लालू यांच्या कन्येने तोंडसुख घेतल्याचे निमित्त झाले आणि फुरंगटलेले नीतीश कुमार भाजपकडे निघाले. तसे ते निघाले नसते तर भाजपने आणखीही काही केले असते..
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
बिहारमध्ये नीतीश कुमार पुन्हा एकदा भाजपच्या कळपात येण्याचा फार काही राजकीय लाभ नाही, हे भाजपच्या धुरिणांस ठाऊक नसेल, असे नाही. तरीही नीतीश आणि त्यांच्या जनता दलास आपल्याकडे वळविण्याचा घाट भाजपने घातला. त्यामागील एकमेव कारण म्हणजे विरोधकांच्या ‘इंडिया’ आघाडीस अपशकुन करणे. त्यात भाजपचे यश निर्विवाद. या यशासाठी भाजपचे बिहार प्रभारी महाराष्ट्राचे विनोद तावडे हे खचितच अभिनंदनास पात्र ठरतात. एकेकाळच्या काँग्रेसप्रमाणे भाजपत नेतृत्वाकडून अवहेलना सहन करण्याची क्षमता असलेल्याचे नंतर भले होते. विनोद तावडे हे त्याचे एक महत्त्वाचे उदाहरण. गेल्या विधानसभा निवडणुकीत आमदारकीसाठी उमेदवारीही नाकारली गेलेल्या तावडे यांचे दिल्लीत पुनर्वसन झाले आणि बिहारसारख्या राज्याची जबाबदारी त्यांच्याकडे दिली गेली. ती त्यांनी किती उत्तम पार पाडली हे नीतीश कुमार यांच्यासारख्यास भाजपने कसे गळास लावले यातून दिसून येते. आज भाजप पक्षसंघटनेत एके काळी प्रमोद महाजन यांचे जे स्थान होते ते आज तावडे यांनी मिळवले. राजकारणात श्रद्धा आणि सबुरी असेल तर यश कसे हमखास असते याचा तावडे हा दाखला.
आणि तीच नेमकी नसेल तर काय होते, याचे नीतीश कुमार हे उदाहरण. हा गृहस्थ गेली १९ वर्षे, म्हणजे जवळपास दोन दशके बिहारसारख्या महत्त्वाच्या राज्याचा मुख्यमंत्री आहे. पण ममता बॅनर्जी वा अण्णा द्रमुकच्या जयललिता वा द्रमुकचे एम. के. स्टालीन वा गेलाबाजार चंद्राबाबू नायडू यांच्याप्रमाणे त्यास एकदाही स्वबळावर सत्ता मिळवता आलेली नाही. म्हणून कधी लालूप्रसाद यांचा ‘राजद’, कधी भाजप, कधी डावे तर कधी उजवे अशा सर्व गरजवंतांशी राजकीय शय्यासोबत करून सत्ता मिळवणे आणि मिळाली की ती राखणे हे त्यांचे आयुष्यभराचे ध्येय. भाजपशी काडीमोड घेताना त्या पक्षाचे नरेंद्र मोदी हे किती असहिष्णु नेते आहेत हे सांगितल्यानंतर अवघ्या काही महिन्यांत पुन्हा मोदी यांचे चरणतीर्थ घेण्यात त्यांना कमीपणा वाटत नाही. नंतर पुन्हा भाजपची साथ सोडून लालूंच्या पक्षाशी घरोबा केल्यानंतर ‘‘हमे मर जाना कबूल है लेकिन भाजपाके साथ नही जाएंगे’’, असे जाहीरपणे सांगणारे नीतीश कुमार आगामी काळात फारसे काही भवितव्य नाही असे दिसल्यावर सराईत पक्षांतऱ्याप्रमाणे लालूंची साथसंगत सोडून पुन्हा भाजपस डोळा घालू शकतात. आणि सदैव सत्ताकांक्षिणी भाजप नीतीशकुमार यांचा राजकीय बदफैलीपणा पोटात घालून त्यांना पुन्हा नांदवण्यास तयार होतो. अशा बदफैलीपणाची गरज जितकी नीतीश कुमार यांच्यासारख्यास असते तितकी वा त्यापेक्षाही अधिक काँग्रेसी शैली अंगीकारणाऱ्या भाजपस असते. यावर भाजपपेक्षाही भाजपवादी झालेले नीतीश कुमार हे ‘इंडिया’ आघाडी सोडून भाजपचा हात धरत असल्यामुळे ‘लोकसत्ता’ त्यांच्यावर टीका करीत असल्याची प्रतिक्रिया व्यक्त करतील. या टीकाकारांसारखीच ती हास्यास्पद असल्याने तीकडे दुर्लक्ष करून परिस्थितीचा ऊहापोह करणे इष्ट.
