न्यायदेवतेच्या डोळ्यांवरील पट्टी काढल्याचा आनंदीआनंद भारतवर्षात पसरला आहे. आता या न्यायदेवतेला सारे काही दिसू लागेल, अशी आशा व्यक्त केली जाते आहे. यास निमित्त आहे ते सर्वोच्च न्यायालयातील ‘न्यायाधीश ग्रंथालया’च्या एका कोनाड्यात न्यायदेवतेची मूर्ती म्हणून आता एक पांढरीशुभ्र शिल्पकृती ठेवली गेल्याचे. ती कोणी ठेवली, कोणी घडवली याबद्दल काहीही अधिकृतपणे सांगितले जात नसले तरी ही मूर्ती आताच चर्चेत आली आहे, एवढे खरे. तिच्या अंगावर साडी आहे- नेसणे राजा रविवर्मा यांच्या चित्रांतल्या देवींसारखे, चेहरा तसाच आणि डोईवरील महिरपी मुकुटही भारतीय शैलीचाच- असे रूप असलेल्या या मूर्तीच्या एका हातात तराजू असला तरी दुसऱ्या हातात राज्यघटना आहे- भारताचे संविधान. ही मूर्ती शत-प्रतिशत भारतीय न्यायदेवतेची आहे, हे आता निराळे सांगावेच लागणार नाही. ती इतकी पांढरीशुभ्र आहे की, तूर्तास घाईघाईने प्लास्टर ऑफ पॅरिसमध्ये घडवलेले ते प्रारूप असावे. पुढे कदाचित त्याआधारे धातूच्या मूर्ती घडवल्या जातील मग तशाच आणखीही मूर्ती घडतील, त्यातल्या काही मूर्ती बाजारात विक्रीसाठी उपलब्धसुद्धा असतील आणि पैसेवाले त्या विकतही घेतील… हे होईल तेव्हा होईल. तूर्तास मीडियात आणि व्हॉट्सअॅप, फेसबुकादि समाजमाध्यमांत या भारतीय न्यायदेवतेच्या रूप-गुणांची चर्चा गेले तीनचार दिवस सुरू आहे आणि न्यायदेवतेला डोळस करण्याचा मास्टरस्ट्रोक ज्यांच्या कारकीर्दीत झाला, त्यांचेही कौतुक यानिमित्ताने होते आहे. ते ठीक. परंतु न्यायदेवतेची प्रतिमा अनादिकालापासून आंधळी होती की नव्हती, तिला भारतानेच डोळस केले काय, या मुद्द्यांची चर्चा कुणीही करत नसल्याने इथे ती स्वत:हून – किंवा न्यायालयांतील प्रचलित शब्दप्रयोग करायचा तर ‘सुओमोटो’ उपस्थित करणे अगत्याचे.
त्याआधी ‘सुओमोटो’सारख्या शब्दप्रयोगांबद्दल. ते मूळचे लॅटिन भाषेतले. ‘हेबियस कॉर्पस’, ‘इंटर अलिया’, ‘इन कॅमेरा’, ‘अॅमिकस क्युरे’ यासारखे अनेकानेक लॅटिन शब्द आजही भारतभरातल्या वरिष्ठ न्यायालयांत वापरले जातात. ही लॅटिन भाषा आज जगात कुठेही संभाषणाची भाषा नाही, पण इंग्रजीने लॅटिनमधले कायदेविषयक शब्द उचलले आणि आजही ते तसेच आहेत. त्यामुळे इंग्रजी वसाहतवाद जिथे जिथे फैलावला, तिथे तिथे ते पोहोचले यात नवल नाही. कायद्याखेरीज अन्य फक्त रोमन कॅथोलिक ख्रिास्ती धर्माच्या आदेशांसाठी लॅटिन आज वापरली जाते. इटलीच्या रोम शहराच्या आतच ‘स्वतंत्र राष्ट्रा’चा दर्जा असलेले इवलेसे ‘व्हॅटिकन सिटी’ हे लॅटिनचा वापर आजही करणारे एकमेव