नदी-तलावाचा पृष्ठभाग व्यापून टाकणाऱ्या जलपर्णीची मुळे एकमेकांत गुंतलेली असतात त्याप्रमाणे भारतीय कंपन्यांच्या उपकंपन्यांची गुंतागुंत असते.

सांप्रत काळी व्यवस्थेच्या दोन परस्परविरोधी टोकांवर असलेले गौतम अदानी, त्यांचे उद्योगसाम्राज्य आणि प्रणव रॉय यांची एनडीटीव्ही कंपनी यांच्यातील संभाव्य संकर शक्यता अनेकांस धक्कादायक वाटणे साहजिक. यानिमित्ताने आर्थिक दांडगाईने एखादी कंपनी ताब्यात घेणे (होस्टाइल टेकओव्हर), कुडमुडय़ा भांडवलशाहीतील बाजारपेठीय नियमन इत्यादी मुद्दय़ांची चर्चा यानिमित्ताने होईलच. ती करण्याआधी एनडीटीव्ही काँग्रेसधार्जिणा आणि म्हणून भाजपविरोधी कसा आहे किंवा अदानी समूहाची भरभराट विद्यमान सरकारच्या काळात कशी झाली वगैरे हेत्वारोपी मुद्दय़ांस स्पर्श करणे टाळायला हवे. आपल्याकडे कोणी कोणावरही टीका केली वा कोणी कोणाचे समर्थन केले की त्यातील मुद्दय़ांकडे संपूर्ण डोळेझाक करून संबंधितांच्या कृत्यांमागील उद्देश शोधला जातो. या असल्या हीन सवयीमुळे माध्यमांतील वा अन्यही टीकाटिप्पणी हेत्वारोपांच्या चष्म्यांतूनच पाहिली जाते. परिणामी निरोगी वादसंवादच आपल्या समाजात आताशा दुरापास्त होऊ लागले आहेत. या वास्तवाचे भान ठेवून एनडीटीव्ही आणि अदानी समूह यांच्यातील या व्यवहाराची चर्चा येथे होईल. दुसरे कारण म्हणजे आपल्याकडे एकूणच अर्थव्यवहारांबाबत असलेली उदासीनता आणि त्यामुळे त्याबाबत साचलेली निरक्षरता. परिणामस्वरूप कोणी तरी खिशात पुरेसे पैसे घेऊन बाजारात गेला आणि त्यास हवे ते विकत घेऊन परतला इतक्याच मर्यादित नजरेने अदानी समूह आणि एनडीटीव्ही यांच्यातील या व्यवहाराकडे पाहिले जाते.

Uddhav Thackeray on PM Narendra Modi
“आधी मणिपूर ‘सेफ’ करा आणि मग…”; उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचं मोदी सरकारवर टीकास्र!
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Liquor and fish stocks seized in Bhayander news
मतदारांना आमिषे दाखविण्यास सुरवात; भाईंदरमध्ये मद्य आणि मासळाची साठा जप्त
Nishigandha Wad
हिंदी मालिकेच्या सेटवर निशिगंधा वाड यांचा अपघात; तातडीने रुग्णालयात केलं दाखल
Rakul Preet Singh opens up about her diet
हळदीच्या पाण्याचे सेवन अन् दुपारच्या जेवणात…; रकुल प्रीत सिंगने सांगितला तिचा डाएट प्लॅन; म्हणाली, “रात्रीचे जेवण…”
Milind Gawali And Teja Devkar
पैसे संपले, अभिनेत्रीला कल्पना न देता निर्माते झाले पसार; नेमकं काय घडलेलं? मराठी अभिनेत्याने सांगितला ‘तो’ प्रसंग
judiciary curb politics Courts Marathi speaking Chief Justice
मनमानी राजकारणावर न्यायव्यवस्था अंकुश ठेवू शकेल?
Numerology: People Born on These Dates Are Blessed by Lord Shani
‘या’ तारखेला जन्मलेल्या लोकांवर असते नेहमी शनि देवाची कृपा

वास्तव यापेक्षा पूर्ण वेगळे आहे. ते समजून घेण्याच्या प्रयत्नांतील पहिला प्रश्न म्हणजे अदानी समूहाकडे एनडीटीव्हीचे सुमारे २९ टक्के समभाग आलेच कसे? ते ना बाजारातून विकले गेले. म्हणजे त्यांची तेथे उघड खरेदी झालेली नाही. ना एनडीटीव्हीच्या कोणा भागधारकाने आपल्याकडील मालकी अदानी समूहास विकली. तरीही या वाहिनीच्या मालकीतील २९ टक्के इतका मोठा समभाग अदानींकडे गेलाच कसा? त्याचे उत्तर दशकभरापूर्वी एनडीटीव्ही कंपनीचे प्रवर्तक प्रणव आणि राधिका रॉय यांनी घेतलेल्या सुमारे ४०० कोटी रुपयांच्या कर्जात आहे. त्या वेळी अपरिचित अशा ‘विश्वप्रधान कमर्शियल प्रायव्हेट लिमिटेड’ या कंपनीने रॉय दम्पतीच्या कंपनीस हे कर्ज दिले. यानंतरचा नैसर्गिक प्रश्न असा की मुळात या ‘विश्वप्रधान’कडे ‘एनडीटीव्ही’ला देण्यासाठी ४०० कोटी इतकी- तेही विनातारण कर्जाऊ- भरभक्कम रक्कम आली कोठून? तर ते दिले ‘शिनानो रिटेल प्रायव्हेट लिमिटेड’ या कंपनीने. तेही विनातारणच. तर मग ‘शिनानो’कडे हे पैसे येण्याचा स्रोत काय? ते दिले ‘रिलायन्स इंडस्ट्रियल इन्व्हेस्टमेंट्स आणि होिल्डग लिमिटेड’ या कंपनीने. तेही अर्थातच विनातारण. आता या नावावरून काय ते स्पष्ट व्हावे. या ‘शिनानो’स ज्या ‘रिलायन्स’ नामक कंपनीने पैसे पुरवले ती ‘रिलायन्स’नामे कंपनी मुकेश अंबानी-चलित ‘रिलायन्स’ समूहाच्या साम्राज्याचा भाग आहे. या सगळय़ांची एकमेकांत इतकी सरमिसळ आहे की बऱ्याच प्रकरणांत त्यांच्या पदाधिकाऱ्यांची नावे वा कार्यालयांचे पत्ते हेदेखील एकसारखे आहेत.

एका चक्रामध्ये अनेक लहान-मोठी चक्रे असावीत त्याप्रमाणे भारतीय कंपन्या अनेक उपकंपन्या, त्यांच्या उपकंपन्या अशी उतरंड रचून मालकी विभागतात. यात गैर वा बेकायदेशीर काहीही नाही. पण या सुनियोजित गुंतागुंतीचा एक ‘फायदा’ असा की त्यामुळे वेळप्रसंगी काही एक मुद्दय़ांवर सत्य/तथ्य शोधणे कमालीचे अवघड होऊन बसते. नदी-तलावाचा पृष्ठभाग व्यापून टाकणाऱ्या जलपर्णीची मुळे जशी एकमेकांत गुंतलेली असतात त्याप्रमाणे भारतीय कंपन्यांच्या उपकंपन्यांची गुंतागुंत असते. तिचा पुढचा भाग या ‘विश्वप्रधान’ची मालकी बदलल्यावर घडला. ती मालकी ज्या दोन कंपन्यांकडे गेली त्यांचे नेतृत्व करणारे ‘रिलायन्स’ची दूरसंचार सेवा कंपनी ‘जिओ’शी संबंधित होते. त्यांनी या व्यवहारात ‘विश्वप्रधान’ जे ‘शिनानो’स देणे लागत होती, तेही स्वत:कडे घेतले. ते घेताना प्रत्यक्ष किती पैशाची देवाणघेवाण झाली वा झालीच नाही, याचा तपशील उपलब्ध नाही. परंतु त्यानंतर ‘विश्वप्रधान’च्या डोक्यावरील आपले कर्ज फिटल्याचे ‘शिनानो’ने जाहीर केले. यातील ‘विश्वप्रधान’कडून घेतलेले कर्ज परत फेडण्याची गरज रॉय दाम्पत्यास मुळातच नव्हती. याचे कारण हे कर्ज फेडले नाही तर त्याचे रूपांतर राधिका रॉय-प्रणव रॉय यांच्याकडील समभागांत करण्याची तरतूद मूळ करारातच होती. म्हणजे कर्जाच्या रकमेच्या बदल्यात काही प्रमाणात कंपनीची मालकी संबंधितांस दिली जाईल, असा त्याचा अर्थ. तेच नेमके अदानी समूहाने केले. त्यांनी फक्त ‘विश्वप्रधान’ ताब्यात घेतली. आणि ज्या अर्थी ‘विश्वप्रधान’ने रॉय दम्पतीस दिलेल्या कर्जाचे रूपांतर मालकी अंशात करण्याची तरतूद आहे त्या अर्थी ‘विश्वप्रधान’ची मालकी हाती आल्याने अदानी समूहाकडे ‘एनडीटीव्ही’च्या मालकीचा लक्षणीय वाटा अलगद आला. झाले ते इतकेच. पण यानिमित्ताने काही गंभीर प्रश्न निर्माण होतात. त्यातील पहिला आणि अत्यंत महत्त्वाचा मुद्दा अंबानी आणि अदानी यांच्यातील संबंधांचा.

हे दोघे एकमेकांचे उद्योग-स्पर्धक. कारणे काहीही असोत. पण भारतीय उद्योग क्षेत्रावरील अंबानींची पकड २०१४ पासून सैल कोणी केली असेल तर ती अदानी यांनी. आता तर धनवानांच्या जागतिक यादीतही हे दोघे एकमेकांशी स्पर्धा करताना दिसतात. एखादे विमानतळ वा किराणा व्यवस्थापनासारखे क्षेत्र वगळल्यास- ज्यात अंबानी समूह वा अदानी तूर्त तरी नाही- हे दोघे उद्योगसमूह एकमेकांशी स्पर्धा करताना दिसतात. माध्यम क्षेत्रातही अंबानी यांच्यापाठोपाठ अदानीदेखील समरसून स्पर्धेत उतरले. असे आणि इतके असताना अंबानी यांनी आपल्याकडील ‘एनडीटीव्ही’ची मालकी अदानी यांच्यासाठी इतकी सहजासहजी कशी काय सोडली? इतकी वर्षे खरे तर ‘एनडीटीव्ही’चा इतका मोठा हिस्सा प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे अंबानी यांच्या हाती आहे. त्यात एक कपर्दिकेचाही नफा करून न घेता तो सहजासहजी अदानी यांच्या हाती पडतो ही एकमेव बाबसुद्धा खरे तर अनेकांच्या भुवया उंचावण्यास पुरेशी आहे. पण याबाबत सार्वत्रिक शांतता दिसते. ती अनेक शंका-कुशंकास जन्म देणारी आहे. दुसरा मुद्दा अदानी समूहाच्या अर्थस्थितीचा. आंतरराष्ट्रीय मानांकन संस्था ‘फिच’कडून अदानी समूहाच्या डोक्यावरील कर्जाच्या बोजाबाबत चिंता व्यक्त झालेली असतानाच या समूहाने आणखी एका उद्योगास हात घातल्याचे वृत्त आले. ते आपल्या बँकिंग उद्योगाच्या आरोग्याची चिंता वाढवणारे आहे ‘अदानी समूहाने आपल्या पतक्षमतेपेक्षा किती तरी अधिक कर्जे घेतली आहेत’ (अदानी ग्रुप इज ओव्हर लेव्हरेज्ड) असे मत ‘फिच’ नोंदवते. ‘परिणामी ज्या क्षेत्रातील कार्याचा कसलाही अनुभव नाही, अशाही क्षेत्रास या समूहाने हात घातला असून मोठी कर्जे घेऊन गुंतवणूक केली आहे. यातून हा समूह कर्जाच्या सापळय़ात अडकण्याचा धोका संभवतो’ इतक्या नि:संदिग्धपणे हा अहवाल धोक्याचा इशारा देतो. कित्येक लाख कोटी रुपयांची कर्जे या समूहाच्या डोक्यावर आहेत. या पार्श्वभूमीवर अदानी-एनडीटीव्ही संभाव्य संबंधांचा विचार व्हायला हवा. अदानीचे स्पर्धक अंबानी यांच्या हाती एक माध्यम समूह आहे. ‘एनडीटीव्ही’चा व्यवहार पुढे गेल्यास त्या माध्यम समूहाचा ताबा अंबानी प्रतिस्पर्धी अदानींकडे जाईल. म्हणजे या दोन प्रतिस्पर्ध्यात देशातील माध्यमविश्वाची वाटणी होईल. हिंदी भाषिक श्रद्धावान ‘सब भूमी गोपाल की’ असे म्हणतात. त्याच धर्तीवर यापुढे माध्यमांच्या भूमीचे काय होईल, हे सांगणे न लगे!