पुरस्कार म्हणजे फक्त सर्वोत्कृष्टता नाही तर कुणीतरी योग्य वेळी त्या व्यासपीठावर पोहोचणे. गोल्डन ग्लोबसाठी ‘आरआरआर’च्या बाबतीत ते म्हणण्यास वाव आहे.

अमेरिका तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवरील चित्रपट आणि टीव्ही कार्यक्रमांसाठी दिला जाणारा प्रतिष्ठेचा गोल्डन ग्लोब पुरस्कार यंदा पहिल्यांदाच आरआरआर या तेलुगु चित्रपटाच्या संगीतकारांच्या हातात येऊन विसावला, तेव्हा खरेतर तमाम सिनेप्रेमी भारतीयांची छाती अभिमानाने ५६ इंची झाली असेल. यंदा तरी आपल्या सिनेमावर ऑस्करची मोहोर लागू दे, या इच्छेने ऑस्कर पुरस्काराची रात्र जागून काढणाऱ्यांसाठी गोल्डन ग्लोब पुरस्कार आता ऑस्करपेक्षाही दुर्मिळातील दुर्मीळ ठरला आहे. दक्षिणेतील चित्रपटांची सगळी वैशिष्टय़े घेऊन पडद्यावर साकार झालेल्या ‘आरआरआर’ने निर्मिती खर्चाचे, उत्पन्नाचे सगळे विक्रम मोडले असल्याचे गेले सहा महिने सतत सांगितले गेले आहे. आणि आता तर तो एखाद्या गीताच्या संगीतासाठी ‘गोल्डन ग्लोब’ मिळवणारा पहिलावहिला भारतीय चित्रपट ठरला आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक, निर्माते तेलुगु चित्रपटकर्ते एस. एस. राजमौळी यांची ओळखच भव्यपटकार अशी आहे. ‘बाहुबली’ मालिकेतील त्यांच्या चित्रपटांनी देशातील आणि बाहेरीलही चित्रपट व्यवसायात अक्षरश: धुमाकूळ घातला होता.  ‘नाटू नाटू’ या गीताबरोबरच गोल्डन पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट बिगरइंग्रजी चित्रपट विभागातही ‘आरआरआर’ला नामांकन होते. तो पुरस्कार मात्र हुकला.

Allu Arjun
‘पुष्पा’साठी राष्ट्रीय पुरस्कार घेताना अल्लू अर्जुन दु:खी का होता? स्वत: सांगितलं कारण
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Earnings of the sequel Singham Again and Bhool Bhulaiyaa 3 mumbai
दोन ‘सिक्वेल’च्या घवघवीत यशाने चित्रपटसृष्टीची दिवाळी गोड
madhuri dixit tezaab is highest grossing film of 1988
आधीचे १० सिनेमे झाले फ्लॉप, ‘या’ एका चित्रपटामुळे माधुरी दीक्षित रातोरात झाली सुपरस्टार! शाहरुखशी आहे खास कनेक्शन
mahshettey acting debut with salman khan upcomimg movie sikandar
सलमान खानच्या ‘सिकंदर’ चित्रपटात झळकणार ‘बिग बॉस’चा स्पर्धक; सेटवरील फोटो आला समोर
Kushal Badrike and Viju Mane wished Pravin Tarde on his birthday in a funny prediction
Video: प्रवीण तरडेंसाठी कुशल बद्रिकेने लिहिलेल्या कविता ऐकून विजू माने वैतागले, म्हणाले…
Stree 2 box office collection
‘स्त्री २’ नव्हे तर ‘हा’ आहे २०२४ मध्ये सर्वाधिक कमाई करणारा भारतीय चित्रपट; जगभरात कमावले तब्बल…
Raosaheb Danave Beating Karyakarta
Raosaheb Danave Viral Video : फोटो फ्रेममध्ये येणाऱ्या कार्यकर्त्याला रावसाहेब दानवेंनी लाथाडलं; VIDEO व्हायरल!