राष्ट्र. कुणाला हे लॅटिनचऱ्हाट लांबल्यासारखे वाटेल, कुणाला ते विषयांतर वाटेल; पण तसे नाही. कारण, याच व्हॅटिकन सिटीमध्ये हौशी वा कलाप्रेमी भारतीय पर्यटकसुद्धा आवर्जून पाहायला जातात अशा ‘सिस्टीन चॅपेल’च्या इमारतीत एका दालनाच्या भिंतीवर न्यायदेवतेचे – अर्थात रोमनांच्या ‘जस्टिटिया’चे छान रंगीबेरंगी चित्र १५२० सालात रंगवले गेले, त्या चित्राचा ऊहापोह केल्याखेरीज न्यायदेवतेच्या प्रतीकाचा इतिहास अपुराच राहील. हा इतिहास सुरू होतो तो ग्रीकांच्या ‘थेमिस’ या देवतेपासून. ती, आता नामशेष झालेल्या पुरातन ग्रीक संस्कृ़तीतली न्यायाची देवता. तिच्या डोळ्यांवर पट्टी असायची. पण रोमनांच्या ‘जस्टिटिया’ न्यायदेवतेचे इसवीसन १५२० मधले हे चित्र आहे राफाएल नामक चित्रकाराने केलेले. लोकांना चटकन आठवणारे मायकेलँजेलो, लिओनार्दो दा विन्ची आदी सारे चित्रकार या राफाएलच्याच काळातले. राफाएलने चितारलेल्या ‘जस्टिटिया’चे डोळे उघडे आहेत!
त्यानंतर ५०० वर्षांनी आपण ‘न्यायदेवतेचे डोळे उघडले’ अशा उत्साहात चर्चा करण्याचे कारण काय? याआधी बराच काळ, बऱ्याच जणांनी डोळ्यावर पट्टी असलेली ‘थेमिस’ न्यायदेवता पाहिली आहे हे खरे. पण ग्रीकांची थेमिस काय, किंवा रोमनांची जस्टिटिया काय, प्रतीकांच्या रूपामध्ये त्या-त्या स्थळकाळातल्या संकल्पनांनुरूप बदल होतच असतात. जगभरात या न्यायदेवतांच्या मूर्तींची वा प्रतिमांची निरनिराळी रूपे दिसतात. तेहरानमध्ये- आज खोमेनी व खोमेनींच्या राजवटीखाली असलेल्या इराणमध्येही न्यायदेवतेचे हेच पट्टीधारी शिल्परूप तेथील न्यायालयाच्या इमारतीवर १९४० च्या सुमारास प्रस्थापित झाले, ते समूहशिल्प आहे. म्हणजे तेहरानची ती न्यायदेवता एकटी नाही. तिच्या सर्वांत जवळ बालक- मग महिला- त्यानंतर कामकरी पुरुष आणि सर्वांत धनिक पुरुष अशी रचना दिसते. हातात तलवारीऐवजी कायद्याचे पुस्तक असलेली न्यायदेवता जर्मनीच्या सॅक्सनी प्रांतीय न्यायालयाच्या इमारतीवर २००८ पासून विराजमान आहे. बांगलादेशात, ढाका येथील सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीसमोर साडी नेसलेल्या न्यायदेवतेची मूर्ती २०१६ मध्ये पहिल्यांदा उभारण्यात आली! पण बांगलादेशातल्या धर्मांधांचा करंटेपणा असा की, ही मूर्ती आपल्या संस्कृतीच्या विरुद्ध आहे म्हणून इथून ती हटवा, यासाठी २०१७ मध्ये हिंसक निदर्शने झाली. अखेर ती मूर्ती गुपचूप जरा आतल्या बाजूला नेण्यात आली. शेख हसीनांना भारतात पळून यावे लागल्यानंतर बांगलादेशातली ही साडी ल्यालेली न्यायदेवताही नष्ट करण्यात आली म्हणतात.
