काँग्रेसने गणपतीस तुरुंगात डांबले असे विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी करणे आणि महाराष्ट्राचे बाल-हिंदुहृदयसम्राट कु. नितेश राणे यांनी भागवतधर्माची पताका आक्रमकपणे फडकावण्यास सुरुवात करणे या दोन भिन्न घटना एकापाठोपाठ घडणे हा योगायोग नाही. हे विधान करताना पंतप्रधान मोदी यांच्याच रांगेत कु. राणे यांस बसवण्यामागे पंतप्रधानपदाचा अधिक्षेप करणे वा कु. राणे यांस पदोन्नती देणे हा विचार अजिबात नाही. राजकारणातील वरिष्ठतम आणि कनिष्ठतम नेत्यांच्या कृतीमागील साधर्म्य दाखवणे हाच केवळ यामागील उद्देश. एरवी कु. राणे यांच्या राजकीय, वा अन्यही, उद्याोगांची दखल या स्तंभातून घ्यावी इतकी त्यांची (तूर्त) पात्रता नाही. तरीही असे करण्यामागील आणखी एक कारण म्हणजे पंतप्रधान आणि कु. राणे या दोघांनी सदरहू विधाने महाराष्ट्राच्याच भूमीत केली म्हणून. त्यास पार्श्वभूमी आहे ती महाराष्ट्रात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकांची. लोकसभा निवडणुकांआधी पंतप्रधानांनी दोनेक डझन वेळा महाराष्ट्रात पायधूळ झाडली. विधानसभेसाठी निवडणूक आयोगाच्या सौजन्याने त्यांस अधिक वेळ मिळेल. तो ते सत्कारणी लावतील याबाबत शंका बाळगण्याचे कारण नाही. तसेच त्यांच्या नजरेत भरावे यासाठी कु. राणे वा तत्सम अधिकाधिक अशी विधाने करतील याबाबतही शंका बाळगण्याचे कारण नाही. खरे तर त्याबाबत इतरांस आक्षेप असण्याची गरज काय, असा प्रश्न या संदर्भात उपस्थित होऊ शकेल. म्हणजे हा प्रश्न कु. राणे आणि त्यांचे (सध्याचे) नेते यांच्यातील आहे. ते त्यांचे पाहून घेतील; असे कोणी म्हणेल. ते योग्य. पण प्रश्न तेवढ्यापुरताच असता तर कु. राणे यांच्या चिमखड्या बोलांकडे दुर्लक्ष करता आले असते. राज्याच्या दुर्दैवाने वास्तव तसे नाही. कारण ही सुरुवात आहे. असे म्हटल्यावर त्याचा शेवट काय, ही पृच्छा ओघाने आलीच. त्यावर भाष्य करण्याआधी एक घटनाक्रम लक्षात घ्यायला हवा.

तो असा. कु. राणे ‘मशिदीत घुसून मारू’ इत्यादी भाषा करतात. तरीही त्यामुळे वातावरणीय तापमान वाढत नाही. मग ते आणखी काही विचारमौक्तिके उधळतात. तरीही त्याकडे हवे तितके ‘ज्यांचे जायला हवे त्यांचे’ लक्ष जात नाही. गणेशोत्सवही शांततेत पार पडतो. मग ते अजितदादा पवार यांच्यावर दुगाण्या झाडू लागतात. त्यावर बाकी कोणी काही भाष्य करायच्या आधी अजितदादा यांच्याकडून कु. राणे यांच्याविरोधात श्रेष्ठींकडे तक्रार केली असल्याची माहिती दिली जाते. खरे तर सत्यवचनी आणि धर्मनिरपेक्ष अजितदादांनी ही तक्रार नक्की कोणाकडे, कधी आणि कोणत्या शब्दांत केली याचाही तपशील दिला असता तर महाराष्ट्राचे अधिक प्रबोधन झाले असते. पण ते तसे करत नाहीत. वास्तविक सद्या:स्थितीत अजितदादा काय आणि कु. राणे काय! दोघांचेही श्रेष्ठी एकच. त्यामुळे अजितदादांची तक्रार नक्की कोणत्या श्रेष्ठींनी ऐकली हा मुद्दा तसा महत्त्वाचाच. तूर्त तरी तो अनुत्तरित. तर या तक्रारीची माहिती देताना हिंदू-मुसलमान ऐक्य, त्यांच्या पक्षातर्फे मुसलमान उमेदवार कसे दिले जाणार आहेत इत्यादी मौलिक माहितीही अजितदादा देतात. पुढे जाऊन ‘युतीत सहभागी असलो तरी शाहू- फुले- आंबेडकरांची विचारधारा आम्ही सोडलेली नाही’ अशीही ग्वाही देण्यास ते विसरत नाहीत. वास्तविक या सगळ्याची गरज होती का, हा प्रश्न. पोलीस चौकशीत न विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देणाऱ्यावर अधिक वहीम घेतला जातो तसे राजकारणातही होते. त्यामुळे अजितदादा वा त्यांच्या पक्षाच्या या निधर्मीवादाच्या फेरवचनाची आवश्यकता का, हा मुद्दा. त्याचे कारण शोधण्याआधी कु. राणे आणि अजितदादा यांच्या वाग्विलासाची परिणती कु. राणे यांस प्रखर हिंदू निष्ठेचे प्रशस्तीपत्रक देण्यात होते हे लक्षात घ्यायला हवे. जनसामान्यांच्या भाषेत याचा अर्थ अजितदादा यांची तक्रार दिल्लीतील श्रेष्ठींनी खुंटीवर टांगली; असा होतो. राजकारणात काहीही कधीही योगायोगाने होत नाही. जे होते त्यामागील कारण भूतकाळात तरी असते किंवा भविष्यात तरी सापडते. येथे ते भविष्यात आहे. ते भविष्य आहे विधानसभा निवडणुका; हे.

