मूलभूत संशोधनापेक्षा नोकरी बरी, अशी मानसिकता असलेल्या आपल्या देशात वेगवेगळे दिन साजरे करणे बहुतेकांना आवडते…

उत्सवांचे पडघम वाजू लागले असतानाच्या काळात आणखी एक दिवस मिरवणुका, फटाके अशा कोणत्याही गाजावाजाविना उत्साहाने साजरा करण्याची संधी चालून आली. २३ ऑगस्ट. गेल्या वर्षीचा हाच तो दिवस ज्या दिवशी चंद्राला स्पर्श करणारा भारत हा जगातील चौथा देश ठरला. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर जाणारा तर पहिलाच. विक्रम लँडर चंद्राच्या त्या खडबडीत पृष्ठभागावर अलगद उतरले आणि भारतीय अवकाश संशोधन संस्थेतील शास्त्रज्ञांसह ते दृश्य विविध प्रकारच्या पडद्यांवर ‘याचि देही याचि डोळा’ पाहणाऱ्या कोट्यवधी भारतीयांनी एकच जल्लोष केला. जगानेही टाळ्या वाजवल्या. कारण, अमेरिका, रशिया आणि चीननंतर असा पराक्रम करणाऱ्या भारताने घेतलेली ही अवकाश झेप अनेकार्थांनी आपली ‘ताकद’ दाखवून देणारी होती. याला प्रतीकात्मकतेपलीकडेही अनेक आयाम होते. तेव्हा हा राष्ट्रीय अंतराळ दिन म्हणून घोषित करणे ठीकच. पण चंद्रावर ‘विक्रम’चे उतरणे हा जसा अखेरचा टप्पा नव्हे, तसा तो पहिलाही नव्हे, कारण भारताच्या राष्ट्रीय अंतराळ दिवसाला अनेक वर्षांचे सुकृत आहे, हेही ध्यानात असू द्यावे.

sebi bans anil ambani from securities market
अग्रलेख : ‘अ’ ते ‘नी’!
how does suiceide pod work
इच्छामरणासाठी तयार करण्यात आलेले ‘सुसाईड पॉड’ काय आहेत? हे मशीन कसे कार्य करते? याची चर्चा का होत आहे?
Loksatta editorial on badlapur protest against school girl sexual abuse case
अग्रलेख: आत्ताच्या आत्ता…
loksatta editorial shivaji maharaj statue collapse
अग्रलेख: पडलेल्या पुतळ्याचा प्रश्न!
rbi concerns decline in bank deposits marathi news
अग्रलेख: पिंजऱ्यातले पिंजऱ्यात…
loksatta editorial on president draupadi murmu
अग्रलेख: अब द्रौपदी प्रश्न न पूछेगी…
Loksatta editorial Election commission declare assembly poll in Jammu Kashmir and Haryana
अग्रलेख: ‘नायब’ निवृत्तीचा निर्णय
loksatta editorial Attack of the Ukrainian army inside the territory of Russia
अग्रलेख: ‘घर में घुसके’…

भारताचा अवकाश संशोधनाचा प्रवास स्वातंत्र्यानंतर जवळपास दीड दशकात सुरू झाला. डॉ. विक्रम साराभाई यांच्या द्रष्ट्या नेतृत्वाखाली अवकाश संशोधनासाठी राष्ट्रीय समिती नेमली गेली. तीच पुढे विकसित होत १९६९ मध्ये भारतीय अवकाश संशोधन संस्था अर्थात इस्राोची स्थापना झाली. भारतीय राष्ट्रीय उपग्रह कार्यक्रमाने अवकाश संशोधनाच्या उपयोजनांची मुहूर्तमेढ रोवली. दूरसंचार, दूरचित्रवाणी प्रक्षेपण, हवामान अंदाज, शिक्षण अशा विविध क्षेत्रांसाठी हे गरजेचे होते. यामध्ये केंद्रस्थानी होता तो संशोधनासाठी देशी तंत्रज्ञान विकसित करण्याचा मुद्दा. सुदूर संवेदन, उपग्रह यानांची संरचना अशा काही कळीच्या गोष्टींवर त्यासाठी काम करणे आवश्यक होते. ‘इस्राो’च्या स्थापनेआधी थुंबा गावात उभारण्यात आलेले यान प्रक्षेपण स्थानक हा पहिला महत्त्वाचा टप्पा होता. भारताचा अवकाश कार्यक्रम आत्मनिर्भर आणि विकासात मोठे योगदान देणारा असावा, असे विक्रम साराभाईंचे ध्येय होते. ‘इस्राो’ने १९७५ मध्ये सोडलेला पहिला उपग्रह आर्यभट्ट ही त्या दिशेने घेतलेली झेप होती. भास्कर, रोहिणी उपग्रह मालिका आणि नंतर इन्सॅट मालिका हे भारतीय अवकाश कार्यक्रमातील नि:संशय मैलाचे दगड. हा सारा प्रवास ऐंशीच्या दशकापर्यंतचा.

