परिस्थितीनुसार बदलणाऱ्या माणसांप्रमाणे हवामानही बदलू लागले आणि नक्षत्रांचे देणे झुगारून कसेही वागू लागले, याचे आव्हान १५० वर्षांच्या वेधशाळेपुढे अधिक…

भारतीय परंपरेत हवामान, पर्यावरण यांस कायमच महत्त्व आहे. तैतिरीय उपनिषदांतील ‘‘शं नो वरुण:’’ ही सागर ज्ञानास आवाहन करणारी प्रार्थना असो वा ऋग्वेदातील निसर्गतत्त्वांचे उल्लेख असोत किंवा कालिदासाचा ‘‘आषाढस्य प्रथम दिवसे’’ मेघांमार्फत प्रेयसीस संदेश धाडणारा मेघदूत असो अथवा दिल्ली-जयपुरात महाराजा जयसिंहांनी उभारलेले जंतर-मंतर असो. हवामान हे भारतीय संस्कृतीचा गाभा राहिलेले आहे. आसमंतातच परमेश्वरास पाहणाऱ्या या संस्कृतीत पर्जन्य, वरुण, सूर्य यांना साक्षात देवाचा दर्जा मिळाला. असा परमेश्वरी दर्जा मिळाला की पूजा होते, भक्ती होते. पण अभ्यास बाजूला राहतो. त्याचे शास्त्र होत नाही. भारतीयांचे हवामानाविषयी असे झाले. त्याचे शास्त्र होण्यासाठी इंग्रजांची वाट पाहावी लागली. आजही अनेकांस माहीत नसेल; पण ज्या वेळी १८५७ चे बंड तापत होते त्या वेळी बंगालातील काही अभ्यासक इंग्रजांकडे आम्हास वेधशाळा हवी म्हणून हट्ट धरून होते. एका वेळी तात्या टोपे, झाशीची राणी आदी इंग्रजांविरोधात उठावाची तयारी करत होते त्या वेळी त्यांचेच देशबांधव त्याच इंग्रजांकडे हवामानाभ्यासासाठी शास्त्राधारित संस्था स्थापनेचा आग्रह धरत होते. त्यात त्या काळी बंगाल प्रांतास दोन मोठ्या अवर्षण हंगामांस सामोरे जावे लागले. त्यामुळे हवामान अभ्यासाची गरज अधिकच अधोरेखित झाली आणि या मागणीच्या पूर्ततेस गती आली. ही बाब कौतुकास्पद.

Amit Shah in BJP Shirdi Convention news in marathi
अग्रलेख : दबंग… दयावान?
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Loksatta editorial Donald Trump won US presidential election
अग्रलेख: तो परत आलाय…
loksatta editorial Donald Trump 2024 presidential campaign
अग्रलेख: सुज्ञ की सैतान?
Loksatta editorial about investment decline in Maharashtra
अग्रलेख: महाराष्ट्र मंदावू लागला…
Loksatta editorial Donald Trump victory in the US presidential election
अग्रलेख: अनर्थामागील अर्थ!
mharashtra total registered voters
अग्रलेख : अवघा हलकल्लोळ करावा…
Stampede at Mumbai s Bandra
अग्रलेख: पंचतारांकितांचे पायाभूत

इंग्रजांविरोधातील उठावाचे वर्ष १८५७. देशात पहिली चार विद्यापीठे स्थापन झाली ते आणि हवामानाभ्यासासाठी संस्थेची मागणी पुढे आली ते सालही तेच. यातूनच पुढे हवामान अभ्यासासाठी संस्था उभारण्यास गती आली आणि १८७५ साली १५ जानेवारीच्या दिवशी पहिल्या वेधशाळेची स्थापना झाली. पहिल्यांदा कोलकाता येथे उभी राहिलेली पहिली वेधशाळा पुढे सिमला येथे हलवली गेली आणि नंतर तिचीच शाखा पुणे येथे आकारास आली. पुणे येथील वेधशाळेच्या कार्यालयास ‘सिमला ऑफिस’ असे नाव मिळाले ते यामुळे. या वेधशाळेचा आज १५१ वा वर्धापन दिन. या संस्था निर्मितीसाठी इंग्रजांचे आभार मानता मानता या शास्त्रासमोरील आव्हानांचा परामर्षही यानिमित्ताने घेणे हे कर्तव्य ठरते.

