संमेलनाध्यक्ष म्हणून मराठी ज्ञानभाषा होण्याच्या बाता न करता आज बोलली जाणारी भाषा निरोगीपणे टिकण्याची गरज तारा भवाळकर व्यक्त करतात…

पांडित्यपूर्ण तरीही प्रासादिक आणि प्रामाणिक प्रश्न करूनही प्रसन्न असे ९८ व्या मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा ताराबाई भवाळकर यांच्या भाषणाचे वर्णन करता येईल. हे साहित्य संमेलन नवी दिल्लीत असल्याने त्यास राजकीय झिरमिळ्या असणार आणि तेथे साहित्यिकांच्या आडून मिरवणारे झिलकरीही असणार. हे फोले पाखडल्याखेरीज निके सत्त्व मिळत नाही हे सत्य लक्षात घेतल्यास त्यास पर्याय नाही. असो. संमेलनाच्या निमित्ताने राजकारणी आणि साहित्यिक इत्यादी निष्फळ मुद्द्यांवरील वाद-चर्चेकडे ‘नेमेचि येतो…’ म्हणत ठरवून दुर्लक्ष केलेले बरे. कारण या साहित्य संमेलनाकडे आवर्जून लक्ष द्यावे असे एक खणखणीत प्रयोजन मराठी जनांसमोर आहे. ते म्हणजे संमेलनाच्या अध्यक्षा ताराबाई. विद्वत्तेच्या अंगाने त्या दुर्गाबाई भागवत, इरावती कर्वे घराण्याच्या; व्यापक जमिनी अनुभवाच्या मुद्द्यावर सरोजिनी बाबर यांच्या कुळातील; आणि रसाळपणात इंदिरा संत यांच्याशी नाते सांगणाऱ्या. त्यांच्या अध्यक्षीय भाषणात या तीन प्रवाहांचे ठसठशीत आणि रसरशीत प्रतिबिंब दिसते. एरवी साहित्य संमेलनाध्यक्षांची भाषणे म्हणजे निर्जीव चऱ्हाट. कंटाळवाणी समीक्षा तरी किंवा स्वत:च्या जगण्यात न आढळणाऱ्या मुद्द्यांवर नि:सत्त्व प्रवचन तरी! अशा पार्श्वभूमीवर ताराबाईंच्या भाषणातील रसरशीतपणा सत्त्वशील आणि अत्यंत लोभस म्हणावा असा. ‘‘उत्तरेतील संस्कृती आर्यबहुल आहे, दक्षिणेतील संस्कृती ही द्रविडबहुल आहे आणि आर्य-द्रविड या प्रदेशांचा सीमा प्रदेश म्हणजे महाराष्ट्र’’ असे नमूद करताना हे महाराष्ट्रात एकारलेपण नसल्याचे कारण ताराबाई नमूद करतात. ‘‘एकारलेपणा कुठल्याही बाबतीत टिकत नाही… मग तो धर्माच्या बाबत असेल वा भाषेच्या! रुढी-चाली महत्त्वाच्या’’, हे ताराबाई दिल्लीत जाऊन ठणकावून सांगतात तेव्हा अनेकांचा अंगचोरटेपणा उघड होतो. मराठी भाषा आणि संस्कृती याबाबत जिव्हाळा असणाऱ्या प्रत्येकाने त्यांचे लिखित/ छापील भाषण वाचणे कर्तव्य ठरते. त्यातील काही मुद्द्यांस दुजोरा देणे तसेच स्थल-कालाअभावी काही दुर्लक्षित राहिलेल्या मुद्द्यांचे महत्त्व समजावून देणे आवश्यक.