अर्थात दरवर्षी भारतीय सिनेप्रेक्षकांना ज्याची आस असते, ते अ‍ॅकॅडमी ऑफ मोशन पिक्चर्स आर्ट्स अँड सायन्सेस म्हणजेच ऑस्कर पुरस्कार यापूर्वी भारतीय कलाकारांना मिळालेले आहेत. पण भानु अथय्या, ए. आर. रहमान, गुलजार, रसूल पुकुट्टी यांच्यासह जीवनगौरव पुरस्कार मिळवणारे चित्रमहर्षी सत्यजीत राय इथेच ही यादी संपते. त्यात बहुधा‘आरआरआर’च्या कर्त्यांचेही नाव यंदा समाविष्ट होईल, असा बहुतांचा होरा आहे. ऑस्कर पुरस्कारांसाठी पाठवला गेलेला ‘आरआरआर’ हा भारताचा अधिकृत चित्रपट नाही. तो मान यंदा ‘छेलो शो’ या गुजराती पटाला मिळाला आहे. जगभरातून येणाऱ्या उत्तम चित्रपटांमधून आपल्या देशातील निर्मिती सर्वोत्तम ठरावी ही आस बाळगण्यात चुकीचे काहीच नाही, पण त्या सगळय़ा प्रक्रियेत गुणवत्तेइतक्याच तांत्रिक बाबीही अत्यंत महत्त्वाच्या ठरतात. त्याचा ऊहापोह करण्याआधी ‘नाटू नाटू’कडे पाहणे आवश्यक ठरते.

गोल्डन ग्लोबने ‘नाटू नाटू’चे संगीत यंदाच्या जगभरातील संगीत निर्मितीत सर्वोत्कृष्ट ठरवले आहे. असा पहिलावहिला, प्रतिष्ठेचा आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाला म्हणजे संबंधित कलाकृतीतील अर्थात या गाण्यातील आशय, संगीत, छायालेखन किंवा कला दिग्दर्शन आदी निर्मितीमूल्ये हीदेखील त्या दर्जाची असणार असे अपेक्षित आहे. कारण एम. एम. किरावानी द्वारा संगीत दिग्दर्शित या गीताने रिआना, टेलर स्विफ्ट, लेडी गागा अशा मातबरांच्या संगीतकृतींवर मात केली. त्यातही पहिल्या दोघींची – रिआना आणि टेलर स्विफ्ट – गोल्डन ग्लोब पुरस्कारावरची दावेदारी प्रबळ मानली जात होती. त्या पार्श्वभूमीवर ‘नाटू नाटू’ हे गीत चटपटीत आहे, सुश्राव्य आहे. परंतु ते लोकप्रिय होण्यामागे संगीतरचनेपेक्षाही नृत्यरचनेचा वाटा अधिक आहे. शब्द, चाल, वाद्यसंयोजन यांत असामान्य वगैरे असे काहीही नाही. नृत्येही थिरकवणारी असली, तरी अशी सामूहिक नृत्ये आपल्याकडील बहुतेक लोकप्रिय चित्रपटांमध्ये नेहमीच दिसून येतात. निर्मितीमूल्यांच्या आघाडीवर हे गीत आणि एकंदरीतच संपूर्ण चित्रपट उत्तम वठला आहे. पण एम. एम. किरावानींच्या आजवरच्या संगीतरचनांपैकी हीच सर्वोत्तम आहे अशी पावती त्यांचे निस्सीम चाहतेही देत नाहीत. उलट याच किरावानी यांची हिंदीतली ‘तुम मिले, दिल खिले’, ‘आवारापन बंजारापन’ ही गाणी आजही कांकणभर सरस ठरतात.

