खेळाडू आणि प्रशिक्षक अशा दोन्ही भूमिकांतून विश्वचषक जिंकण्याची अलौकिक कामगिरी झागालो आणि बेकेनबाउर यांना साधली होती..

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘फुटबॉल हा सोपा खेळ आहे. २२ खेळाडू फुटबॉलचा पाठलाग करतात. आणि अखेरीस जर्मन नेहमीच जिंकतात!’.. इंग्लंडचे विख्यात फुटबॉलपटू गॅरी लिनेकर यांचे हे तितकेच विख्यात उद्गार. ते ज्या ‘जिंकणाऱ्या’ जर्मनांबद्दल बोलले, त्या जर्मनांमध्ये जिंकण्याची मानसिकता रुजवली फ्रान्झ बेकेनबाउर यांनी. १९६०चा उत्तरार्ध आणि १९७०चे दशक बेकेनबाउर यांच्या जर्मनीने गाजवले. फुटबॉल मेरुमणी ब्राझीलचे पेले अस्ताला गेल्यानंतर आणि योहान क्रायुफ यांच्या नेतृत्वाखाली डच फुटबॉल संघ अफलातून कामगिरी करत असताना, स्वत:चे झळाळते अस्तित्व सादर करत, या मातब्बर मंडळींना काही काळ निस्तेज करण्याची कामगिरी बेकेनबाउर यांनी करून दाखवली. ब्राझिलियन फुटबॉल रसिकांनी फुटबॉलचे वर्णन ‘जोगो बोनितो’ असे केले आहे. म्हणजे सुंदर खेळ. फुटबॉलमधील ब्राझीलच्या अढळपदामुळे हेच नाव आणि वर्णन सार्वत्रिक ठरले. सौंदर्यामुळेच खेळाच्या लोकप्रियतेची व्याप्ती पंचखंडात पोहोचली. फुटबॉल म्हणजे कौशल्य आणि ऊर्जा यांचा मेळ. यांत समतोल साधून दिग्विजयी होणे हे फुटबॉल संघांचे लक्ष्य असते. पण हे झाले या खेळाचे सरधोपट आणि स्वप्नाळू वर्णन. निव्वळ कौशल्य आणि ऊर्जेच्या पलीकडे या खेळात सखोल व्यामिश्रता असते. मैदानावर खेळताना त्रिमितीय अवकाशभान असावे लागते. संधी हेरण्याची नजर असावी लागते. धोकादायक प्रतिस्पध्र्यासमोर पाय रोवून उभे राहण्याचा निर्धार लागतो. कोलाहली प्रेक्षकांसमोर धैर्य शाबूत ठेवण्याची कला लागते. त्याहीपलीकडे जाऊन, विविध व्यक्तिमत्त्वांना समान उद्दिष्ट साधण्यासाठी एकाच धाग्यात गुंफावे लागते. यासाठी ठायी नेतृत्व लागते. निष्णातांहून निष्णात गणल्या गेलेल्या फुटबॉलपटूंमध्ये असे बहुपैलुत्व नव्हते. ते ज्या मोजक्यांत होते, त्यांमध्ये बेकेनबाउर हे नाव पहिल्या तिघांत तरी घ्यावेच लागेल.

