तालिबान ही एक जगातील कुख्यात धार्मिक अतिरेकी संघटना. मुल्ला ओमर हा एकाक्ष दहशतवादी, गुलबुद्दीन हिकमत्यार, रशीद दोस्तम असे एकापेक्षा एक- गुंड जगातील शब्द वापरावयाचा तर-‘नामचीन’ दहशतवादी या संघटनेशी संबंधित होते वा त्यांनी या संघटनेचे नियमन केले होते. गुलबुद्दीन हिकमत्यार हा त्याचे राजकीय विरोधक, इस्लामी नियमांचे पालन न करणारे, महिला इत्यादींना जिवंतपणी मोटारीच्या मागे बांधून फरपटवत मारत असे तर दोस्तम हा व्यक्तीस जिवंत ठेवून त्याची त्वचा सोलून काढण्यात माहीर होता. ‘तालिबान’ची सत्ता आल्यानंतर काबूल आदी शहरांतील परिसरांतील स्टेडियमवर धार्मिक बंडखोरांस दगडाने ठेचून मारण्याचा जाहीर सोहळा होत असे आणि त्यासाठी सर्वांस आमंत्रण असे. त्या देशातील बामियान येथील भव्य आणि अप्रतिम बुद्धमूर्ती पाडण्याचे पापही याच तालिबानचे. आपले ‘आयसी १८४’ हे विमान अपहरणानंतर दहशतवाद्यांनी काबूल येथे नेले याचे कारण या दहशतवाद्यांना ‘तालिबान’चे अभय आणि आधार होता म्हणून. सत्ता हाती आल्यावर स्थापन झालेल्या ३३ सदस्यीय तालिबानी ‘मंत्रिमंडळातील’ १८ जण हे अधिकृतपणे दहशतवादी म्हणून घोषित केले गेलेले होते/आहेत आणि त्यातील एकास जिवंत अथवा मृत पकडून देणाऱ्यास कोट्यवधी डॉलर्सचे इनाम आजही आहे. त्या सरकारचा खुद्द म्होरक्या मौलाना हैबतउल्लाह अखुंडझादा यास संयुक्त राष्ट्र संघाच्या सुरक्षा परिषदेने आंतरराष्ट्रीय दहशतवादी जाहीर केलेले आहे. चित्रपट बंदी, स्त्रीशिक्षण बंदी, महिलांस बुरखा आदी धोरणांनी इतिहासाचे चाक उलट फिरविणारीही तालिबानच. अशा या तालिबान संघटनेकडे अफगाणिस्तानची सत्ता अधिकृतपणे आली आणि तीस दहशतवादी संघटना ठरवून बंदी घाला असे म्हणणाऱ्या सर्वांचीच पंचाईत झाली. एकेकाळी बिल क्लिंटन प्रशासनातील मेडेलिन ऑलब्राईट यांच्यासारख्या खमक्या मंत्री ‘तालिबान’च्या नायनाटासाठी जातीने प्रयत्न करत. त्या डेमॉक्रॅटिक पक्षाच्या. तथापि त्याच तालिबानशी ‘एन्रॉन’च्या व्यावसायिक हितासाठी रिपब्लिकन पक्षाच्या जॉर्श बुश यांनी करार केला आणि तालिबानच्या अतिरेक्यांस टेक्सास राज्यातील आपल्या शेतघरी पाहुणचारही करवला. जबरदस्तीने, सक्तीने सत्ता काबीज करणाऱ्या कोणत्याही अफगाण सरकारला भारत पाठिंबा देणार नाही, असे सणसणीत विधान इतरांच्या सुरात सूर मिसळत भारताने १३ ऑगस्ट २०२१ या दिवशी केले आणि दुसऱ्या दिवशी तालिबानच्या हाती अफगाणिस्तानची सत्ता आली. हा सारा इतिहासाचा काळा कोळसा आता नव्याने उगाळण्याचे कारण म्हणजे भारत सरकारने अधिकृतपणे पहिल्यांदा केलेली औपचारिक चर्चा. हे पुरोगामी पाऊल उचलल्याबद्दल नरेंद्र मोदी सरकारचे अभिनंदन.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा