जगण्याशी संबंधित अनेक अंगांचा अभ्यास आनंददायी असू शकतो, याचा अंदाज नसलेल्या आपल्या समाजात अजूनही अभियांत्रिकी आणि वैद्यकीय शाखांची हाव सुटत नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

आज स्त्रिया आणि पददलित यांच्याखेरीज वा त्यांच्या बरोबरीने भारतात सर्वात केविलवाणी अशी कोणती जमात असेल तर ती म्हणजे विद्यार्थी. यात शालेय आणि महाविद्यालयीन दोन्हीही येतात. भारतीय विद्यार्थ्यांची इतकी कणव येते की त्यांच्याकडे पाहिल्यावर खाटीकखान्याकडे निघालेले प्राणीही यांच्या मानाने आनंदी वाटतात. आधी अभ्यासक्रमांचे घोळ, नंतर परीक्षा घ्याव्यात की न घ्याव्यात यावर चर्चा आणि परिसंवाद, परीक्षा झाल्याच तर उत्तरपत्रिका तपासणारे ऐन वेळी संपावर जाणारच नाहीत याची हमी नाही. शिवाय पेपरफुटीचा धोका आहेच. त्यामुळे एखादा पेपर फुटणे आणि त्या विषयाची परीक्षा दोन महिन्यांनी ठरवली जाणे ओघाने आलेच. म्हणजे परीक्षेनंतर काही कार्यक्रम ठरवायची अडचण. अलीकडे बरेच विद्यार्थी परीक्षेनंतरही दुसऱ्या कोणत्या तरी परीक्षेसच सामोरे जात असतात. पण पेपरफुटी वा तत्सम समस्येमुळे या परीक्षेत राहिलेल्या पेपरचे तंगडे नंतर येणाऱ्या परीक्षेत घुसते. परिणामी दोन्हीही परीक्षांत कपाळमोक्षाचा धोका वाढतो. हे वा यातील काही झाले नाही तर ‘कट ऑफ’ आदी मुद्दय़ांचे त्रांगडे ठरलेले. इतके करूनही या सगळय़ांतून तावून-सुलाखून बाहेर पडावे तर अभियंत्यांची बोळवण १५-२० हजारांत करणाऱ्या नोकऱ्यांसाठीच्या जीवघेण्या स्पर्धात उतरायचे. हे दुष्टचक्र काही संपत नाही. त्यास घाबरून राजस्थानातील विद्यार्थ्यांच्या ‘कोटा कारखान्या’तील विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्याचे वृत्त नुकतेच आले. यंदाच्या आठ महिन्यांत या शहरात अशा २२ विद्यार्थ्यांच्या आत्महत्या नोंदवल्या गेल्या. हे सर्व शैक्षणिक वेठबिगार. वेठबिगारी ही सामाजिक समस्या असते. मग ती शैक्षणिक असो वा शेतमजुरादींची असो. तेव्हा कोटा येथील विद्यार्थ्यांच्या आत्महत्या ही शैक्षणिक समस्या नाही; ती सामाजिक आहे.

हेही वाचा >>> अग्रलेख: अवध्य मी; पुतिन मी!

समाज म्हणून आपण उद्याच्या या नागरिकांसाठी किती आणि कोणत्या संधी उपलब्ध करून देत आहोत या प्रश्नाच्या उत्तरात विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांचे कारण दडलेले आहे. आज समस्त मध्यमवर्गातील पुढची पिढी काही तरी करून दाखवण्याच्या अस्वस्थतेने ग्रासलेली आहे. आपल्याकडील सामाजिक उतरंड यात भर घालते. सामाजिक उतरंड म्हणजे जातव्यवस्था. या उतरंडीतील वरच्या फळीवर असलेल्यांस काही व्यवसाय आपल्यासाठीच आहेत/नाहीत आणि काही व्यवसाय खालच्या रांगेतल्यांसाठी आहेत/नाहीत, असेच वाटत असते. व्यवस्थेतील हे वरचे-खालचे स्तर हे अभेद्य आहेत. त्यामुळे वरच्या रांगेत स्थान असलेल्यांच्या घराघरांत आपल्या पुढच्या पिढीने असेच ‘वरचे’ मानले जाणारे व्यवसाय निवडायला हवेत, असा आग्रह असतो. कोटासारखे शिक्षणाचे कारखाने या मानसिकतेमुळे फोफावतात. आपल्या पाल्यास आयआयटी वा वैद्यकीय अभ्यासक्रमांत प्रवेश मिळवून देण्याची गुरुकिल्ली आपल्याला गवसल्याचा दावा हे ‘कोटा कारखाने’ करत असतात आणि अन्य बाबाबापूंवरील अंधश्रद्धेप्रमाणे मध्यमवर्गीय पालक एखाद्या देवस्थानाबाहेर रांग लावावी तसे ‘कोटा कारखान्या’बाहेर रांगा लावून असतात. संख्याशास्त्रीयदृष्टय़ा पाहू गेल्यास या ‘कोटा कारखान्या’मुळे आयआयटी वा वैद्यकीय अभ्यासक्रमांस प्रवेश मिळालेल्यांपेक्षा न मिळालेल्यांची संख्याच जास्त असेल. पण हे समजून घेण्याइतके भान अलीकडच्या पालकांत नसते. 