मुंबईत उच्च न्यायालयाच्या १५० वर्षांहून जुन्या इमारतीवरील न्यायदेवताही डोळ्यांवर पट्टी असलेली आहे. ती जुनी मूर्ती ‘आपली’ नाही अशी वटवट आता जरूर सुरू होईल आणि संविधानधारी, साडी नेसलेल्या भारतीय न्यायदेवतेमुळे ती वाढेलसुद्धा… पण अशा वटवटी समाजमाध्यमांपुरत्या बऱ्या. मूर्ती ‘आपली’ नाही म्हणून ती फोडून टाकण्याचे प्रकार हे तालिबानी मनोवृत्तीलाच शोभतात. धर्मांधांना न्यायाचे रूप दिसत नाही. याउलट, राजस्थानात राजधानीच्या जयपूर शहरातील उच्च न्यायालयाच्या इमारतीसमोर ‘मनुस्मृती’कार मनूचा पुतळा सन १९८९ मध्ये उभारला गेला तेव्हापासून कोणीही त्याचे कौतुक केलेले नाही तरीही तो आजतागायत दिमाखात तिथेच उभा आहे. वर्णभेदानुसार न्याय द्या असे ‘मनुस्मृती’ सांगते, हा प्रकार कोणाही भारतीयास आज मान्य होणार नाही, होऊही नये. तरीही ‘मनुस्मृती’काराचा पुतळा ऐन उच्च न्यायालयासमोरच उभारला जातो आणि गेल्या कैक वर्षांत फक्त एकदाच या पुतळ्यास काळे फासण्याचा प्रयत्न होतो. दलितांच्या अनेक नेत्यांनी हा पुतळा हटवण्यासाठी निदर्शने केली, पण ती सारी शांततेच्या मार्गाने होती. ही सहिष्णुता भारतीयांमध्ये येण्यासाठी आक्रमकांनी इथे रुजवलेल्या सांस्कृतिक वैविध्याचा इतिहासही कारणीभूत आहे.
त्या इतिहासाकडे उघड्या डोळ्यांनी पाहण्याची तयारी किती जणांची, हा प्रश्न आहे. समाजाच्या डोळ्यांवर जेव्हा आत्ममग्नतेची पट्टी नसते, तेव्हाच तो आपल्या आणि इतरांच्याही सांस्कृतिक वैशिष्ट्यांकडे सर्वांगाने पाहू शकतो. मनूचा पुतळा १९८९ मध्ये बसवणाऱ्या त्या उच्च न्यायालयाने १९८७ च्या ‘सती’ प्रकरणाचे गांभीर्य ओळखले नाही हा इतिहास लाजिरवाणा आहे. सतीप्रथा पाळणाऱ्यांना सर्वोच्च न्यायालयाच्या हस्तक्षेपामुळे त्या वेळी झालेली जन्मठेपेची शिक्षा कालांतराने कमी होऊ शकते, ती आधुनिक काळातल्या मूलत: पाश्चात्त्य धर्तीच्या न्याय-प्रशासनामुळे. मनूचा न्याय भेदभावमूलक आणि अन्याय्य होता, तरीही मनू-पुतळा हटवण्यासाठी संघर्ष करायचा तो आजच्या सनदशीर मार्गानेच, हे ज्या समाजाला कळते तो न्यायप्रिय समाज. त्याऐवजी, न्यायदेवतेची मूर्ती अमुकच पद्धतीची हवी – तशी नको- ‘एक देश- एक न्यायदेवता’ हवी, असा आग्रह धरणे हे असहिष्णुतेचे पहिले लक्षण. ते टाळायचे तर, न्यायदेवता महत्त्वाची की न्यायप्रियता, हे आधी ठरवावेच लागेल.
आपला समाज प्रतीकांतच रमणारा आहे आणि प्रतीकांमुळे वास्तव बदलेल असे आज एकविसाव्या शतकाचा चतकोर सरत असतानाही त्यास वाटते आहे, हेही नव्या मूर्तीविषयीच्या चर्चेतून दिसले.