दाक्षिणात्य आणि त्यातही तेलुगु चित्रपटसृष्टीने आशयाइतकेच – किंबहुना त्यापेक्षा अधिक- लक्ष निर्मितीमूल्यांकडे पुरवले आणि भारतीय सिनेमाला जागतिक परिमाण व प्रेक्षक मिळवून देण्यात अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली, हे मान्य करावेच लागेल. आंतरराष्ट्रीय पुरस्कारांच्या बाबतीत अशा प्रकारे जागतिक ओळख प्राप्त करणे अतिशय महत्त्वाचे असते. याआधीही भारतातर्फे अनेक चांगले चित्रपट ऑस्करसाठी गेले, पण पुरस्कार मिळवू शकले नाहीत, कारण त्यांच्याकडे गुणवत्ता कमी होती असे नाही, तर त्यासाठी कराव्या लागणाऱ्या लॉबिइंगमध्ये ते कमी पडले. अ‍ॅकॅडमीच्या पाचेक हजार सदस्यांना आपला चित्रपट बघायला लावणे, त्यासाठी त्यांच्यापर्यंत पोहोचणे हीच या प्रवासातली सर्वाधिक आव्हानात्मक बाब असते. आजवर अनेकांना न जमलेले हे ‘व्यवस्थापन’ राजमौळींना सहज जमेल असे जाणकारांचे म्हणणे आहे. राजमौळींसारख्यांनी या महत्त्वाच्या मुद्दय़ावर बौद्धिक आणि आर्थिक गुंतवणूक करायला सुरुवात केली आहे. त्यामुळे अ‍ॅकॅडमीचे जेवढे सदस्य भारताचा अधिकृत चित्रपट पाहतील, त्यापेक्षा कितीतरी अधिक सदस्य ‘आरआरआर’ पाहतील, अशी शक्यता मांडली जात आहे. ‘नाटू नाटू’ या गीताला ऑस्करसाठी सर्वोत्कृष्ट मूळ गीतासाठी नामांकन आहे. राजमौळींचा प्रयत्न अधिक तगडी नामांकने मिळावीत यासाठी आहे. त्यांनी अधिक जोर लावल्यास सर्वोत्कृष्ट चित्रपट, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन अशी प्रमुख नामांकने मिळू शकतीलही. या सहस्रकाच्या सुरुवातीला ‘क्राउचिंग टायगर, हिडन ड्रॅगन’ या चिनी कथेवर आधारित आणि चीननेच निर्मिलेल्या चित्रपटाने गोल्डन ग्लोब आणि ऑस्करमध्ये ढीगभर पुरस्कार जिंकले होते. त्या चित्रपटाची ताकद आशयात नव्हे, तर सादरीकरणात होती. गंमत म्हणजे त्याच सुमारास आंतरराष्ट्रीय अर्थकारणात चीनच्या प्रभाववृद्धीला सुरुवात झाली होती.  चिनी चित्रपटसृष्टीकडे तोपर्यंत ऑस्करच्या परिप्रेक्ष्यात ढुंकूनही न पाहिलेल्या अ‍ॅकॅडमीने किंवा गोल्डन ग्लोबचे परीक्षक असलेल्या ‘हॉलीवूड फॉरेन प्रेस’ने  ‘क्राउचिंग टायगर, हिडन ड्रॅगन’मध्ये त्यांच्या सुपरिचित चिकित्सक नजरेतून असे कोणते सोने शोधले, असा प्रश्न त्यावेळच्या विश्लेषक आणि रसिकांना पडला होता. तेव्हा या गोष्टी योगायोगाने घडत नसतात, असे म्हणायला निश्चितच जागा आहे. ‘क्राउचिंग टायगर, हिडन ड्रॅगन’ हा अविस्मरणीय आणि अभिजात म्हणावा असा चित्रपट नव्हता. कोरियन समाजावर भाष्य करणाऱ्या ‘पॅरासाइट’ने त्यावर्षीची ऑस्करची बाहुली मिळवली असली तरी तो चित्रपट म्हणजे कोरियाचा सर्वोत्कृष्ट चित्रपट नव्हे, कोरियन चित्रपट त्या पलीकडेही बराच काही आहे आणि वेगळा आहे. तसेच ‘आरआरआर’चेही आहे. निर्मिती, सादरीकरण आदी तांत्रिक बाबींच्या पातळीवर ‘आरआरआर’ त्याच्या आसपासच्या चित्रपटांमध्ये उठून दिसतो. उत्तम दर्जाचे व्हीएफएक्स, बॉलीवूडमधल्या आघाडीच्या कलाकारांची हजेरी, मिथ्यकथांचा वापर, ब्रिटिशांविरोधात लढलेल्या व्यक्तिरेखांचा आधार या सगळय़ा हमखास यशस्वी ठरणाऱ्या क्लृप्त्य़ाही त्यात बघायला मिळतात. परंतु आजकाल जगभर ज्याच्या अर्थकारणाचा दबदबा आहे, त्या बॉलीवूडच्या किंवा दक्षिणी चित्रपटसृष्टीतील अस्सल भारतीय म्हणता येतील अशा चित्रपटांच्या यादीत त्याचे नाव किती जण समाविष्ट करतील याविषयी शंकाच वाटते. ‘स्लमडॉग मिल्यनेअर’ या चित्रपटाच्या संगीतासाठी ए. आर. रेहमानला मिळालेले ऑस्कर ही बाब सिद्धच करते. कारण रेहमानने ‘जय हो..’ पेक्षा कितीतरी नितांतसुंदर संगीत त्याआधी दिलेले आहे, याबाबत कोणत्याही कानसेनाचे दुमत असणार नाही. थोडक्यात काय, तर पुरस्कार म्हणजे फक्त सर्वोत्कृष्टता नाही तर कुणीतरी योग्य वेळी त्या व्यासपीठावर पोहोचणे. गोल्डन ग्लोबसाठी ‘आरआरआर’च्या बाबतीत ते म्हणण्यास वाव आहे. अर्थात किरावानी यांच्या आणखी उत्तम कलाकृतीची प्रतीक्षा आहेच. तशा उत्कृष्टतेने त्यांच्या सुवर्णवेधामागचा ‘परंतु’ दूर करण्याची संधीच त्यांना मिळेल.