नव्वदच्या दशकात ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपक वाहन अर्थात पीएसएलव्हीचे ‘उड्डाण’ हे ‘इस्राो’चे ध्रुवीय कक्षांमध्ये उपग्रह सोडण्यासाठीचे जणू कार्ययंत्र झाले. पृथ्वीवरील निरीक्षणांपासून सुदूर संवेदनासाठीचे उपग्रह अवकाशात सोडण्यापर्यंतच्या प्रवासात पीएसएलव्हीनेच एक प्रकारे सारथ्य केले. चंद्रयान आणि मंगलयानाची उड्डाणेही पीएसएलव्हीच्याच सारथ्यात झाली. भूसंकालिक उपग्रह प्रक्षेपक वाहन अर्थात जीएसएलव्हीने भूस्थिर कक्षेत उपकरणे सोडण्याची सिद्धता प्राप्त करून आपल्या क्षमता आणखी रुंदावल्या. या प्रवासाची उजळणी एवढ्यासाठी, की अवकाश संशोधनातील कामगिरीचे मूल्यमापन करताना त्यातील पूर्वसूरींचे योगदान विसरले जाऊ नये. अवकाश संशोधनाचे आणि विस्ताराचे सगळे कार्यक्रम राबविताना त्यासाठीची राजकीय इच्छाशक्तीही महत्त्वाचीच. स्वातंत्र्यानंतर भाकरीचा चंद्र शोधण्याची भ्रांत पडलेल्या देशवासीयांना प्राधान्यक्रमांच्या यादीत अवकाशात उपग्रह सोडण्याचा समावेश करणे वेडगळपणाचे वाटलेच असणार. पण, त्याचा उपयोग त्यांचे आयुष्य आणखी सुकर करण्यासाठी होणार आहे, याची जाणीव या लोकशाही देशात रुजविणे खचितच गरजेचे होते. ते काम पं. जवाहरलाल नेहरू यांच्यासारख्या विज्ञानवादी नेतृत्वाने केले, हे अंतराळ दिनी आठवणेही गरजेचे. कवितेत विरघळलेला चंद्र प्रत्यक्षात तितका मृदू आहे का, हे आज त्याशिवाय आकळले नसते.

चंद्रयान-१ च्या यशानंतर चंद्रयान-२ च्या वेळी चंद्राच्या पृष्ठभागावर उतरण्यात अपयश आले, तरी त्याच्या कक्षेत फिरणारे ऑर्बिटर हे उपकरण चंद्राच्या पृष्ठभागाबद्दल बरीच माहिती देत राहिले. २०१७ मध्ये आपल्या प्रक्षेपक यानाने १०४ उपग्रह एका वेळी अवकाशात नेण्याचा पराक्रमही केला होता. चंद्रयान-३ ने विक्रम लँडर उतरवून चंद्र संशोधनाच्या प्रवासातील पुढच्या स्थानकावरही भारत पोहोचल्याची ग्वाही दिली. संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा समितीत अद्याप कायम सदस्य म्हणून स्थान न मिळालेल्या भारताने अवकाश संशोधनात आपले स्थान आपल्या हिमतीवर पक्के केले आहे, हा संदेश चंद्रयान-३ ने नक्कीच दिला. तो जागतिक पातळीवर दृढ करताना केवळ ‘अभिमान’, ‘गर्व है’ वगैरेपुरता मर्यादित राहून चालणार नाही. त्याला मुत्सद्दीपणाची जोड द्यावी लागेल. अवकाश संशोधन ही काही विकसित देशांची मक्तेदारी होती. ती मोडताना आपल्याला अधिक पुढे जावे लागेलच, पण अवकाश संशोधनात प्रगत नसलेल्या इतर देशांनाही बरोबर घेऊन त्याद्वारे आंतरराष्ट्रीय संबंधांना नवे परिमाण द्यावे लागेल.