याचे कारण या राजकारणातील विसंवाद. नीतीश कुमार यांनी ज्यावेळी लालूंची साथसोबत करण्याचा निर्णय घेतला त्यावेळी त्यांना आता भाजपचे दरवाजे कायमचे बंद अशी प्रतिक्रिया अनेक भाजप नेत्यांनी दिली. ती योग्यच. पण आता नीतीश कुमारांचे एकेकाळचे उपमुख्यमंत्री भाजपचे सुशील मोदी हे हा दरवाजा उघडा असल्याचे म्हणतात तर त्यांच्याच पक्षाचे गिरिराज सिंह यांना तो बंद असल्याचे दिसते. नीतीश कुमार सोडून गेल्याने भाजपने ज्यांस चुचकारणे सुरू केले ते बिहारातील दुसरे मागास नेते रामविलास पास्वान यांचे सुपुत्र चिराग हे या निर्णयाने बिथरतात. घराणेशाहीविरोधात उठता बसता बोटे मोडणारा भाजप मागासांतील घराणेशाहीवर दावा सांगणाऱ्या चिराग यांचा आधीच मिणमिणता राजकीय दिवा विझू नये यासाठी प्रयत्न करतो आणि संभाव्य सरकारात उपमुख्यमंत्रीपदी सुशील मोदी यांच्याऐवजी कोणाची वर्णी लावता येईल यावर चर्चा सुरू होते. हे मोदी भाजप नेतृत्वापेक्षा अधिक नीतीश कुमारांस जवळचे असल्याचा वहीम होता आणि आहे. देशभरात ‘ओबीसीं’ची जनगणना केली जावी अशी भाजपस अमान्य मागणी करण्यास जेव्हा नीतीश कुमार यांनी पंतप्रधान मोदी यांची भेट घेतली त्याहीवेळी हे सुशीलकुमार मोदी त्यांच्यासमवेत होते. भाजपच्या या मोदींशी अधिक दोस्ताना करणारे हे कुमार आपल्याच पक्षाचे नेते लल्लन सिंह हे आपल्यापेक्षा लालूप्रसाद यांस अधिक जवळ गेल्याच्या संशयावरून मात्र बिथरतात. या संशयापोटीच या लल्लनास नीतीश कुमार यांनी अलीकडेच पक्ष नेतृत्वावरून दूर केले. आताही कुमार यांच्याच पक्षाच्या किमान १८ आमदारांस पुन्हा एकदा भाजपची साथसंगत करण्याचा निर्णय मान्य नसल्याचे दिसते.
त्यामुळे या संभाव्य १८ जणांचा खड्डा भरून काढण्यासाठी भाजपने काँग्रेसच्या आमदारांस फोडण्याची तयारी सुरू केल्याच्या बातम्या आहेत. त्यावर संशय घेण्याचे कारण नाही. कारण असे काही केल्याखेरीज बिहारात नव्याने राजकीय स्थैर्य येऊ शकत नाही. मुख्यमंत्री कुमार यांच्या पक्षात २४३ सदस्यांच्या विधानसभेत जेमतेम ४५ आमदार आहेत आणि भाजपप्रणीत आघाडीतील पक्षांकडे ८२. या विधानसभेत सर्वात मोठा पक्ष आहे तो लालूंचा राजद. त्यांच्याकडे ७९ आमदार आहेत आणि काँग्रेस आणि डावे मिळून या आघाडीची सदस्यसंख्या ११४ इतकी आहे. तेव्हा केंद्राच्या हातातील एखादी ‘महाशक्ती’ जोपर्यंत मदतीस येत नाही तोपर्यंत या आघाडीस झगडावे लागेल. त्यात खरी डोकेदुखी असेल ती विधानसभा अध्यक्षांची. महाराष्ट्रात या महत्त्वाच्या पदावरून नाना पटोले यांस दूर होऊ देण्याचा काँग्रेसी अजागळपणा बिहारात लालूंच्या राजदने टाळला. विधानसभेचे अध्यक्षपद लालूंच्या पक्षाचे अवधबिहारी चौधरी यांच्याकडे आहे. तेव्हा सद्य:स्थितीत पक्षांतर बंदी कायदा भंग, आमदारांची अपात्रता वगैरे मुद्दे पुढे आलेच तर लालूंच्या पक्षाच्या या चौधरीबाबूंहाती बरेच काही असेल. नव्या भाजपप्रणीत सरकारात विधानसभा अध्यक्षपद आपल्याकडे असावे अशी मागणी भाजप करताना दिसतो ते यामुळेच. हे झाले बिहारबद्दल.
आता मुद्दा ‘इंडिया’चा. राहुल गांधी यांची यात्रा बिहारात प्रवेश करत असताना नीतीश कुमार यांचे सरकार ‘पाडण्यात’ भाजपस यश येणे हा या यात्रेस अशक्त ठरवण्याचा प्रयत्न हे उघड आहे. तो ओळखून काँग्रेसने नीतीश कुमार यांस आधीच चुचकारण्याची गरज होती. अर्थात पट्टीच्या व्यसनाधीनाचे कितीही प्रबोधन केले तरी ते निरुपयोगी ठरते हे खरे. त्यामुळे काँग्रेसच्या प्रयत्नांस यशाची हमी कधीच नव्हती. त्यात लालू यांच्या कन्येने तोंडसुख घेतल्याचे निमित्त झाले आणि फुरंगटलेले नीतीश कुमार भाजपकडे निघाले. तसे ते निघाले नसते तर त्यांचा ‘उद्धव ठाकरे’ करण्याची भाजपची तयारी सुरू होती. तीतही त्यास यश मिळाले असते. तेव्हा आता नीतीश कुमार यांनी पुन्हा मुख्यमंत्रीपद राखणे, भाजपने ‘इंडिया’ आघाडी त्यामुळे किती तकलादू आहे हे सांगणे आणि नंतर दिल्ली वा पश्चिम बंगाल या राज्यांत याच खेळाचे प्रयोग होणे हे ओघाने आलेच. वास्तविक भाजप म्हणते तशी ‘इंडिया’ आघाडी तकलादू आहे यावर विश्वास ठेवल्यास खरे तर मग त्यास या अशा ‘अ’नीतीश कुमारांची गरजच लागता नये. पण भाजपस या अशांची गरज लागते यात त्या पक्षाचा आत्मविश्वासाचा अभाव आणि विरोधकांची अस्थिरता दिसून येते. या अस्थिरतेत आपल्याकडे अशा ‘अ’नीतीश कुमारांची कधीच कमतरता नसते. मतदार या अशा ‘अ’नीतीशांस किती काळ स्वीकारणार यावर त्यांचे आणि लोकशाहीचेही यशापयश अवलंबून असेल.