधीही स्पर्शणार नसते. वेदपुराणांच्या गौरवगानात मग्न असलेले भारतीयसुद्धा दार्शनिकतेविषयी, त्यातील प्रश्न विचारण्याच्या महत्तेविषयी अनभिज्ञ असू शकतात. ‘‘हे सर्व निर्माण व्हायच्या आधी काय होते या प्रश्नाचे उत्तर विधात्यासच ठाऊक असेल..’’ असे सांगणारा ऋग्वेद त्याच ओळीत ‘‘..कदाचित त्यालाही हे माहीत नसेल’’, असे म्हणण्यास मागेपुढे पाहात नाही. हिंदू धर्मात अश्रद्धांचाही श्रद्धावानांइतकाच आदर केला जातो आणि नास्तिकासही आस्तिकासारखेच वंदन केले जाते हे या सर्वास माहीतही नसते. त्याच वेळी आपल्या उपेक्षांसाठी परदेशांतून आलेल्या धर्मीयांस- म्हणजे ख्रिश्चन आणि मुसलमानांस- बोल लावताना हिंदू धर्म इतका सर्वसमावेशक होता तरी जैन, बौद्ध वा शीख धर्म या मातीत तयार का झाले हे प्रश्न यांतील अनेकांस पडत नाहीत. खुद्द हिंदू धर्मातील अनेकांवर धर्मत्यागाची वेळ का आली हा प्रश्नही यांतील अनेकांस भेडसावत नाही. अयोध्येत आज राम मंदिराचे उद्घाटन झाल्यानंतर अथवा काशी-मथुरा वा सोमनाथ येथेही अशी भव्य मंदिरे उभारली गेल्यानंतर कदाचित या सगळय़ाची जाणीव होऊ शकेल. या मंदिर निर्मितीमुळे अयोध्येचा होऊ घातलेला कायापालट अन्यत्रही अशा मंदिर उभारणीच्या रेटय़ास गती देईल.

यानिमित्ताने धार्मिक पर्यटनाचे महत्त्व सांगितले जात आहे. ते खरे आहे. संस्कृतीचा विकास धर्मक्षेत्रांभोवती झाला आणि ही धर्मकेंद्रे आर्थिक विकासाची गंगोत्रीही बनली हे खरेच. पण हेही खरे की केवळ धर्मकेंद्र आहे हे निमित्त सर्वागीण प्रगतीसाठी पुरेसे नसते. तसे असते तर मक्का-मदिना ही इस्लामची पवित्र धर्मकेंद्रे सौदी अरेबियास आर्थिक महासत्ता बनवू शकली असती. व्हॅटिकन आणि पोपचे वास्तव्य आहे या केवळ एकाच कारणासाठी इटली इतिहासात महासत्तापदी पोहोचली नाही. धर्मकेंद्रांभोवती धार्मिक सलोख्याचे आणि खऱ्या अर्थी सर्वधर्मसमभावाचे वातावरण सर्वंकष प्रगतीसाठी आवश्यक असते. तसे नसेल तर धर्मकेंद्र हे केवळ त्या त्या धर्मीयांसाठी श्रद्धास्थान इतक्यापुरतेच मर्यादित राहते. रोम आणि मक्का-मदिना यांतील फरक हे सत्य दाखवतो. हॉटेले, बँका, वित्त सेवा, पर्यटन व्यावसायिक यांच्यात सध्या अयोध्यावासी होण्यासाठी दिसून येत असलेली लगबग कौतुकास्पद खरीच. पण तीस धार्मिक सौहार्द, उत्तम पायाभूत सोयी आणि त्याहीपेक्षा सुसंस्कृत वातावरण याचीही जोड मिळत राहील याची दक्षता धोरणकर्त्यांस घ्यावी लागेल. मंदिराच्या उद्घाटनाचा आनंदसोहळा शांत झाला, त्यामागील राजकीय निकड निवली की या मुद्दय़ांकडेही लक्ष देण्यास संबंधितांस उसंत मिळेल.

संस्कृतीच्या अनादी-अनंत प्रवासात एखादी वास्तू उभारणी हा एक टप्पा. असा एखादा टप्पा म्हणजे गन्तव्य स्थान नव्हे. हिंदू श्रद्धावानांसाठी मंदिर उभारणी हा असा एक अर्थातच ‘विजयी’ टप्पा. कोणत्याही विजयाचे आयुष्य आणि गोडवा हे त्यानंतर दिसणाऱ्या उन्मादावर नव्हे तर नम्रतेवर अवलंबून असते. या संदर्भात खुद्द श्रीरामाचे तुलसीरामायणातील वचन उद्धृत करणे प्रसंगोचित ठरेल. प्रभू रामचंद्र जेव्हा विजयी होऊन अयोध्येत सिंहासनावर विराजमान झाले तेव्हा अयोध्यावासीयांस उद्देशून म्हणाले : जौ अनीति कछु भाषौ भाई। तौ मोहि बरजहु भय बिसराई।। सत्तापदी आरूढ झाल्यावर माझ्याकडून अनीतीचे वर्तन/वक्तव्य झाल्यास निर्भयपणे मला विरोध करा, हे खुद्द श्रीरामाचे आवाहन. आजच्या मुहूर्तावर ते लक्षात घेणे महत्त्वाचे.

मराठीतील सर्व संपादकीय बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta editorial inauguration ceremony of shri ram temple in ayodhya construction of ram temple and uniform civil code amy
Show comments