हेही वाचा >>> अग्रलेख : दबंग… दयावान?

अगदी अलीकडेपर्यंत ही वेधशाळा आणि तिचा अंदाज मराठी वाङ्मयातील काही ‘पीजे’ (पांचट जोक्स) निर्मितीचे अथवा व्यंगचित्रकारांचे ‘प्रेरणा’स्थान भले राहिला असेल. ‘‘हवामान खाते मुसळधार पाऊस सांगते आहे म्हणजे छत्री घरी ठेवलेली बरी’’ अशा प्रकारचा उपहास या खात्याने सहन केला असेल. पण गेल्या काही वर्षांत या खात्याची प्रगती लक्षणीय नाही, असे त्या खात्याच्या टीकाकारांसही म्हणता येणार नाही. एके काळी हवामानाचे भाकीत फक्त एक दिवस आधी करण्याची क्षमता असलेली वेधशाळा आता आगामी पाच-पाच दिवसांचा अंदाज अचूक वर्तवते. वास्तविक आपल्यासारख्या प्रचंड, खंडप्राय देशात हवामान अंदाज वर्तवणे कर्मकठीण. मुसळधार पाऊस एकीकडे, दुसरीकडे कडाक्याचे ऊन, तिसरीकडे हिमवर्षाव आणि त्याच वेळी अन्य कोठे पावसाची ओढ असे सारे एकाच वेळी आपल्याकडे असू शकते. त्यात देश अजूनही कृषिप्रधान. त्यामुळे या खात्याचे महत्त्व अधिक. आजही देशाच्या अर्थव्यवस्थेचा तराजू पावसाच्या कमीजास्त बरसातीवर वरखाली होत असतो. फाल्गुनातील हुताशनी पौर्णिमेनंतर अंगाची लाही लाही करणारा सूर्य आकाशातून आग ओकू लागला की सगळ्यांना प्रतीक्षा असते पावसाच्या पहिल्या अंदाजाची. खरे तर प्रत्यक्ष पाऊस सुरू होण्यास महिना-दोन महिने असतात. पण तरीही ‘‘यंदा पावसाळा समाधानकारक’’ या एका वाक्याने अनेकांचा जीव भांड्यात पडतो. नंतर तो पुन्हा अडकतो ‘‘पाऊस अंदमानात/ केरळात अडकला’’ या वाक्याने. आज एकविसाव्या शतकात आधुनिक वगैरे झालेला दोन खोल्यांच्या घरात चार एअर कंडिशनर लावणारा समाज दिलासा शोधतो तो हवामानाच्या अंदाजात. त्यामुळे या खात्यास पहिल्यापासून महत्त्व मिळत गेले. देशातील पहिल्या संगणक-लाभार्थी संस्थांत म्हणून हवामान खाते होते आणि केवळ हवामान अंदाजासाठी अवकाशात उपग्रह पाठवण्याचे भाग्य लाभलेले खातेही तेच होते. तथापि या खात्यास चेहरा मिळाला तो राजीव गांधी यांच्या काळात. त्यांनी डॉ. वसंत गोवारीकर यांच्यासारख्या विशुद्ध विज्ञानप्रेमीकडे ही संस्था सोपवली आणि हवामान खात्याचा प्रतिमाउत्कर्ष सुरू झाला. पुढे वेधशाळेने हवामान अंदाजाची अनेक नवी प्रारूपे बनवली आणि ती यशस्वीही झाली. त्याआधी १९७१ साली ‘भोला’ चक्रीवादळाने बांगलादेशात तीन लाखांचे प्राण गेले, त्याच वर्षी आंध्र आणि ओरिसात चक्रीवादळात जवळपास २० हजार मारले गेले. पण नंतर हवामान खात्याने विकसित केलेल्या चक्रीवादळ अभ्यास केंद्राने या वादळांचा इतका अचूक माग ठेवला की अलीकडच्या चक्रीवादळांची पूर्वसूचना मिळाल्याने सर्वांस सुरक्षित स्थळी हलवता आले. त्या खात्याची हेटाळणी कमी झाली ती तेव्हापासून.

नंतर देशभरात अनेक ठिकाणी हवामान केंद्रे वाढत गेली आणि नवनव्या रडारमार्फत बदलत्या हवामानाचा वेध घेता येऊ लागला. आपण उष्णकटिबंधीय. युरोपप्रमाणे आपले ऋतू उच्छृंखल नाहीत. निदान नव्हते. म्हणजे एकाच दिवसात थोडथोड्या अंतराने पाऊस आणि ऊन आपल्याकडे बारा महिने नसते. म्हणून तर ‘ऊन-पाऊस नागडा’ ठरवण्यापर्यंत आपली मजल गेली. आतापर्यंत चार-चार महिने उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा आपापला संसार थाटत आणि मुदत संपली की काढता पाय घेत. ‘नेमेचि येतो मग पावसाळा’ असे म्हणत ‘हे सृष्टिचे कौतुक जाण बाळा’ असे सांगण्याची सोय तेव्हा होती. पण परिस्थितीनुसार बदलणाऱ्या माणसांप्रमाणे हवामानही बदलू लागले आणि नक्षत्रांचे देणे झुगारून कसेही वागू लागले. एरवी ७ जून रोजी शंभर टक्के येणार म्हणजे येणार याची खात्री असलेला पाऊस ताळतंत्र सोडून वागू लागला आणि मग शिशिरातील मार्गशीर्ष पौर्णिमेसही घाम पुसण्याची वेळ आपल्यावर आली. म्हणजे एके काळी १ तारखेस हाती पगार पडणाऱ्या सरकारी नोकरासारखे इमानदार वागणारे हवामान बेरोजगार होऊन रोजंदारीवर गेले. येथून पुढे हवामान खात्याची परिस्थिती हळूहळू हलाखीची बनली. इतके दिवस पृथ्वीभोवती दुलईसारखा असणारा ओझोनचा तळ पातळ झाला आणि सूर्याची तप्त किरणे कोणताही आडपडदा न ठेवता जमिनीवर येऊ लागली. सौरकुलाच्या अधिपतीचाच पाय घसरला म्हटल्यावर इतरांनी स्थानभ्रष्ट होणे ओघाने आलेच. सध्या आपण ही अवस्था अनुभवत आहोत. पाऊस पावसाळ्याच्या आधी तरी येतो किंवा आला तरी सरळ पडत नाही, पडला तर थांबता थांबत नाही. मग बेभरवशी पावसाने तयार झालेल्या शेवाळ्यावर हिवाळ्याचा पाय घसरतो आणि पुढे उन्हाळाही लडखडतो. हवामानाची ही अशी थेरे १५१ व्या वर्षात पदार्पण करणाऱ्या वेधशाळेसमोर आव्हान निर्माण करणारी आहेत. आज सर्वात मोठे आव्हान आहे ते हवामान बदल हेच. त्यामुळे या बदलत्या हवामानाचा माग ठेवणे ही हवामान खात्याची डोकेदुखी असेल. अनेक विकसित देशांनी या खात्यांसाठी लक्षणीय तरतूद केलेली आहे. आपल्याकडेही ‘स्कायमेट’च्या रूपाने खासगी क्षेत्रसुद्धा हवामान अंदाज क्षेत्रात पाय पसरू लागले आहे. त्या पार्श्वभूमीवर सरकार या खात्यासाठी करत असलेले उपाय आणि तरतूद पुरेशी आहे का हा प्रश्न. अलीकडेच केंद्र सरकारने या खात्यासाठी जेमतेम दोन हजार कोटींची तरतूद केली आणि हे खाते १५१ व्या वर्षात पदार्पण करत असताना केंद्राने ‘मिशन मौसम’ योजना जाहीर केली. हा शतकोत्तरी सुवर्ण महोत्सव समाप्त होत असतानाही काही विशेष घोषणा होतील. ते सर्व आवश्यक. कारण आपणा सर्वांचे भले ‘मौसम है आशिकाना…’ असे वाटू लागण्यात आहे. या अत्यंत महत्त्वाच्या संस्थेस आगामी वाटचालीसाठी शुभेच्छा.

Story img Loader