जर्मन इंजिनीअरिंगची बिनचूक शिस्त आणि इटालियन डिझाइनची नजरखेचक नजाकत अशा मिलाफातून कुणी एखादी मोटार बनवली, तर तिचे नाव ‘बेकेनबाउर’ असे खुशाल ठेवावे! ‘प्रशियन’ कण्याच्या उंच चणीचे शरीर, शहामृगासारखी लांब ढांगांची लयबद्ध धाव, गरुडासारखी भिरभिरणारी बहुकोनीय नजर, ग्रीक देवतेसम देखणे व्यक्तिमत्त्व लाभलेले बेकेनबाउर जर्मनांच्या दृष्टीतून सम्राट होते. म्हणूनच ‘डेर कायझेर’ हा सम्राटासाठीचा जर्मन प्रतिशब्द हीच त्यांची ओळख बनली. आंतरराष्ट्रीय फुटबॉलमध्ये जर्मनी आणि क्लब फुटबॉलच्या विश्वात बायर्न म्युनिच यांचा दरारा सत्तरच्या दशकात निर्माण झाला आणि पुढे कित्येक वर्षे टिकून राहिला याचे श्रेय बेकेनबाउर यांना द्यावे लागेल. १९६६ च्या विश्वचषकापासूनच बेकेनबाउर हे नाव विश्वचषकाच्या दुनियेत गाजू लागले होते. तत्कालीन पश्चिम जर्मनीचा संघ अंतिम फेरीत यजमान इंग्लंडला भिडला, त्या वेळी वीस वर्षीय बेकेनबाउर यांच्यावर प्रतिस्पर्धी संघातील निष्णात बॉबी चाल्र्टन यांना थोपवण्याची जबाबदारी सोपवण्यात आली. गंमत म्हणजे चाल्र्टन यांच्यावरही बेकेनबाउर यांना रोखण्याची जबाबदारी होती! कारण मधल्या फळीत बचावात्मक जबाबदारी असूनही बेकेनबाउर कधीही सुसाटत प्रतिस्पध्र्याच्या गोटात शिरायचे आणि गोल झळकवायचे. पुढे ते बचावपटू बनले. पण फुटबॉल व्यूहरचनेतील ‘लिबेरो’ ही खास जागा त्यांनी लोकप्रिय केली. बचावपटू असूनही कधीही मैदानात प्रतिस्पर्धी गोलपर्यंत मुसंडी मारून असे लिबेरो प्रतिस्पध्र्याची मूळ रचनाच विस्कटवू शकतात. मात्र यासाठी त्यांना स्वत:च्या गस्तीचौकटीबाहेर काही काळ पडावे लागते आणि यात विलक्षण जोखीम असते. कारण प्रतिहल्ला झाल्यास, बचावफळीत एक भिडू कमी झालेला असतो. अशा प्रकारच्या व्यूहरचनेमध्ये असीम कौशल्य आणि हिंमत लागते. बेकेनबाउर यांच्यापाशी ती होती. गोल करण्यासाठी लागणारे कसब असूनही बेकेनबाउर त्या फंदात फारसे पडायचे नाहीत. ती जबाबदारी म्युलर, ब्राइटनर असे त्यांचे सहकारी पार पाडायचे. पण म्हणून बेकेनबाउर यांच्याकडून गोल होणारच नाही याची हमी कुणीही देऊ शकत नव्हते. त्यामुळेच ते अतिशय धोकादायक ठरायचे. १९७२ मध्ये युरो अजिंक्यपद आणि १९७४ मध्ये जगज्जेतेपद जर्मनीने मिळवले. १९७४ ते १९७६ अशी सलग तीन वर्षे बायर्न म्युनिचने युरोपियन क्लब अजिंक्यपद पटकावले. हे सर्व करंडक उंचावणारे बेकेनबाउर पहिले कप्तान होते. फुटबॉलमधील वार्षिक ‘बॅलाँ डी ओर’ हा प्रतिष्ठेचा वैयक्तिक पुरस्कार दोन वेळा पटकावणारे ते एकमेव बचावपटू.

