बुद्धिबळपटू हरिका द्रोणावल्लीपुढे आता दोन वैयक्तिक, कौटुंबिक जबाबदाऱ्या आहेत. बुद्धिबळ ऑलिम्पियाड स्पर्धेमुळे पुढे ढकलल्या गेलेल्या आई आणि आजीच्या गुडघेरोपण शस्त्रक्रियांच्या तारखा ठरवून त्या लवकरात लवकर करून घेणे आणि लेक हन्विकाच्या दुसऱ्या वाढदिवसाची तयारी. हरिका ‘परफेक्शनिस्ट’ असल्याने यात कोणतीही हलगर्जी होणार नाही, याची सर्वतोपरी दक्षता तिला घ्यायची आहे; अगदी तशीच, जशी तिने बुद्धिबळ ऑलिम्पियाडच्या निर्णायक सामन्यातील डावात अझरबैजानच्या गुनाय मम्मदझादाशी पांढऱ्या मोहऱ्यांसह खेळताना घेतली होती. अखेरच्या या अकराव्या फेरीत हरिका पहिल्या पटावर खेळत होती आणि तिचा या डावातील विजय महिला संघासाठी फार महत्त्वाचा होता. नागपूरची दिव्या देशमुख, वंतिका अग्रवाल यांनीही विजय मिळवले, तर आर. वैशालीला बरोबरीवर समाधान मानावे लागले. पण तोवर भारतीय महिला संघाचे सुवर्णपदक निश्चित झाले होते. जागतिक बुद्धिबळाच्या पटावरील अत्यंत प्रतिष्ठेच्या बुद्धिबळ ऑलिम्पियाडमध्ये सुवर्णयश संपादन करून भारताने बुद्धिबळविश्वातील महासत्ता होण्याच्या दिशेने भक्कम पाऊल टाकले आहे. यात पुरुष संघाचा खुल्या स्पर्धेतील विजय वर्चस्व सिद्ध करणारा होता, तर खडतर परिस्थितीतून वाट काढत महिला संघाने मिळवलेल्या सुवर्णपदकामुळे या यशाची झळाळी आणखी वाढली.
बुद्धिबळाच्या पटावरील भारताचे हे वर्चस्व खचितच सुखद आहे. एरवी आपण क्रिकेटप्रेमात इतके आकंठ बुडलेले आहोतच. पण नव्या शतकाच्या सुरुवातीपासून ही परिस्थिती धिम्या गतीने बदलू लागली आणि इतरही खेळांना प्रोत्साहन मिळू लागले. त्यात जसा विविध क्रीडाप्रकारांत झालेला नव्या प्रतिभावान खेळाडूंचा उगम हे एक कारण, तर त्यांचा खेळ दाखविणाऱ्या आणि त्याद्वारे तो पाहणारे प्रेक्षक निर्माण करणाऱ्या संपर्क साधनांचा विस्तार हे दुसरे. क्रिकेटपायी या खेळांचा अगदीच अनुल्लेख व्हायचा, तो टळून त्याकडे लक्ष जाण्याइतपत आपलीही प्रेक्षक म्हणून कामगिरी सुधारली आहे. बुद्धिबळासारख्या- पाहण्यासाठीही मोठ्या संयमाची मागणी करणाऱ्या – खेळातील यश साजरे होणे, हे त्या अर्थाने दिलासादायक.