सर्वप्रथम ‘अभिजात’चे पलिते नाचवण्याबाबत. आणखी आठवडाभर हा उच्छाद सहन करावा लागणार. एखाद्याच्या हत्येस जबाबदार असणाऱ्यांनीच नंतर त्याच्या अमरत्वाचे सोहळे करावेत असे आता या आठवड्यात होणार. अशावेळी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावरून मराठी भाषेच्या भवितव्याबाबत साशंकता व्यक्त करणाऱ्या ताराबाईंचा प्रामाणिकपणा कौतुकास्पद ठरतो. उगाच मराठी ज्ञानभाषा वगैरे होण्यासाठी काय करावे इत्यादी पोपटपंची ताराबाई करत नाहीत. सांप्रत काळी आव्हान आहे ते ही भाषा भविष्यात बोली म्हणून तरी किती निरोगीपणाने टिकवता येईल, याचे. आर्थिक आणि तांत्रिकदृष्ट्या प्रगत झालेल्या मराठी जनांस आपली भाषिक आणि सांस्कृतिक पाळेमुळे लपवणे ‘स्टेटस’साठी गरजेचे वाटते. हा न्यूनगंड तमिळ, तेलगु, कन्नड, मल्याळी, बंगाली जनांत नाही. ते आपापले भाषक संस्कार सहज मिरवतात. अशावेळी ‘अभिजात’चा दर्जा मिळाला तरी मराठीच्या भवितव्याबाबत ताराबाई व्यक्त करत असलेली साशंकता सार्थ. अभिजात या शब्दाची व्युत्पत्ती, अभिजन वर्गात जन्माला न येऊनही ‘अभिजात’ कर्तबगारी नोंदवणाऱ्यांचे त्यांनी दिलेले दृष्टान्त मराठीस ‘अभिजात’ दर्जा देण्याच्या संकल्पनेतील पोकळपणा दाखवून देतात. तो ताराबाईंनी दाखवून देणे अधिक समर्पक याचे कारण भाषेस अभिजात दर्जा ‘बहाल करण्याच्या’ क्रियेमागे एक उपकाराची भावना आहे. तसेच त्यामागे तुमचे ते लोकवाङ्मय आणि आमचे ते अभिजात असा एक वर्चस्ववादी सूरही त्यात आहे. हे म्हणजे आमचे ते शास्त्रीय, खानदानी संगीत आणि तुमची ती लोकगीते असे! तथापि अस्सल लोकसंस्कृतीतच अभिजातता असते आणि केवळ अभिजन सुखावतात म्हणून कोणा एका भाषेस ‘अभिजात’ दर्जा ‘देणे’ ही केवळ सोय असते. आपल्या दांडग्या, सर्वसमावेशक व्यासंगातून ताराबाई हा मुद्दा सहजपणे पटवून देतात. याबाबत त्यांची तुलना लोकधुनांमधील रागदारी संगीत उलगडून दाखवणाऱ्या कुमार गंधर्वांशीच व्हावी.