त्यामुळे शिक्षकांप्रमाणे वा शिक्षकांखालोखाल हे पालक हे आजच्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीतील सर्वात मोठे आव्हान बनलेले आहेत. हा पालकवर्ग बराचसा मेंढपाळ मानसिकतेचा असतो. हे सर्व मेंढपाळ एकमेकांस धरून असतात. एखाद्या शेतातील कुरण अधिक हिरवे आहे असा ग्रह होऊन एखाद्या मेंढपाळाने आपले कोकरू त्या शेतात सोडले तर लगेच अन्य मेंढपाळही तेच करू पाहतात. असे करण्यामागे आपल्या कोकरांस अधिक हिरवा, अधिक चांगला, अधिक पोषक चारा मिळावा असाच त्यांचा उद्देश असतो, हे मान्य. पण मुळात आपणांस जे योग्य वाटते ते आपल्या पाल्यास तसे वाटते का, त्यांस काय हवे आहे, तो काय पचवू शकतो वा पचवू शकत नाही याचाही पालक म्हणून आपण विचार करायला हवा, याचे भान आजच्या पालकांत अत्यंत अभावाने आढळते. परिणामी जेथे गर्दी अधिक तेथेच आपल्या पाल्यांस पाठवण्याकडे त्यांचा कल! यातून कोटासारखे कारखाने तयार होतात आणि ज्यांना तेथे आपल्या पाल्यांस पाठवता येत नाही, ते आपापल्या प्रांतांत लातूरसारखे तसे कारखाने विकसित करतात. तेव्हा या कारखान्यांत असे आत्महत्यांचे अपघात होत असतील तर त्यासाठी एक घटक अधिक जबाबदार आहे. 

हेही वाचा >>> अग्रलेख :..बजाव पुंगी!

तो म्हणजे पालक. कारण आजचा विद्यार्थी हा बव्हंश: शिक्षण, कारकीर्द, प्रगती, स्थैर्य आदींबाबत पालकांच्या अंधश्रद्धांचा बळी आहे. वास्तविक कोणत्याही प्रगतिशील समाजात अमुक एक असे(च) असायला हवे, ही धारणा प्रगतीस खीळ घालणारी ठरते. म्हणजे आयआयटी वा वैद्यकीय शाखेत एकदा का प्रवेश मिळाला की आपल्या पाल्याच्या जगण्याच्या समस्या सुटल्या असे या पालकवर्गास वाटते. ते काही प्रमाणात खरेही आहे. पण काही प्रमाणातच. म्हणजे आयआयटीत वा वैद्यकीय शाखेत गेलेल्यांचे भले होते हे खरे. पण म्हणून आपल्या पाल्यांचे भले होण्यासाठी या दोन शाखांचाच रस्ता निवडायला हवा, हे मात्र तितके खरे नाही. बरे, या दोन शाखांत प्रवेश मिळाला म्हणून विद्यार्थी आणि त्यांचे पालक यांचा संघर्ष संपतो असेही नाही. तेथे आपापले पुत्र/पुत्री गुणवत्ता यादींत हवे, या अपेक्षांचे दडपण. गुणवत्ता यादीत का यायचे? तर ‘चांगल्या’ कंपन्यांतून बोलावणे येते आणि पाश्चात्त्य देशांतील जगण्याची हमी मिळते म्हणून. म्हणजे आपल्या पुत्र/पुत्रीस जमते काय, आवडते काय, झेपते काय याचा विचार कोठेही नाही. पालकांच्या स्वप्नपूर्तीसाठी त्याने आपले धावत राहायचे. यातही परत पालकांच्या प्रतिष्ठेचा एक मुद्दा असतोच असतो. आपला मुलगा/मुलगी हॉर्वर्ड वा ‘एमआयटी’त आहेत हे सांगणे/मिरवणे हा या एकविसाव्या शतकातील नवब्राह्मण्यवाद आहे हे कितीही प्रयत्न केले तरी नाकारता येणारे नाही. म्हणूनच कोटा कारखान्यात आत्महत्या करणारे विद्यार्थी हे या नव्या जातव्यवस्थेचे बळी ठरतात. वास्तविक पाश्चात्त्य उच्चशिक्षित आणि विकसित समाजाने ही नवी जातव्यवस्था कधीच मोडली आहे. आज त्या देशांत अभियांत्रिकी वा वैद्यकीय अभ्यासक्रमापेक्षा मानव्य शाखांत (ह्युमॅनिटीज) प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांकडे आदराने पाहिले जाते. मानवी प्रतिभा, विचारशक्ती यांचा वैयक्तिक तसेच सामाजिक अंगाने अभ्यास करणाऱ्या मानव्य शाखांस म्हणूनच आज त्या देशांत अधिकाधिक उत्तेजन दिले जाते. अभियांत्रिकीचे आज अधिकाधिक स्वयंचलन होऊ लागले आहे आणि वैद्यकीयचे अभियांत्रिकीकरण. कृत्रिम बुद्धिमत्तादींचे विविध पर्याय आणि अगदी साध्या साध्या आणि अत्यंत गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियांत होऊ लागलेला यंत्रमानवादी उपकरणांचा वापर यातून हे दिसून येते. अशा वेळी मानवी जगण्याशी संबंधित अन्य अनेक अंगांचा अभ्यास करणे आनंददायी असू शकते. पण या बदलांचा कोणताही अंदाज नसलेल्या आपल्या जगात मात्र अजूनही अभियांत्रिकी आणि वैद्यकीय शाखांची हाव काही सुटत नाही. कोटासारख्या आत्महत्यांमागे ही हाव आहे. म्हणून या हावेस बळी पडणारे पालक या आत्महत्यांस अधिक जबाबदार ठरतात. जे विकते ते पिकवले जाते या तत्त्वाने चालवल्या जाणाऱ्या त्या कारखान्यांस बोल लावण्यात काही अर्थ नाही.