हमास पराभूत होईल; हे निश्चित. युद्धात इस्रायलच जिंकेल; पण नेतान्याहूंच्या नेतृत्वाच्या मर्यादा अधिकच उघड होतील..

बरोबर ५० वर्षांपूर्वी ६ ऑक्टोबर १९७३ या दिवशी इजिप्तच्या अन्वर सादात यांच्या नेतृत्वाखालील अरब आघाडीने इस्रायलला पूर्णपणे बेसावध गाठून त्या देशावर हल्ला केला. इस्रायलच्या तत्कालीन पंतप्रधान गोल्डा मायर या हल्ल्याने गडबडल्या. पण अमेरिकेच्या सक्रिय पाठिंब्याच्या जोरावर त्यांनी हे युद्ध अंतिमत: जिंकले. ‘योम किप्पूर युद्ध’ नावाने इतिहासात नोंदल्या गेलेल्या या युद्धाने इस्रायलच्या गुप्तचर यंत्रणेची अब्रू धुळीस मिळवली. त्यानंतर अर्धशतकाने योम किप्पूर युद्धाच्या पन्नासाव्या श्राद्धदिनी, त्या वेळच्या इजिप्तपेक्षा कित्येक पट लहान, अशक्त अशा ‘हमास’ या संघटनेने त्यावेळपेक्षा कित्येक पट मजबूत, सशक्त आणि सदा-युद्धसज्ज इस्रायली गुप्तचर यंत्रणेच्या अब्रूची लक्तरे शब्दश: वेशीवर टांगली. या हल्ल्याने इस्रायलचे अत्यंत भ्रष्ट, युद्धखोर आणि बेमुर्वतखोर पंतप्रधान बिन्यामिन नेतान्याहू यांची मिजास तर उतरवलीच; पण आपली यंत्रणा, क्षेपणास्त्रविरोधी जाळे अभेद्य आहे हा इस्रायलचा दावा किती पोकळ ठरतो हेदेखील ‘हमास’ने दाखवून दिले. असे काही होईल याची कोणतीही कल्पना नसलेल्या इस्रायलला ‘हमास’ने चक्क पेंगताना पकडले आणि इलेक्ट्रॉनिक देखरेख, २४ तासांचा खडा पहारा, सर्वदूर असलेले खबऱ्यांचे जाळे प्रसंगी नाकाम करता येऊ शकते हे दाखवून दिले. गेल्या पन्नास वर्षांत इस्रायलला इतक्या मानहानीकारक घुसखोरीस सामोरे जावे लागले नव्हते. ‘हमास’ने ते करून दाखवले. याची किंमत इस्रायलपेक्षा किती तरी प्रमाणात अधिक ‘हमास’ला मोजावी लागेल हे खरे. इस्रायली यहुदींपेक्षा किती तरी अधिक पॅलेस्टिनी यात प्राणास मुकतील हेही खरे. यात अंतिम विजय इस्रायलचा होईल हे तर खरेच खरे. पण इतके विजयी होऊनही या युद्धात अपमानित, पराजयी होतील ते इस्रायलचे पंतप्रधान बिन्यामिन नेतान्याहू आणि त्यांच्यासमवेत हा पराभव असेल शस्त्रसज्जतेचे पौरुष हेच सर्व समस्यांवर उत्तर असे मानणाऱ्या विचारांधळय़ा इस्रायली समर्थकांचा.

Crime NEws
कुवैतहून थेट मध्य प्रदेश गाठलं अन् मुलीवर लैंगिक शोषण करणाऱ्याचा घेतला जीव; मृत्यूचं गुढ उकलायला वडिलांनीच केली मदत!
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
syria civil war marathi news
सीरियातील अचानक सत्ताबदलाने कुणाला काय मिळणार? रशिया-इराणचे नुकसान कसे? तुर्कीये-इस्रायलचा फायदा कसा?
challenges in front of Syria
सीरियातील आव्हाने संपणार कशी?
Bashar al-Assad
Bashar al-Assad: सीरियाचा नेता की क्रूर राजवटीचा चेहरा? बशर अल-असद कोण आहे?
Syria Civil War
Syria Crisis: “सीरीया शुद्ध होत आहे”; असद यांची राजवट उलथवल्यानंतर बंडखोरांचा नेता अबू जोलानीची मोठं वक्तव्य
Syria, Abu Mohammad Al Jolani, dictatorship Syria,
विश्लेषण : जिहादीचा बनला प्रशासक… कोण आहे सीरियाचा नवा शासक अबू मोहम्मद अल जोलानी?
President Bashar al Assad forces defeated in parts of Syria
सीरियावर बंडखोरांचा ताबा… अध्यक्ष बशर अल असद परागंदा… नेमके काय घडले? अमेरिका, रशिया, इराण, तुर्कीयेचा काय संबंध?