बुद्धिबळ म्हणजे तत्कालीन सोव्हिएत महासंघ, त्यातून फुटलेले देश, रशिया, अमेरिका, हंगेरी आणि अलीकडच्या काळात चीन या प्रबळ देशांची मक्तेदारी. यंदा ती मोडण्याचा पराक्रम करताना भारताने, विशेषत: पुरुष संघाने खुल्या गटात जे वर्चस्व गाजवले, ते पाहून भारतीयांची मान अभिमानाने ताठ होईल. ऑलिम्पियाडमध्ये खेळाव्या लागणाऱ्या ११ फेऱ्यांत जास्तीत जास्त २२ गुण मिळू शकतात, अशा वेळी भारताच्या पुरुष संघाने २१ गुण मिळवून जेतेपद खेचले. आपल्या मागचा दुसरा संघ १७ गुणांवर आहे, हे पाहिल्यावर या यशाची महत्ता अधिक ठसठशीतपणे दिसेल. दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर अनुक्रमे अमेरिका आणि उझबेकिस्तान आहेत, तर चीन चौथ्या क्रमांकावर आहे. पुरुष संघाने ११ पैकी १० फेऱ्या जिंकल्या आणि १ बरोबरीत सोडवली, म्हणजे एकही पराजय न स्वीकारता हे जेतेपद मिळवले, हे आणखी विशेष. महिला संघाचे ११ फेऱ्यांत १९ गुण आहेत, ते पोलंड आणि अमेरिकेविरुद्ध हार पत्करल्यानंतरही जिद्दीने खेळून अखेरच्या फेरीत केलेल्या कामगिरीमुळे आहेत, हे लक्षात घेतले, तर महिला संघाने विजय अक्षरश: खेचून आणला आहे, हे अधोरेखित होईल. एकाच ऑलिम्पियाडमध्ये दोन्ही सांघिक स्पर्धा जिंकण्याचा प्रसंग २०१८ नंतर पहिल्यांदा घडला आणि असे दुहेरी यश आतापर्यंत फक्त तत्कालीन सोव्हिएत महासंघ, रशिया, अर्मेनिया, हंगेरी आणि अमेरिका यांनीच मिळवले आहे. म्हणजे असे वर्चस्व गाजवणारा भारत हा केवळ सहावा संघ आहे.
गेली बरीच वर्षे भारताचा जागतिक बुद्धिबळविश्वातील दबदबा एखाद्या नावापुरता मर्यादित होता. अभिजित कुंटे, रघुनंदन गोखले, प्रवीण ठिपसे, मृणालिनी कुंटे, भाग्यश्री ठिपसे या मराठी नावांची मोहोर बुद्धिबळ पटावर होती. पण, जगज्जेतेपद मिळवल्याने विश्वनाथन आनंद हे त्यातील सर्वांत ठळक. मराठी जनांसाठी अभिमानाची गोष्ट म्हणजे जयश्री खाडिलकर यांनी १९७९ मध्ये महिला इंटरनॅशनल मास्टरचा मिळवलेला किताब. भारताने आतापर्यंत ८४ ग्रँडमास्टर निर्माण केले. विश्वनाथन आनंद हा पहिला. म्हणजे सगळे ग्रँडमास्टर घडले आहेत, ते गेल्या साडेतीन दशकांत. आनंदचे महत्त्व अधिक, कारण बुद्धिबळातही कारकीर्द होऊ शकते, यावर अनेकांचा विश्वास त्याला पाहून बसला. ज्या पुरुष भारतीय संघाने यंदाच्या ऑलिम्पियाडमध्ये जेतेपद मिळवले, त्यातील अर्जुन एरिगसी, डी. गुकेश, आर. प्रज्ञानंद हे जेमतेम विशीत आहेत, तर २०१८ मध्ये ‘लोकसत्ता तरुण तेजांकित’ने सन्मानित झालेला नाशिकचा विदित गुजराथी आता तिशीत. आनंद हा या सगळ्यांची कोणत्या ना कोणत्या टप्प्यावर प्रेरणा. आनंद ग्रँडमास्टर झाला, तेव्हा यापैकी कुणाचा जन्मही झाला नव्हता. आज आनंद त्यांचे तोंड भरून कौतुक करण्यासाठी पुढे आला आहे. ‘ऑलिम्पियाडमध्ये कोणत्याही संघाने यापूर्वी असे वर्चस्व गाजवल्याचे माझ्या तरी स्मरणात नाही,’ हे आनंदचे उद्गार बुद्धिबळातील आपले भविष्य किती उज्ज्वल आहे, याची साक्ष देणारे आहेत.
सारे जग आश्चर्यमिश्रित कौतुकभरल्या नजरांनी भारतीय संघाकडे पाहते आहे आणि त्यात महिला संघाचीही प्रशंसा करावी तेवढी थोडीच आहे. कोनेरू हम्पी पहिली भारतीय महिला ग्रँडमास्टर झाली, ती एकविसाव्या शतकाच्या अगदी सुरुवातीला. त्याला दोन दशके होत असताना आपण जागतिक दर्जाच्या स्पर्धेत जेतेपद मिळवणे खूपच प्रशंसनीय. हम्पी या वेळच्या ऑलिम्पियाडमध्येही खेळली असती, पण वैयक्तिक कारणांसाठी तिने माघार घेतली. त्या वेळी महिला संघात अनुभवी बुद्धिबळपटू हवी, म्हणून प्रशिक्षक अभिजित कुंटे यांनी हरिकाला विनंती केली आणि तिनेही ती मान्य करून संघाच्या यशात आपला अनुभव पणाला लावला. हरिका आपल्या दोन वर्षांच्या मुलीशी स्पर्धेदरम्यान दूरध्वनीवरून बोललीही नाही, ते खेळताना भावनाशीलता बाजूला राहावी म्हणून. तिच्या या समर्पित वृत्तीला जेतेपदापेक्षा मोठे पारिश्रमिक काय असू शकते? महिला संघातील वैशालीसाठीही हे यश असेच मोठे, कारण पुरुष संघातील प्रसिद्ध बुद्धिबळपटू प्रज्ञानंदची बहीण यापेक्षा तिला तिची स्वतंत्र ओळख हवी होती, ती यामुळे मिळाली आहे. यंदाच ‘लोकसत्ता तरुण तेजांकित’ ठरलेल्या नागपूरच्या दिव्या देशमुखने तर सुवर्णपदक जिंकून सांघिक यशाला वैयक्तिक कामगिरीचीही सोनेरी किनार जोडली आहे.
बुद्धिबळ हा अस्सल भारतीय खेळ, पण रशिया आणि तत्कालीन सोव्हिएत महासंघ, तसेच पूर्व युरोपातील देशांनी वर्षानुवर्षे त्यावर अधिराज्य गाजवले. अमेरिकाही फार मागे राहिली नाही आणि चीननेही गेल्या काही काळात मुसंडी मारली. एकच घर पुढे सरकणाऱ्या प्याद्यापासून तिरकी चाल करणारा उंट, अडीच घरे उड्या मारणारा घोडा आणि कसाही सरकू शकणाऱ्या वजिरापर्यंतचे मोहरे खेळवणारे बुद्धिबळ शीतयुद्धाच्या काळात हेरगिरीपर्यंत जाऊन पोहोचले होते. अलीकडच्या काळात ‘नेटफ्लिक्स’वरच्या ‘क्वीन्स गॅम्बिट’ या मालिकेमुळे या खेळाला वलय आले आणि नंतर त्याची महिलांचा बुद्धिबळातील सहभाग ते त्यांच्या पेहरावावरून व्यक्त केली जाणारी मते, अशा विविधांगाने चर्चा होऊ लागली. पण, त्याहीपेक्षा महत्त्वाचे होते ते भारताने या खेळात सांघिक जेतेपद मिळवणे. ते आता साध्य झाले आहे. अखिल भारतीय बुद्धिबळ महासंघाने संघांना सव्वातीन कोटींचे पारितोषिक जाहीर केले, तेही औचित्याचे. कृत्रिम प्रज्ञेच्या आजच्या प्रभावकाळातही मानवी बुद्धीच्या लखलखण्याला इतके मोठे जागतिक परिमाण आहे आणि त्यात भारत अग्रेसर आहे, हे सुचिन्ह.