बेकेनबाउर हे आख्यायिका बनले, त्या सुवर्णपटाचा हा झाला पहिला भाग. दुसऱ्या भागाची सुरुवात झाली ऐंशीच्या दशकात. त्या काळात त्यांच्याकडे जर्मन संघाच्या प्रशिक्षकपदाची धुरा सोपवण्यात आली. ते साच्यातले प्रशिक्षक नव्हते. एकदा त्यांच्या खेळाडूंनी रात्रभर पार्टी आणि मद्यमस्ती केली. एकावरही त्यांनी कारवाई करण्याची इच्छादेखील बोलून दाखवली नाही. त्यांचे खेळाडूंना एकच सांगणे असे – मैदानावर जा नि आनंद लुटा. तो काळ जर्मनीसाठी आव्हानात्मक होता. हा संघ अंतिम फेरीत किंवा त्याच्या आसपास जात होता, पण तेथे जिंकत नव्हता. इटली, ब्राझील हे जुने प्रतिस्पर्धी अधिक सक्षम बनले होतेच. याशिवाय अर्जेटिना, डेन्मार्क आणि मुख्य म्हणजे फ्रान्ससारखे संघ जर्मनीपेक्षा सरस कामगिरी करून दाखवू लागले होते. पण जर्मनीच्या फुटबॉल व्यवस्थेला आणि फुटबॉलपटूंना बेकेनबाउर यांच्याविषयी आदर होता. सत्तरच्या दशकात मैदानावर दाखवलेले नेतृत्व बेकेनबाउर यांनी थोडे फेरफार करून ऐंशीच्या उत्तरार्धात मैदानाबाहेर केले. पहिल्याच प्रयत्नात म्हणजे १९८६ मध्ये त्यांचा संघ अंतिम फेरीत धडकला. तेथे दिएगो मॅराडोनाच्या युवा, चपळ संघासमोर पराभूत झाला. पुढील विश्वचषक स्पर्धेत याच दोन प्रतिस्पध्र्यामध्ये अंतिम सामना झाला. तो जर्मनीने जिंकला. कारण जिंकण्याची मानसिकता तोपर्यंत बेकेनबाउर यांनी जर्मन संघात मुरवली होती. ते स्वच्छंदी होते. एकाच जागी घरोबा करून त्याचा मठ बनवण्याची त्यांची वृत्ती नव्हती. खेळाडू आणि प्रशिक्षक अशा दोन्ही भूमिकांतून विश्वचषक जिंकण्याची अलौकिक कामगिरी बेकेनबाउर यांनी करून दाखवली.

पण अशी कामगिरी करणारे ते पहिले नव्हेत. तो मान जातो ब्राझीलचे मारियो झागालो यांच्याकडे. झागालो हे नाव सुपरिचित ब्राझिलियन फुटबॉलपटूंच्या मांदियाळीतले नव्हे. पेले, गॅरिंचा, सॉक्रेटिस, रोमारियो, रोनाल्डो, रोनाल्डिन्यो, काका, नेमार अशांची नावे जगभर ठाऊक. या रंगमंचावर झागालो हे नेहमीच विंगेत राहिले. तेही बेकेनबाउर यांच्यासारखे बचावपटूच, पण तरीही वेळ पडेल तेव्हा बगलेवरून सुसाटत धावत जायचे. १९५८ आणि १९६२ मधील विश्वविजेत्या ब्राझिलियन संघाकडून ते खेळले. तरी त्यांचे खरे कर्तृत्व दिसून आले, १९७०मधील सर्वोत्तम ब्राझिलियन विश्वविजेत्या संघाचे प्रशिक्षकपद सांभाळताना. नितांतसुंदर आक्रमक चाली रचताना बचावाचे भानही हवे या भूमिकेतून त्यांनी तो संघ बांधला. लोकांसमोर आला तो पेले आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा अलौकिक खेळ. परंतु त्या संघाचे शिल्पकार होते मारियो झागालो. त्यांचे खेळाडूंना सांगणे असे – मनमुराद खेळा आणि त्या खेळाचा आनंद प्रेक्षकांना द्या.

झागालो आणि बेकेनबाउर. विश्वविजेते खेळाडू आणि विश्वविजेते प्रशिक्षक. दोघेही गेल्या काही दिवसांत निवर्तले. या दोघांव्यतिरिक्त अशी सोनेरी दुहेरी कामगिरी करणारे केवळ फ्रान्सचे दिदिए देशांजच आता हयात आहेत. बेकेनबाउर आणि झागालो यांना फुटबॉलमधील सौंदर्याची जाण होती, तसेच सातत्याचे भानही होते. आज ब्राझील आणि जर्मनीकडे फुटबॉलमधील महासत्ता म्हणून कुणीही पाहत नाही. बहुधा सौंदर्य की सातत्य, या गोंधळात दोन्ही फुटबॉल संस्कृतींचे स्वत्व हरपलेले दिसते. दोन्ही व्यवस्था आज काहीशा कुचेष्टेचाच विषय ठरतात. बेकेनबाउर आणि झागालो यांचे निर्गमन हे त्यामुळेच प्रतीकात्मक आणि खंतावणारेही!

मराठीतील सर्व संपादकीय बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta editorial mario zagallo and franz beckenbauer have won the world cup as both players and coaches amy