सावरकर गायीस केवळ ‘उपयुक्त पशु’ असे म्हणतात? ‘राज्यमाते’चा किती हा अपमान? यवनही तो आता करू धजणार नाहीत…
हा शाहू- फुले- आंबेडकर यांचा महाराष्ट्र यापुढच्या काळात शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांचा- अलीकडचा लोकप्रिय राजकीय शब्दप्रयोग करायचा तर- आभाळभर ऋणी राहील. या ऋणातून उतराई कसे व्हावे हे पुढच्या कित्येक पिढ्यांना कळणार नाही; इतके हे ऋण मोठे आहे. त्याचा संबंध या शंकराचार्यांनी आधी ‘मातोश्री’वर पायधूळ झाडून, तेथील पाहुणचार झोडून, पोटभर आशीर्वाद देऊन नंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही तसेच आशीर्वाद दिले या त्यांच्या धार्मिक चातुर्याशी अजिबात नाही. असे सर्व डगरींवर एकाच वेळी पाय रोवून उभे राहता येणे यालाच अध्यात्म असे म्हणत असावेत. आणि असेही आत्मा एक आहे, असे म्हणतातच. तेव्हा ‘मातोश्री’वर केलेली आशीर्वादवर्षा ‘वर्षा’वासीयावरही केली तर कुठे बिघडते असाही स्थूलातून सूक्ष्मात जाणारा विचार शंकराचार्यांनी केला असणार. या ऋणाचा संबंध आपणास आणखी एक शंकराचार्य प्राप्त झाले, या आनंदवार्तेशीही नाही. पूर्वीच्या काळी या भारतवर्षात तीन आणि एक अर्धा इतकेच शंकराचार्य असत. हे अर्थातच पं. नेहरूंचे पाप. त्यांनी आयआयटी, आयआयएम, एम्स यांचा पुरेसा विस्तार केलाच नाही. त्यामुळे फक्त मूठभरांनाच त्याचा लाभ झाला. हे मूठभर त्यामुळे कायम पं. नेहरूंचा जप करीत बसतात. शंकराचार्यांबाबतही त्यांनी असाच हात आखडता घेतला असावा. काही का असेना, त्यातून त्यांचा हिंदुद्वेषच दिसून येतो. या देशाचा, हिंदूंचा आकार लक्षात घेता अधिकाधिक शंकराचार्यांची आपणास गरज होती. ती गेली दहा वर्षे यथासांग पूर्ण होताना दिसते. त्याचाच एक भाग म्हणून मोठ्या प्रमाणावर शंकराचार्य निर्मिती आपल्या देशात सुरू आहे. खरे तर ‘एक जिल्हा, एक शंकराचार्य’ अशी योजनाच हाती घ्यायला हवी. तसे झाल्यास हिंदूंचा उद्धार झालाच म्हणून समजा. तथापि तो होईपर्यंत सध्या उपलब्ध असलेल्या शंकराचार्यांवर आपणास भागवून घ्यावे लागेल. तूर्त त्यांनी आपणावर केलेल्या उपकारांविषयी.
हेही वाचा >>> अग्रलेख : अधर्मयुद्धाचा अंत?
ते आहेत गोमातेस ‘राज्यमाता’ दर्जा देण्याच्या त्यांच्या सूचनेबद्दल. या राज्यातील नव्हे तर समग्र देश आणि खरे तर पृथ्वीवरील गोधन यामुळे खूश झाले असून त्यांच्या सुमधुर हंबरड्याने आसमंत कसा भरून गेला आहे. यामुळे मेनका गांधींसह सर्वच प्राणीप्रेमींस आनंद अनावर झाला असून तो कसा व्यक्त करावा हे न कळून रस्त्यारस्त्यांवर कोणा गोप्रेमीने पुण्यसंचयासाठी भरवलेल्या फरसाण-गाठ्यांचा रवंथ करीत बसलेल्या, हाडे वर आलेल्या राज्यमातांचा शोध घेण्यासाठी झुंडीच्या झुंडी घराबाहेर पडल्या आहेत. गोमातेस ‘राज्यमाता’ जाहीर करा हा अत्यंत बुद्धिजन्य, पंडिती, प्रज्ञावान इत्यादी सल्ला निवडणुकेच्छू एकनाथरावांस साक्षात शंकराचार्यांनी दिला. धर्मरक्षक, धर्मप्रेमी आणि धर्मवीरांचे अनुयायी एकनाथराव हा शंकराचार्यांचा शब्द खाली कसा पडू देतील? त्यांनी ताबडतोब मंत्रिमंडळ बैठकीत हा विषय मांडला आणि त्यास नवे गोप्रतिपालक अजितदादा पवार यांनी त्वरेने अनुमोदन दिले. जुने गोप्रतिपालक देवेंद्र ऊर्फ देवाभाऊ यांनी हे श्रेय घेऊ नये यासाठी अजितदादांनी दाखवलेली चपळाई अगदी नोंद घ्यावी अशी. गोमातेचे प्रेमच असे आहे. तेव्हा मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा मुद्दा मंजूर होणे हा उपचार ठरला. लगेच सरकारी अध्यादेश निघाला. ‘राज्यमाता’ असे शिक्कामोर्तब गायीगायींवर झालेही. सुरुवातीस थोडा विलंब झाला तो ‘राज्यमाता’ की ‘राजमाता’ या शब्दच्छलाचा गुंता सुटेपर्यंत. अखेर ‘राज्यमाता’ हा शब्दप्रयोग उचित असल्याचे प्रमाणपत्र अलीकडचे वैय्याकरणी संजय शिरसाट आणि तत्समांनी दिल्यानंतर सरकारी आदेश प्रसृत झाला म्हणतात.
