नारी सन्मान, स्थलांतरितांचे हक्क आदींवर प्रवचने झोडणाऱ्या डेमोक्रॅटिक पक्षास हे तत्त्वज्ञान प्रत्यक्षात आणण्याची सुसंधी हॅरिस यांच्या उमेदवारीने मिळेल…
कोणत्याही यशाचा लाभांश हा अनंत काळ मिळवता येत नाही. अर्थशास्त्रातील ‘लॉ ऑफ डिमिनिशिंग रिटर्न्स’ हा सिद्धान्त जगण्याच्या सर्वच क्षेत्रांस लागू होतो आणि त्यास राजकारण अपवाद नाही. हे शहाणपण अखेर अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांस लक्षात येऊन त्यांनी अध्यक्षीय निवडणुकीतून माघार घेतली; हे उत्तम झाले. नपेक्षा नागरिकांनी मतदानातून बायडेन यांचा ‘अहं’ वाढल्याचा संदेश दिला असता आणि बायडेन हे स्वत:बरोबर पक्षाच्याही नामुष्कीस कारणीभूत ठरले असते. आपल्या यशास आता ओहोटी लागलेली आहे याचे भान नेतृत्व करणाऱ्यांस असावे लागते. ते तसे नसेल तर पक्षाच्या धुरीणांनी तरी अशा आत्मसुखी रममाण नेतृत्वास ‘आता आटपा’ असा संदेश द्यावा लागतो. हे दोन्ही घडले नाही तर हा निरोप मतदार देतातच देतात हा जगभरातील लोकशाहीचा इतिहास आहे. त्याची पुनरावृत्ती अमेरिकेत होता होता टळली आणि आत्मभानामुळे असेल/नसेल पण पक्षाच्या ज्येष्ठ धुरीणांनी टोचल्यामुळे का असेना अखेर बायडेनबाबांनी अध्यक्षीय निवडणुकीतून माघार घेतली. कितीही आव आणायचा प्रयत्न करून पाहिला तरी त्यांचे वय काही लपत नव्हते. मंदावलेली देहबोली, घसरते शब्द आणि वरचेवर दगा देऊ लागलेली स्मरणशक्ती असा नकारात्मकतेचा त्रिवेणी संगम त्यांच्या ठायी जुळून आला होता. तेव्हा झाली तेवढी शोभा पुरे असे अखेर त्यांना वाटले. ढकलून बाहेर काढण्याची वेळ येण्यापेक्षा स्वत:हून काढता पाय घेण्यात नेहमीच शहाणपण असते. ते दिसले. तसे करता करता बायडेन यांनी उपाध्यक्षा कमला हॅरिस यांचे नाव अध्यक्षपदाच्या शर्यतीत जाहीर करून अपेक्षित खेळी खेळली. यापुढे चर्चाकेंद्री असतील कमला हॅरिस. अन्य कोणत्याही व्यक्तीप्रमाणे हॅरिस यांस काही मुद्दे अनुकूल आहेत तर काही प्रतिकूल. या निमित्ताने त्यांचा परिचय करून घ्यायला हवा.
हॅरिस यांची सर्वात जमेची बाजू असेल ती अफ्रिकी महिला मतदार. हा वर्ग याआधीही त्यांच्या मागे होता. आता तो अधिक मजबूत होईल. कारण हॅरिस यांचे ‘कमला’ असण्याइतकीच त्यांची स्थलांतरितांबाबतची भूमिका. डेमोक्रॅटिक पक्ष हा डोनाल्ड ट्रम्प यांच्या रिपब्लिकन पक्षाप्रमाणे स्थलांतरितांविरोधी नाही. अमेरिका, इंग्लड या देशांच्या स्थलांतरस्नेही धोरणांचा स्वत: फायदा घेऊन त्या देशांत जम बसवायचा आणि इतरांसाठी मात्र दरवाजे बंद करायचे असा ब्रिटनच्या प्रीती पटेल, सुएला ब्रावरमन इतकेच काय ट्रम्प यांच्यासारखेही दुटप्पी राजकारण हॅरिस यांचे नाही. ट्रम्प यांच्या विद्यामान अर्धांगिनी या स्थलांतरित आहेत आणि हा गृहस्थ इतरांस अमेरिकेत येऊ नका म्हणतो. ट्रम्प यांनी उपाध्यक्षपदासाठी निवडलेल्या साथीदाराची पत्नी स्थलांतरित आहे आणि अमेरिका ही स्थलांतरितांची स्वप्नपूर्ती करणारी भूमी आहे असे त्या उघड म्हणतात. आणि त्यांचा पती बरोबर विरोधी भूमिका घेतो. तेव्हा अशा ‘अमेरिकन ड्रीम’चे जिवंत उदाहरण असणाऱ्या हॅरिस या गटास अधिक आपल्या वाटतील. आणखी एका मुद्द्यावर महिला मतदारांस त्या जवळच्या वाटतील.
