सांप्रतकाळात अभिजात वगैरे दर्जाचा दुरभिमान पोसणाऱ्या मराठी ‘साहित्याची भूमी’ कोणत्या स्थितीत, याचे उत्तर तीन पिढ्यांच्या वाचन- संसारातल्या किंवा वाचन- काडीमोडानंतरच्या व्यवहारांवरून शोधावे लागेल. १९८१ ते ९६ पर्यंत वाचनकक्षेच्या साधारण वयात आलेली ‘मिलेनियल’ पिढी, १९९७ ते २०१२ पर्यंत जन्मलेली ‘जेन झी’ पिढी आणि २०१० ते २०२४ या काळात भूतळावर कोसळलेली ‘अल्फा’ पिढी. त्या आधीच्या ‘जेन एक्स’ अथवा साठोत्तरीत बंडखोरीचे झेंडे फडकावणारी ‘बूमर्स’ या पिढीतील तथाकथित मुरब्बी उरलेत फक्त पुरस्कार घेऊन क्षीण नाचण्यासाठी आणि क्षणसाजऱ्या कौतुकासाठी. तर याआधीच्या दोन पिढ्यांना व्यवधाने नव्हती; त्याच्या शतपटींत नंतर वाढली. पुढल्या पिढ्यांना उपग्रह वाहिन्या आल्यानंतरच्या द्रुतगतीने धावणाऱ्या क्रांत्यांमध्ये जगाशी अद्यायावत राहत संगणकाच्या सतत विकसित होत राहणाऱ्या आवृत्त्यांशी एकरूप होताना, माहितीच्या स्फोटांमध्ये मेंदूत आधी असलेल्या तपशिलांना राखत बुद्धीशकले होण्यापासून स्वत:ला सावरताना आणि समाजमाध्यमांची व्यसननशा अंगभर भिनूनदेखील सुखात जगताना किती तारेवरची कसरत करावी लागली याची जाणीवदेखील ‘जेन एक्स’ किंवा ‘बूमर्स’ना असू शकत नाही. तर या अजस्रा पसाऱ्यात त्यांच्याकडून ग्रंथोत्तेजनाची अपेक्षा करणे किती अवघड गोष्ट, हेदेखील उमजू शकत नाही. या पिढ्या ई-मेल्स, इन्स्टापोस्ट, व्हॉट्सअॅप पिंग्ज आणि या विद्यापीठात फॉरवर्डींनी पसरविलेले उपयोजित प्रबंध डोळे दुखेस्तोवर वाचतात. रील्स-व्हिडीओ न्याहाळत त्यांचे तासचे तास निष्प्रभ होतात. ‘ट्रेण्ड’च्या नावाखाली महापुरुषाची जयंती आपापल्या वाहनाला झेंडा लावून साजरी करण्यात त्यांना धन्यता वाटते. शुक्रवारी थिएटरमध्ये रक्त खवळून काढणारा वगैरे सिनेमा पाहून झाल्यावर ‘छावा’ कादंबरीच्या तीन-चारशे प्रती त्यांच्याकडून खरेदी केल्या जाऊ शकतात. ‘साहित्याच्या भूमी’तल्या नापिकीचीच ही वेळ कधीपासून आली?