आता लवकरच- बहुधा २४ तासांत- सरकारी आज्ञावलीही प्रसिद्ध होणार असून तीत ‘राज्यमातेशी कसे वागावे’ इत्यादी राजशिष्टाचारसंबंधी मुद्दे असतील. जसे की यापुढे रस्त्यावर फतकल मारून बसलेल्या राज्यमाता दिसल्यास वाहतुकीत व्यत्यय येत असल्याच्या कारणांसाठी राज्यमातांस उठवता येणार नाही. वाहतुकीने वाटल्यास राज्यमातेस वळसा घालून जावे अथवा तसेच वाहनांत बसून राहावे. शेतकऱ्यांस अथवा गोधन प्रतिपालकांस यापुढे दूध देत नाही, सरळ घरी येत नाही, रानोमाळ भटकते इत्यादी कारणांसाठी शेपटी पिरगाळता येणार नाही. राज्यमातेची शेपटी कशी काय पिळणार? निसर्गाच्या नियमानुसार या चतुष्पादाने खाल्लेल्या पदार्थांचे कोठेही उत्सर्जन झाले तरी त्यास यापुढे ‘शेण’ असे म्हणता येणार नाही. राज्यमातेच्या विष्ठेस शेण कसे म्हणणार? यावरून ‘शेण खाल्ले’ या अपमान निदर्शक शब्दप्रयोगासही कायमचे हद्दपार करण्याचा आदेश शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी दिल्याचे कळते. राज्यभरातील अशा राज्यमातांच्या वास्तव्यासाठी ठिकठिकाणच्या शाळा उपलब्ध करून द्याव्यात या केसरकर यांच्या मताची व्यवहार्यता तपासण्याचे काम सुरू आहे. ते झाले की या शाळांतून राज्यमातांच्या वास्तव्याची सोय होऊ शकेल. एरवीही या शाळांची अवस्था गोठ्यापेक्षा काही कमी नसल्याने तेथे राहण्याची संधी मिळाल्यास राज्यमातांस घरचे वातावरण अनुभवता येईल, हा यामागील विचार. आणि तसेही या शाळांत राहिले आहे काय? तेव्हा या पडक्या-झडक्या वास्तूंत राज्यमातांची सोय केल्यास काही पुण्य तरी सरकारच्या गाठीशी जमा होईल.
हेही वाचा >>> अग्रलेख : भेसळ भक्ती!
या पाठोपाठ स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या विज्ञानवादी वाङ्मयावर बंदी कशी आणता येईल याचेही प्रयत्न या संदर्भात सुरू करण्यात आले असल्याचे कळते. एकतर अलीकडच्या काळात विज्ञानवाद ही संकल्पनाच खरे तर कालबाह्य झालेली आहे. गावोगावी भरणारे सत्संग, नवनव्या बाबा- बापू- महाराजांचा उदय, त्यांच्या दर्शनासाठी आसुसलेल्या लहानथोरांची झुंबड, सर्वोच्च सत्ताधीशांकडून या पुण्यपुरुषांना दिला जाणारा आश्रय इत्यादी पाहिले की विज्ञानवादाचा फोलपणा मठ्ठातील मठ्ठासही लक्षात येईल. असे असताना कोण सावरकर आणि कसले त्यांचे विज्ञानवादी विचार! त्यांच्याविषयी आदर व्यक्त करायला स्वातंत्र्यवीर ही उपाधी आणि ‘ने मजसी ने’ गायिले की झाले. कशास हवा त्यांचा विज्ञानवादी विचार? हे सावरकर गायीस केवळ ‘उपयुक्त पशु’ असे म्हणतात? ‘राज्यमाते’चा किती हा अपमान? यवनही तो आता करू धजणार नाहीत. तेव्हा सावरकरांनी तो केला असेल म्हणून काय झाले? एकदा का राज्यमातेचा दर्जा मिळाला की तीस ‘उपयुक्त पशु’ ठरवणाऱ्या सावरकरांस विसरलेले बरे. ‘राज्यमाते’च्या पुत्राविषयीही सावरकर असेच काही अद्वातद्वा बोलले आहेत. त्यामुळे त्यांच्या अशा वाङ्मयावर एकदा बंदी घातली की प्रश्न मिटला. महाराष्ट्र सरकारनेच बंदी घातली म्हटल्यावर राज्याबाहेर त्यांचे वाचणार कोण आणि कशाला? यथावकाश सगळ्यांच्या मनात ‘राज्यमाता’ घर करून बसतील यात शंका नाही.
फक्त कोणी आता ‘राज्यपिता कोण’ हा प्रश्न तेवढा उपस्थित करू नये. प्रत्येक ‘मातेस’ एक भिन्नलिंगी साथीदार असल्याखेरीज तूर्त तरी प्रजोत्पादन होऊ शकत नाही, हे खरे असले तरी उभयतांतील ‘संबंध’ हे क्षणिक असतात असे साक्षात आचार्य अत्रे यांनीच सांगून ठेवलेले आहे. (पाहा : स्त्री ही क्षणाची पत्नी असून अनंत काळची माता असते.) तेव्हा राज्यपिता कोण हा प्रश्न अयोग्य. हे असले क्षुद्र मुद्दे विसरून आपण सर्व जण गायींस राज्यमातेचा दर्जा देण्याच्या ऐतिहासिक निर्णयाचे स्वागत करू या आणि हा दर्जा देता यावा म्हणून या राज्याची अवस्था जणू गोठा अशी केली याबद्दल सरकारचे आभार मानू या.