गर्भपात हा तो मुद्दा. या विषयावर रिपब्लिकन पक्षाची भूमिका अत्यंत कर्मठ धर्मवादी आहे आणि स्त्रियांच्या हक्कांचा संकोच करणारी आहे. आपली पुरुषी मानसिकता हा वर्ग ‘प्रो लाइफ’ अशा गोंडस नावाखाली लपवून गर्भपाताच्या हक्कांस विरोध करतो. आपल्या देहावरील अधिकार धर्म, संस्कृतीच्या नावाखाली अन्य कोणा हाती देणे कोणत्याही शहाण्या महिलेस मान्य असणार नाही. हॅरिस या अशा शहाण्या महिलांचे प्रतिनिधित्व करतात. त्यामुळे त्यांचा आणि पुरोगामी विचारांच्या पुरुषांचाही पाठिंबा त्यांना सहज मिळेल. तसेच ट्रम्प यांची महिलांबाबतची मते किती वाह्यात आहेत हेही सर्व जाणतात. ट्रम्प यांच्यातील या विकृत स्त्रीदेहलोलुप पुरुषास हॅरिस यांनी वकील या नात्याने याआधी धडा शिकवलेला आहे. म्हणजे हॅरिस यांच्या स्त्री-हक्कवादी भूमिकेस प्रत्यक्ष कृतीची जोड आहे. ती असल्याने त्यांच्यावर कोणत्या टोकास जाऊन टीका करायची याची नैसर्गिक मर्यादा ट्रम्प यांच्यावर येईलच येईल. स्त्री-राजकीय प्रतिस्पर्ध्यावरील टीकेचे भान राखले नाही तर काय होते याचे अनंत धडे लोकशाहीत सापडतील. आता हॅरिस यांच्या मर्यादांविषयी.
हे पण वाचा- कमलाची ओळख!
त्या ‘गोऱ्या’ नाहीत हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा. त्यांचे ‘गौरेतर’ असणे हे वाढत्या संकुचितवादात अडचणीचे ठरू शकते. या अपंगत्वावर त्या उपाध्यक्षपदाचा उमेदवार गौरवर्णीय घेऊन मात करू शकतात. किंबहुना राजकीय संतुलनासाठी तसे त्यांना करावे लागेल. दुसरी बाब अधिकाधिक स्वपक्षीयांस त्यांना जिंकून घ्यावे लागेल. एरवीच्या प्रथेप्रमाणे हॅरिस यांनी ही उमेदवारी जिंकून मिळवलेली नाही. अध्यक्षीय उमेदवाराने ऐनवेळी माघार घेतल्याने त्यांना पदोन्नती मिळून त्या अध्यक्षीय उमेदवार बनल्या. नेहमीच्या स्पर्धेतून यश मिळवणे केव्हाही श्रेयस्कर असते. कारण त्यामुळे कर्तृत्व, क्षमता आदींविषयी संशय राहात नाही. हॅरिस यांच्याबाबत तो राहील. त्यामुळे तो दूर करण्यासाठी त्यांना विशेष प्रयत्न करावे लागतील आणि हे सर्व १७ ऑगस्टच्या आत संपवावे लागेल. डेमोक्रॅटिक पक्षाचे अधिवेशन त्या दिवशी सुरू होईल. ते होताना पक्ष एकसंधपणे आपल्यामागे उभा आहे हे त्यांना दाखवावे लागेल आणि त्यासाठी या अधिवेशनास येणाऱ्या सुमारे साडेचार हजार प्रतिनिधींतील बहुसंख्यांस आपल्याकडे वळवावे लागेल. हे खरे आव्हान. ते पेलण्याची इच्छा आणि झपाटा आपल्यात आहे हे तरी त्यांनी लगेचच दाखवून दिले. बायडेन यांनी माघार घेतल्या घेतल्या जवळपास अर्धा डझनांहून अधिक राज्यांच्या डेमोक्रॅटिक गव्हर्नरांशी त्यांनी संपर्क साधला आणि त्यांचा पाठिंबा मिळवला. बिल आणि हिलरी क्लिंटन यांनीही आपण हॅरिस यांच्यामागे उभे असल्याचे जाहीर केले. ही मोठी बाब. तथापि बराक ओबामा आणि दोन-पाच गव्हर्नरांनी हा कमला राग आळवण्यात तितकी उत्सुकता दाखवलेली नाही. काहींनी लढतीतून आपला उमेदवार पुढे यावा अशी इच्छा व्यक्त केली. म्हणजे हॅरिस यांस बसल्या जागी, आयती उमेदवारी दिली जाऊ नये असा त्याचा अर्थ. त्यात गैर काही नाही.
तथापि तितका वेळ डेमोक्रॅटिक पक्षाकडे नाही. निवडणुकीसाठी जेमतेम तीन महिने आहेत. इतक्या काळात ही संपूर्ण प्रक्रिया पूर्ण होणे अवघड. तेव्हा प्रक्रियेचा आग्रह धरून मूळ परीक्षेकडे दुर्लक्ष करायचे आणि रिपब्लिकन पक्षास परिस्थिती अनुकूल करायची किंवा काय याचा निर्णय डेमोक्रॅटिक पक्षीयांस घ्यावा लागेल. म्हणजे आपापसांत संघर्ष करावयाचा की ट्रम्प यांना रोखण्यास प्राधान्य द्यावयाचे हा प्रश्न. एरवी डेमॉक्रॅटिक पक्षास मानवी मूल्ये, नारी सन्मान, स्थलांतरितांचे हक्क इत्यादींवर जगास प्रवचने देणे आवडते. हे आपले तत्त्वज्ञान प्रत्यक्षात आणण्याची सुसंधी त्या पक्षासमोर आहे. खेरीज बायडेन यांची हेटाळणी ‘वयस्कर’ अशी करणाऱ्या ट्रम्प यांच्यापेक्षा ५९ वर्षीय कमला हॅरिस या तुलनेते तरुण ठरतात. म्हणजे त्या आघाडीवरही ती जमेची बाजू. अशा सर्व जमेच्या बाजूंची बेरीज करण्याचे शहाणपण हा पक्ष दाखवणार का, हा प्रश्न. या शहाणपणाच्या मार्गावरचा पहिला, बायडेन यांना ‘बाय बाय’ करण्याचा टप्पा या पक्षाने ओलांडला. आता हा दुसरा. त्यासाठी त्या पक्षास कमला पसंत कराव्या लागतील. तो पक्ष हे करणार का यावर त्या पक्षाच्या आणि अमेरिकेच्याही राजकारणाचा पोत अवलंबून असेल.