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

साहित्याच्या सकस भूमीचा ऱ्हास होण्याचा प्रकार ‘मिलेनियल’ पिढी रांगण्यास आरंभ करीत होती तेव्हापासूनच सुरू झाला, असे म्हणावे लागेल. श्री.पु. भागवतांनी ऑगस्ट १९८२ मध्ये ‘सत्यकथा’ मासिकाच्या शेवटच्या अंकात दिलेल्या निवेदनात म्हटले की ‘आज घटकेला सत्यकथेच्या दरमहा १,८७५ प्रती काढण्यात येतात. त्यांपैकी १,२६८ वर्गणीदार, ३४५-५० विक्रेत्यांकडे किरकोळ खपणाऱ्या व २२० भेटीदाखल जाणाऱ्या असतात. दिवाळी अंकांची संख्या ४,२५० असते. या सर्व प्रतींचा एकूण मुद्रणखर्च, संपादकीय व व्यवस्थापकीय सहकाऱ्यांचे पगार, कार्यालयीन इतर खर्च, लेखक-कलावंतांचे मानधन, टपालहशील व तत्सम खर्च मिळून वर्षाला एकूण खर्च प्रत्यक्षाप्रत्यक्ष ९९,४७५ रुपये इतका होतो. वर्गणी, किरकोळ विक्री व जाहिराती मिळून एकूण उत्पन्न ५३,८५० रुपये इतका होतो. या वर्षी सत्यकथेचा निव्वळ तोटा ४५ हजार ६२५ इतका आहे. याचा अर्थ असा की, सत्यकथेचा प्रत्येक महिन्याचा अंक सुमारे पावणेचार हजार रुपये नुकसान सोसून काढला जातो’!

हे मासिक मराठी भाषेच्या समृद्धीसाठी, लोकांत साहित्याभिरुचीची जडण-घडण व्हावी यासाठी तोटा सोसून कित्येक दशके निघत होते. या परमोच्च स्थानी मानल्या जाणाऱ्या मासिकाची ही दु:स्थिती, तर पुढल्या क्रांत्यांत ढेपाळत गेलेल्या मासिक-साप्ताहिकांची काय परिस्थिती असणार? आज भाषेला अभिजात दर्जा आहे; पण अस्तित्वासाठी झगडणाऱ्या पण हाताच्या बोटांवर मोजता येणाऱ्या मासिकांना तगण्याइतपत ‘प्राणवायू’ लाभेल काय, हा प्रश्न अधिक महत्त्वाचा आहे. कारण अभिजात दर्जा मिळविणाऱ्या मल्याळममध्ये वर्गणीदारांनी जपलेली २३ च्या वर बालमासिके आहेत. तिसाहून अधिक साहित्यिक नियतकालिके आहेत. तमीळमध्ये दीड डझन साहित्यिक नियतकालिके, तर डझनभर बालमासिके आहेत. तेलुगूमध्ये देखील हीच परिस्थिती आहे. या भाषांची मुद्रित साहित्य वाचनाची भूक अधिक त्यांच्याच चित्रपटगोष्टी सध्या संपूर्ण भारतात तिकीटबारीवर गल्लाभरू ठरत आहेत, हादेखील योगायोग म्हणावा काय? या पार्श्वभूमीवर आपण कुठे आहोत, याची सांख्यिक गरिबी खिन्न करणारी नाही काय?

आदल्या पिढ्यांना- ‘जेन एक्स’ किंवा ‘बूमर्स’ना- आपले बुद्धिचातुर्य अथवा ज्ञानपारंगतता चमकवण्यासाठी नियतकालिकांचाच आधार होता. नव्वदीनंतर अनेक आकर्षण केंद्रांनी हे पारंपरिक सहजमार्ग जेव्हा बंद होण्यास सुरुवात झाली, तेव्हा मराठीत वाचक नावाचा नवा वर्ग घडण्याचे इतर मार्गही आपसूक खुंटत होते. नव्वदीच्या आरंभी मध्यमवर्गातील ‘मिलेनियल’ मुले इंग्रजी माध्यमांच्या शाळेत जाऊ लागली. दोन हजारानंतर निमशहरी भागातील निम्नमध्यमवर्गातील पालकांनीही खिशाला भार सोसून इंग्रजी शाळांचा आग्रह आपल्या मुलांसाठी धरला. ती आज घराघरांतील कर्ती-धर्ती झालेली ‘मिलेनियल’ आणि ‘जेन एक्स’ मराठी भाषेपासून, साहित्यापासून दूर गेली यात नवल नाही. नवल हे आहे या काळात नाइलाज म्हणून मराठीतून शिक्षण घेणाऱ्या तुरळक तरीही संभाव्य वाचक घडू शकणाऱ्या वर्गापुढे तरी काय आणि किती चांगल्या दर्जाचे साहित्यिक वातावरण तयार केले गेले? नव्या लिहिणाऱ्यांचे आणि समकालातील प्रश्नांशी भिडणाऱ्यांचे किती साहित्य पुढे केले गेले? जुनेच आणि जुन्यांचेच, किंवा जुनाटच लिखाण नव्या वाचकांपुढे ठेवण्याचे उद्याोग कशासाठी- कोणासाठी चालवले गेले?