याचे कारण असे की नेतान्याहू यांच्या सरकारने गेली काही वर्षे पॅलेस्टिन, गोलान टेकडय़ा आदी परिसरांत कमालीची दांडगाई चालवलेली आहे. त्याआधी अरब आणि पॅलेस्टिनींनी इस्रायलला एकतर्फी लक्ष्य केले होते हे खरे. त्याचाच सूड इस्रायलने उगवला आणि त्यातूनच द्विराष्ट्रवाद सिद्धान्त मांडला गेला. पॅलेस्टिनींनाही त्यांची हक्काची भूमी देण्याचा तोडगा ही यातील समेटाची परिणती. तथापि यित्झाक रॅबिनसारखा एखादा पंतप्रधान वगळता अन्य फारच कमी इस्रायली सरकारांनी या द्विराष्ट्र तोडग्याचा आदर राखला. यात सर्वात मोठा अडथळा होते ते अतिकडवे यहुदी. हे कडवे यहुदी ही इस्रायलची सर्वात मोठी डोकेदुखी आजही आहे. अन्य कोणा इस्रायलीप्रमाणे या कडव्या धर्मवाद्यांस ना सक्तीची लष्करी सेवा असते ना असतात अन्य नागरिकांची बंधने. ही मंडळी इतकी दुराग्रही की त्यांच्या प्रचारात वाहून गेलेल्याने पंतप्रधान रॅबिन यांच्यासारख्या नेमस्त नेत्याची हत्या केली. जितकी जमेल तितकी संतती प्रसवण्यात मशगूल अशा या अतिकडव्या यहुदींस म्हणून शहाणी सरकारे चार हात दूर ठेवतात. विद्यमान पंतप्रधान नेतान्याहू हे अर्थातच अशा शहाण्यांत मोडत नाहीत. आपले सरकार राखण्यासाठी आणि त्याहीपेक्षा मुख्य म्हणजे स्वत:वरील भ्रष्टाचाराची प्रकरणे धसास लागू नयेत यासाठी या नेतान्याहू यांनी स्वधर्मीय अतिरेक्यांस जवळ केले. त्यातूनच मंत्रिमंडळात घेण्याचीही अजिबात लायकी नसलेल्या इतमार बेन-ग्विर यांच्यासारख्यांकडे नेतान्याहू सरकारात अंतर्गत संरक्षण खाते दिले गेले. या धर्ममरतडी मंत्र्यांचे प्रशासन ज्ञान शून्य आणि त्याहूनही दिव्य त्यांची संरक्षण समज. हे अतिकडवे मंत्री गेले काही महिने यहुदी-पॅलेस्टिनी संघर्ष कसा पेटेल आणि पेटल्यावर त्या आगीत आपली धर्मपोळी कशी भाजून घेता येईल याच उद्योगात मग्न होते.

त्यामुळेच सागरी, हवाई आणि भू अशा तीनही मार्गाने ‘हमास’ घुसखोरीची तयारी करीत आहे याचा अंदाजही या सरकारला आला नाही. ही जेरुसलेमच्या परिसरातील अल अक्सा मशिदीच्या परिसरात होणारी नेहमीची चकमक नाही. हे ‘हमास’ने इस्रायलच्या विरोधात अत्यंत नियोजनपूर्व असे छेडलेले युद्धच आहे. त्यामुळेच हे हल्ले सुरू झाल्या झाल्या गांगरून गेलेल्या यहुदी नागरिकांनी रस्त्यांवर उतरून समाजमाध्यमांतून ‘सरकार कोठे आहे’ असा संतप्त सवाल केला. इतक्या बेसावधपणाची यहुदींना सवय नाही. त्यात सतत सरकारची पोकळ मर्दुमकीची भाषा. जोडीला पॅलेस्टिनी सरकार आणि प्रशासनात ‘पेगॅसस’सारख्या हेरगिरी-सॉफ्टवेअरच्या साहाय्याने इस्रायली सुरक्षा यंत्रणेने केलेली घुसखोरी. त्यामुळे पॅलेस्टिनींच्या प्रत्येक हालचालींवर लक्ष ठेवणे इस्रायलला शक्य होत होते. तरीही इतका नियोजनबद्ध हल्ला त्या देशावर होऊ शकला. त्यानंतर ‘‘हे युद्ध आहे’’ अशी गर्जना करत पंतप्रधान नेतान्याहू यांनी शड्डू ठोकले खरे. पण तोपर्यंत त्या देशाच्या संरक्षण यंत्रणेची जी जायची ती अब्रू गेली ती गेलीच. संरक्षणमंत्री योआव गालंट यांच्यासारख्यांच्या विरोधात समाजमाध्यमांतून निषेधाचा सूर याप्रसंगी निघाला तो यामुळेच. ‘हमास’चा हल्ला आणखी एका कारणासाठी इस्रायलसाठी अत्यंत लाजिरवाणा ठरतो. तो म्हणजे अनेक इस्रायली नागरिक आणि जवान यांना ‘हमास’ने ओलीस ठेवले असून त्यांचे जीवित सुरक्षित राखणे हा राजकीय देवाणघेवाणीत कळीचा मुद्दा असेल. आपले अत्याधुनिक शस्त्रसज्ज, प्रशिक्षित सैनिक ‘हमास’सारखी दहशतवादी संघटना ओलीस ठेवते याइतकी लाजिरवाणी घटना नेतान्याहू सरकारसाठी अन्य कोणती नसेल.