दलितांचे ब्राह्मणीकरण आणि ब्राह्मणांचे साहेबीकरण हा ताराबाईंच्या भाषणातील एक धाडसी मुद्दा. धाडसी त्यास म्हणायचे कारण राजकीय नाही. ते सामाजिक आहे. ‘‘दलितांचे ब्राह्मणीकरण होण्याची जी पद्धत आहे ते नुसते ब्राह्मणीकरण नसते. आपल्यापेक्षा जे उच्च आहेत त्यांचे ते अनुकरण असते. मग आमची जी ब्राह्मण मंडळी जेव्हा साहेबाची, गोऱ्या कलेक्टरची, गव्हर्नरची नोकर झाली ती त्या साहेबाचे अनुकरण करायला लागली’’ ही ताराबाईंची मांडणी चोख आणि अनेकांस भानावर आणेल अशी. ‘‘शौचालयापासून ते स्वयंपाकघरापर्यंत आज ‘आपले’ काय राहिले आहे’’ असे विचारत ताराबाई ब्राह्मणांचे ‘साहेबीकरण’ दाखवून देतात आणि साहेब गेल्यानंतर या प्रक्रियेचा वेग कसा वाढता आहे हेही नमूद करतात. या मुद्द्याचा विस्तार करताना आधी नाकारल्या गेलेल्या अनेक घटकांचे आधी प्रमाणीकरण कसे केले जाते आणि नंतर ते प्रमाणीकरण करणारा वर्गच ते ‘आपले’ आहे हे कसे मिरवू लागतो याचे ताराबाईंनी केलेले विश्लेषण अत्यंत समयसूचक. तथाकथित ‘खालच्या, शूद्र वर्गाच्या’ देवता, त्यांचे उत्सव वगैरेंची लोकप्रियता कमी करण्यात यश येत नाही असे दिसल्यावर ‘उच्चवर्णीय’ या उत्सव, जत्रांत कसे शिरतात आणि यथावकाश ते सर्व ‘आपले’ असल्यासारखे कसे मिरवतात हे ताराबाईंचे सोदाहरण प्रतिपादन. एकेकाळी शूद्रांची म्हणून गणलेली अनेक देवस्थाने, मंदिरे आज कथित उच्चवर्णीयांनी आपल्या ताब्यात घेतली आणि त्याच्या मूळ आश्रयदात्यांस कसे अलगद दूर केले याचे काही दाखले ताराबाई आपल्या भाषणात देतात. तसे करताना गणपती या देवतेची मूळ ओळख ‘विघ्नकारक’ कशी होती आणि नंतर ती ‘विघ्नहारक’ कशी झाली हे दाखवून देताना अलीकडच्या काळात दुर्मीळ असलेला बुद्धिप्रामाण्यवाद ताराबाईंच्या प्रतिपादनातून उठून दिसतो. हे होते त्यास समाजाचे उन्नयनीकरण असे मानले जात असले तरी प्रत्यक्षात समाजाभ्यासक एम. एन. श्रीनिवासन सांगून गेले त्याप्रमाणे हे ‘संस्कृतायझेशन’ असते हा ताराबाईंचा बिनतोड युक्तिवाद. आज या विवेचनाचे महत्त्व महात्मा गांधी ते वल्लभभाई पटेल ते सुभाषचंद्र बोस ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर अशा एकेकाळी ‘नाकारल्या’ गेलेल्या सर्वांस ‘आपले’ ठरवण्याचा सध्याच्या प्रयत्नांच्या पार्श्वभूमीवर अधोरेखित झाल्याशिवाय राहात नाही. बहुजन समाजातील माणसे शिक्षणाच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर येऊ लागल्याने शिक्षणाचा दर्जा खालावत चालल्याची तक्रार करणाऱ्यांना ताराबाई विचारतात : जोपर्यंत उच्चवर्णीयांमधलीच माणसे शिकत होती तोपर्यंत हा दर्जा फार उच्च होता की काय? आजही ज्याप्रमाणे शिक्षणाच्या वा अन्य क्षेत्रात ‘पाट्या टाकणारे’ लोक आहेत ते उच्चवर्णीयांतही होते, असे स्पष्ट म्हणण्यास ताराबाई कचरत नाहीत.

त्यांचा आणखी एक विचारात घ्यायला हवा आणि तरीही तो घेतला जाणार नाही, असा मुद्दा म्हणजे विद्यापीठांच्या अवस्थेचा. विद्यापीठांवर शासनाने काय करावे आणि काय नाही याची बंधने अजिबात घालू नयेत, हे ताराबाईंचे प्रतिपादन अरण्यरुदन ठरणार हे निश्चित असले तरी म्हणून हा मुद्दा मांडण्याचे महत्त्व अजिबात कमी होत नाही. ‘‘एखादा शासकीय आदेश पटकन येतो. अमुक दिवशी, अमुक दिवस साजरा करा हे शासनाने सांगण्याची गरज नाही’’ या ताराबाईंच्या विधानामुळे विविध शैक्षणिक संस्थात ‘मेरी माटी मेरा देश’ वगैरे कार्यक्रमांत मग्न असहाय कुलगुरू आणि प्राध्यापकांची चळत डोळ्यासमोर येते. आता माझ्या देशात माझीच माती असणार हे उघड असले आणि त्यात साजरे करण्यासारखे काय हे स्पष्ट असले तरी त्याबाबत प्रश्न विचारण्याची हिंमत गमावलेला आपला अध्यापकवर्ग ताराबाईंच्या भाषणाने अधिकच केविलवाणा वाटू लागतो.

याचे कारण माणूस म्हणवून घेण्यास किमान आवश्यक असलेली स्वत:च्या बुद्धीने विचार करण्याची गरज आपण सहजपणे सोडून देऊ लागलो आहोत. कोणत्या तरी अमूर्त भांगेच्या धुंदीत तर्र असणाऱ्या समाजात ताराबाईंचे भाषण कृश, पण ठामपणे उभ्या असणाऱ्या सात्त्विक तुळशीसारखे ठरते. त्यांना नमन.