शालेय पातळीवर भूषणावह स्थिती नसताना महाविद्यालयीन पातळीवर प्राध्यापकी साहित्यिकांचा नवा गोतावळा तयार होतो आहे. ज्यांचा मुख्य हेतू शिकविण्यापेक्षा पाठ्यक्रमांत असलेल्या पूर्वसुरी साहित्यिकांपेक्षा वरताण निर्मिती करणे हाच अधिक. गावातल्या गल्लीतील प्रकाशनगृहांमधून कवितांची-संपादनांची आणि ललितबंध अथवा कादंबऱ्यांची माळ लावण्यात हे पटाईत. तालुका-जिल्हा वृत्तपत्रांवर त्यांची पानभर परीक्षणे घडवून त्यांना ‘स्व. अमुक-तमुक’ नावांचे पुरस्कार लाभण्याचे पुण्यदेखील त्यांच्याकडून सराईतरीत्या घडते. मग झकर-‘बुद्रुक’ बनलेल्या ‘फेसबुक’ या माध्यमात समोरच्याला वात आणण्याइतपत या पुस्तकांचे प्रसिद्धीचाळे सध्या मोठ्या प्रमाणावर गाजताहेत आणि तोदेखील साहित्याचा एक नवा प्रवाह बनत चालला आहे. आत्मउन्नतीचे हे महामार्ग एकीकडे वाढत असताना ‘साहित्येच्छुक’ वर्गाची पुस्तके छापण्याच्या महत्कार्यासाठी बड्या-बड्या प्रकाशनसंस्थाही सरसावल्या आहेत. केवळ पैसा आहे म्हणून आपल्या आयुष्याची नसलेली ‘चित्तरकथा’ हवी तशी बनवून सांगण्यासाठी शब्दांकनकारांची फौजसुद्धा तयार झाली आहेच. त्यामुळे खरोखरीच बरे लिहिणाऱ्याला आवृत्ती संपल्यानंतर पुस्तकाचे जेमतेम दहा टक्के मिळणारे मानधनदेखील आगामी काळात ‘परागंदा’ होते की काय अशी परिस्थिती आहे.

अशा भयकारी वातावरणामध्ये मराठी भाषक म्हणून केवळ सांगायला उरलेल्या ‘मिलेनियल’, ‘जेन झी’ आणि ‘अल्फा’ या वाचनक्षम पिढ्यांसमोर आपण साहित्यिक आदर्श कुठल्या मार्गाने ठेवू शकतो, याचा विचार सध्या कुठल्याही पातळीवर गांभीर्याने केला जात आहे काय? तसा तो केला गेला नाही, तर अभिजात अट्टहासानंतरच्या काळात उपनगरांत किंवा निमशहरांत रिकामी ‘ग्रंथप्रदर्शने’, कर्ण्यांवरची दुरभिमानी गीते यांची राज्यभर सारखीच स्थिती पाहायला मिळेल, हे भाकीत चुकणार नाही.

तूर्त ‘अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन’ नामक साहित्याचा पारंपरिक उत्सव दूरवरच्या भूमीत जोमात सुरू झालाय. अलीकडे वाचनाशी, साहित्याशी आणि एकुणातच भाषिक समृद्धीशी फारकत घेणाऱ्या या वार्षिक कार्यक्रमात यंदा प्रमादांचे इतके विक्रम घडलेत की, त्याकडे पाहत साहित्याची खरीच आस्था असलेले सर्व जण श्याम मनोहरांच्या साहित्य- अकादमी पुरस्कारप्राप्त कादंबरीचे शीर्षक आठवून, त्याबरहुकूम सुखनिद्रा घेत असल्यास नवल नाही.