या युद्धाचे परिणाम गंभीर असतील. त्या परिसरासाठी आणि जागतिक पातळीवरही. अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांच्यापासून ते ब्रिटिश पंतप्रधान ऋषी सुनक यांच्यापर्यंत अनेकांनी या युद्धाबद्दल भाष्य केले. या देशांतील तगडे यहुदी दबावगट लक्षात घेता इस्रायलच्या मदतीसाठी या सर्वास काही ना काही करावे लागेल हे ओघाने आलेच. तथापि अमेरिकेत रिपब्लिकन सत्तेवर नाहीत आणि बायडेन व नेतान्याहू यांचे संबंध तितके सौहार्दाचे नाहीत. हे बायडेन उपाध्यक्षपदी असताना त्यांच्या इस्रायली दौऱ्यात त्यांच्या नाकावर टिच्चून नेतान्याहू यांनी पॅलेस्टिन प्रदेशांत घुसखोरी करण्याचे औद्धत्य दाखवले होते. त्या वेळचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी उर्मट नेतान्याहू यांना कधीही भीक घातली नाही आणि आपल्या देशाच्या परंपरेप्रमाणे ते जेरुसलेमच्या तीर्थस्थळी नतमस्तक होण्यासही गेले नाहीत. नंतरच्या ट्रम्प यांच्यासारख्यांनी जेरुसलमेच्या वादग्रस्त परिसरात अमेरिकी दूतावास वसवण्याचा निर्लज्जपणा दाखवला होता. त्यांच्यासारख्यांमुळे नेतान्याहू यांची भीड चेपली आणि मूळची बेमुर्वतखोरी अधिक वाढली. या नेतान्याहूंनी सध्या आपण कोणी शांतीदूत असल्याच्या थाटात सौदी अरेबिया, इराण आदींशी व्यापारी करारमदार करण्यास सुरुवात केली होती. अलीकडे व्यापारी संधींमार्फत प्रतिपक्षास शांत करण्याचा नवा प्रकार देशोदेशींचे हुकुमशाहीवृत्तीचे राज्यकर्ते करताना दिसतात. नेतान्याहू यांनी तेच केले. ‘हमास’चे हे युद्ध या व्यापारी करारांस आव्हान निर्माण करते. हे इस्लामी देश व्यापारसंधींच्या मोहात किती प्रमाणात ‘हमास’कडे दुर्लक्ष करतात यावर या लढाईची लांबी-रुंदी अवलंबून राहील.

यामुळे अर्थातच युद्धाच्या निकालावर काडीचाही परिणाम होणार नाही, हे नक्की. विजय अंतिमत: इस्रायलींचाच होईल. तो देश पराभूत होणे अमेरिकेस परवडणारे नाही. तेव्हा नेतान्याहू यांना विकट विजयी हास्य करता येईल. धर्मातिरेकी हमासने आपल्यापेक्षा अतिरेकी आणि समर्थ धर्मवेडय़ांस आव्हान दिलेले आहे. हमास पराभूत होईल; हे निश्चित. पण ‘बिबी’ ऊर्फ बिन्यामिन नेतान्याहू यांच्या ढासळत्या कारकीर्दीतील हा पुलवामा क्षण त्यांच्या नेतृत्व मर्यादा उघड केल्याखेरीज राहणार नाही, हेही निश्चित. या धर्मवेडय़ांच्या संघर्षांत हकनाक मरणे हे मातृभूमीही नसलेल्या पॅलेस्टिनींचे प्राक्तन. ते बदलण्याची ताकद आधुनिक जगात नसणे हे मानवतेचे दुर्दैव. ‘हमास’चा हल्ला ते अधोरेखित करतो.

Story img Loader