म्हणजे ही सारी तयारी आहे अजितदादा यांनी महायुतीतून प्रस्थान ठेवावे, याची. लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर ‘साम- दाम- दंड- भेद’ यातील शेवटच्या दोन पर्यायांच्या धाकाने अजितदादांस भाजपने आपल्या कळपात ओढण्यात यश मिळवले खरे. पण त्याचा अपेक्षित तर सोडाच पण दोन-पाच टक्केही उपयोग झाला नाही. उलट अपायच झाला. निकालातील परिणाम ही भाजपच्या शीर्षस्थ नेत्यांच्या साहसवादी राजकारणास महाराष्ट्रातील मतदारांनी दिलेली सणसणीत चपराक होती. त्यानंतर महायुतीची होडी बागबुग करू लागली आणि तीत क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी असल्याचे भाजपस जाणवू लागले. या होडीचे एक वल्हे एकनाथराव शिंद्यांच्या हाती आहे आणि दुसरे भाजपच्या. तेव्हा या ‘तिसऱ्यास’ ‘‘आपण आता उतरा’’ हे सांगायचे कसे, हा प्रश्न पहिल्या दोघांस पडला. कु. राणे आणि तत्सम वाचाळवीरांची फौज ही या कामी भाजपने मैदानात उतरवलेली पहिली फळी. ही झुंड हिंदुत्वाचा गजर यापुढे अधिकाधिक तीव्र करत जाईल. वेळ पडल्यास या गजरात शिवाजी पार्कातून मराठी हिंदुहृदयसम्राट आपलीही बांग मिसळतील. हा ध्वनिकल्लोळ पुरेसा तीव्र होईपर्यंत निवडणूक आयोगानेही तारखांची घोषणा लांबवून ठेवल्यास नवल नाही. आणि हे सर्व नेपथ्य, वेशभूषा आणि सर्वांचे सुरेख मेकअप वगैरे झाले की तिसरी घंटा व्हायच्या वेळी अजितदादांस निधर्मीवादाची उबळ असह्य होऊन ‘शाहू-फुले-आंबेडकर’ यांच्या विचारांच्या वारशाची शपथ घेत महायुतीत्याग करतील. हे असेच, या क्रमाने होईल असे आताच छातीठोकपणे सांगता येणार नाही कारण राजकीय वाऱ्यांची दिशा वर्तवणे अवघड, हे खरे. पण हे सर्व त्या दिशेने जाऊ लागलेले आहे, यात तिळमात्र संदेह नाही.

हा मार्ग पत्करण्याची वेळ सत्ताधाऱ्यांवर आलेली आहे याचे कारण सत्ता राखण्याच्या आव्हानाचा आकार. लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर मराठा-अन्य मागास संघर्षाचा वणवा पेटला. तो विझवण्यासाठी भाजपने छगन भुजबळ यांच्यासारख्या अनुभवी आणि सद्या:स्थितीत तडजोडवादी गरजवंत ‘ओबीसी’ नेत्यांस पुढे केले. त्याचा परिणाम उलटा झाला. आग अधिक भडकली. नंतर लहान-मोठ्या नेत्यांचे अग्निशमन दल भाजपने वापरून पाहिले. त्यांना तूर्त तरी यश आलेले नाही. म्हणजे जातीतील दुहीच्या खेळीचे प्रत्यंतर सत्ताधाऱ्यांस अद्याप मिळालेले नाही. निवडणुकांच्या आत ही आग विझवण्याचा जालीम उपाय त्यांस आवश्यक आहे. काही वैदू रुग्णाचे एका वेदनेवरील लक्ष्य अन्यत्र वळवण्यासाठी दुसरे अधिक तीव्र वेदनाकेंद्र निर्माण करण्याचा ‘उपाय’ सुचवतात. राजकारणातही असे होताना दिसते.

म्हणजे जात विग्रह-वादावर लागलेल्या आगीवर उपाय म्हणून या आगीची दिशा ‘धर्म’ या अधिक जालीम आणि ज्वलनशील घटकाकडे वळवण्याचा ‘उपाय’ तपासण्याची गरज संबंधितांस वाटत असेल. ही शक्यता नाकारणे अवघड. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पडलेल्या पुतळ्याने पडता पडता ‘लाडकी बहीण’ प्रेमास मातीमोल केले. बदलापुरातील शाळेत या प्रेमाचे वस्त्रहरण झाले. परत प्रकाश आंबेडकर, राज ठाकरे आदींच्या बाह्य रसदेवर किती विसंबून राहावे हा प्रश्न आहेच. शिवाय हरयाणाप्रमाणे महाराष्ट्रात मदतीस ‘आप’ही नाही. अशा वेळी जुन्या, विश्वसनीय आणि काळकसोटीवर सिद्ध अशा ‘धर्म’ या मुद्द्याचा आधार घेण्याची गरज संबंधितांस वाटणे साहजिक. तेव्हा आगामी दोन महिने हे ‘शाहू- फुले- आंबेडकर’ यांच्या कर्मभूमीत धर्म-कसोटीचे असतील याची जाणीव मऱ्हाटीजनांस असलेली बरी, इतकेच.