येत्या काळात गगनयान प्रकल्पाच्या माध्यमातून भारत अवकाशात मनुष्य पाठवेल. नासाबरोबरच्या ‘निसार’ प्रकल्पाद्वारे पृथ्वीचा अभ्यास करायचा आहे, तर आणखी एका दशकानंतर अवकाशात स्वत:चे अवकाश स्थानक स्थापण्याचेही भारताने ठरविले आहे. या संशोधनासाठीचे मनुष्यबळ तसेच देशी तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी विद्यार्थ्यांना अवकाश संशोधन क्षेत्राकडे आकर्षित करावे लागेल. राष्ट्रीय अवकाश दिनाने ते साध्य करणे अपेक्षित आहे. मूलभूत संशोधनापेक्षा नोकरी बरी, अशी मानसिकता असलेल्या आपल्या देशात वेगवेगळे दिन साजरे करणे बहुतेकांना आवडते. पण त्यात त्या दिनाचा हेतूच मरून जातो. ही हेतुहत्या करण्यात आपल्याच संस्था पुढे असतात, हे दुर्देव. अखिल भारतीय तांत्रिक शिक्षण परिषदेने – म्हणजे ‘एआयसीटीई’ने सप्टेंबर २०२३ च्या पहिल्या आठवड्यात ‘चंद्रयान महोत्सव’ साजरा करण्यासाठी देशातील २०० तंत्रशिक्षण संस्थांची निवड केली. पण या महोत्सवात पोस्टर स्पर्धा, विज्ञान कथाकथन, नृत्यस्पर्धा यांचाच भरणा होता. हे असले महोत्सव साजरे करण्यापेक्षा ‘एआयसीटीई’ने या २०० संस्थांच्या क्षमतांची तपासणी करून जर पुढल्या काळात त्या वाढवण्याचा प्रयत्न केला असता, तरी खूप झाले असते. या २०० संस्थांमध्ये तमिळनाडूतील सेलमचे ‘सोना तंत्रशिक्षण महाविद्यालय’देखील होते. ‘चंद्रयान- ३’ला पुढल्या झेपेआधी पृथ्वीच्या कक्षेत ठेवण्यासाठी उपयुक्त असलेले काही भाग सेलमच्या या महाविद्यालयात तयार झाले होते. आजघडीला दिल्लीच्या किरोडीमल महाविद्यालयात सध्या मंगळाच्या पृष्ठभागावरील वाहन घडवण्याची तयारी सुरू आहे. आपले विद्यार्थी आळशी नाहीत. पण त्यांनी कोणत्या दिशेने काम करावे, हे सांगण्याची मात्र गरज आहे. ‘चंद्रयान-३’च्या प्रक्षेपणावेळी सर्व आयआयटी व अन्य तंत्रशिक्षण संस्थांतील विद्यार्थ्यांना एकत्र जमवून चित्रवाणीवरील थेट प्रसारण दाखवण्याचा आदेश ‘वरून’ निघाला होता. वास्तविक असल्या आदेशांची गरज नाही. त्याऐवजी अध्यापकांनी अधिक नेमकी माहिती देणे, अधिक प्रश्न विचारण्यास विद्यार्थ्यांना प्रवृत्त करणे हे अपेक्षित आहे. भारतीय ज्ञानपरंपरा मोठी आहेच, पण विक्रम साराभाई ते एपीजे अब्दुल कलाम यांच्या ज्ञानलालसेचा वारसा जागता ठेवण्याची गरज अधिक आहे.

तो सामान्यजनांतही जागता ठेवण्यासाठी आपल्या देशाच्या अवकाश संशोधनातील साजरे न करताही मिळविलेल्या यशाच्या पूर्वसुकृताचे स्मरण आवश्यक ठरते. राष्ट्रीय अंतराळ दिनाचा उत्सवी गोंगाट पहिल्या वर्षी तरी फार दिसला नाही हे बरेच; कारण अवकाश-संशोधनाने नेहमी ‘नभाच्या पल्याडचे’ पाहायचे असते!